यॉर्क−२ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील याच नावाच्या परगण्याचे मुख्यालय व औद्योगिक शहर. लोकसंख्या ४४,६१९ (१९८०). हे हॅरिसबर्गच्या आग्नेयीस ४५ किमी. अंतरावर कोडोरस क्रीक या सस्क्वेहॅना नदीच्या उपनदीवरील दोन्ही तीरांवर वसले आहे. हे महानगरीय जिल्ह्याचे केंद्र असून त्यात नॉर्थ यॉर्क, वेस्ट यॉर्क हे परगणे व अनेक लहान गावे अंतर्भूत होतात.
प्रथम १७३५ मध्ये सस्क्वेहॅना नदीच्या पश्चिमेस काही जर्मन, इंग्रज क्वकरपंथीय व स्कॉटिश − आयरिश लोकांनी जी एक स्थायी वसाहत उभारली, तीच यॉर्कचे मूलस्थान होय. १७४१ मध्ये विल्यम पेन (१६४४−१७१८) ह्या स्वातंत्र्यवादी व क्वेकरपंथीय इंग्रजाचा नातू स्प्रिंगेट पेन याच्या मालकीच्या ‘स्प्रिंगेट्सबरी मॅनॉर’ या भूखंडावर गावाचा आराखडा बनविण्यात आला व त्याला ‘यॉर्क’ असे इंग्रज शहराचेच नाव देण्यात आले. काँटिनेंटल काँग्रेसने अल्पकाळ (३० सप्टेंबर १७७७ − २७ जून १७७८) यॉर्क येथे आपली ‘राष्ट्रीय राजधानी’ स्थापिली होती. येथील जुन्या परगण्याच्या न्यायालयवास्तूमध्ये काँग्रेसने राज्यसंघ संस्थापना नियमावली संमत केली. साराटोगामधील जनरल जॉन बर्गाइनच्या शरणागतीची वार्ता यॉर्कमध्येच काँग्रेसला मिळाली ‘प्रथम राष्ट्रीय आभार प्रदर्शना’ची उदघोषणा येथूनच काँग्रेसने जारी केली व फ्रान्स नवजात अमेरिकन राष्ट्राला साहाय्य करणार असल्याची वार्ता पॅरिसस्थित बेंजामिन फ्रँक्लिनकडून काँग्रेसला येथेच समजली. काँग्रेसने फ्रीड्रिख व्हिल्हेल्म स्ट्यूबेन (१७३० − ९४) हा प्रशियन लष्करी अधिकारी व मार्को द लाफायेत (१७५७-१८३४) हा फ्रेंच मुत्सद्दी व लष्करी अधिकारी या दोघांना काँटिनेंटल सेनेमध्ये मेजर जनरल असे मोठे हुद्दे देऊ केले. हे दोघेही वॉशिंग्टनचे विश्वासू सहकारी बनले. यॉर्कमध्येच टॉमस कॉनवे (१७३५ − १८००) या सैनिकाचा उपयोग करून जनरल होरेशियो गेट्सने (१६७८) जनरल वॉशिंग्टनचा काटा काढण्याकरिता उभारलेल्या ‘कॉनवे षड्यंत्राचा’ (कॉनवे कॅबाल) लाफायेतने बीमोड केला. फ्रान्सने उसनवारीने देऊ केलेली १५ लक्ष डॉलर किंमतीची चांदी यॉर्क शहरी १७७८ मध्ये आणण्यात आली आणि येथेच बेंजामिन फ्रँक्लिनच्या छापखान्यातून सु. एक कोटी डॉ. किंमतीचा ऐवज ‘काँटिनेंटल नोटां’च्या रूपाने छापण्यात आला. यादवी युद्धात (१८६१ − ६५) राज्यसंघीय फौजांनी यॉर्कमध्ये शिरून लहानशा संघीय सैन्याला माघार घ्यावयास लावली. यॉर्कला १७८७ मध्ये परगण्याचा, तर १८८७ मध्ये शहराचा दर्जा मिळाला.
यॉर्कची अर्थव्यवस्था शेती, निर्मितीउद्योग व वितरण अशा तिहेरी स्वरूपात विकसित झाल्याचे आढळते. निर्मितीउद्योगांत प्रशीतक व वातानुकूलन यंत्रे, टरबाइन व ट्रॅक्टरचे सुटे भाग, शेती व बांधकाम सामग्री, फर्निचर, तारजाळी व छत-आच्छादन साहित्य, कागद, कापडवस्त्रे, विणमाल, सिमेंट, खाद्यपदार्थ, तंबाखू, कृत्रिम दात, लष्करी साहित्य इ. विविधांगी उद्योगांचा भर दिसून येतो. देशातील अनेक मोठ्या कंपन्यांची वितरण कार्यालये यॉर्कमध्येच आहेत.
शहरात ‘यॉर्क कॉलेज ऑफ पेनसिल्व्हेनिया’ (१९४१), पेनसिल्व्हेनिया राज्य विद्यापीठाचे यॉर्क विद्यापीठक्षेत्र (१९४९) ही उच्च शिक्षणकेंद्रे आहेत. यॉर्कमध्ये सुरेख वसाहतकालीन घरे व चर्चवास्तू अद्यापि पहावयास मिळतात. प्रतिवर्षी येथे भरणारी आंतरराज्यीय जत्रा व प्रदर्शन प्रसिद्ध आहे. येथील प्रेक्षणीय वास्तूंमध्ये वसाहतकालीन न्यायालयवास्तू असलेला ‘काँटिनेंटल स्क्वेअर’ हा चौक ‘फ्रेंड्स मीटिंग हाउस’ (१७६५) ही वास्तू, तसेच अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करणाऱ्या जेम्स स्मिथ (१७१९ − १८०६) या प्रख्यात कायदेपंडिताचे थडगे असलेले पहिले प्रेसबिटेरियन चर्च तसेच स्मशानगृह इत्यादींचा समावेश होतो.
गद्रे, वि. रा.