गोरा कुंभार : (१२६७–१३१७). एक मराठी संत. पंढरपूरजवळील तेरढोकी येथे तो राहत असे. जातीने तो कुंभार होता आणि त्याला संती व रामी नावाच्या दोन बायका होत्या. आपले काम करीत असता तो विठ्ठलाचे नामस्मरण करी. एकदा माती तुडविताना तो नित्याप्रमाणे नामस्मरणात तल्लीन झाला आणि त्याने रांगत आलेले स्वतःचे लहान मूल पायाखाली तुडविले, अशी आख्यायिका आहे. त्याच्याबाबत इतरही आख्यायिका रूढ आहेत. 

ज्ञानेश्वरादी संतमंडळीत तो सर्वांत वडील होता आणि सर्वजण त्याला गोरोबाकाका म्हणत. नामदेव परमार्थात कच्चा आहे की पक्का, हे ठरविताना गोरोबाचे मत प्रमाणभूत मानले गेले. त्याने आपल्या स्वानुभवाच्या थोपटण्याने मडके वाजवून तो निर्णय दिला, असे म्हटले जाते. त्याचे फक्त वीसच अभंग उपलब्ध आहेत. त्यांत त्याने नामदेवाचा मोठ्या प्रेमाने वारंवार उल्लेख केला आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेल्या उद्धवचिद्‌घनाने त्याचे मराठीत ओवीबद्ध चरित्र लिहिले आहे. तेरढोकी येथे त्याची समाधी असून तेथील त्याचे घर, त्याचप्रमाणे मूल तुडविलेली जागा आजही लोक दाखवितात. 

फरांडे, वि. दा.