दान टाकण्याची आधुनिक पद्धत

फाशांचे खेळ: फाशांच्या साहाय्याने खेळावयाचे विविध खेळ . फासा म्हणजे सामान्यपणे छोटासा चौरस किंवा आयताकृती ठोकळा. या ठोकळ्याच्या सहा बाजूंवर एकापासून सहापर्यंत ठिपके काढलेले असतात ते अशा रीतीने की कोणत्याही दोन विरुद्ध बाजूंवरील ठिपक्यांची बेरीज सात भरावी. असे एक वा दोन वा अधिक फासे हातात किंवा फासेपात्रात घेऊन, ते खुळखुळवून सपाटशा पृष्ठभागावर टाकतात. नंतर फाशांच्या वरच्या भागांवरील ठिपक्यांची संख्या मोजतात. त्याला ‘दान पडणे’ असे म्हणतात. अशा फाशांचा उपयोग दैवावर वा योगायोगावर आधारित तसेच ⇨ जुगाराच्या खेळांत करतात.

फार प्राचीन काळापासून फाशांचा उपयोग मानव करीत आला आहे. ग्रीक तत्ववेत्ता सॉफोक्लीझ याच्या मते ग्रीसमधील पॅलमीडीझने इ. स. पू. सु. १२४४ मध्ये फाशांचा शोध लावला, तर ग्रीक इतिहासकार हीरॉडोटसच्या मते लिडियन लोक हे फाशांचे शोधक होत.

प्राचीन ग्रीक व रोमन फाशांचे काही नमुने : (१) ठिपके असलेला हाडांचा फासा, (२) एका बाजूवर ‘मॅलेस्ट’ (दुर्दैव) हा शब्द दर्शविणारा हाडांचा फासा, (३) सहा बाजूंचा ब्राँझचा मूर्तिवजा फासा, (४) हस्तिदंती फाशाची ‘व्हिक्टर’ (विजयी) बाजू, (५) चौदा बाजूंचा दगडी रोमन फासा. नैर्ऋत्य अमेरिकेतील फाशांचे काही नमुने (इ.स.सु. ९००) : (६) कोरीव लाकडी फासा, (७) चौकटी नक्षीचा हाडांचा फासा, (८) शिंपल्याचा फासा.

परंतु या काळाच्याही खूप पूर्वीपासून फाशांचा वापर होत असल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसून येते. अतिप्राचीन आदिमानवी टोळ्यांमध्ये यातुविद्येतील एक साधन म्हणून फाशांचा वापर होत असावा. मेंढीच्या घोट्याच्या हाडांचा वापर फासे म्हणून करीत. अनेक आदिम जमातींमध्ये फाशांचे जुगारी खेळ खेळले जात. अमेरिकन इंडियन, ॲझटेक, माया, एस्किमो, आफ्रिकन जमाती इत्यादींचा उदाहरणादाखल उल्‍लेख करता येईल. चीनमधील उत्खननात इ. स. पू. सहाव्या शतकातील फासे आढळले आहेत तर ईजिप्शियन थडग्यांमध्ये सापडलेले फासे इ. स. पू. दुसऱ्या सहस्त्रकातील आहेत. भारतातही प्राचीन काळापासून फाशांचे अनेक खेळ रूढ आहेत. त्यात द्यूतक्रीडा, सोंगट्यांचे खेळ, पटावरील किंवा सारीपाटावरील खेळ प्रसिद्ध आहेत. तसेच सापशिडी, व्यापार यांसारखे घरगुती बैठे खेळ फाशांच्या साहाय्याने खेळले जातात. आर्यपूर्व सिंधू संस्कृतीत द्यूत प्रचलित असावा. वैदिक वाङ्‌मयात, विशेषतः ऋग्वेदात फाशांचा ‘अक्ष’ या शब्दाने उल्‍लेख आढळतो. महाभारतातील कौरव-पांडवांच्या द्युताचा व त्यात पांडव सर्वस्व हरल्याचा संदर्भ सर्वश्रुतच आहे. आचार्य शूलपाणीच्या चतुरंग दीपिका ह्या संस्कृत ग्रंथात द्यूतासंबंधी माहिती आहे. द्यूत खेळण्यासाठी पूर्वी राजे लोक द्यूतगृहे बांधीत व तेथे खेळणाऱ्या लोकांकडून कर वसूल करीत तसेच द्यूतामध्ये जिंकलेल्या द्रव्याचा काही भागही राजांचा असे. द्यूतासाठी वापरले जाणारे फासे बेहड्याचे, मातीचे, दगडाचे वा हस्तिदंताचे असत. फाशांच्या ऐवजी कधीकधी कवड्याही वापरल्या जात. या खेळांमुळे समाजात जुगारी प्रवृत्ती वाढीस लागत असल्यामुळे धर्मशास्त्रानुसार ते निषिद्ध होते. तथापि वर्षातून फक्त कोजागिरी पौर्णिमा व बलिप्रतिपदा या दिवशी हे खेळ खेळण्यास मुभा असे. या दिवसांना द्यूत पौर्णिमा व द्यूत प्रतिपदा असेच संबोधत असत.

प्राचीन काळातील मेंढीच्या घोट्याच्या हाडापासून बनविलेल्या फाशाच्या चार बाजू : वरच्या ओळीतील डाव्या बाजूचे दान –६, उजवीकडे– ४, खालच्या ओळीतील डावीकडचे–३ व उजवीकडील–१.

फाशांचे अनेक प्रकार आढळतात. त्यातील काही पिरॅमिडच्या आकाराचे, काही पाच बाजू असलेले तर काही आठ बाजू असलेले आहेत. परंतु सहा बाजू असलेले चौरस ठोकळेच विशेष लोकप्रिय व प्रचलित आहेत. फार पूर्वी फासे हे हाडांचे, दातांचे, हस्तिदंताचे, लाकडाचे, दगडाचे, धातूचे, काचेचे किंवा मौल्यवान रत्‍नांचे बनविलेले असत. आधुनिक फासे हे हस्तिदंताचे किंवा प्‍लॅस्टिकचे बनविलेले असतात. साधारणपणे फाशांच्या खेळात दैवाचा किंवा यदृच्छेचा भाग फार मोठा असल्याने खात्रीने पैज जिंकण्याचा संभव कमी असतो. जगातील निरनिराळ्या देशांत फाशांचे निरनिराळ्या प्रकारचे खेळ प्रचलित आहेत. त्यांपैकी ‘बॅकगॅमॉन’ हा सर्वांत जुना व अजूनही खेळला जाणारा एक खेळ आहे. काही फाशांच्या खेळात एकच फासा वापरतात. उदा., पाश्चिमात्य राष्ट्रांत सर्वांत लोकप्रिय असलेला ‘बँक क्रॅप्स’ हा खेळ. काही खेळांत फक्त दोनच फासे वापरतात. उदा., अमेरिकन ‘क्रॅप्स’, काही खेळांत फक्त तीन फासे वापरतात. ‘चक-अ-लक’. ‘पोकर डाइस’मध्ये पाच फासे वापरतात. ‘यॅट’ ह्या खेळात दहा फासे वापरतात. या सर्व खेळांत पैजेची बोली करावी लागते. फासे ज्याच्या बाजूने पडतात तो पैज जिंकतो. फाशांच्या खेळामुळे समाजात जुगारी प्रवृत्ती वाढत असल्याने तो अनेकदा निषिद्ध मानला असला, तरी त्याची लोकप्रियता अद्यापही टिकून आहे.

पहा : पटावरील खेळ सोंगट्यांचे खेळ.

संदर्भ : 1. Scarne, John, Scarney Dice, 1969.

2. Wykes, Alan, Gambling, London, 1964.

शहाणे, शा. वि.