भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर : पुणे येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीची प्राच्यविद्या संशोधनसंस्था. संस्कृत आणि भारतविद्यचे महर्षी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्याविषयी यथार्थ आदर प्रकट करण्याच्या हेतूने, त्यांचे शिष्य आणि मित्र यांनी ६ जुलै १९१७ मध्ये, भांडरकरांच्या ८० व्या वाढदिवशी, ह्या संस्थेची स्थापना केली.

आरंभीच डॉ. भांडारकारांनी आपल्या ग्रंथांचा आणि संशोधनपत्रिकांचा अनमोल संग्रह संस्थेला दिला. पुढील वर्षी तत्कालीन मुंबई इलाख्याच्या सरकारने आपल्याजवळचा संस्कृत-प्राकृत हस्तलिखितांचा संग्रह आणि संस्कृत-प्राकृत ग्रंथमाला संस्थेकडे दिली. १९१९ मध्ये संस्थेने स्वतःची संशोधनपत्रिका, महाभारताच्या चिकित्सक पाठवृत्तीचा प्रकल्प, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेची योजना आणि स्नातकोत्तर अध्ययन आणि संसोधन विभाग हि चार कार्ये सुरु केली.

संस्थेच्या कार्याचे चार प्रमुख भाग आहेत : हस्तलिखितसंग्रहाची जपणूक आणि देवघेव, संशोधन, ग्रंथप्रकाशन आणि महाभारत विभागाची कार्यवाही.

सरकारकडून मिळालेल्या हस्तलिखांमध्ये संस्थेच्या स्वतःच्या, खाजगी संस्था वा व्यक्ती यांनी दान दिलेल्या पोथ्यांची भर पडून हा हस्तलिखाताचा संग्रह २४,००० च्या जवळपास झाला आहे. या पोथ्या भूर्जपत्र. ताडपत्र, वंशपत्र, जुना कागद यांवर लिहिलेल्या आहेत. मुख्यतः त्या संस्कृत भाषेतल्या असल्या, तरी अरबी, फार्सी, प्राकृत, अर्धमागधी, मराठी, हिंदी इ. भाषांतील आणि जैन वाड्मयावरील पोथ्याही या संग्रहात आहेत. या संग्रहाची वर्णनात्मक सूची केलेली आहे. तिचे २५ खंड आजवर प्रसिद्ध झाले आहेत. सु. २०० पोथ्यांच्या सूक्ष्मपट (मायक्रोफिल्म) प्रती करवून घेतल्या आहेत. संग्रहात अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान हस्तलिखिते आहेत (त्यांतील भागवतपुराणाची सचित्र पोथी लंडनमध्ये नुकत्याच भरलेल्या भारतीय महोत्सवात (१९८२) प्रदर्शनासाठी भारत सरकारमार्फत पाठविली होती). जोडीने ताम्रपटावर कोरलेले दानपत्र, सुंदर अक्षरात लिहिलेली पाणिनीची अष्टाध्यायी, माक्स म्यूलरने ऋग्वेदाच्या पहिल्या आवृत्तीसाठी वापरलेली पोथी, अँसीरियन इष्टिका ग्रंथ, मोहेंजदडो येथील काही कलाकृती, अशा वस्तू असल्यामुळे या विभागाला, छोटेखानी पुराणवस्तुसंग्रहालयाचे रुप अनायासे आले.

संस्थेचे ग्रंथालय भारतीय आणि प्राच्यविद्येच्या अभ्यासाच्या दृष्टीने समृद्ध असून एकंदर ग्रंथसंख्या ६०,००० च्या आसपास असावी. ग्रंथालयातील संशोधनपत्रिकांचा संग्रह अमोल असून इतरत्र अप्राप्य अशा पत्रिकांचे जुने अंक इथे बहुधा मिळतात. विविध ग्रंथमाला, महत्त्वाच्या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्त्या, विविध शास्त्रग्रंथ, संस्कृतप्राकृतखेरीज अवेस्तन, फ्रेंच, जर्मन, रशियन, फार्सी, चिनी या भाषांतील ग्रंथ आणि सर्व भाषांचे कोश ग्रंथालयात आहेत.

अध्ययन- संशोधनासाठी भारताच्या कोनाकोपऱ्यांतून आणि जगातील अनेक देशांतून अभ्यासक येथे येतात. संस्थेच्या अतिथिगृहात निवासाची व ग्रंथालयात अध्ययनाची सुविधा आहे. संस्थेचे संचालक पुणे विद्यापीठाच्या स्नातकोत्तर अध्यापनात आणि संशोधन-मार्ग-दर्शनात सहभागी असतात. अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे मध्यवर्ती कार्यालय संस्थेत आहे. महाभारताच्या सांस्कृतिक बृहतसूचीचे काम आज अनेक वर्षे चालू आहे. काही देणग्या मिळाल्यामुळे संस्थेने दोन-तीन व्याख्यानाला सुरु केल्या आहेत.

संस्थेच्या एकूण ११ प्रकाशनमाला आहेत. त्यांद्वारा आजवर पावणेदोनशे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांत संस्थेची वार्षिके, त्यांचा हीरकमहोत्सवी हजार पृष्ठांचा खंड (१९७८), महाभारताची चिकित्सक पाठावृत्ती (१९ खंड, २२ पुस्तके), हरिवंश (२ खंड), महाभारत-श्लोकचरणसूची (६ खंड) आणि इतर प्रकाशनांत म. म. डॉ. काणे यांचा हिस्टरी आँफ धर्मशास्त्र (५ खंड), सर्वदर्शनसंग्रह, न्यायकोश, जिनरत्नकोश, पालीग्रंथ, बौद्ध ग्रंथांवरील चिनी टीका इ. ग्रंथाचा निर्देश केला पाहिजे.

संस्थेचे सभासद सु. ८०० असून त्यांतून त्रैवार्षिक निवडणुकीने ३९ सद्स्यांचे नियामक मंडळ आणि ७ सदस्यांचे कार्यकारी मंडळ निवडून येते. संस्थेचा कारभार मानद सचिव कार्यकारी मंडळाच्या मदतीने पाहतात. डॉ. गुणे पहिले मानद सचिव होते. त्यानंतर डॉ. बेलवलकर. १९३९ पासून डॉ. रा. ना. दांडेकर मानद सचिव आहेत. हस्तलिखांची देखभाल आणि सेवकांचा महागाई भत्ता यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून संस्थेला काही वार्षिक अनुदान मिळते. संशोधनप्रकल्प आणि त्याचे प्रकाशन ह्या बाबी भारत सरकारच्या मदतीने चालतात. एरव्ही संस्थेचा प्रपंच हा सदस्यांची वर्गणी, देणग्या आणि प्रकाशनांची विक्री यांतून भागवावा लागतो.

संस्थेच्या कार्याशी डॉ. प. ल. वैद्य, म. म. का. वा. अभ्यंकर, डॉ. बापट, डॉ. गोखले, डॉ. मिराशी, आचार्य लिमये, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी इ. विद्वान निगडीत आहेत. महाभारताचे पहिले प्रमुख संपादक डॉ. सुकथनकर यांच्या निधनानंतर डॉ. बेलवलकरांनी प्रमुख संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली होती, तर एकेका पर्वाच्या संपादनास डॉ. एगर्टन, डॉ. सुशील कुमार दे. प्रा. वेलणकर, डॉ. दांडेकर इत्यादीनी साहाय्य केले. हरिवंश आणि महाभारत-श्लोकचरण-सूचीच्या संपादनांची जबाबदारी डॉ. वैद्यांनी पार पडली.

पं. जवाहरलाल नेहरु, डॉ. राजेन्द्रप्रसाद, डॉ. राधाकृष्णन् यांच्यासारख्या महनीय व्यक्तींपासून तो जगातील भारतविद्येच्या अनेक विद्वानांनी संस्थेला प्रसंगोपात्त भेट देऊन, प्राच्य आणि भारतविद्येचे एक पावनतीर्थ म्हणून तिला गौरविले आहे.

भट, गो. के