पशूंच्या झुंजी :प्राचीन काळापासून चालत आलेला एक रोमहर्षक लोकरंजनप्रकार. पुरातन काळापासून जत्रेत किंवा उत्सव समारंभाच्या वेळी करमणुकीसाठी पशूंच्या झुंजी लावण्यात येतात. मानवातील युयुत्सू वृत्तीचे उपशमन व्हावे, हा या झुंजी लावण्यामागील एक हेतू असवा. या झुंजींचा उगम सुरुवातीस भारत, चीन, इराण, ग्रीस व रोम या देशांत झाला असवा. कालांतराने त्याचा प्रसार इतर देशांतून झाला. पशूंच्या झुंजींचे काही प्रकार पुढे दिले आहेत.

कोंबड्यांची झुंज

कोंबड्यांची झुंज :स्पेन, अतिपूर्वेकडील देश, दक्षिण अमेरिका येथे हा खेळ अद्यापही लोकप्रिय आहे. कोंबड्यांच्या झुंजी सु.तीन हजार वर्षांपूर्वीपासून प्रचलित असाव्यात. भारतातून हा खेळ प्रशिया व ग्रीसमध्ये गेला. प्रशियन सैन्यावर थीमिस्टोक्लीझ (इ. स. पू.५२८–४६२) या ग्रीक सेनापतीने स्वारी केली असता त्याला कोंबड्यांची झुंज पाहण्यास मिळाली. ती त्याने आपल्या सैनिकांना दाखवून चेतविले व युद्धात विजय मिळवला. तेव्हापासून कोंबड्यांची झुंज हा त्यांचा खेळ बनला. या झुंजीत भाग घेणारे कोंबडे हे शिकवून तयार केलेले असतात. या कोंबड्यांची खाण्यापिण्याची व इतर सर्व प्रकारे निगा राखली जाते . झुंज खेळणाऱ्‍या कोंबड्यांचे तुरे व पंख काही प्रमाणात कापून टाकतात. तसेच त्यांंच्या पायांची नखे कापून त्या जागी तीक्ष्ण पात्यांनी कोंबडा प्रतिपक्षाला इजा करू शकतो. अशा प्रकारची बनावट पाती युद्धखोर कोंबड्यांच्या पायांना बांधण्याची युक्ती प्रथम रोमन लोकांनी अंमलात आणली. झुंजीसाठी उत्कृष्ट कोंबडे तयार करणे, हे शर्यतीसाठी घोडे तयार करण्याइतकेच कौशल्याचे समजले जाई. इंग्लंडमध्ये तर अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत लोकांना कोंबड्यांच्या झुंजीचे विलक्षण वेड लागले होते. १८४९ साली इंग्लंडमध्ये या खेळावर बेकायदेशीर म्हणून बंदी घालण्यात आली.

कोंबड्यांची झुंज खेळण्याचे मैदान बहुधा गोलाकार असून त्याचा व्यास ५·५ ते ६ मी. असे. झुंजणाऱ्‍या कोंबड्यांपैकी एक कोंबडा मरेपर्यंत किंवा मागे हटेपर्यंत झुंज चालत असे. या झुंजीचा निकाल ठरविण्यासाठी पंच असत आणि मुष्टियुद्धाच्या निकालाप्रमाणेच याही झुंजीचा निकाल होत असे.

प्रथम करमणूक म्हणून कोंबड्यांच्या झुंजी लावण्यात येत. परंतु नतंर या झुंजींवर जुगार खेळला जाऊ लागला, म्हणून या खेळावर बंदी घालण्यात आली. तरीही हा खेळ अनेक ठिकाणी खेळतात[⟶ कोंबड्यांची झुंज].

कोंबड्यांच्या झुंजींप्रमाणेच कुत्र्यांच्या झुंजी व घोड्यांच्या झुंजीही सोळाव्या शतकात लोकप्रिय होत्या.

बैलांची झुंज

बैलांची झुंज: कोंबड्यांच्या झुंजींप्रमाणेच मस्त बैलांच्या (पोळांच्या) झुंजी किंवा टकरी लावल्या जातात. बैलांच्या जातात. बैलांच्या झुंजी बहुतेक भारतातच लावल्या जातात. भारतात खेड्यापाड्यांतून जत्रेत किंवा उरुसामध्ये बैलांच्या झुंजी पहावयास मिळतात. झुंजीसाठी बैल तयार करण्यासाठी चार ते पाच वर्षे लागतात व यासाठी खर्चही पुष्कळच येतो. या बैलांना निराळ्या बंद कुरणातून ठेवण्यात येते. ते एक वर्षाचे झाल्यानंतर त्यांची प्राथमिक निवड करतात. या निवडीत जे बैल दुर्बळ व भित्रे असल्याचे आढळून येते, त्यांना वगळण्यात येते. याप्रमाणे पाच वर्षांत तीन वेळा निवड करण्यात येते. या तिन्ही निवडींत जो बैल सरस ठरेल त्याला झुंजीसाठी निवडतात. शर्यतीच्या घोड्यांची निवड करताना ज्याप्रमाणे त्यांच्या मागील कित्येक पिढ्यांची नोंद तपासण्यात येते, त्याचप्रमाणे या झुंजार बैलांची निवड करतानाही त्यांच्या वंशाची माहिती तपासून पाहण्यात येते.

रेड्यांची झुंज :रेड्यांची झुंज ही बहुधा भारतातील खेड्यांतून पहावयास मिळते. बैलांप्रमाणेच रेड्यांचीही झुंजीसाठी तयारी केली जाते. खेड्यातील जत्रेतून रेड्यांच्या टकरी हे मोठे आकर्षण असते. टकरीसाठी जे रेडे मैदानात आणतात, त्यांची शिंगे लाल रंगाने रंगवितात.

एडक्यांची झुंज : एडक्यांची झुंज हीसुद्धा भारतातच पहावयास मिळते. एडक्याला कमानदार शिंगे असतात. खेड्यापाड्यांतून एडक्यांच्या टकरी लावल्या जातात. या झुंजीसाठी एडक्यांची खास तयारी करून घेतली जाते.

गेंड्यांची झुंज :हा खेळ फक्त आफ्रिकेतच पहावयास मिळतो. आफ्रिकेतील घनदाट जंगलात गेंडा हा हिंस्त्र प्राणी आढळतो. या प्राण्याची शिकार केली जाते. पंरतु काही लोक गेंड्याच्या पिलाला लहानपणापासून पाळून व त्याला खुराक वगैरे खाऊ घालून झुंजीसाठी तयार करतात.

कार्लेकर, शि. शं.