सेनापति : (सु. १५८९ – ?). मध्ययुगीन हिंदी कवी. उत्तर प्रदेशातील अनुपशहर (जिल्हा बुलंदशहर) येथे जन्म. त्याने रचलेला कवित्त-रत्नाकर हा एकमेव काव्यग्रंथ उपलब्ध असून, त्याचा रचनाकाळ सु. १६४९ असा दर्शविला जातो. त्याच्या चरित्राविषयी फारशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्याचे मूळ नावही नेमकेपणाने सापडत नाही. ‘सेनापती’ हे त्याला मिळालेले नाव असावे. कवित्त-रत्नाकरातील एका पदावरून, त्याच्या आजोबांचे नाव परशुराम दीक्षित, वडिलांचे नाव गंगाधर व गुरूचे नाव हिरामणी दीक्षित होते, एवढीच माहिती मिळते. काही काळ तो मोगलांच्या दरबारी होता. तिथे त्याला मानसन्मानही लाभले. पुढे उत्तरायुष्यात त्याने क्षेत्रसंन्यास घेतला व अखेरचे दिवस वृंदावन येथे घालवले, असे उल्लेख आढळतात. त्याचे आराध्य दैवत श्रीराम होते, हे कवित्त-रत्नाकराच्या चौथ्या तरंगावरून (अध्याय) स्पष्ट होते. या अध्यायात कवीने भक्तिभावाने रामचरित्र वर्णिले असून, रामाच्या महत्कार्याचे गुणगान केले आहे. या तरंगात रावणालाही महान योद्धा म्हणून गौरविले असून, अशा योद्ध्याला जिंकणाऱ्या रामाची स्तुती केली आहे. दुसऱ्या तरंगात शृंगार व नायक-नायिका भेद या विषयांचे विस्तृत वर्णन आहे. त्याने केलेल्या संयोग व वियोग ह्यांच्या वर्णनांत प्रवाहित्व व प्रसाद हे गुण आढळतात. जेवढ्या मर्यादित क्षेत्रात कवीने आपले काव्यकौशल्य प्रकट केले आहे, तेवढ्यावरून त्याच्या प्रखर प्रतिभेची कल्पना येते.

सेनापतीच्या काव्यात भक्तिकाव्य व रीतिकाव्य या दोन्ही संप्रदायांची वैशिष्ट्ये आढळतात. कालदृष्ट्या त्याचे काव्य भक्तिकाळ व रीतिकाळ या हिंदी काव्येतिहासातील दोन कालखंडांच्या सीमेवर, संक्रमणकालात मोडते. त्यामुळे या दोन्ही काव्ययुगांची वैशिष्ट्ये त्यात एकवटली आहेत. भक्ती व वैराग्य यांची वर्णने करताना त्याच्या लेखणीला जेवढे स्फुरण चढते, तेवढाच उत्साह त्याच्या शृंगारवर्णनांतही आढळतो. त्याची जवळजवळ अर्धीअधिक काव्यरचना भक्तिपर व अर्धी रचना रीतिपरंपरेला धरून आहे. त्याचा कवित्त-रत्नाकर हा काव्यग्रंथ म्हणजे स्फुट कवितांचा संग्रह आहे. त्याने अनेक विषयांवर काव्यरचना केली आहे. त्यांपैकी ‘ऋतुवर्णन’ हा त्याच्या वर्णनकौशल्याचा खास प्रांत होय. अनेक रीतिकालीन कवींचा ऋतुवर्णने हा खास आवडीचा विषय असला, तरी त्या सर्वांत सेनापतीची ऋतुवर्णने सर्वश्रेष्ठ ठरली आहेत. केवळ जुन्या चाकोरीतून न जाता–म्हणजे ढोबळ मानाने तीन ऋतूंचे सांकेतिक वर्णन न करता–ऋतूंच्या संधिकालाकडे सौंदर्यदृष्टीने पाहून व निसर्गाचे सूक्ष्म अवलोकन रसिकत्वाने करून त्याचे चित्रण करण्यात त्याच्या स्वतंत्र प्रतिभेची चमक दिसून येते. वर्ण्य विषयाची कौशल्यपूर्ण मांडणी व कलात्मक अभिव्यक्ती ह्या संदर्भांत तो अन्य कवींहून श्रेष्ठ ठरतो. निसर्गाची वर्णने तो इतक्या तन्मयतेने व एकरूप होऊन करतो, की त्या वर्णनांत निसर्ग ही निर्जीव वस्तू न राहता, त्याला सजीवाचे चैतन्यशील व स्पंदनशील रंगरूप प्राप्त होते. भक्ती व रीती या कालखंडांतील कोणाही कवीने निसर्गाचे इतके सजीव चित्रण केलेले नाही. सेनापतीच्या ऋतुवर्णनांत निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण व त्याचे प्रत्ययकारी चित्रण आढळते. चपखल, यथार्थ प्रतिमा निवडण्यात व भाषेचा आलंकारिक फुलोरा फुलवण्यातही तो वाकबगार आहे पण हा फुलोरा अर्थहानी करणारा नसावा, तर आशयाचे सौंदर्य खुलवणारा असावा, ह्यावरही त्याचा कटाक्ष दिसतो. ब्रज भाषेवर त्याचे असाधारण प्रभुत्व होते. अर्थ व ध्वनी तसेच निरीक्षण व आविष्कार यांत सुसंवादी मेळ साधल्यानेच तो रीतिसंप्रदायातील कवींमध्ये सर्वश्रेष्ठ ठरला.

दुबे, चंदुलाल द्रविड, व्यं. वि.