रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यक : वैद्यकशास्त्राच्या या शाखेमध्ये रोगप्रतिबंध व स्वास्थ्यसंवर्धन यांचा शास्त्र व व्यवहार या दृष्टीने विचार करण्यात येतो.

सार्वजनिक आरोग्याची जपणूक आणि संवर्धन ही एक सामाजिक स्वरूपाची व योजनाबद्ध रीतीने राबविण्याची महत्त्वाची संकल्पना आहे. व्यक्तिगत पातळीवरील स्वास्थ्यसंवर्धनाच्या उपाययोजनांच्या प्रयत्नात या संकल्पनेचा उगम असला, तरी लवकरच सामूहिक व सामाजिक स्तरांवर त्याची गरज व उपयुक्तता वाटू लागली. शासकीय यंत्रणेमार्फत त्यासंबंधीची देखरेख गरजेची ठरू लागली. सुरुवातीस या कार्यवाहीच्या उपक्रमांचे स्वरूप सांसर्गिक रोगांवरील प्रतिबंधक उपय योजिणे एवढेच मर्यादित होते. 

आता विज्ञानातील विस्तृत प्रगतीमुळे त्यांत फार मोठा बदल झाला आहे. प्रगत, प्रगतीशील व त्यामानाने अप्रगत असलेल्या राष्ट्रांमध्ये या वैद्यकासंबंधीच्या दृष्टिकोनात व उपाययोजनांत आजही फरक आढळत असले, तरी त्याचे स्वरूप निर्विवादपणे व्यापक झाले आहे. उदा., उपाययोजनांची व्याप्ती कुटुंब किंवा गावपातळीवर मर्यादित न राहाता त्या जिल्हा, राज्य, देश व जागतिक स्तरावर सुसूत्रपणे करणे, त्यासाठी दूरसंदेशवहन, संगणक अशा आधुनिक विज्ञान-तंत्रविद्येतील साधनांचा वापर करणे तसेच केवळ शासकीय व ⇨जागतिक आरोग्य संघटनेसारख्या जागतिक संघटनांमार्फत उपयायोजना अमलात आणणे असे त्याचे स्वरूप न राहता किती तरी देशी व विदेशी सेवाभावी संस्था त्यात सहभागी होऊ लागल्या आहेत. त्याचप्रमाणे सांसर्गिक रोगांवरील प्रतिबंधक उपाय करणे असे मर्यादित स्वरूप न राहता रोगपरिस्थितिविज्ञान (एखाद्या जनसमूहातील रोगाचा उद्‌भव, त्याचा प्रसार व नियंत्रण यांच्या संबंधीची वैद्यकाची शाखा), आनुवंशिकी, पर्यावरणविज्ञान याबरोबरच सांस्कृतिक वारशाचा समाजावर होणारा परिणाम यांचाही विचार करणे आता क्रमप्राप्त झाले आहे. इतरही अनेक बाबतींत बदल आवश्यक ठरले आहेत. उदा., रोगाचे अभिज्ञान (अस्तित्व ओळखणे) व लवकरच्या अवस्थेत निदान करण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर, सांसर्गिक रोगांबरोबर अ-सांसर्गिक रोगांचाही प्रतिबंध करण्याचे प्रयत्न करणे आजाऱ्याची काळजी घेण्याच्या पद्धतीतील बदल, आजारातून बरे झालेल्यांच्या गरजेनुसार विविध पद्धतींनी त्यांचे पुनर्वसन करणे आणि रोग्याला रोगातून मुक्त झाल्यानंतर समाजाचा एक घटक म्हणून जगू देण्यासाठी व शक्यतेनुसार त्याला समाजाचा एक उपयोगीघटक म्हणूनही जगण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना करणे अशा अनेक बदलांनी या वैद्यक शाखेचे स्वरूप केवढे तरी व्यापक झाले आहे. तशातच शास्त्रीय प्रगतीनुसार नवनव्या प्रश्नांना सामोरे जाणे व त्यावर नवनव्या उपाययोजना करणे हेही या वैद्यकशाखेला एक आव्हान निर्माण झाले आहे. त्यानुसार लोकांच्या सहभागाच्या स्वरूपातही महत्त्वाचे बदल होऊ लागले आहेत. एकेकाळी आरोग्यखाते, दवाखाने, रुग्णालये यांतून काम करणारे किंवा व्यावसायिक एवढेच लोक ही जबाबदारी उचलण्यास आवश्यक मानले जात असत. त्यांनी ती जबाबदारी स्वीकारणे स्वाभाविक आहे पण आता गरजेपोटी प्रशिक्षित सामाजिक वैद्यकीय कार्यकर्त्यांच्या सेवा देशोदेशीच्या परिस्थितिमानानुसार घेण्यातयेऊ लागल्या आहेत. विविध स्तरांवर व मोठ्या प्रमाणावर असे प्रशिक्षित कार्यकर्ते रोगप्रतिबंधक व सामाजिक वैद्यकाचे काम करू लागले आहेत. या सर्वांमुळे रोगप्रतिबंधक व स्वास्थ्यसंवर्धन परिणामकारक रीतीने होऊ लागले आहे.

या वैद्यकशाखेचा उगम, शास्त्रीय प्रगती व सामाजिक गरजांच्या रेट्याने त्यात झालेल्या संक्रामणाचा इतिहास व उपाय पद्धतींचे संक्षिप्त वर्णन खाली दिले आहे. 


इतिहास : प्रकृती सुदृढ रहावी, रोग होऊ नयेत यांसंबंधीच्या कल्पना वैद्यकाइतक्याच प्राचीन असून त्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनादि कालापासून प्रचारात आहेत. जगातील सर्व प्राचीन वाङ्‌मयांत आहारनिद्रादि नैसर्गिक प्रवृत्तीसंबंधी नियमनिर्बंध आढळतात त्यांपैकी कित्येकांचा अंतर्भाव धर्माचरणात केला गेला आहे. अशा निर्बधांचे महत्त्व आज आपणास वाटत नसले, तरी त्या काळातील जनतेच्या अतिजीवनास व उत्कर्षास ते नियम निःसंशय उपकारक झाले असले पाहिजेत.

या नियमनिर्बंधांपैकी कित्येक गाढ अनुभवावर आधारलेले असून शतकानुशतके त्यांत भर पडत गेली. काहींना कल्पनेशिवाय दुसरा आधारच नव्हता. ही स्थिती सु. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत अशीच टिकली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ⇨लुई पाश्चर व ⇨रॉबर्ट कॉख यांच्या संशोधनामुळे रोगकारकांविषयीच्या कल्पनांत क्रांती घडून आली आणि कित्येक रोग सूक्ष्मजंतूंमुळे होतात ही गोष्ट सर्वमान्य झाली. रोगजंतूंचा शरीरात प्रवेश होऊ दिला नाही, तर ते रोग होणारच नाहीत हा विचार ओघानेच आला. काहींच्या मते रोगप्रतिबंधक शास्त्राचा व लशींचा जन्म प्रथम पशुवैद्यकशास्त्रानेच घडवून आणला [⟶ लस व अंतःक्रामण]. १८९३ मध्ये थीओबॉल्ड स्मिथ यांनी कीटकांद्वारे होणाऱ्या रोग संक्रामणाची तत्त्वे प्रस्थापित केली. आंत्रज्वराकरिता (टायफॉइड ज्वराकरिता) विडाल विक्रिया आणि उपदंशाकरिता वासरमान परीक्षा यांसारख्या रक्तरस-परीक्षा विकसित करण्यात आल्या. त्यापूर्वीच्या काळात स्वच्छता ही सौंदर्यसाधनेसाठी किंवा तिचा स्वास्थ्याशी काही संबंध असावा या अस्पष्ट कल्पनेसाठी ठेवली जाई. नवीन शोधामुळे सार्वजनिक स्वच्छतेच्या कल्पनांना भक्कम आधार मिळून त्यासाठी कायदे करण्यात आले. जर्मनीसारख्या काही देशांत या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले. जेथे जेथे या कायद्यांचे परिपालन परिणामकारक रीतीने झाले तेथे पचन तंत्राच्या (संस्थेच्या) विकारांचे (उदा., आंत्रज्वर, आव, पटकी) प्रमाण पुष्कळ कमी झाले. रोगप्रतिकारक्षमतेची तत्त्वे समजल्यावर प्रतिबंधक लशींचे शोध लागून त्यांच्यामुळे रोगप्रतिबंधाचे क्षेत्र अधिक विस्तीर्ण झाले. रोगचिकित्सेमध्ये झालेल्या समांतर प्रगतीमुळे (उदा., घटसर्पावरील प्रतिविष एमिल फोन बेरिंग यांनी, तर उपदंशावरील साल्व्हरसान हे औषध पॉल अर्लिक यांनी शोधून काढले) रोगप्रतिबंधाकरिता नवीन मार्ग निर्माण झाले. १९३२ मध्ये सल्फॉनामाइड औषधांमुळे आणि पुढे पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन, क्लोरटेट्रासायक्लीन, क्लोरँफिनिकॉल इ. प्रतिजैव पदार्थांमुळे (अँटिबायॉटिक्समुळे) रोगप्रतिबंध व उपचार या दृष्टींनी नवीन संधी उत्पन्न झाल्या.

रोगप्रतिबंधक वैद्यकाचे हे स्वरूप विसाव्या शतकाच्या पहिल्या तीसपस्तीस वर्षांपर्यंत टिकले. या काळात प्रतिबंधक वैद्यक आणि सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य ही एकच मानली जात. स्वच्छता व लस टोचणे ही साधने, आरोग्य खात्यातील कर्मचारी यांचा हा व्यवसाय व सर्वसाधारण समाज हे त्यांचे कार्यक्षेत्र, असे मानले जाई. गरोदर स्त्रिया व बालके यांच्यासाठी काही वैयक्तिक सुखसोई उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, तरी सामान्य वैद्यक-व्यावसायिक आपल्या रोगनिदान व चिकित्सा याच कार्चात निमग्न असून सार्वजनिक आरोग्यासंबंधी आपले काही कर्तव्य आहे याची त्याला जाणीव नव्हती. 

अशी परिस्थिती असल्यामुळे रोगप्रतिबंधाच्या अनेक संधी वाया जात. वैद्याने प्रतिबंधक उपायांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे, नुसत्या सार्वजनिक स्वच्छतेवर व लस टोचण्यावर अवलंबून राहणे योग्य नव्हे, हा विचार पुढे आला. दुसऱ्या महायुद्धानंतर जी प्रचंड सामाजिक उलथापालथ झाली, तीमुळे या विचारांना विशेष चालना मिळाली. उद्ध्वस्त यूरोपाचे पुनर्वसन करीत असताना आलेले अनुभव, जगात चिरकालीन शांतता प्रस्थापित व्हावी अशी प्रबल इच्छा व उदार मानवतावादी प्रेरणा या सर्वांचा परिणाम होऊन केवळ मानव्याच्या विचारलाच प्राधान्य मिळून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात संयुक्त राष्ट्रांची शाखा म्हणून जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली. त्याच अनुषंगाने वैद्यकीय शिक्षणक्रमाचा फेरविचार होऊन ‘रोगप्रतिबंधक वैद्यक’ या विषयाला त्या शिक्षणक्षेत्रात विशेष स्थान प्राप्त झाले. प्रथम यूरोप व अमेरिका या खंडांत या नवीन कल्पना प्रत्यक्षात आणल्या गेल्या हळूहळू त्यांचा स्वीकार भारतादि इतर देशांतही झाला.


 

इ. स. १९०० नंतर रोगप्रतिबंधक वैद्यकात संसर्गजन्य रोगांखेरीज इतर प्रकारच्या रोगांबाबतही विविध प्रकारे प्रगती झाली. रोगनिदानात व उपचारात (उदा., क्षयरोग व कर्करोग) तसेच मूलभूत शरीरक्रियात्मक संशोधनात क्ष-किरण व किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारी) द्रव्ये यांच्या करण्यात आलेल्या उपयोगामुळे नवीन शक्यता निर्माण झाल्या. ⇨अंतःस्त्रावी ग्रंथींच्या कार्याचे अधिक आकलन झाल्यावर आणि इन्शुलीन, ⇨ अवटू ग्रंथी आणि ⇨पोष ग्रंथी यांचे अर्क व ⇨हॉर्मोने तयार करण्यात आल्यावर काही विशिष्ट चयापचयजन्य विकारांच्या [⟶ चयापचय] बाबतीत प्रतिबंधक उपाय योजणे शक्य होऊ लागले. आरोग्य व रोग यांतील पोषणाचे स्थान आणि कित्येक आवश्यक अन्न घटकांचे विलगीकरण यांमुळे पुरेशा आहाराचे आरोग्यातील महत्त्व स्पष्ट झाले. याखेरीज रोगप्रतिबंधक वैद्यकामध्ये विसाव्या शतकात झालेल्या प्रगतीत समग्र आरोग्यातील मानसिक घटकांच्या महत्त्वाला मिळालेली व्यापक मान्यता, नवीन शस्त्रक्रिया तंत्रे, शुद्धिहरणाच्या (भूल देण्याच्या) नवीन पद्धती, आनुवंशिकीविषयक संशोधन व वैद्यकीय समस्यांतील संख्याशास्त्रीय पद्धतींचा उपयोग यांचाही अंतर्भाव होतो.

कार्यक्षेत्र : रोगप्रतिबंधक वैद्यक व सार्वजनिक आरोग्यशास्त्र ही दोन स्वतंत्र शास्त्र असून पहिले व्यक्तीपुरते मर्यादित व खासगी व्यावसायिक वैद्याचे क्षेत्र मानले जाते, तर दुसरे सर्वसमाजव्यापी व पूर्णकालिक सवेतन अशा राज्य अथवा स्थानिक संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे क्षेत्र मानले जाते. वैद्याचा संबंध रोगी व त्याची दैनंदिन लक्षणे यांच्याशी येतो, तर आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांचा संबंध शासनाशी येत असतो.

याप्रमाणे वैद्य व आरोग्य कर्मचारी यांची क्षेत्रे स्थूलतः स्वतंत्र असली, तरी ती एकमेकांशी संलग्न असून त्यांच्या मर्यादा निराळ्या दाखविता येत नसल्यामुळे या दोघांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. ज्या देशांत खासगी वैद्यकव्यवसाय अस्तित्वात नाही तेथे हे सहकार्य पूर्णत्वाने होणे शक्य असते. दोघांचेही समान उद्दिष्ट समाजावरील रोगाचे संकट कमी करणे हेच असते. रोगचिकित्सा व रोगप्रतिबंध यांमधील पूर्वीची स्पर्धा आता कमी होत चालली असून त्यांची क्षेत्रे स्वतंत्र टिकविण्यापेक्षा एकजुटीने कार्य करण्यावरच अधिक भर दिला जातो.

इतर सामाजिक शास्त्रांशी संबंध : रोगाची नजिकची व दूरची कारणे कोणती याचे ज्ञान असणे रोगप्रतिबंधासाठी अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी वैद्यकीय शिक्षणात रोगाच्या सामाजिक कारणांसंबंधी फारशी चर्चा नसे. विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षण रुग्णालयातच होत असल्यामुळे त्यांन रोग्यांच्या घरांची व भोवतालची परिस्थिती कशी आहे याचे काही ज्ञान नसे. त्यामुळे त्या परिस्थितीचा रोगाच्या उत्पत्तीशी काय संबंध आहे किंवा रोगी रुग्णालयातून बरा होऊन परत गेल्यानंतर पुन्हा का आजारी पडतो यासंबंधी विद्यार्थ्यांना काही कल्पना येणे शक्य होत नसे. शिक्षण संपवून स्वतंत्र व्यवसाय करू लागल्यावरच त्यांना या गोष्टींची तीव्रतेने जाणीव होई. आता आधुनिक वैद्यकीय शिक्षणात ‘सामाजिक वैद्यक’ असा नवीन विषयच नेमण्यात आला असून त्यात रोगांची सामाजिक कारणे, त्यांचा होणारा परिणाम व रोगप्रतिबंधासाठी जरूर असलेल्या सामाजिक तरतुदी यांसंबंधी विशेष शिक्षण देण्यात येते. यामुळे समाजाचे घटक या नात्याने प्रतिबंधक उपायांचा प्रारंभ व समर्थन करण्याची जबाबदारी वैद्यांवर पडते, याची जाणीव उत्पन्न झाली आहे.

सामाजिक परिस्थितिचा परिणाम स्वास्थ्यावर कसा होतो याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना सामाजिक वैद्यकीय कार्यकर्त्यांकडून दिले जाते. विद्यार्थीही रोग्याच्या घरी जाऊन तेथील परिस्थितीचे प्रत्यक्ष अवलोकन करू शकतात त्यामुळे या प्रश्नांसंबंधी काय व कसे उपाय केले जातात, याचे समक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना होते. विशिष्ट सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी विशिष्ट यंत्रणा कसे कार्य करते हेही विद्यार्थ्यांना समजू शकते. उदा., अनाथ मुले, विधवा व अविवाहित माता यांच्यावरील आपत्तिनिवारणार्थ कार्य करीत असलेली यंत्रणा, अपंगांचे पुनर्वसन, चिरकाल आजारामुळे कुटुंबाला जरूर असलेली मदत किंवा दुखण्यातून नुकत्याच उठलेल्यांना हवापालट व विश्रांती देण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न असे अनेकविध प्रश्न विद्यार्थ्यांना माहीत होऊ शकतात. सामाजिक वैद्यकीय कार्यकर्त्यांचा या विविध यंत्रणांशी नेहमी संबंध येत असल्यामुळे हे प्रश्न कसे हाताळले जातात, हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहण्यास मिळाल्यामुळे पुढे व्यवसाय सुरू केल्यावर अशा प्रश्नांना तोंड देण्याची त्यांची अधिक तयारी असते.


रोगप्रतिबंधक वैद्यकाचा समाजशास्त्राशी आणखी एका बाबतीत संबंध येतो. वैद्यकीय शिक्षणात सामाजिक मनःप्रवृत्तींचा अभ्यास असा एक विषय ठेवलेला आहे, कारण लोगजागृती हे रोगप्रतिबंधक वैद्यकाला आधारभूतच आहे. कोणत्या चालीरीती रोगकारक आहेत व त्या हळूहळू बदलून स्वास्थ्यसंवर्धन कसे करता येईल यांसंबंधी लोकमत जागृत करणे आणि हे करीत असताना समाजघटकांवर कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो ते अभ्यासून त्यानुरूप लोकजागृती करीत राहणे, या सर्व गोष्टींचा या विषयात अंतर्भाव केलेला आहे.

 

 

रोगप्रतिबंधक उपाय : रोगप्रतिबंधक वैद्यकाची मूलभूत कल्पना अशी आहे की, आधी होऊन गेलेल्या अनेक क्रियांचा परिणाम म्हणून विविध घटना घडून येतात. निरनिराळ्या क्षेत्रांत घडणाऱ्या घटनांच्या मागे अनेक गोष्टींची साखळी आढळून येते. क्रिकेटचा सामना, रस्त्यावरील अपघात, दंगल किंवा उत्तम पीक येणे अशा अनेक घटनांच्या मागे अशी साखळीअसते. या साखळीचेसर्व दुवे प्रथमदर्शनी लक्षात येतील असे नसले, तरी असे दुवे असतात याबद्दल आपली खात्री असते. रोग ही अशीच घटना असून तिच्या मागेही रोग्याच्या परिसरातील व अंतर्गत क्रियेमधील फरक पडण्याचे दुवे असून त्या फरकानुसार शारीरिक प्रतिक्रिया न घडल्यामुळे रोग उत्पन्न होतो. तसेच रोगाची परिणती होण्यापूर्वीही दुसऱ्या अनेक घटनांचे दुवे दिसून येतात. त्या प्रत्येक दुव्याची माहिती करून घेऊन त्यांपैकी कमकुवत दुव्यावर आघात केल्यास कारणशृंखला तुटून रोगोत्पत्ती व रोगप्रसार यांस आळा घालणे शक्य असते.

अशा तऱ्हेने रोगप्रतिबंध करणे शक्य असलेल्या पाच जागा (किंवा दुवे) आज ओळखल्या जातात. त्यांपैकी प्राथमिक अवस्थेतच प्रतिबंधक उपाय करता आल्यास रोगोत्पत्ती होतच नाही. त्यापुढील अवस्थांतील उपायांमुळे रोगामुळे होणारी हानी कमी करता येते. 

(१) स्वास्थ्यसंवर्धन : वर वर्णन केलेल्या दुव्यांपैकी पहिला स्वास्थ्यसंवर्धन हा आहे. साधारणपणे असे म्हणता येईल की, रोगाला योग्य अशी परिस्थिती तयार असल्याशिवाय रोग होत नाही. सदोष किंवा विपरीत आहार व स्वास्थ्याला बाधक अशी राहणी यांमुळे रोगाला योग्य अशी भूमिका तयार होते. या गोष्टी टाळता आल्या, तर स्वास्थ्यरक्षण होऊन रोग होण्याचे टळते. स्वास्थ्यसंवर्धनामध्ये आहार, व्यायाम, निद्रा, विश्रांती व स्वच्छता यांबद्दल लोकजागृती करणे याला फार महत्त्व आहे म्हणजेच लोकशिक्षण हा स्वास्थ्यसंवर्धनाचा पाया आहे. हे लोकशिक्षण त्या विषयातील अधिकारी व्यक्तीने केल्यास लोकांचा विश्वास सहज संपादन करता येतो. वैद्याचे याविषयाचे स्थान अनन्यसाधारण आहे. रोगपरिहार करीत असल्यामुळे त्याच्यावर लोकांचा विश्वास सहज बसतो. हस्तपत्रके, भित्तिपत्रके, चित्रपटगृहांतील व दूरचित्रवाणीवरील जाहिराती यांचा या कामी उपयोग होत असला, तरी वैद्याच्या शब्दावर जितका विश्वास बसतो तितका त्यांच्यावर बसू शकत नाही. रोगी बरा होण्याच्या मार्गावर असताना तर वैद्याच्या सल्ल्यावर रोगी व त्याच्या कुटुंबियांची गाढ श्रद्धा असते, म्हणून त्या वेळी दिलेला सल्ला पुष्कळ अंशी सफळ होण्याचा संभव असतो. आधुनिक वैद्यकात वैद्याची ही भूमिका फार महत्त्वाची मानली आहे. पुष्कळ काळपर्यंत अंगी खिळून गेलेल्या पण रोगसाहाय्यक सवयी एकदम सुटणे अर्थातच शक्य नसते पण वैद्याने चिकाटीने व युक्तीने प्रयत्न केल्यास त्याला यश येण्याची शक्यता असते. असा प्रयत्न केल्यानंतर एखाद्या कुटुंबाला त्या विषयाचे महत्त्व पटले म्हणजे रोगप्रतिबंधाला योग्य अशी भूमिका तयार होऊ शकते.

(२) विशिष्ट रोगांचा प्रतिबंध : ही प्रतिबंधाची दुसरी पायरी आहे. रोगप्रतिबंधक लस टोचल्यामुळे कित्येक रोग होऊ शकत नाहीत पण दैनंदिन व्यवहारातील साध्या दिसणाऱ्या गोष्टींचाही रोगप्रतिबंधास उपयोग होतो. उदा., हिवतापाच्या प्रतिबंधासाठी मच्छरदाणी वापरणे, मोटरसायकलवर बसताना शिरस्त्राण वापरणे, गरोदर स्त्रियांना लोहादि औषधे देणे यांमुळे पुष्कळ परिणामकारक प्रतिबंध होऊ शकतो. अशा तऱ्हेने अनेक धोक्यांपासून संरक्षण होऊ शकते. यासंबंधीचे यश वैद्याने पाडलेली छाप व उत्पन्न केलेला आपलेपणा यांवर अवलंबून असते.


(३) त्वरित निदान व वेळीच उपचार : रोगाचे त्वरित निदान करून त्यावर वेळीच उपचार करणे ही रोगप्रतिबंधाची तिसरी पायरी होय. अर्थात त्यामुळे प्रत्यक्ष रोगप्रतिबंध होत नसला, तरी वेळीच केलेल्या उपचारामुळे रोग फार वेळ टिकत नाही व त्यामुळे शारीरिक हानी फार होत नाही. या गोष्टी अंतिम परिणामाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. क्षयरोग, गुप्तरोग, कुष्ठरोग व मधुमेह यांची उदाहरणे यासाठी देण्यासारखी आहेत. तिरळेपणावर वेळीच उपचार केल्यास अंधत्व टाळता येते. या व अशाच तऱ्हेच्या अनेक गोष्टी करण्यास वैद्यक व्यवसायात पुष्कळ वाव आहे.

 

(४) पंगुत्व शक्य तेवढे कमी करणे : रोग होऊन गेल्यावर त्याचा परिणाम म्हणून येणारे पंगुत्व कायम राहणारे असले, तरी ते अधिक होऊ नये यासाठी पुष्कळच करण्यासारखे असते. बालपक्षाघातात (पोलिओत) रोगग्रस्त भाग फळीने बांधून ठेवला असता पंगुत्व वाढत नाही. तसेच फुप्फुसनलिकाविस्तारांत वेळीच फुप्फुसखंड छेदन केल्यास कायमचे दौर्बल्य टाळता येते. या सर्व प्रकारांत पुढे होणाऱ्या संभाव्य अपायांवर वेळीच उपाययोजना करणे हे तत्त्व आहे.

(५) पुनर्वसन : रोगामुळे रोग्याच्या शारीरिक क्रियेमध्ये काही न्यून उत्पन्न झाल्यानंतर किंवा एखाद्या अवयवाचा संपूर्ण नाश झाल्यानंतरही पुनर्वसनासाठी पुष्कळ काही करता येण्यासारखे आहे. या वेळी करावयाची मुख्य गोष्ट म्हणजे पंगुत्वामुळे रोग्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विघटन होऊ न देणे ही होय. नाहीशा झालेल्या अवयवाचे कार्य राहिलेल्या अवयवास प्रशिक्षण देऊन रोग्याच्या मनाची जिद्द टिकविणे हे फार महत्त्वाचे आहे. उदा., कृत्रिम हातपाय बसवून, अंधाला स्पर्शाने लेखन-वाचन व इतर कामे शिकवून किंवा बहिऱ्याला ओष्ठवाचनाने शब्द संज्ञा शिकवून त्यांचे पुनर्वसन करणे शक्य असते. याकरिता तज्ञांची मदत घ्यावी लागते. अशी मदत कोठे, केव्हा व कोणत्या अवस्थेत उपयुक्त होऊ शकते याची माहिती वैद्यास असणे फार जरूरीचे आहे. अशा वेळी वैद्याचे काम म्हणजे रोग्याला योग्य मार्गदर्शन करून त्याचे मनोधैर्य टिकविणे हे होय. अशा तऱ्हेचे मार्गदर्शन झालेल्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात स्वावलंबी होऊ शकतात [⟶ अपंग कल्याण व शिक्षण]. रोगप्रतिबंधाच्या या ‘पाच पायऱ्या’ म्हणजे प्रतिबंधक उपायांचा आधार असून त्यांचा व्यवसायात उपयोग करणारा वैद्य हाच खऱ्या अर्थाने ‘वैद्य’ ही संज्ञा सार्थ करतो.

पहा : आरोग्यविज्ञान लस व अंतःक्रामण सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य.

संदर्भ : 1. Davies, J. B. Public Health and Preventive Medicine, London, 1966.

           2. Essex-Cater, A. J. A Synopsis of Public Health and Social Medicine, London, 1967.

           3. Last, J. M. Ed., Public Health &amp Preventive Medicine, 1980.

           4. Mckeown, T. Lowe, C. R. An Introduction to Social Medicine, Oxford, 1974.

           5. Maxcy, K. F. Ed., Preventive Medicine and Public Health, New York, 1956.

अद्रानवाला, जे. के. (इं.), ढमढरे, वा. रा. (म.) परांजपे, स. य.