आंद्रेयेव्ह, लिओनिद : (१८ जून १८७१–१२ सप्टेंबर १९१९). एक रशियन लेखक. जन्म ऑरेल येथे. तो कायद्याचा पदवीधर असला, तरी लेखन हाच त्याच्या आयुष्याचा व्यवसाय होता. त्याने कथा, नाटक, कादंबरी असे विविध साहित्यप्रकार हाताळलेले असले, तरी तो मुख्यत: कथाकार म्हणून त्याच्या पहिल्या कथासंग्रहापासूनच (१९०१) लोकप्रिय ठरला. त्याच्या उत्कृष्ट कथांपैकी क्रास्नि स्मेख (१९०५, इं. भा. रेड लाफ) ही एक विशेष महत्त्वाची कथा होय. या कथेत युद्धाविषयीची त्याची चीड दिसून येते. त्याचे लेखन आरंभी वास्तववादी असले, तरी पुढे ते प्रतीकात्मकतेकडे व निराशावादाकडे झुकल्याचे दिसते. बोल्शेव्हिक क्रांतिकारकांबद्दल त्याला प्रथम फार सहानुभूती वाटतहोती पण प्रत्यक्ष बोल्शेव्हिक क्रांतीनंतर (१९१७) त्याचा क्रांतीविषयीचा भ्रमनिरास झाला. अखेर रशियाबाहेर फिनलंड येथे तो मरण पावला. 

मेहता, कुमुद