भुजंगधारी : खगोलीय विषुवृत्तावरील एक फार मोठा (क्षेत्रफळ सु. ९४८ चौरस अंश) परंतु अंधुक तारकासमूह. टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांपैकी हा एक आहे. हा मुख्यत्वे खगोलीय विषुववृत्ताच्या दक्षिणेस शौरी व तूळ यांच्या दरम्यान असून दक्षिणेकडे हा वृश्चिक व धनू यांच्या दरम्यान क्रांतीवृत्तापर्यंत (पृथ्वीच्या कक्षेची पातळी खगोलास ज्या वर्तुळास छेदते त्या वर्तुळापर्यंत) पसरलेला आहे. याचा काही भाग आकाशगंगेच्या पट्‍ट्यापर्यंत गेलेला असून त्या भागात तेजोमेघ [⟶ अभ्रिका] आणि तारकागुच्छ दिसतात. ग्रीक पुराणकथांतील एस्क्यलेपीअन या वैद्यकाच्या देवतेवरून याचे ऑफियुचस हे पाश्चात्त्य नाव आले आहे. मोठे अथवा विशेष महत्त्वाचे तारे यात नाहीत. यामध्ये २ ते ६ प्रतीपर्यंतचे [⟶ प्रत] ३२ तारे असून २ प्रतीच्या तीन ताऱ्यांपैकी सर्वांत तेजस्वी आल्फा ताऱ्याला रास लव्हेग्वी म्हणतात. यातील सात तारे तीन प्रतीचे असून यात अनेक युग्मतारे (एकमेकांच्या आकर्षणाने त्यांच्या समाईक गुरुत्वमध्याभोवती फिरणाऱ्या ताऱ्यांच्या जोड्या), कित्येक तारकागुच्छ व अभ्रिका आहेत. ३९ ऑफियुची या युग्मताऱ्याचे नारिंगी (प्रत ५.५) व निळा (प्रत ६) हे आणि ७० ऑफियुची युग्मताऱ्याचे पिवळसर लघुतारे [प्रत ५.७२ व ३.९७ ⟶ तारा] सहचर आहेत. भुजंगधारीतील एम १९ तारकागुच्छाचा व्यास ५’ आहे. केप्लर यांना १६०४ साली याच समुहाच्या आग्‍नेय भागात सर्वांत अलीकडच्या काळातील अतिदीप्त नवतारा (अंतर्गत स्फोटामुळे ज्याची तेजस्विता अचानकपणे सु. ४ कोटी पट वाढते असा तारा) दिसला होता, म्हणून त्याला ‘केप्लर तारा’ म्हणतात. त्याची तेजस्विता कमाल असताना तो गुरूपेक्षा अधिक तेजस्वी दिसत होता [⟶ नवतारा व अतिदीप्त नवतारा]. भुजंगधारी क्रांतिवृत्तावर असला तरी त्याचा राशिचक्रात समावेश केलेला नाही. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात रात्री नवाच्या सुमारास हा याम्योत्तर वृत्तावर (खगोलाचे ध्रुवबिंदू व निरीक्षकाचे खस्वस्तिक-माथ्यावरील बिंदू-यांतून जाणाऱ्या वर्तुळावर) येतो. सूर्य नोव्हेंबरअखेर ते डिसेंबर या कालावधीत या तारकासमूहातून जातो.

ठाकूर, अ. ना