वेतालपंचविंशतिका : (वेतालपंचविंशति). संस्कृतातील एक प्राचीन कथासंग्रह. वेताळाने सांगितलेल्या पंचवीस कथा ह्या ग्रंथात आहेत. वेताळपंचविशी  या नावाने तो मराठीत ओळखला जातो. ह्या कथांचे पाच पाठ उपलब्ध आहेत. सर्वांत जुने असे दोन पाठ ⇨ क्षेमेंद्रकृत बृहत्कथा मंजरीच्या आणि ⇨सोमदेवाच्याकथासरित्सागराच्या  काश्मीरी संहितावरुन मिळतात. हे दोन्ही ग्रंथ अकराव्या शतकातले असून ते कवी ⇨गुणाढयकृत बड्डकहा (बृहत्कथा) ह्या ⇨पैशाची भाषेतील मूळ अनुपलब्ध ग्रंथाच्या संकलित संहिताधारे रचण्यात आलेले आहेत. [→ पैशाची साहित्य]. वेतालपंचविंशतिकेची शिवदासकृत संहिता गद्य असून तीत अधूनमधून काही पद्ये येतात. ह्या संहितेचे एक हस्तलिखित १४८७ चे आहे. ह्या कथासंग्रहाची वल्लभदासाने तयार केलेली संहिताही उपलब्ध असून तिचे शिवदासकृत संहितेशी बरेच साम्य आहे. पाचवी संहिता जंभलदत्ताची (सु. सोळावे शतक). ही जवळजवळ गद्यातच असून तीत फक्त एकोणीस श्लोक आढळतात.    

यातील कथांचे निमित्त असे : विक्रमकेसरी किंवा विक्रमसेन (सोमदेवाच्या संहितेत त्याला त्रिविक्रमसेन म्हटले आहे). नावाच्या एका बलाढय राजाला क्षांतिशील नावाचा एक कापालिक सतत बारा वर्षे रोज एक बिल्वफळ भेट देत असे. त्याने दिलेल्या प्रत्येक बिल्वफळात पाच मौल्यवान रत्ने असतात, हे राजाच्या लक्षात आल्यावर त्याने त्या कापालिकास आपल्या भेटीस बोलावून, ‘तुझी इच्छा काय आहे?’ असे विचारले. तेव्हा आपणास मृतकसिध्दी प्राप्त करुन घ्यावयाची असून त्या संदर्भात एक विशिष्ट यातुविधी करण्यासाठी शिंशपवृक्षावर (शिसूच्या झाडावर) टांगलेले प्रेत आपल्याला हवे आहे, असे तो सांगतो. भाद्रपद मासाच्या कृष्णपक्षातील चतुर्दशीच्या काळोख्या रात्री हे प्रेत आणायचे असते. राजा त्याची ही विनंती मान्य करुन स्वतः ते प्रेत आणण्यास निघतो. हे प्रेत आणण्याचे काम पूर्णतः मौन पाळून करावयाचे असते. तथापि त्या प्रेताचा ताबा भूतनाथ ⇨वेताळाने आधीच घेतलेला असतो. ‘ह्या प्रेताला मी सोडावे, असे वाटत असल्यास मी एक गोष्ट सांगतो आणि त्यानंतर त्या गोष्टीबाबत एक कूटप्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचे उत्तर तुला ठाऊक असल्यास तू ते दिलेच पाहिजेस. अन्यथा तुला पाप लागेल’ असे सांगून तो राजाला पंचवीस कथा सांगतो आणि त्या प्रश्नांची उत्तरे राजाकडून घेऊन मौन पाळण्याची अट राजाला मोडायला लावतो.    

ह्या सर्व कथा वैविध्यपूर्ण असून प्रत्येक कथेच्या शेवटी विचारण्यात आलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर अत्यंत मार्मिक आहे. चतुरोक्तीही ह्या कथांतून येतात. क्षेमेंद्र आणि सोमदेव ह्यांच्या काश्मीरी संहिता पद्यमय असून जंभलदत्ताची साध्या, अनलंकृत गद्यात आहे. शिवदासाच्या संहितेतील वाङ्‌मयीन डौल आणि निवेदनकौशल्य लक्षणीय आहे. भारतीय तसेच जागतिक कथासाहित्याच्या इतिहासात ह्या कथांना महत्त्वपूर्ण स्थान आहे.

ह्या कथांच्या शिवदासकृत संहितेचे इटालियन भाषांतर व्ही. बेत्तई ह्यांनी केले आहे. कथासरित्सागरातील जवळपास निम्म्या वेताळकथांचा जर्मन अनुवाद एफ्‌. व्होन डर लेयेन ह्यांनी केला आहे. ⇨ सदाशिव काशिनाथ छत्रे ह्यांनी ह्या कथा वेताळपंचविशी (१८३०) ह्या नावाने मराठीत आणल्या. साहित्याचार्य पं. दामोदर झा ह्यांनी ह्या ग्रंथाचे हिंदी भाषांतर केले आहे. यांखेरीज या कथा अनेक भारतीय व परदेशी भाषांत भाषांतरित अथवा रुपांतरित झाल्या आहेत. ह्या कथांची लोकप्रियता लक्षात घेऊन भारतीय दूरचित्रवाणीच्या पडद्यावरही त्या आणण्यात आल्या.

संदर्भ : 1. Dasgupta, S.N. De, S. K. A History of Sanskrit Literature, Calcutta, 1962.           2. Gore, N. A. Ed. Vetalapancavinsati of Jambhaladatta, Pune, 1952.

कुलकर्णी, अ. र.