पेशन्स : एकट्याने खेळावयाचे पत्त्यांचे खेळ. हे खेळ म्हणजे एक प्रकारे पत्त्यांची कोडीच होत. एकट्याने वेळ घालवण्याचे ते एक प्रभावी साधन असून त्या दृष्टीने सॉलिटेअर हे या खेळाचे अमेरिकन नाव अन्वर्थक आहे. तथापि पेशन्समधील काही खेळ दोन वा अधिक खेळाडूंनाही स्पर्धात्मक रीतीने खेळता येतात. पेशन्सचे किमान ३५० प्रकार आज ज्ञात आहेत. त्यांतील काही जुने प्रकार परंपरेने आजतागायत चालत आलेले आहेत. एकोणिसाव्या शतकात पेशन्सचे नियम निश्चित करण्यात आले. १८१६ साली प्रकाशित झालेल्या एका वृत्तपत्रात नेपोलियन बोनापार्ट सेंट हेलेना बेटावर कैदेत असताना पेशन्स खेळत असल्याचा उल्लेख आहे. त्याच्या नावाचे चार प्रकार आज रूढ आहेत. नेपोलियनप्रमाणेच राणी व्हिक्टोरिया हिलाही या खेळाचे आकर्षण होते. टॉलस्टॉयच्या वॉर अँड पीस या कादंबरीतही पेशन्सचा उल्लेख आहे. पेशन्सवर प्रथम फ्रान्समध्ये पुस्तके लिहिली गेली व तदनंतर इंग्‍लंडमध्ये त्याविषयी लेखन झाले. पेशन्सचे प्रकार एकटाच माणूस खेळत असल्याने त्या खेळातील नियम काटेकोरपणे पाळणे, ही त्या खेळाडूचीच जबाबदारी व त्याच्या प्रामाणिकपणाची कसोटी असते.

या खेळांचे जवळजवळ सर्व प्रकार पत्त्यांच्या एक किंवा दोन संचांनी खेळता येतात. मात्र दोन संच घेतल्यास डाव अधिक किचकट बनतो. एका संचाने खेळल्या जाणाऱ्या पेशन्सच्या प्रकारांत सामान्यत: बेकर्स डझन, ब्रिस्टल, कॅल्क्युलेशन, गुड मेझर, ला बेल ल्युसी, लिट्‌ल स्पायडर, पोकर पेशन्स, रॉमरॉक्स, स्ट्रॅटेजी इ. डाव प्रसिद्ध आहेत. दोन संचांनी खेळले जाणारे बिगबेन, ब्रिटिश स्क्वेअर, कॉन्स्टिट्यूशन, कॉर्नर स्टोन्स, फ्रॉग, हाउस ऑन द हिल, हाउस इन द वुड, स्लाय फॉक्स, स्पायडर, मारिया, टुर्नामेंट, व्हर्जिनिया रील इ. प्रकार प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे क्लॉनडाइक, कॅनफील्ड यांसारखे पेशन्सचे डाव विशेषत्वाने प्रचलित आहेत. सर्वसामान्यपणे पेशन्सच्या खेळात खेळाडू स्वत:च पत्ते मांडून घेतो. त्यात काही पालथे तर काही उघडे ठेवले जातात. ते कोणत्या पद्धतीने मांडावयाचे, हे त्या त्या प्रकारावर अवलंबून असते. डाव मांडल्यानंतर पत्त्यांच्या नियमबद्ध हालचाली करून सर्व पत्ते त्या त्या चिन्हांनुसार उतरत्या किंवा चढत्या भांजणीत म्हणजे क्रमरचनेत (सीक्वेन्स) लावावयाचे असतात. जे पत्ते सर्वांच्या वर आणि उघडे असतील त्यांचीच हालचाल करता येते. ते क्रमरचनेच्या पायावर (बेस किंवा फाउंडेशन) रांगेत रचावे लागतात. बहुतेक खेळांत एक्का हाच पाया असतो. तसेच उभ्या रांगेतील पत्त्यांची (कॉलम) फिरवाफिरव करूनही रचना साधली जाते. जे पत्ते मांडलेले नसतात, त्याचा उपयोग भांडारासारखा (स्टॉकपाईल) केला जातो. भांडारातील सर्वांत वर असलेले पानच घेता येते. भांडारातून घेतलेल्या पण न लागलेल्या पत्त्यांचा वेगळा ढीग (रबिश किंवा वेस्ट हीप) केला जातो. डाव अडल्यास त्यातील तीन पाने घेऊन अडलेला किंवा कुजलेला डाव चालू ठेवता येतो.

पेशन्सच्या खेळांचे तीन प्रमुख प्रकारभेद आहेत. काही खेळांचे यश केवळ नशिबावरच अवलंबून असते. डाव मांडल्यावरच तो जमेल किंवा नाही याची कल्पना येते. त्यांत हालचालींना वावच नसतो. ज्या प्रकारात पत्त्यांच्या हालचालींना वाव असतो, त्या खेळांत साहजिकच खेळाडूच्या कौशल्याला महत्त्व येते. तिसऱ्या प्रकारच्या स्पर्धात्मक डावात खेळण्याच्या वेगाला महत्त्व असते.या डर्बी किंवा रेसिंग डेमनयांसारख्या खेळांत दोन किंवा जास्त खेळाडू भाग घेतात. ज्या डावात अधिक संच वापरण्यात येतात, त्यांत खेळाडूच्या कौशल्याला प्राधान्य येते.

हातातले पत्ते एकदाच पिसून त्यातली वरवरची पाने लावावयाचा नियम जर सचोटीने पाळला, तर पेशन्सचा डाव क्वचितच लागतो. पिसलेल्या पत्त्यांपैकी एक पत्ता जरी वापरला, तरी सर्व पत्ते फिरतात आणि डाव पूर्ण व्हावयाचा संभव वाढतो. सॉलिटेअर या नावाने ओळखला जाणारा ð पटावरील खेळांचाही एक प्रकार रूढ आहे.

संदर्भ : 1. Basil, Dalton, The Complete Patience Book, London, 1948.

2. Morehead, A. H. Mott-Smith, Geoffrey, The Complete Book of Solitaire and Patience Games, New York, 1949.

गोखले, श्री. पु.