व्हिश्न्येव्ह्स्की, व्ह्येस्‌व्होल्ड : (२१ डिसेंबर १९००–२८ फेब्रुवारी १९५१). आधुनिक रशियन नाटककार. जन्म पेट्रग्राड (लेनिनग्राड) येथे. विद्यार्थिदशेत असतानाच १९१४ साली ते सैन्यात शिरले. पुढे रशियात झालेल्या ऑक्टोबर क्रांतीतही (१९१७) ते सहभागी झाले. त्यानंतर सोव्हिएट रशियाच्या घोडदळात आणि नाविक दलात त्यांनी नोकरी केली. जा व्लास्त सवेतव (१९२४, इं. शी. फॉर द रूल ऑफ द सोव्हिएट्स) हा त्यांच्या कथांचा आणि निबंधांचा संग्रह. रशियातील सर्वसामान्य जनतेने क्रांतिकाऱ्यात गाजविलेले पराक्रम त्यांनी आपल्या नाटकांतून चित्रित केले. पेरवाया कोन्नाया (१९२९, इं. शी. द फर्स्ट कॅव्हल्री), पस्ल्येदनी रिशीत्येलनी (१९३१, इं. शी. ॲन ऑप्टिमिस्टिक ट्रॅजेडी ) ही त्यांची नाटके विशेष प्रसिद्ध आहेत. समाजवादी वास्तववादाचा नाट्यरूप अविष्कार त्यांच्या नाटकांतून प्रभावीपणे करण्यात आला आहे. त्यांनी काही पटकथा आणि माहितीपटांचे लेखनही केले. १९५० साली त्यांना सोव्हिएट रशियाचा शासकीय पुरस्कार मिळाला. लेनिनग्राड (सध्याचे सेंट पीटर्झबर्ग) येथे ते निधन पावले.

पांडे, म. प.(इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)