स्टेथॅस्कोप : शरीराच्या अंतर्भागातील विशेषतः छातीमधील निरनिराळ्या प्रकारचे आवाज स्पष्टपणे ऐकण्यासाठी स्टेथॉस्कोप हे उपकरण वापरतात. रुग्णाच्या शारीरिक तपासणीसाठी निरीक्षण, चाचपणी, बोटांनी ठोकून निर्माण झालेला आवाज ऐकणे आणि आत नैसर्गिक रीत्या निर्माण होत असलेले आवाज कान लावून ऐकणे अशा चार मुख्य पध्दती अनेक वर्षे प्रचलित आहेत. त्यांपैकी शेवटच्या पध्दतीसाठी (श्रवण) स्टेथॉस्कोपची निर्मिती ⇨ रने तेऑफील यासँत लेनेक यांनी १८१९ मध्ये केली. त्यांनी फ्रान्समधील आपल्या अनेक रुग्णांवर लाकडाच्या पोकळ नळीच्या किंवा जाड कागदाच्या सुरळीच्या स्टेथॉस्कोपने श्रवणाचा प्रयोग केला. १८२१ मध्ये ‘फुप्फुसे व हृदयाच्या रोगांच्या माध्यमाच्या मदतीने (कान शरीराला न टेकवता केलेले) केलेले श्रवण’या नावाचा त्यांचा शोध ग्रंथ प्रसिध्द झाला. थोड्याच दिवसांत तो इंग्लंडमध्ये व अमेरिकेत पोहोचला आणि स्टेथॉस्कोपचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. लाकडी नळीऐवजी रबरी लवचिक नळी वापरणे आणि एका कानाऐवजी दोन्ही कानांनी ती जोडणे यांसारखे बदल त्यात लवकरच करण्यात आले.

स्टेथॉस्कोप (चित्राची साईज १६ X १२ सेंमी. घेणे.)

आधुनिक स्टेथॉस्कोपचे पुढील तीन मुख्य भाग असतात : (१) शरीरावर टेकविण्याचा ध्वनिग्राहक (वक्षखंड) हा चपटा पसरट आणि पातळ पटल बसविलेला भाग असतो पटल नसलेला आणि उलट्या घंटेच्या आकाराचा ध्वनिग्राहकही कधी कधी वापरला जातो. एकाच उपकरणात दोन्ही प्रकारचे आलटून पालटून वापरता येणारे ग्राहकही उपलब्ध असतात. (२) रबरी नळीचा ध्वनिवाहक म्हणजे ध्वनिग्राहकापासून निघालेली नळी मध्येच एका धातूच्या इंग्रजी ध अक्षराच्या आकाराच्या द्विशाखी रचनेला जोडलेली असते. त्यातून निघणाऱ्या दोन नळ्या दोन्ही कानांकडे जातात. (३) कानात सहजपणे बसू शकणारे आणि बाह्यकर्णाच्या नलिकेच्या दिशेनुसार किंचित पुढे वळणारे कर्णखंड (श्रवण्या) हे दोन्ही खंड धातूच्या नळीचे असतात परंतु त्यांच्या टोकांना कानाला आरामदायी (न टोचणारी) अशी टोपणे बसविलेली असतात. डॉक्टर स्वतःच्या सोयीप्रमाणे हे कर्णखंड मागे-पुढे वळवून व्यवस्थित घट्ट बसवू शकतात.

या तीन मुख्य भागांखेरीज रुग्णालयीन संशोधनकार्यासाठी किंवा शैक्षणिक उपयोगासाठी असलेल्या स्टेथॉस्कोपमध्ये इतर फेरफार करणे शक्य असते. उदा., एकाचवेळी अनेक डॉक्टरांनी ऐकण्याची सोय, इलेक्ट्रॉनीय यंत्रणेच्या मदतीने ध्वनिवर्धन, अधिक सुस्पष्ट आवाज किंवा आवाजाचे रूपांतर, आलेखात करून त्याचे मुद्रण करणे किंवा पडद्यावर दाखविणे एकाचवेळी विद्युत् हुद आलेखन (ECG) आणि ध्वनिआलेखन करणे विशेष प्रकारचे ध्वनिग्राहक वापरून गर्भाच्या हृदयाचे आवाज ऐकणे इत्यादी.

स्टेथॉस्कोप हे सुटसुटीत स्वस्त आणि कोणत्याही प्रकारची इजा किंवा अस्वस्थता निर्माण न करणारे उपकरण असते. त्यामुळे रुग्णाच्या प्राथमिक तपासणीत त्याचा उपयोग नेहमी केला जातो. श्वसन तंत्राच्या तपासणीत स्टेथॉस्कोपमुळे फुप्फुसामधील हवेचा प्रवाह त्या प्रवाहाला होणारा गतिरोध आणि विकारजन्य द्रवाची उपस्थिती यांची माहिती मिळते. हृदयाच्या स्टेथॉस्कोपने केलेल्या तपासणीत हृदयाच्या स्पंदनाचा वेग, नियमितता, झडपांची उघडझाप व त्यांतील दोष यांची कल्पना येते. रक्तदाबाच्या मापनातही रोहिणीमधील रक्तप्रवाहाचा अंदाज स्टेथॉस्कोपने घेऊन दाबाचे अचूक मापन होऊ शकते. यांखेरीज परिफुप्फुसाचे आणि परिहृदपटलांच्या शोथांमुळे (दाहयुक्त सुजेमुळे) निर्माण होणारे ध्वनी स्टेथॉस्कोपच्या मदतीने निष्णात डॉक्टर ओळखू शकतात. उदराच्या तपासणीत त्यामानाने हे उपकरण कमी उपयुक्त असते परंतु याच्यामुळे जठरांत्रमार्गाची नैसर्गिक नियमित हालचाल रोहिणींधमील मोठे दोष, गर्भाच्या हृदयाच्या नियमित स्पंदन यांबद्दल प्राथमिक अंदाज बांधणे शक्य होते.

अतिस्थूल व्यक्ति, छातीत किंवा उदरात मोठ्या प्रमाणात द्रव साचणे यांसारख्या परिस्थितींत ध्वनिग्राहकता कमी झाल्यामुळे स्टेथॉस्कोपचा उपयोग न झाल्यामुळे इतर उपकरणे वापरून तपासण्या करणे आवश्यक ठरते. तरीही स्टेथॉस्कोप हे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील जवळीक निर्माण करणारे एक महत्त्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

पहा : वैद्यक वैद्यकीय उपकरणे.

श्रोत्री, दि. शं.