जूदो : निःशस्त्र स्वसंरक्षणपद्धतीच्या तत्त्वांवर आधारलेला कुस्तीसारखा जपानी खेळ. बाराव्या शतकातील चिनी बौद्ध भिक्षूंनी सशस्त्र किंवा हिंसात्मक प्रतिकार निषिद्ध मानल्यामुळे स्वसंरक्षणार्थ जुजुत्सू खेळाचे तंत्र पुढे आले. त्याचाच आधुनिक अवतार म्हणजे जूदो होय. जपानमधील सामुराई लोक या पद्धतीचा अवलंब करीत. चापल्य, प्रतिस्पर्ध्याला युक्तीने लोळविण्याचे अवधान राखणे, खोडा घालणे, त्याच्या मर्मस्थानावर आघात करून किंवा दाब देऊन त्यास तात्पुरते हतबल करणे किंवा वेळप्रसंगी जायबंदी करणे या जुजुत्सूमधील प्रमुख बाबी, त्यांतील अपायकारकता वगळून जुदो खेळातही घेण्यात आल्या आहेत.

जुजुत्सू पद्धतीचा सतराव्या-अठराव्या शतकात खूपच जोर होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जपानमध्ये सामुराई वर्ग नष्ट झाला व त्या वर्गाबरोबरच जुजुत्सूची पद्धतीही मागे पडत गेली. या अवनतीच्या काळात टोकिओ विद्यापीठातील एक जर्मन वैद्य डॉ. बायलझ याने जुजुत्सूचे

जूदोतील डावपेच

पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. त्याचा शिष्य डॉ. जिगोरो कानो याने १८८२ साली जुजुत्सूच्या निरनिराळ्या पद्धतींचा अभ्यास करून कुस्तीची नवीन पद्धती प्रचारात आणली. डॉ. कानो याने या नवीन पद्धतीचे नाव ‘जूदो ’ ठेवले.‘जू’ म्हणजे सौम्य किंवा सुलभ ‘दो’ म्हणजे पद्धती किंवा मार्ग. नवीन पद्धतीत जुजुत्सूची काही तत्त्वे व यंत्रे यांचा समावेश तर त्याने केलाच पण शारीरिक व नैतिक शिक्षणावरही त्याने भर दिला. त्यामुळे जुजुत्सूचे तात्त्विक दृष्ट्या उन्नत झालेले स्वरूप जूदोला प्राप्त झाले. खिलाडू वृत्तीवर भर देऊन डॉ. कानोने आपल्या या नवीन पद्धतीला पूर्णतः खेळाचे स्वरूप दिले. हे खेळाचे स्वरूप जुजुत्सूला कधीच नव्हते.

या खेळाला जपानी क्रीडाजीवनात १९३० पर्यंत स्थिरता मिळाली. जपानी शिक्षण खात्याने या खेळाचा शाळेच्या क्रीडा-कार्यक्रमात समावेश केला. लष्कर, पोलीस, अग्निशामक दले इ. सरकारी विभागांनी लवकरच त्याचे अनुकरण केले. डॉ. कानोचा शिष्य यामा शितो याने १९०२ साली अमेरिकेत जूदोचे शिक्षण द्यावयास सुरुवात केली. १९१८ साली लंडनमध्ये कोझुमीने एक क्लब स्थापन केला. त्यायोगे यूरोपमध्येही हा खेळ लोकप्रिय होण्यास मदत झाली. यूरोप-अमेरिकेत जूदोचे क्लब स्थापन झाले. ऑस्ट्रेलियात डॉ. रॉस याने ब्रिस्बेन क्लब स्थापन केला. १९२९ साली ताकागीने भारतात व १९३१ साली आफ्रिकेतही असेच क्लब स्थापन केले. तथापि खऱ्या अर्थाने या खेळाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व दुसऱ्या महायुद्धानंतर वाढले. १९६० पर्यंत साधारणतः प्रत्येक देशात जूदोच्या संघटना निर्माण झाल्या व त्या आंतरराष्ट्रीय जूदो संघाशी संलग्न झाल्या. या खेळाच्या जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा निरनिराळ्या पातळ्यांवर होत असतात. संघटनेचे मुख्य केंद्र पॅरिसला आहे. १९६४ साली टोकिओ येथे झालेल्या ऑलिंपिक सामन्यात या खेळास पहिल्यांदाच स्थान मिळाले.

जूदो खेळात अनेक डावपेच असतात. त्यांतील प्रत्येक हालचाल ही विशिष्ट अर्थाने व उद्देशाने केलेली असते. हे डावपेच साधारणतः तीन गटांत विभागलेले आहेत : (१) नागेवासा, (२) काटेमेवाझा, (३) आटेवाझा. नागेवासामध्ये प्रतिस्पर्ध्याचे शरीर फेकण्याकरिता हात, पाय, कंबर यांच्याशी संबंधित असणारे अनेक डावपेच असतात. एखाद्या व्यक्तीस खाली पाडण्याकरिता शरीराचा उपयोग करण्याचे मार्गही त्यात समाविष्ट आहेत. काटेमेवाझामध्ये प्रतिस्पर्ध्याचे शरीर खिळविण्याच्या किंवा खोड्यात पकडण्याच्या तंत्राचा अभ्यास करण्यात येतो. उदा., गळ्याचा खोडा, पायांचा खोडा, बाहूंचा खोडा इत्यादी. आटेवाझामध्ये प्रतिस्पर्ध्याला खिळखिळे करणाऱ्या, इजा पोहोचविणाऱ्या किंवा ठार करणाऱ्या हाणामारीच्या किंवा लाथा मारण्याच्या अनेक युक्त्यांचा समावेश असतो. जूदोच्या प्रगत शिक्षणात अंगघात करण्याच्या त्याचप्रमाणे रुधिराभिसरण रोखण्याच्या व दम कोंडण्याच्या दृष्टीने शारीर व शारीरक्रियाविज्ञानाचा अभ्यास अंतर्भूत असतो. बेशुद्ध व्यक्तीस शुद्धीवर आणण्याची उपाययोजनाही शिकविली जाते.

जूदोचे संपूर्ण क्रीडाक्षेत्र १६ X १६ मी. चे असते. स्पर्धा मात्र ९ चौ. मी. हिरव्या चटईवरील क्षेत्रात खेळल्या जातात. या ९ चौ. मी. हिरव्या चटईच्या भोवती १ मी. रुंद लाल रंगाचे क्षेत्र असते. खेळाडूस इजा होऊ नये, म्हणून या लाल रंगाच्या क्षेत्रासभोवती हिरव्या चटईचे सुरक्षित क्षेत्र असते. स्पर्धा नियंत्रित करण्यास एक निर्देशक व दोन पंच असतात. निर्देशक साधारणतः स्पर्धेचे नियंत्रण करतो, तर दोन पंच सुरक्षित क्षेत्राच्या दोन विरुद्ध दिशेला उभे राहून निर्देशकाला स्पर्धेच्या नियंत्रणात साह्य करतात. निर्देशी निर्दोष तंत्राकडे लक्ष देतो. अनिर्णित स्पर्धेच्या शेवटी पंचांनी निर्णय द्यावयाचा असतो. निर्देशकाचे मत यावेळी विचारात घेतले जाते. निर्णय बहुमताच्या आधारावर देण्यात येतो.

स्पर्धेच्या सुरुवातीस स्पर्धक एकमेकांसमोर ४ मी. अंतरावर उभे राहून उभ्या उभ्याच थोडेसे वाकून परस्परांस अभिवादन करतात. निर्देशकाने इशारा देताच खेळास सुरुवात होते. लढतीचा कालावधी साधारणतः २ ते २० मिनिटांपर्यंत असतो. खेळात दोष दिसला, स्पर्धक लढतक्षेत्र सोडण्याच्या बेतात असला, त्यांपैकी एखाद्याची प्रकृती बिघडली वा एखाद्यास इजा झाली तर वा निष्प्रभ पकड सोडवावयाची असेल, तर निर्देशक लढत तात्पुरती थांबवू शकतो.

उपयोगात आणलेल्या नागेवासा आणि काटेमेवाझा या तंत्राच्या अचूकपणावर स्पर्धकाचा विजय अवलंबून असतो. त्याचप्रमाणे नियमभंगाचा विचार करण्यात येतो. इपॉन म्हणजे एक गुण जो स्पर्धक मिळवील तो सरळ विजयी होतो. इपॉन खालील गोष्टींबद्दल देण्यात येतो : (१) जेव्हा स्पर्धक प्रतिस्पर्ध्यास जोराने पाठीवर खाली पाडतो (जर प्रतिस्पर्धी पाठीवर पडला नाही, तर आर्धा गुण मिळतो). (२) जेव्हा स्पर्धक प्रतिस्पर्ध्यास चटईवरून खांद्यापर्यंत वर उचलतो. (३) जेव्हा स्पर्धक प्रतिस्पर्ध्यास ३० सेकंदपर्यंत परिणामकारक रीत्या पकड वा खोडा घालतो. जर स्पर्धक इपॉन मिळवू शकला नाही, तर त्यास अर्धा गुण (वाझाअरी) देण्यात येतो. जर एखाद्या स्पर्धकाने अर्धा गुण मिळविला असेल व त्याच्या प्रतिस्पर्ध्याने अनेक वेळा नियमांचा भंग केला असेल, तर अर्धा गुण मिळविणाऱ्या स्पर्धकास तात्काळ विजयी घोषित करण्यात येते. प्रतिस्पर्धी अनुपस्थित राहिला, तर उपस्थित स्पर्धकास पंच विजयी घोषित करू शकतात.

निर्देशकाला नियमभंगाबद्दल वाढत्या परिणामाचे दंड करण्याचा अधिकार आहे. प्रथम नियमभंगाबद्दल स्पर्धकाचे फक्त लक्ष वेधतो. पुन्हा नियमभंग केला, तर त्यास सावधगिरीची समज देण्यात येते. त्यानंतरही नियमभंग होत राहिला, तर त्यास ताकीद देण्यात येते. ताकीद दिल्यानंतरही नियमभंग थांबला नाही, तर निर्देशक स्पर्धकास स्पर्धेस अपात्र ठरवितो. ताकीद देण्याकरिता व अपात्र ठरविण्याकरिता निर्देशकास पंचांशी सल्लामसलत करणे आवश्यक असते. दंड किंवा शिक्षेचा निर्णय बहुमताने घेण्यात येतो.

श्रेष्ठ दर्जाच्या जूदो-स्पर्धा निर्णय देण्यास कठीण असतात. त्यामुळे पुष्कळसे निर्णय वादग्रस्त होतात. जर कोणीही गुण मिळविला नसेल व कोणासही नियमभंगाबद्दल ताकीद देण्यात आली नसेल, तर ज्याने प्रतिस्पर्ध्यास अनेक वेळा लोळविले असेल त्यास पंच विजयी घोषित करतात. हेही शक्य नसेल, तर तो स्पर्धक अधिक आक्रमक असेल, त्यास विजयी घोषित करण्यात येते. निर्णय देताना सामान्यतः हल्ले व चीत लोळविणे (नॉक डाउन) विचारात घेतात पण जर निर्णायक लोळविले असेल, तर त्याकडे दुलर्क्ष करण्यात येते. जूदोमध्ये अचूक तंत्राने लाभणाऱ्या गुणांपेक्षा अधिक गुण नियमभंगामुळे गमवावे लागतात.

जूदो स्पर्धकांचा एक विशिष्ट पोषाख असतो. त्यास ‘जूदोगी’ म्हणतात. साधारणतः हा पोषाख सैल असतो. त्यास गुंड्या किंवा खिसे नसतात. इजा कमीत कमी व्हावी म्हणून खालचे पाय उघडे ठेवले जातात. स्पर्धक जाकीट नीट बसावे म्हणून पट्टा वापरतात. पट्ट्याचा रंग खेळाडूचा दर्जा दाखविणारा असतो.

खोडवे, अच्युत