आयुर्वेदीय चिकित्सा: हृदयात वातविकृती होऊन शूल उत्पन्न होतो. हा हृदयदेशात उत्पन्न होऊन डाव्या बाजूकडे जात असतो व जीव घुसमटतो. नारायण तेल दशमुळाच्या काढ्यात घालून त्याचा बस्ती द्यावा. हेमगर्भ, चिंतामणिरस किंवा राजवल्लभ मधात व आल्याच्या रसात सारखा चाटवावा. नारायण तेलाचा अभ्यंगही करावा. महाळुंगाचा रस कोमट पाण्यात गरम करून त्याचा एक चमचा व राजवल्लभाचे चाटण क्रमाने चालू द्यावे. रस न मिळाल्यास पिकलेले कवठ, मुसुंब्याचा रस, आमसुलाचे किंवा पाड आलेल्या आंब्याचे पन्हे ही कोमट करून यांचा एक चमचा रस व वरील औषध चाटवावे. थोड्याच वेळात शूल कमी होतो. शूल पुन्हा सुरू होऊ नये याकरिता राजवल्लभ किंवा चिंतामणिरस (हीरकयुक्त) वा मृगशृंगभस्म दुपारी जेवण झाल्याबरोबर वरील अनुपानातून सेवन करीत जावे. वातज हृद्राेगामधील सर्व आहारविहार द्यावा.

जोशी, वेणीमाधवशास्त्री