प्रासंगिक खेळ : विशिष्ट प्रसंगाच्या निमित्ताने खेळले जाणारे खेळ, इंग्रजीतील ‘पार्टी गेम्स’ या संज्ञेचा हा मराठी पर्याय आहे. यूरोपीय समाजात मेजवानीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या स्त्रीपुरुषांच्या समूहात पार्टी गेम्स किंवा प्रासंगिक खेळ खेळण्याची प्रथा आढळ्ते. ज्या प्रसंगाच्या निमित्ताने प्रासंगिक खेळ खेळले जातात, ते प्रसंग अनेक प्रकारचे असू शकतात. सण आणि उत्सव, विवाहकार्ये आणि वाढदिवस, स्नेहसंमेलने, संस्था व व्यवसाय इत्यादींचे वर्धापनदिन यांसारख्या अनेकविध प्रसंगांच्या निमित्ताने कौटुंबिक व इतर सामाजिक गट मेजवानीचे कार्यक्रम योजतात. प्रासंगिक खेळ या कार्यक्रमाचाच एक भाग होय. या खेळांचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमास आलेले लहानथोर सर्व स्त्रीपुरुष त्यांत सहभागी होतात. असे खेळ मेजवानीच्या आधी वा नंतर खेळले जातात. प्रासंगिक खेळ नेमके केव्हा सुरू झाले हे सांगणे कठीण आहे तथापि प्राचीन काळापासून सुसंघटित समाजात अशा प्रकारचे खेळ रूढ असावेत, असे दिसते. व्यक्तीच्या सहज व उत्स्फूर्त आत्माविष्काराला अगदी मोकळेपणाने वाव मिळावा, असेच या खेळांमागील हेतू असतात. स्वतःला व भोवतालच्या बाह्य विश्वाला विसरून बेभानपणे संगीताच्या तालावर नाचणे, मोठ्या आवाजात गाणी म्हणणे, आनंदाने आरोळ्या देणे, हास्यविनोदात रममाण होणे यांसारख्या मुक्त वर्तनप्रकारांना प्रासंगिक खेळांतून वाव मिळतो. इतरांपासून अलिप्त राहणाऱ्या भिडस्त व लाजऱ्याबुजऱ्या व्यक्तींनाही अशा खेळांत सामील करून घेतले जाते व त्यांना समूहात मिसळण्याची संधी उपलब्ध होते.

मेजवान्यांचे सामान्यतः तीन प्रकार दिसून येतात : (१) लहान मुलांचे वाढदिवस, बारसे वगैरे प्रसंगी योजलेल्या मेजवान्या. (२) तरुण मुलामुलींसाठी योजलेल्या मेजवान्या. या निमित्ताने तरूण मुलामुलींना एकत्र येण्याची, प्रणयाराधनाची व विवाहासाठी जोडीदार शोधण्याची संधीही उपलब्ध होऊ शकते. (३) गृहस्थाश्रमी व प्रौढ यांच्यासाठी योजलेल्या मेजवान्या. या विविध मेजवान्यांच्या प्रसंगी त्या त्या वयोगटांस अनुरूप अशा खेळांची योजना करतात. प्रासंगिक खेळ हे निव्वळ करमणुकीसाठी असले, तरी त्यांतील काही खेळ बुद्धिकौशल्य, स्मरणशक्ती, अभिनय यांच्या चाचणीसाठी खेळले जातात. काही खेळ समूहगीतांचे व त्यांच्या साथीवरील सोप्या नृत्यप्रकारांचेही असतात. अशा नृत्य-गीतप्रकारांत प्रौढ व्यक्तीही सहजपणे सहभागी होऊ शकतात. प्रत्यक्ष सहभागी होण्यानेच प्रासंगिक खेळांची रंगत व गंमत वाढत असते.

मेजवानी देणाऱ्या यजमानाने जशी भोजनाच्या पदार्थांची निवड कुशलतेने करावयाची असते, तसेच या प्रसंगी घेतल्या जाणाऱ्या खेळांची व त्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्याची जुळणी व आखणी, ही तत्संबंधी आवश्यक ते पूर्वनियोजन करून, करावी लागते. मेजवानी सुरू होण्यापूर्वी कोणते खेळ खेळावे, मेजवानी चालू असताना काय करता येणे शक्य आहे, मेजवानीनंतर कोणते खेळ खेळावे यांचा क्रमही ठरवून घ्यावा लागतो. यासाठी लागणारे साहित्य म्हणजे कागद, पेन्सिली, चेंडू, फुगे, सुई, दोरा, पत्ते, टाचण्या, शिटी, बाजा, बासरी यांसारखी वाद्ये इ. सहजगत्या उपलब्ध होईल असे हाताशी ठेवले जाते. योजलेले खेळ कोठे खेळायचे त्याची जागा निश्चित केली जाते. यांपैकी बरेचसे खेळ भोजनगृहाजवळच्या एखाद्या दालनामध्ये, काही घराशेजारील हिरवळीवर तर काही घराच्या गच्चीवर घेता येतात. मेजवान्या व त्याप्रसंगी आयोजित केलेल्या प्रासंगिक खेळांचा प्रधान हेतू निमंत्रित लोकांनी एकमेकांच्या व यजमानांच्या संगतीत आनंदात वेळ घालवावा, हा असतो. हा आनंद निर्माण करण्यासाठी व लुटण्यासाठी अशा खेळांचा चांगला उपयोग होतो.

मेजवानीच्या प्रसंगी आयोजित केलेल्या खेळांच्या कार्यक्रमाचा एक आराखडा करावा लागतो. खेळात विजयी होणाऱ्यांना किंवा विशेष नैपुण्य दाखविणाऱ्यांना छोटी बक्षिसे देण्याचा एखादा गंमतीचा समारंभही घडवितात. त्यासाठी निमंत्रितांतील एखाद्याला अध्यक्ष करून त्याच्या हस्ते छोटी व मजेशीर अशी बक्षिसे हास्यनिर्मिती होईल अशा रीतीने वाटण्यात येतात. या खेळांचे आयोजनच असे असावे, की सर्व लोक त्यात सहजपणे सहभागी होऊ शकतील.

प्रासंगिक खेळांचे इतके विविध प्रकार आहेत, की त्यांची वर्गवारी करणे अवघड आहे. तरी पुढीलप्रमाणे सामान्यतः वर्गवारी करता येईल : (१) ओळख घडवून आणणारे खेळ, (२) गाण्यांचे अथवा ⇨

भेंड्यांसारखे खेळ, (३) संगीत खुर्चीसारखे खेळ, (४) स्मरणशक्तीचे व निरीक्षणाचे खेळ, (५) स्पर्शाने वा वासाने वस्तू ओळखण्याचे खेळ, (६) चित्रकलेवर आधारलेले खेळ आणि (७) अभिनयावर आधारलेले खेळ. या प्रत्येक प्रकारातील साधारण एकेक खेळ उदाहरणादाखल पुढे दिला आहे :

(१) ओळख घडवून आणणारे खेळ : मेजवानीला आलेल्या सर्व निमंत्रितांची एकमेकांशी ओळख व्हावी, म्हणून प्रथम त्यांना एक चौकटी आखलेला कागद दिला जातो व त्यातील चौकोनांत एकमेकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्यास सांगितले जाते. ज्याच्या कागदावर त्यांपैकी जास्त स्वाक्षऱ्या असतील त्याला शेवटी बक्षीस दिले जाते.

(२) गाण्यांचे वा भेंड्यांचे खेळ : पार्टीला जमलेल्या स्त्रिया व पुरुष यांचे वेगवेगळे दोन गट करतात. त्यांच्यात गाण्यांच्या तसेच वेगवेगळ्या विशेषनामांच्या भेंड्या खेळतात. जिंकणाऱ्यांना बक्षीस दिले जाते.

(३) संगीत खुर्ची : खेळात भाग घेणारे जेवढे असतील त्यांच्यापेक्षा खुर्च्यांची संख्या एकाने कमी ठेवतात. खुर्च्या गोलाकार किंवा एका ओळीत आलटून पालटून एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंडे येतील अशा ठेवल्या जातात. पेटी वा बाजासारखे वाद्य वाजविले जाते अथवा संगीताची ध्वनिमुद्रिका लावली जाते. सर्वजण खुर्च्यांभोवती फिरतात. अचानक संगीत बंद होताच सर्वजण खुर्च्यांत बसण्याचा प्रयत्न करतात, त्यात ज्याला खुर्ची मिळत नाही, तो बाद होतो. अशा प्रकारे पुढे खेळत असताना प्रत्येक वेळी एकेक खुर्ची कमी केली जाते. जो शेवटी राहील त्याला बक्षीस दिले जाते.

(४) स्मरणशक्तीचे व निरीक्षणाचे खेळ : मध्यावर एका ट्रेमध्ये निरनिराळ्या वीस ते पंचवीस वस्तू झाकून ठेवतात. सर्वांना त्या एक मिनिटभर दाखविल्या जातात. नंतर त्या वस्तूंची यादी करायला सांगतात. ज्याची यादी मोठी व जास्त बरोबर त्याला बक्षीस दिले जाते.

(५) स्पर्शाने वा वासाने वस्तू ओळखण्याचे खेळ : छोट्या छोट्या पिशव्यांत काही वस्तू भरून ठेवतात. प्रत्येकजण त्या वस्तू बोटांनी चाचपून पाहून ओळखतो. निरनिराळे वास येणाऱ्या वस्तू पिशव्यांत ठेवतात. वासांवरून वस्तू ओळखण्यास सांगितले जाते.

(६) चित्रकलेवर आधारलेले खेळ : निमंत्रितांचे चार गट केले जातात. प्रत्येक गटाला ओळीत उभे केले जाते. चित्र काढण्यासाठी एखादा फळा व खडू ठेवतात. सर्व संघाला मिळून एक चित्र काढायला सांगितले जाते. उदा., प्रत्येकजण धावत येऊन हत्तीचा एक अवयव काढतो. सर्वजण मिळून हत्तीचे चित्र पूर्ण करतात. ज्या संघाने चित्र चांगले काढले असेल, त्याला बक्षीस दिले जाते.


(७) अभिनयावर आधारलेले खेळ : सर्वजण गोलाकार बसतात. एका पुठ्ठ्याच्या खोक्यात चिठ्ठ्या ठेवल्या जातात व प्रत्येक चिठ्ठीवर गंमतीदार अभिनयाची कृती दिली जाते. यजमान बाजा वाजवतो. प्रत्येकजण हे खोके पुढे सरकवीत राहतो. बाजा जेव्हा थांबतो, त्यावेळी खोके ज्याच्यापुढे असेल तो ते उघडून त्यातील एक चिठ्ठी काढतो व तीवर लिहिलेली कृती करतो. उदा., रडक्या मुलाचा अभिनय करणे, गाढवासारखे ओरडून दाखवणे, उखाणा घेणे इत्यादी.

अलीकडे शाळा, महाविद्यालयांतून सहली, स्नेहसंमेलनांच्या वेळी, गणपती उत्सवात, पालक दिनी, कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी असे खेळ मोठ्या प्रमाणावर खेळले जातात. आनंद मेळा वा गंमतजंमत जत्रा (फन फेअर) या नावाने ओळखले जाणारे कार्यक्रम तर हल्ली फारच लोकप्रिय ठरले आहेत. त्यात वरील प्रकारांबरोबरच डोळे बांधून गाढवाला शेपूट लावणे, डोळे बांधून काठीने मडके फोडणे, एका आगकाडीत जास्तीत जास्त मेणबत्या लावणे, राक्षसाच्या मुखवट्याच्या तोंडात दुरून चणे टाकणे, कडीतून चेंडू टाकणे, तिपाई शर्यत, पोत्यांची शर्यत, चमचालिंबू शर्यत असे कितीतरी प्रकार खेळले जातात.

प्रासंगिक खेळांमध्ये सर्वांना स्वतःचे वय, अधिकाराचा हुद्दा प्रतिष्ठा वगैरे विसरायला लावून भाग घेता येईल व त्याचा आनंद मनसोक्त लुटता येईल, असेच खेळ अंतर्भूत असावे लागतात.

मेजवानीनंतर खेळ खेळायचे असतील तर त्यात फार धावपळ होणार नाही, बसून खेळता येतील, असे बैठे खेळ घ्यावे. यातच भेंड्या, गाणी, पत्ते, कॅरम, बुद्धीबळे, सापशिडी इ. खेळांचा समावेश असावा. खेळातील आनंद नष्ट होण्यापूर्वीच ते संपवणे केव्हाही उचित ठरते.

भारतीय समाजातही अशा रंजक प्रासंगिक किंवा नैमित्तिक खेळांना महत्त्वाचे स्थान असल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या सण-उत्सवादी प्रसंगी अनेक प्रकारचे खेळ, नाच, गाणी इ. करमणुकीचे प्रकार केले जातात. अक्षय्य तृतीयेस भारतात अनेक ठिकाणी, विशेषतः महाराष्ट्रात खानदेशमध्ये, पतंगाच्या काटाकाटीचे खेळ खेळले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक ठिकाणी जत्रा भरतात व त्या जत्रांमध्ये अनेक प्रकारचे झुले व पाळणे, बैलगाड्यांच्या शर्यती वगैरे रंजनप्रकार केले जातात. श्रावण महिन्यात नवविवाहित तरुणी मंगळागौर पूजतात, त्यावेळी रात्री स्त्रिया फुगड्या, फेर, कोंबडे असे खेळ खेळतात. तसेच नागपंचमीला झाडांना झोके बांधून खेळण्याची प्रथा आहे. गोकुळअष्टमीला दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम केला जातो. तसेच गुजरातमध्ये रास, गरबा यांसारखे नृत्यप्रकाराचे खेळ अनेक स्त्रीपुरुष एकत्र येऊन खेळतात. सार्वजनिक गणेशोत्सवातील विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल-लेझिमीच्या खेळाने सर्व वातावरण धुंद होऊन जाते. दिवाळीच्या दिवसांत अनेक ठिकाणी प्रेक्षणीय अशी शोभेच्या दारूगोळ्याची-बाणांची युद्धे होतात. रंगपंचमीचा सणही सर्व लहानथोर स्त्रीपुरुष उत्साहाने साजरा करतात. अशा प्रकारे विविध सण व उत्सव प्रसंगी तऱ्हेतऱ्हेचे पारंपरिक खेळ खेळण्याची पद्धती भारतात सर्वत्र आढळून येते.

संदर्भ : 1. Edmundson, y3wuoeph, The Handbook of Games for Parties, London, 1964.

            2. Grey, Jayne, Party Games for Young Children, London, 1963.

            3. Leeming, y3wuoeph, The Real Book of Games, London, 1958.

            4. Van Rensselaer, Alexander, Complete Book of Party Games, New York, 1952.

शहाणे, शा. वि. पटवर्धन, म. गं.