ज्वालमाला : (फॅक्युली). पुरेसे संरक्षण डोळ्यांना घेऊन दूरदर्शकातून सूर्यबिंबाकडे पाहिल्यास सर्वसाधारण पृष्ठभागापेक्षा अधिक तेजस्वी असे पांढरे भाग बिंबावर दिसतात, त्यांना ज्वालमाला म्हणतात. सूर्यावरील काळ्या डागांशी त्या निगडित असतात त्यामुळे डागांच्या भोवती तर त्या असतातच पण भिन्न क्षेत्रात स्वतंत्रपणेसुद्धा त्यांचे अस्तित्व आढळते. डागांपेक्षा ज्वालमाला बऱ्याच जास्त काळ (कित्येक महिने) टिकतात. ⇨दीप्तिगोलापासून थोड्या अंतरावर, तुलनेने थोड्या थंड असलेल्या वातावरणात तरंगणारे अत्युच्च तापमानाच्या वायूचे हे ढग असावेत, अशी कल्पना आहे. या ज्वालमाला किंचित उठावाच्या स्वरूपात असल्याने व बिंबाच्या कडेचा भाग तौलनिक दृष्ट्या कमी तेजस्वी असल्याने बिंबाच्या कडेवर ज्वालमाला ठळकपणे दिसतात. गॅलिलीओ यांनी या प्रथम पाहिल्या. यांनाच अतिभा किंवा तेजोबिंदू असेही नाव आहे.

पहा : सूर्य. 

काजरेकर, स. ग.