न्येक्रासॉव्ह, न्यिकलाय : (१० डिसेंबर १८२१–८ जानेवारी १८७८). रशियन कवी व पत्रकार. जन्म युक्रेनमधील युझ्विन येथे. पीटर्झबर्ग विद्यापीठात चालू असलेले त्याचे शिक्षण त्याच्या वडिलांनी त्याला मदत करण्याचे नाकारल्यामुळे संपुष्टात आले आणि तो लेखनव्यवसायाकडे वळला. १८४६ मध्ये सव्हरेमेन्निक (इं. शी. कंटेंपररी) ह्या मासिकाचे मालकी हक्क त्याने विकत घेतले. विख्यात रशियन लेखन अलिक्सांद्र पुश्किन हा ह्या मासिकाचा संस्थापक. त्याच्या निधनानंतर ह्या मासिकाची स्थिती चांगली राहिली नाही. तथापि न्येक्रासॉव्हने ते नावारूपाला आणले त्याला श्रेष्ठ वाङ्‍मयीन नियतकालिकाचा दर्जा प्राप्त करून दिला. लीओ टॉलस्टॉय आणि टुर्ग्येन्येव्ह ह्यांच्यासारख्या जगद्विख्यात रशियन साहित्यिकांनी सव्हरेमेन्निकसाठी आस्थेने लेखन केले. तथापि रशियातील जहालमतवाद्यांचे मुखपत्र, अशी सव्हरेमेन्निकची प्रतिमा हळूहळी प्रस्थापित होत गेली आणि १८६६ मध्ये सरकारने त्यावर बंदी घातली. त्यानंतर फादरलँड ॲनल्झ (इं. शी.) ह्या नियतकालिकाचे त्याने हयातभर संपादन केले.

त्याच्या कवितांतून रशियातील निसर्गाचे आणि कृषिजीवनाचे वास्तववादी चित्रण आलेले आहे. रशियातील सर्वसामान्यांच्या दुःखीकष्टी जीवनाचे प्रत्ययकारी आणि प्रातिनिधिक दर्शन त्याने घडविले. त्याच्या ‘हू कॅन बी हॅपी इन रशिया?’ ह्या इंग्रजी शीर्षकार्थाच्या दीर्घ कवितेत रशियन प्रशासनातील दोषांवर त्याने उपरोधपूर्ण टीका केली. ‘रेड नोज्‌ड फ्रॉस्ट’ (इं. भा.) ही त्याची आणखी एक उल्लेखनीय कविता. एका शूर शेतकरी स्त्रीचे वेधक व्यक्तिचित्र तीत त्याने रेखाटलेले आहे. कवितेला सामाजिक कार्य आणि प्रयोजन आहे, अशी न्येक्रासॉव्हची श्रद्धा होती आणि त्याचा देश हेच त्याचे खरेखुरे स्फूर्तिस्थान होते. नैतिक उद्‍बोधनाचा सूर त्याच्या सामाजिक कवितांतून स्पष्टपणे जाणवतो. रशियन लोकसाहित्याच्या परंपरेशी त्याच्या कवितेचे निकटचे नाते आहे. रशियन लोकगीतांतून त्याने आपल्या कवितेसाठी अनेक नवे छंद घेतले ती लोकसंगीतानुकूल केली. त्याच्या कवितेचा कलात्मक दर्जा मात्र एकविध नाही तीत अनेकदा भावविवशतेचा दोषही आढळतो. सेंट पीटर्झबर्ग येथे तो निवर्तला.

कुलकर्णी, अ. र.