ल्येस्कॉव्ह, न्यिकलाय : (१६ फेब्रुवारी १८३१-५ मार्च १८९५). रशियन कथा-कादंबरीकार. जन्म रशियातील गरॉखफ येथे. फौजदारी न्यायालयात एक कनिष्ठ कारकून म्हणून काही काळ काम केल्यानंतर त्याने एका इंग्रजी व्यापारी संस्थेत नोकरी धरली आणि ह्या नोकरीच्या निमित्ताने रशियात खूप प्रवास केला. त्याच्या बर्यावचशा कथा-कादंबऱ्यांची सामग्री त्याला ह्या प्रवासाच्या अनुभवांतूनच मिळाली. १८६० साली तो पत्रकारितेकडे वळला. ‘लोडी मॅक्बेथ ऑफ द मिसेन्स्क डिस्ट्रिक्ट’ (१८६५, इं, भा. १९६१) आणि ‘द टेल ऑफ क्रॉसआदड लेफ्टी फ्रॉम तुला अँड द स्टील फ्ली’ (१८८१, इं. शी.) ह्या त्याच्या कथांमुळे त्याला विशेष ख्याती प्राप्त झाली. एका व्यापाऱ्याच्या पत्नीचे क्रौर्य ‘लेडी मॅक्बेथ……’ ह्या कथेत प्रत्ययकारीपणे चित्रित केले आहे. ‘द टेल ऑफ क्रॉसआइड लेफ्टी …’ ही एक उपरोधप्रचुर कथा. Nekuda (१८६४, इं. शी. नोव्हेअर टू गो) आणि Na Nozhakh (१८७०-७१, ई. शी. ॲट डॅगर्स ड्रॉन) ह्या त्याच्या दोन कादंबऱ्यांवर रशियातील  प्रागतिकांनी कठोर टीका केली होती कारण रशियातील क्रांतिकारी चळवळीविरुद्ध त्या कादंबऱ्यांचा रोख होता. ल्येस्कॉव्हच्या विचारांत पुढे परिवर्तन घडून आले. Suboryane (१८७२, इं. भा. कॅथीड्रल फोक, १९२४) ही त्याची सर्वोत्कृष्ट कादंबरी. रशियाच्या ग्राणीण भागातील धर्मोपदेशकांचे वे प्रभावी चित्र ह्या कादंबरीत त्याने रेखाटले आहे.

उत्कृष्ट निवेदनशैली आणि वेगाने उलगडत जाणारी गुंतागुंतीची संविधानके ही ल्येस्कॉव्हच्या कथात्मक साहित्याची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. रशियन जीवनाच्या त्याने केलेल्या सर्जनशील निरीक्षणाचा व्यापक आवाका त्याच्या साहित्यकृतींतून दिसून येतो. भाषेचा वापरही त्याने चतुरस्रपणे केला. विविध प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या त्याच्या व्यक्तिरेखा आपापल्या बोलभाषेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दकळा वापरताना दिसतात. विनोदनिर्मितीसाठी त्याने काही वेळा चर्च स्लाव्होनिकचाही वापर केला आहे. सेंट पीटर्झबर्ग येथे तो निधन पावला. 

कुलकर्णी, अ. र.