बालभवन : मुलांच्या सांस्कृतिक विकासासाठी रंजनपर माध्यमांतून कार्य करणारी शासकीय संस्था. सामान्यत: चार ते चौदा (काही ठिकाणी सोळा) वर्षे वयोगटातील मुलांच्या सुप्त गुणांना विविध छंद व मनोरंजक कार्यक्रम यांद्वारे भरपूर वाव देणे, हे बालभवनाचे मूळ उद्दिष्ट होय. तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी आपल्या आवडत्या छंदांमध्ये मुक्तपणे प्रगती व कौशल्य साधावे, मुलांमध्ये विधायक कार्य करण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी व मुलांचा आत्मविश्वास वाढावा, या दृष्टीने बालभवनाच्या कार्यक्रमांची आखणी केली जाते. बालभवनामध्ये असामान्य, सामान्य व अतिसामान्य अशा सर्व बौद्धिक स्तरांवरील मुलांना योग्य प्रकारे वाव दिला जातो. हुशार मुलांना बालभवनात भरपूर साधनसामग्री, वैयक्तिक मार्दर्शन व मुबलक वेळ यांमुळे खूपच प्रगती करता येऊन आपली गुणवत्ता वाढवता येते. शाळेत ठराविक तासांच्या बंधनामुळे व परीक्षाकेंद्रित अभ्यासक्रमामुळे सामान्यत: हुशार मुलांकडेच विशेष लक्ष पुरवणे शक्य होते. सामान्य व अतिसामान्य (अगदी बेताच्या बुद्धीची, पण मंदबुद्धी नव्हेत) मुले घरून मदत नसल्यास अभ्यासात मागे पडतात व शाळेतही दुर्लक्षित राहतात. अशा मुलांना शाळेमध्ये आपला आत्मविश्वास वाढवण्यास वा एखादा सुप्त गुण विकसित करण्यास वा एखादी गोष्ट करून पाहण्यास फारशी संधीच मिळत नाही. बालभवनामध्ये अशा मुलांना शैक्षणिक विषयांव्यतिरिक्त त्यांच्या आवडीनिवडीच्या एखाद्या छंदामध्ये प्रगती करण्यास पूर्ण वाव दिला जातो. आवडेल तो छंद हाताळता आल्याने तसेच खेळ, बालचित्रपट व अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांमुळे मुलांचे मनोरंजनही होते. सारांश, असामान्य मुलांना जास्तीत जास्त संधी व साधने देणे, सामान्यांना पुढे येण्यास योग्य तो वाव देणे व अतिसामान्य मुलांना अवहेलनेपासून, न्यूनगंडापासून वाचवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, हे स्थूल मानाने बालभवनाच्या कार्याचे उद्दिष्ट होय.

बालभवनातून मुलांच्या सुप्त गुणांना व अमाप उत्साहाला विविध छंदांतून व मनोरंजनपर उपक्रमांतून म्हणजे सर्जन, निरीक्षण, विश्लेषण, प्रयोग, आयोजन, रचना वगैरेंतून चालना व संधी दिली जाते. बालभवनामधअये बैठे व मैदानी खेळ, हस्तव्यवसाय, चित्रकला, मातीकाम वगैरे संगीत, नृत्य, नाट्य , वक्तृत्व, कथाकथन इ. सोपे वैज्ञानिक प्रयोग, ज्ञानवर्धक वृत्तांतकथन, लेखन इ. यांसारखे विविध प्रकारचे विषय मुलांना उपलब्ध असतात. तसेच त्यांतील स्पर्धाही आयोजित केल्या जातात. मुलांना करमणुकीसाठी बालचित्रपट, जादूचे खेळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ इ. दाखवले जातात. सहली काढल्या जातात. वाचानालये, वस्तुसंग्रह, प्रदर्शने आदी सुविधाही असतात. मुलांना कोणत्याही अभ्यासक्रमाची सक्ती वा बांधीलकी जिकिरीची व नकोशी वाटते. आवडेल त्या विषयातील काम मन रमेल तेवढा वेळ करीत राहणे आवडते. म्हणून बालभवनात ठराविक अभ्यासक्रम पार पडलाच पाहिजे, असे बंधन नाही. शाळेमधील धाकाचे, कडक शिक्षायुक्त शिस्तीचे वातावरण असू नये, याउलट शक्य तितके मुक्त, मनमोकळे वातावरण असावे, यावर कटाक्ष असतो. वेगवेगळे छंद शिकवण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ शिक्षक नेमलेले असतात. ते आपल्या विषयाची मुलांना कोणकोणत्या उपक्रमांमुळे गोडी लागेल ह्याचा विचार करून, वर्षभरात शिकवण्याच्या उपक्रमांची आखणी करतात व त्यानुसार शिकवतात. ज्या मुलांना ते उपक्रम जमत नसतील त्यांना दुसरे उपक्रम दिले जातात. बालभवनाच्या वेळा सर्वसामान्यपणे दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सकाळी साडेआठ ते साडेअकरा व सांयकाळी पाच ते सात आणि एऱ्हवी दुपारी साडेतीन ते सात अशा असतात. काही बालभवनांमध्ये नेहमीच सकाळ-संध्याकाळ कार्य चालते.

मुंबईमध्ये १९५२ साली एक सरकारी बालभवन सुरू झाले. हे भारतातील पहिले बालभवन होय. सोव्हिएट सरकारने मुलांमधील सुप्त गुणांच्या विकासासाठी ‘पायोनिअर पॅलेसिस’ हे छंदशिक्षणाचे राष्ट्रीय केंद्र स्थापून गावोगावी त्याच्या शाखांची उभारणी केली. या पायोनिअर पॅलेसिसच्या तसेच अन्य देशांतीलही बहि:शाल कार्यक्रमांच्या अभ्यासातून प्रेरणा घेऊन तत्कालीन मुंबई सरकारच्या शिक्षणखात्याचे सल्लागार डॉ. के.जे. सैयदिन यांनी १९४८ मध्ये एक बालकेंद्रयोजना आखली. त्याचेच मूर्त स्वरुप म्हणजे वर उल्लेखिलेले बालभवन होय. १९५५ मध्ये केंद्र शासनाने दिल्लीमध्ये एक प्रशस्त बालभवन उभारण्याचा ठराव केला. शासकीय तसेच खाजगी प्रतिनिधी असलेल्या स्वायत्त अशा मंडळाच्या देखरेखीखाली १९५६ मध्ये हे प्रशस्त बालभवन सुरू झाले. या काळात राजकोट, चंडीगढ वगैरे शहरीही मोठे बालभवने उभारण्यात आली.

अल्पावधीतच दिल्ली येथील बालभवनाला नेहरूंच्या कल्पनेतील राष्ट्रीय बालकांचे वस्तुसंग्रहालय जोडण्यात आले. माहितीफलक, भित्तिचित्रे, छायाचित्रे, माती, रेती तसेच अन्य माध्यमांचा वापर करून उभारलेली दृश्ये, प्रकल्प, चित्रपट, कळसूत्री बाहुल्या वगैरे साधनांद्वारा अनेक महत्त्वाच्या विषयांची प्रारंभापासून अद्ययावत माहिती देणारे प्रदर्शनकेंद्र असे त्याचे स्वरुप होते. ते बालभवनांचे अपरिहार्य अंग बनले. नेहरूंच्या निधनानंतर (१९६४) राष्ट्रभर जवाहरलाल नेहरू स्मारक निधी उभारण्यात आला. त्यातून प्रत्येक राज्याने जमविलेल्या निधीपैकी चाळीस टक्के रक्कम त्या त्या राज्याला राज्यस्तरीय जवाहर बालभवन स्थापण्यासाठी परत देण्याचे ठरले. जवाहर बालभवनाच्या शक्याशक्यतेच्या चर्चेसाठी केंद्र शासन व नेहरू स्मारक समितीतर्फे दि. ८ ते १२ जून १९६६ या अवधीमध्ये विविध राज्यांतील शासकीय प्रतिनिधींची व शिक्षणतज्ञांची दिल्लीच्या बालभवनामध्ये एक बैठक झाली. बैठकीतील चर्चेतून राज्यस्तरीय जवाहर बालभवनांची गरज, घडण, शासकीय नियंत्रण, नियम, अटी व खर्चाचा तपशील तयार झाला. प्रत्येक राज्यस्तरीय बालभवनाला एकेक शिक्षक-प्रशिक्षण केंद्र, विचित्र वागणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी मार्गदर्शन केंद्र व मुलांची प्रगती व वर्तणूक यासंबंधी संशोधन केंद्र असावे, हे अभिप्रेत आहे. या योजनेनुसार मुंबईच्या बालभवनाचे राज्यस्तरीय जवाहर बालभवनात रुपांतर झाले (१९७७). त्याची मुंबईच्या उपनगरांतून आठ व महाराष्ट्रात अन्यत्र बारा उपकेंद्रे आहेत. महाराष्ट्र व दिल्लीखेरीज आसाम, बंगाल, उत्तर प्रदेश, हरयाणा, जम्मू व काश्मीर, गुजरात, कर्नाटक, आंध्र, केरळ व तमिळनाडू या राज्यांतून राज्यस्तरीय जवाहर बालभवने व त्यांची उपकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

पायगावकर, सुमती