मेष : (एरिज). भारतीय राशिचक्रातील पहिली रास. अश्विनी व भरणी ही नक्षत्रे व कृतिकेचा पहिला चरण अशी सव्वादोन नक्षत्रे या राशीत येतात. मेंढा ही राशीची आकृती समजतात. खगोलीय विषुववृत्ताच्या किंचित उत्तरेस असलेल्या या राशीचा मध्य होरा २ ता. ३० मि. व क्रांती ३०° उ. [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] या ठिकाणी येतो. या तारकासमूहात चौथ्या प्रतीहून [→ प्रत] अधिक तेजस्वी तारे थोडेच आहेत. उदा., आल्फा एरिटीज (हॅमल होरा २ ता. ४ मि.१४ से. व क्रांती २३° १३ उ.) प्रत २·२३, बीटा एरिटीज (शेरतन) प्रत २·३२ व गॅमा एरिटीज (मेझार्हिम) प्रत सु. ४ या तीन ताऱ्यांचे अश्विनी हे नक्षत्र असून मेषेतील ३९, ४१ व म्यूहे तारे भरणी नक्षत्रातील आहेत. ही रास डिसेंबरमध्ये साधारणपणे रात्री नऊच्या सुमारास मध्यमंडलावर (खगोलाचे ध्रुवबिंदू व खमध्य यांतून जाणाऱ्या खगोलावरच्या वर्तुळावर) येते. निरयन (संपात चलन लक्षात न घेता येणाऱ्या) मेष राशीत सूर्य १३ एप्रिल ते १४ मे पर्यंत असतो. इ. स. पू. सु. दुसऱ्या शतकात राशिचक्र रूढ झाले तेव्हा वसंत संपात [क्रांतिवृत्त-सूर्याचा भासमान वार्षिक मार्ग-व खगोलीय विषववृत्त यांच्या ज्या छेदन बिंदूपाशी सूर्य विषुववृत्ताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो तो बिंदू → संपात] मेष राशीत होता. संपाताला विलोम (उलटी) गती असून तो आता बराच पश्चिमेकडे सरकल्याने मीन राशीत आलेला आहे [→ संपातचलन]. आणखी सु.२२ हजार वर्षांनी तो पुन्हा मेष राशीत येईल. असे असले, तरी वसंत संपाताला मेषादी बिंदू (व पर्यायाने मेषेला पहिली रास) मानतात.

फलज्योतिषाच्या दृष्टीने मंगळ हा या राशीचा स्वामी असून हिच्यात रवी उच्चीचा व शनी नीचेचा मानतात. तसेच या राशीवर जन्मलेली व्यक्ती धाडसी, करारी, महत्त्वाकांशी व चिडखोर असते, असे मानतात.

पहा : राशिचक्र संपात.

ठाकूर, अ.ना.