कुंभ : (ॲक्वॅरियस). राशीचक्रातील अकरावी रास. तिच्यात धनिष्ठेचा तिसरा आणि चौथा चरण (चतुर्थांश), शततारका व पूर्वा भाद्रपदाचे पहिले तीन चरण अशी सव्वादोन नक्षत्रे येतात. कुंभेतील शनी स्वगृहीचा समजतात. कुंभ घेऊन उभा असलेला माणूस हे या राशीचे प्रतीक आहे. ही रास स्थिर असून तिचा शूद्र वर्ण मानतात. १३ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत सूर्य निरयन कुंभ राशीत असतो. तिच्यात सहाव्या प्रतीपर्यंतचे [→प्रत] पंचेचाळीस तारे आहेत. मात्र आल्फा (सादलमेलिक, प्रत ३·१९), बीटा (सादलसूद, प्रत ३·०७), गॅमा (सादकबिया, प्रत ३·९७), डेल्टा (स्केत, प्रत ३·५१), थीटा (अँका, प्रत ४·३२) आणि लॅम्डा (प्रत ३·८) एवढेच तारे काहीसे ठळक असून तिच्यात आकर्षक रंगीत तारकायुग्मे, काही चल (भासमान प्रत स्थिर नसलेले) तारे (आर ॲक्वॅरी), सॅटर्न बिंबाभ्रिका (एनजीसी ७,००९) व गोलसर (एम २) तारकागुच्छही आहेत. हॅली धूमकेतूशी संबंधित असलेली व मेमध्ये होणारी ईटा-ॲक्वॅरीड आणि जुलैत दिसणारी लॅम्डा-ॲक्वॅरीड या उल्कावृष्टींचे उद्‍गम बिंदू याच राशीत येतात [→ उल्का व अशनि]. हर्शेल यांनी प्रजापती हा ग्रह शोधून काढला तेव्हा तो कुंभ राशीत होता. प्राचीन संस्कृतींमध्ये पावसाळ्याचा तर ईजिप्तमध्ये नाईलला येणाऱ्या पुराचा या राशीशी संबंध जोडला जाई. ग्रीक पुराणकथेनुसार गॅनिमिडाने देवांसाठी गरूडावरून नेलेला अमृतकुंभ म्हणजेच हा कुंभ होय. या राशीचा बहुतेक सर्व भाग खगोलीय विषुववृत्ताच्या दक्षिणेस होरा [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] २० तास ३० मिनिटे ते २४ तास या दरम्यान दिसतो. 

पहा: राशिचक्र

ठाकूर, अ. ना.