आगास्सिझ, झां लुइ रूडोल्फ : (२८ में १८०७ –१४ डिसेंबर १८७३) स्विस अमेरिकन प्राणिशास्त्रज्ञ, प्रकृतिवैज्ञानिक (सजीवांच्या नैसर्गिक विकासासंबंधीच्या विज्ञानातील तज्ज्ञ‍) आणि भूवैज्ञानिक. यांचा जन्म मोत्ये (स्वित्झर्लंड) येथे झाला. झुरिक हायड्रलबर्ग आणि म्यूनिक या विद्यापीठांत त्यांचे वैद्यकीय शिक्षण झाले आणि एर्लोगेन येथे पीएच्.डी व म्यूनिक येथे एम्. डी या पदव्या त्यांनी संपादन केल्या. स्पिक्स आणि आणि मार्शिअस या दोन प्रकृतिवैज्ञानिकांनी ब्राझीलमध्ये गोळा केलेल्या गोड्या पाण्यातील माशांचा संग्रह स्किप्स यांच्या मृत्यूनंतर मार्शिअस यांनी आगास्सिझ यांच्याकडे सोपविला आणि त्याचा आभ्यास करून द फिशेस ऑफ ब्राझील हा ग्रंथ १८२९ मध्ये संपादित करून प्रसिद्ध केला १८३१ मध्ये ते अभ्यासाकरिता पॅरिसला गेले आणि १८३२ मध्ये नशाटेल येथे प्रकृतिविज्ञानाच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. या ठिकाणी या ठिकाणी ते १८४५ पर्यंत होते.

त्यांनी १८३६ मध्ये स्वित्झर्लंडमधील हिमनद्यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. हिमनद्यांच्या संरचनाविषयांचे त्यांचे निष्कर्ष मौलिक आणि महत्त्वाचे होते. ‘आइस एज’ (हिमयुग) ही संज्ञा त्यांच्यामुळेच रूढ झाली. १८४६ मध्ये प्रशियाच्या राजाने दिलेल्या अनुदानाच्या मदतीने ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात गेले. तेथे त्यांनी त्या देशाच्या प्रकृतिविज्ञानाचा आणि भूविज्ञानाचा अभ्यास करून बॉस्टन, फिलाडेल्फिया इ. शहरांत कित्येक व्याख्याने दिली. १८४८ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठाच्या लॉरेंन्स सायंटिफिक स्कूलमध्ये प्रकृतिविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. १८५९ मध्ये त्यांनी यूरोपाला भेट दिली. पॅरिसच्या ‘म्युझियम ऑफ नॅचरल हिल्टरी’ मध्ये पुराजीवविज्ञानाच्या (गतगालिन भूवैज्ञानिक कालखंडातील जीवांसंबधीच्या विज्ञानाच्या) प्राध्यापकाची त्यांना देऊ केलेली जागा, अमेरिकेतील संशोधनकार्य पुढे चालू ठेवण्याकरिता, त्यांनी नाकरली. हार्व्हर्ड येथे १८६० मध्ये त्यांच्या मदतीने ‘म्युझियम ऑफ कंपॅरेटिव्ह झोऑलॉजी’ या संस्थेची स्थापना झाली आणि ते तिचे पहिले संचालक झाले. १८६१ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. १८६३ मध्ये वॉशिंगटन येथे ‘नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस’ स्थापना करण्याच्या कामी त्यांनी साहाय्य केले. १८६५ मध्ये त्यांनी ब्राझीलची सफर केली आणि तेथून परत आल्यावर बऱ्याच ठिकाणी व्याख्याने दिली. १८६८ मध्ये कॉनॅल विद्यापीठात प्रकृतिविज्ञानाचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८७२ मध्ये आगास्सिझ यांना मॅसॅचूसेट्स किनाऱ्याजवळ पेनिकीज बेट आणि ५०,००० डॉलरची देणगी मिळाली आणि या बेटावर त्यांनी प्रकृतिविज्ञानाच्या उन्हाळी विद्यालयाची स्थापना केली. १८७३ मध्ये त्यांनी एक प्रबंध लिहून डार्विन यांच्या क्रमविकासाच्या सिद्धांताला विरोध केला. माशांचे जीवाश्म (अवशेष), हिमनद्यांचा संशोधनात्मक अभ्यास, अमेरिकेचा निसर्गेतिहास वगैरे विषयांवर त्यांनी महत्त्वपूर्ण ग्रंथरचना केली आहे. काँट्रिब्युशन्स टू द नॅचरल हिस्टरी ऑफ युनायटेड स्टेट्स४ खंड (१८५७–६२), द स्ट्रक्चर ऑफ निमल लाइफ (१८६२), ए जर्नी इन ब्राझील (१८६८) जिऑलॉजिकल स्केचेस-2 खंड (१८६६–७६)हे त्यापैकी काही महत्त्वाचे ग्रंथ होत. ते केंब्रिज, मॅसॅचूसेट्स येथे मरण पावले.

जमदाडे, ज. वि.