फेदिन, कन्स्तांतीन अलेक्सांद्रोविच : (२४ नोव्हेंबर १८९२ – १५ जुलै १९७७). प्रसिद्ध सोव्हिएट कादंबरीकार. सराटव्ह येथे जन्मला. तेथेच त्याचे बालपण गेले आणि आरंभीचे काही शिक्षणही झाले. १९११ मध्ये मॉस्को कमर्शियल इन्स्टिट्यूटमधील अर्थशास्त्र विभागात त्याने प्रवेश घेतला. १९१४ मध्ये, उच्च शिक्षणासाठी, तो जर्मनीस गेला. १९१८ मध्ये तो रशियास परतला.

गरदा अ गोदी (१९२४, इं. शी. सिटीज अँड यीअर्स) आणि व्रात्या (१९२८, इं. शी. ब्रदर्स) ह्या त्याच्या आरंभीच्या कादंबऱ्या. ऑक्टोबर क्रांतीचे (१९१८) रशियातील बुद्धिवंत वर्गावर झालेल्या परिणामांचे चित्रण त्यांत आढळते. क्रांत्युत्तर रशियात स्वतःचे यथोचित स्थान घेऊ पाहणाऱ्या प्रामाणिक बुद्धिमंतांच्या संकुल मनःस्थितीचे दर्शन त्याने घडविले आहे. बालपणापासून मनावर बूर्झ्वा संस्कार झाल्यामुळे ह्या बुद्धिमंतांपैकी अनेकांना क्रांतीने निर्माण केलेल्या नव्या सामाजिक संदर्भाशी जुळवून घेता येत नाही. समाजात संघर्षात उभे राहिलेले एकाकी नायक त्याने रंगविल्यामुळे त्याच्या कादंबऱ्यांत एका प्रकारची स्वच्छंदतावादी प्रवृत्ती अपरिहार्यपणे आलेली दिसते. पखिश्चेनिये येवरोपी (१९३३-३५, इं. शी. अब्‌डक्शन ऑफ यूरोप) ह्या कादंबरीतही स्वच्छंदतावादी वातावरण आहे. भयानक एकाकीपणातून काही दिलासा मिळविण्यासाठी स्वतः ला कौटुंबिक जीवनात गुंतवून घेणारा नायक त्यात त्याने रंगविला आहे. पेरविये रादस्ती (१९४५, इं.शी. अर्ली जॉइज), निअबिक्‍नोव्हेन्नोये ल्येतो (१९४७-४८, इं.शी. नो ऑर्डिनरी समर) आणि कस्त्योर (१९६१, इं. शी. कॉनफ्लग्रेशन) ह्या त्याच्या तीन कादंबऱ्यांत रशियातील जीवनाचे चित्रण एका वेगळ्या दृष्टिकोणातून केलेले आहे. एखाद्या नायकाच्या मनोव्यथांचे चित्रण करण्याचा प्रयत्‍न त्यांत नाही, तर संपूर्ण सोव्हिएट रशियातील जीवन आणि त्या देशाचे भागधेय हा ह्या कादंबऱ्यांचा विषय आहे त्यामुळे ह्या कादंबरीत्रयीला एका महाकाव्याचे परिमाण प्राप्त झालेले आहे. १९४९ मध्ये त्याला वाङ्‌मयाचे शासकीय पारितोषिक देण्यात आले. सोव्हिएट रशियातील लेखकसंघटनेतील एक पदाधिकारी म्हणून त्याने दीर्घकाळ काम केले. ह्या संघटनेचे अध्यक्षपदही त्याला लाभले. मॉस्को येथे तो निधन पावला.

पांडे, म. प.(इं) कुलकर्णी, अ. र.(म.)