मेअरिॲना बेटे : पॅसिफिक महासागरातील अ.सं.सं.च्या आधिपत्याखालील बेटे. क्षेत्रफळ १,०१२ चौ. किमी. ही फिलिपीन्सच्या पूर्वेस २,४०० किमी.वर १३° २५ ते २०° ३२ उं. अक्षांस व १४४° ४५ ते १४४° ५४ पू. रेखांशांदरम्यान उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेली असून ती अग्निजन्य व चुनखडकांपासून बनलेली आहेत. राजकीय दृष्ट्या या बेटांचे ग्वॉम व उत्तर मेअरिॲना बेटे असे दोन भाग पाडले जातात. या द्वीपसमूहात प्रामुख्याने (उत्तरेकडून दक्षिणेकडे) पाहारोस, माउग, आसूनस्यॉन, आग्रीहान, पगान, आलामागा, गूग्वान, सारीगान, आनाटाहान, मेडीनीया, साईपॅन, टिनीअन, आगिहान, रोटा व ⇨ ग्वॉम (सर्वांत मोठे) या बेटांचा समावेश होतो. यांपैकी आसूनस्यॉन, पगान आणि पाहारोस बेटांवर जागृत ज्वालामुखी आहेत.

भूरचनेच्या दृष्टीने व बेटांचे दोन भाग पडतात. उत्तरेकडील बेटे प्रामुख्याने अग्निजन्य खडकापासून बनलेली असून, दक्षिणेकडील बेटे मूळच्या अग्निजन्य खडकांवर प्रवाळ साचून जलछिद्रयुक्त चुनखडकाची बनलेली आहेत. ही बेटे म्हणजे जपानच्या दक्षिणेस पसरलेल्या सागरी डोंगररांगेचे वर आलेले भाग होत. बहुतेक बेटे कमी-जास्त उंचीच्या टेकड्या व डोंगररांगांनी व्यापलेली आहेत. याद्वीपसमूहातील सर्वांत उंच शिखर (९६५ मी.) आग्रीहान बेटावर आहे. बेटांवरील बहुतेक नदीप्रवाह पूर्वेस व पश्चिमेस वाहतात. येथील हवामान उष्ण प्रदेशीय स्वरूपाचे असून वार्षिक सरासरी तापमान २६° से. असते. जून ते नोव्हेंबर या काळात तापमान जास्त म्हणजे २४ ° ते ३० °  से. असते, तर डिसेंबर ते मे या काळात हवा थंड व कोरडी असते. पावसाचे वार्षिक सरासरी प्रमाण २०० सेंमी. असून तो प्रामुख्याने मे ते नोव्हेंबर या काळात पडतो. येथे बऱ्याच वेळा चक्री वादळे होतात. बेटांवर मुख्यत्वे फॉस्फेट, गंधक, मँगॅनीजचे खनिज सापडते, तर ऊस, कॉफी, नारळ ही येथील प्रमुख पिके होत. येथे विविध प्रकारचे सरडे, वटवाघळे व बिनविषारी सर्प आढळतात.

फर्डिनंड मॅगेलन या पोर्तुगीज समन्वेषकाने १५२१ मध्ये या बेटांचा शोध लावला व त्यांना लड्रोन (चोरांची बेटे) हे नाव दिले असे मानतात. त्यानंतर १६६८ मध्ये येथे आलेल्या स्पॅनिश जेझुइट मिशनऱ्यांनी या बेटांना ‘मेअरिॲना’ हे नाव दिले. १८९८ पर्यंत ही बेटे स्पॅनिशांच्याच ताब्यात होती. स्पेन व अमेरिका यांच्यातील युद्धानंतर पॅरिसच्या तहान्वये स्पेनने अमेरिकेला ग्वॉम बेट दिले (१८९८)व पुढच्याच वर्षी हे बेट वगळता बाकीची बेटे जर्मनीला विकली. १९१४ मध्ये ही बेटे जपानने बळकावली, परंतु दुसऱ्या महायुद्धात (१९४४) अ.सं.सं.ने यांवर ताबा मिळविला व ग्वॉम बेट वगळता इतर बेटांचा अमेरिकेच्या पॅसिफिक बेटांच्या विश्वस्त प्रदेशात समावेश केला. जून १९७५ मध्ये अमेरिकन राष्ट्रकुल प्रदेश असा स्वायत्त दर्जा मिळविण्याचे येथील लोकांनी ठरविले. १९७६ मध्ये तो दर्जा त्यांना मिळाला. १९७७ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उत्तर मेअरिॲना बेटांच्या संविधानाला मान्यता दिली. १९७८ पासून येथे अंतर्गत स्वयंशासन सुरू झाले. त्यासाठी डिसेंबर १९७७ मध्ये द्विसदनी विधिमंडळ, राज्यपाल व नायब राज्यपाल यांच्या निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली.

जोपर्यंत हा अमेकिरेचा विश्वस्त प्रदेश म्हणून आहे, तोपर्यंत येथील नागरिकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. तथापि जुलै १९८४ मधील जाहीरनाम्यानुसार येथील नागरिकांना रोजगार, संघराज्याच्या नागरी सेवेत व सैन्यात संधी देणारे, तसेच रोजगार व इतरही काही नागरी व राजकीय हक्क देण्यात आले आहेत.

ग्वॉम बेटावर १९८२ साली राजकीय दर्जा ठरविण्याबाबत जनमताचा कौल घेण्यात आला. त्यावेळी फक्त ३८% मतदान झाले. राष्ट्रकुल प्रदेश म्हणूनच आपला दर्जा राखावा असे मत ४८% मतदारांनी व्यक्त केले. त्यासंबंधीचा ठरावही तेथील विधिमंडळापुढे होता [→ ग्वॉम बेट].

शेती उत्पादनाच्या दृष्टीने ही बेटे फारशी महत्त्वाची नाहीत. लहानलहान शेतांमध्ये प्रामुख्याने स्थानिक गरजेपुरती नारळ, टोमॅटो, विलायती फणस, कलिंगडे, काकड्या, टॅपिओका, भाजीपाला, केळी इ. पिके घेतली जातात. शेतीच्या प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शेतीबरोबरच गुरेपालन व्यवसायही केला जातो. भाजीपाला, गुरांचे व डुकरांचे मांस यांना बेटांच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. लघुउद्योगांच्या बाबतीत मासे व खोबरे यांवर प्रक्रिया करणे तसेच हस्तव्यवसाय महत्त्वाचे आहेत. पर्यटन व्यवसायाचीही वाढ होत आहे. बेटांवर रस्ते, हवाईमार्ग व जलमार्गाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

येथील बहुतेक लोक जपानी असून काही मायक्रोनीशिअन व चामोरो (स्पॅनिश, फिलिपिनो व मायक्रोनीशिअन यांचे मिश्रण असलेले) गटाचे लोक आहेत. ख्रिस्ती धर्म प्रमुख असून बहुतेक लोक रोमन कॅथलिक आहेत. अगान्य (ग्वॉम) हे राजधानीचे ठिकाण व बेटांवरील प्रमुख शहर आहे.

चौंडे, मा.ल.