मुसिल रोबेर्ट : (६ नोव्हेंबर १८८०–१५ एप्रिल १९४२). ऑस्ट्रियन कादंबरीकार. क्लॅगनफर्ट येथे जन्मला. मोरिस वाईषकिर्षन येथील लष्करी शाळेत तो काही काळ होता परंतु ते शिक्षण सोडून त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. पुढे तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र हे विषय घेऊन बर्लिन विद्यापीठातून त्याने डी. फिल्. ही पदवी मिळवली (१९०८).

मुसिलला त्याच्या देअर मान् ओन ऽ  आयगेनशाफ्टन्‌ (३ भाग १९३०, १९३३, १९४३ इं. भा. द मॅन विदाउट क्वालिटीज १९५३–६०) या कादंबरीने प्रसिद्धी मिळाली. १,६७० पानांचा प्रचांड पसारा आणि त्याला योग्य असा विषयाचा आवाका असलेली ही कादंबरी अपूर्णच राहिली. तीत १९१३–१४ या काळातल्या विनाशाकडे जाणाऱ्या ऑस्ट्रियन राज्याचे आणि त्याही पलीकडे जाऊन केलेले तत्कालीन आधुनिक समाजाच्या नैतिक अधःपतनाचे सखोल चित्रण दिसते. या कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा उल्‌रिष्‌ हा एक बुद्धिमान गणितज्ञ असून, बुद्धिवादापेक्षा गूढवादाला त्याच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. प्रस्थापित सत्यापेक्षा प्रत्येक गोष्टीतून निघणाऱ्या भविष्यकालीन शक्यतांवर त्याचा अधिक विश्वास असतो. सामाजिक – राजकीय जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तो आपल्या नवीन योजनेसह उमेदीने भाग घेतो. व्यक्तिगत जीवनात त्याचे त्याच्या बहिणीशी असलेले प्रेमसंबंधही तो नैतिक परिवर्तनाचा भाग समजतो. पण दोन्ही पातळ्यांवरील त्याचे हे प्रयत्न व प्रयोग असफल ठरतात. पहिले महायुद्ध उल्‌रिष्‌ला आणि त्याच्या समाजाला व राज्याला पूर्णपणे घेरून टाकते.

कादंबरीचा हा नायक लेखकाशी बराच मिळताजुळता वाटतो. त्याचे चित्रण करीत असताना ‘मी’ आणि त्याचे विश्वाशी नाते एक प्रकारच्या मनोवैज्ञानिक विश्लेषणातून मांडण्याचा मुसिलचा प्रयत्न आहे. नायकाच्या शारीरिक आणि मानसिक यातना सशब्द करताना सामाजिक मनोवृत्ती आणि व्यक्तिचे अंतर्मन ह्यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणाऱ्या संकुल अर्थ लावण्याचा त्याचा यत्न ज्या शैलीतून त्याने साकार केला ती शैली विख्यात फ्रेंच कादंबरीकार मार्सेल प्रूस्त आणि आयरिश कादंबरीकार जेम्स जॉइस ह्यांचे स्मरण करून देते. मुसिलने नाट्यलेखन, तसेच निबंधलेखन व कथालेखनही केले. जिनीव्हा येथे तो मरण पावला.

महाजन, सुनंदा