ललितविस्तर : महायान पंथाचा गद्यपद्यमिश्रीत संस्कृत ग्रंथ. नेपाळी बौद्धांच्या नवधर्मग्रंथापैकी एक. ह्या ग्रंथात एकूण २७ परिच्छेद वा परिवर्त असून त्यात गौतम बुद्धाचे आरंभापासून धर्मचक्रप्रवर्तनापर्यंतचे चरित्र आलेले आहे. महायान ग्रंथांच्या पद्धतीप्रमाणे ह्या ग्रंथातील निवेदन अनेक दैवी चमत्कारांसह आलेले आहे. ह्या ग्रंथातील पद्याची भाषा क्वचित ठिकाणी आर्ष असून व्याकरणरूपे पाली प्राकृत रूपांशी जुळणारी आहेत. मिथिला विद्यापीठातर्फे प्रसिद्ध झालेल्या बौद्ध संस्कृत ग्रंथमालेतील हा पहिला ग्रंथ होय. तत्पूर्वी राजेंद्रलाल मित्र व यूरोपीय पंडित लेफमान ह्यांनी हा ग्रंथ संपादून प्रसिद्ध केला होता (अनुक्रमे १८७७ १९०२-०८). तिबेटी व चिनी भाषांत ह्या ग्रंथाची संस्करणे झालेली आहेत. बोरोबूदूर येथील शिल्पकारांना हा ग्रंथ परिचीत होता, असे तेथील शिल्पांवरून वाटते.

बापट, पु. वि.