सुलेखन कला : (कॅलिग्राफी). सुंदर हस्ताक्षराची कला. मात्र सुलेखन हे माणसाचे सामान्य हस्ताक्षर असे नसून एका विशिष्ट हेतूने प्रेरित सौंदर्यपूर्ण हस्ताक्षर या दृष्टिकोणातून त्याकडे पाहावे लागते. वाचनीयता हा अक्षरसौंदर्याचा प्राथमिक घटक होय. या दृष्टीने अक्षरांच्या उंची-लांबी-रुंदीची प्रमाणे ही लेखणीच्या टोकाच्या (कटनिब) जाडीच्या पटीत मांडले ली दिसून येतात. सुवाच्य, सुस्पष्ट अक्षर-लेखनाबरोबरच अक्षरांच्या सौंदर्यावर, अलंकरण व सजावटीवर सुलेखनात जास्त भर दिला जातो. सुलेखनामागे प्रामुख्याने कलात्मक उद्दिष्टे व प्रेरणा असतात आणि दर्शकाला सौंदर्यानुभूती व उच्च प्रतीचा कलात्मक आनंद देण्याची भूमिका असते. त्यामुळे सुलेखन हा एक ललित कलाप्रकार मानला जातो. सुलेखनात वर्णाला, अक्षरे यांची आकारिक चिन्हे (सिम्बॉल्स) ही कलात्मक आविष्काराची साधने म्हणून वापरली जातात. ‘कॅलिग्राफी’ हा शब्द मूळ ग्रीक ‘Kalligraphia’ ह्या, ‘सुंदर अक्षर’ ह्या अर्थाच्या शब्दापासून व्युत्पन्न झाला. फार प्राचीन काळापासून लेखनाची दोन गटांत विभागणी होत आली आहे : (१) व्यवहारोपयोगी वा कार्यसाधक (फंक्शनल) आणि (२) अलंकरणात्मक वा सौंदर्य-साधक (डेकोरेटिव्ह). प्राचीन ग्रीक लेखक फलास्ट्रट्स याने असे लिहून ठेवले आहे, की टायनाचा अपोलोनीअस (इ. स. पहिले शतक) हा ग्रीक तत्त्वज्ञ प्रवासाला निघताना आपल्या सोबत दोन कुशल लेखनिक (स्क्राइब) बाळगत असे. त्यांपैकी एक शीघ्रलेखनात, तर दुसरा संदर हस्ताक्षरलेखनात निपुण असे.

सुलेखनाचे आद्य व प्रधान उद्दिष्ट नेत्रसुखदता हे होय. अक्षरे डोळ्यांना सुंदर दिसली पाहिजेत हे आद्य प्रयोजनतत्त्व व ते साधण्यासाठी कित्येकदा सुवाच्यता, सुस्पष्टता हे लेखनाचे मूळ गुणधर्मही दुर्लक्षिले जात. पौर्वात्य लिपी वाचू न शकणाऱ्या दर्शकालाही त्या लिपीतले अक्षरसौंदर्य मोहून टाकते. असे असले तरी, सुलेखनकलेच्या आदर्श,परिपूर्ण आविष्कारात सौंदर्य व वाचनसुलभता यांचा सुरेख मेळ साधलेला दिसून येतो. अक्षरांची नेमकी व सुबक घडण, वेगवेगळ्या सुट्या अक्षरावयवांची वा घटकांची सुसंघटित क्रमबद्घ रचना, तसेच प्रमाणबद्घ व सुसंवादी एकात्म मेळातून साधलेले कलात्मक अक्षराकृतिबंध हे सुलेखनकलेचे स्वरुपवैशिष्ट्य म्हणता येईल. सुलेखनकलेत अक्षरांच्या सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीच्या अफाट शक्यतांचे विस्तीर्ण क्षितिज सुलेखनकाराला खुणावत असते. त्यातून सुलेखनाचे अक्षरशः अगणित वैविध्यपूर्ण नमुने देशोदेशींच्या कलाविष्कारांतून पहावयास मिळतात. इस्लामी संस्कृतीत सुलेखनकलेला चित्रकलेच्या बरोबरीनेच उच्च दर्जा व प्रतिष्ठा प्राप्त झाली. चिनी अक्षरे ही मुळातच ⇨ चित्रलिपी च्या— म्हणजेच सौंदर्यवस्तूच्या (इस्थेटिक ऑब्जेक्ट) – स्वरुपाची असल्याने त्यांत कलात्मक अभिव्यक्तीला मनसोक्त वाव मिळाला. चिनी संस्कृतीत आणि चिनी सुलेखनाच्या प्रभावाखाली असलेल्या अन्य देशांतही सुलेखनाला चित्रकलेच्या बरोबरीनेच उच्च दर्जा व प्रतिष्ठा लाभत गेली.

सुलेखन हे प्राचीन काळापासून ग्रंथ, हस्तलिखिते यांच्या सजावटीसाठी जसे वापरले गेले, तसेच ते पुढील काळात इमारती, अन्य कलाकृती यांच्या सजावटीमध्येही वापरले जाऊ लागले. सुलेखन करण्यासाठी सुलेखनकारांनी प्राचीन काळापासून ते आजतागायत वेगवेगळ्या प्रकारची माध्यम-साधने हाताळली, असे दिसून येते. उदा., ⇨ पपायरस, भूर्जपत्रे, ताडपत्रे, मृदू चर्मपत्रे (व्हेलम), कापड, फलक, कागद इ. माध्यमे लेखनासाठी वापरली गेली, तसेच निरनिराळ्या प्रकारच्या लेखण्या, पक्ष्यांच्या पिसांच्या लेखण्या (क्विल), बोरु, कुंचले, टाक, पेने, निबांचे टोकदार, गोलाकार, तिरपे, चपटे यांसारखे विविध प्रकार, वेगवेगळ्या रंगीत शाई व रंग वगैरे बहुविध साधने वापरली गेली आहेत. यांपैकी अनेक माध्यम-साधने आजही वापरात आहेत.

यूरोपीय सुलेखनकलेचा, अभिजात काळापासून ते प्रबोधनकाळापर्यंतच्या ऐतिहासिक विकासक्रमाचा आढावा हा मुख्यत्वे ⇨ पुराभिलेखविद्ये च्या (इतिहासकाळी लिहिल्या गेलेल्या मजकुराचा पद्घतशीर शास्त्रशुद्घ अभ्यास) शास्त्राशी निगडित आहे. वेगवेगळे लिपिप्रकार, त्यांची प्रादेशिक गुणवैशिष्ट्ये यांवर प्रभाव टाकणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, बौद्घिक, आर्थिक इ. घटकांचा अभ्यास हा स्थूलमानाने पुराभिलेखविद्येच्या कक्षेत येतो. सुलेखन ही स्वरुपतःच एक ललित कला आहे आणि सुलेखनकलेच्या ऐतिहासिक विकासक्रमात निरनिराळ्या देशांतल्या, वेगवेगळ्या कालखंडांतल्या बदलत्या कलाभिरुचींचे प्रतिबिंब स्वाभाविकच उमटलेले दिसून येते आणि त्याचा अभ्यास हा सौंदर्य-समीक्षेच्या प्रांतात मोडतो.

ग्रीक सुलेखन : सर्वांत आद्य ग्रीक हस्ताक्षर-लेखनाचे दोन प्रमुख प्रकार इ. स. सु. आठव्या शतकापर्यंत प्रचलित होते व ते कार्यवादी उद्दिष्टांनुसार वापरले जात होते. त्यांपैकी एक प्रकार म्हणजे ग्रंथांच्या हस्तलिखित नकला तयार करण्यासाठी केले जाणारे लेखन. हा लेखनप्रकार मुख्यत्वे दस्तऐवज तयार करणे, पत्रलेखन यांसाठी वापरला जाई. दुसरा प्रकार ‘युन्सिअल’ म्हणजे वाटोळ्या मोठ्या अक्षरांच्या (कॅपिटल्स) अक्षरलिपीत केले जाणारे लेखन. चौथ्या ते आठव्या शतकांतील प्राचीन हस्तलिखितांतून हा प्रकार आढळतो. हे लेखन अलंकरणप्रधान, सुशोभित स्वरुपाचे असून त्यातील अक्षरे शैलीदार, सुस्पष्ट व मोठ्या अक्षरांच्या लिपीत लिहिली जात. ग्रीक लिपीपासून रोमन वा लॅटिन लिपीची उत्पत्ती झाली असावी, असे काही विद्वानांचे मत आहे. [→ ग्रीक लिपि].

रोमन सुलेखन : प्राचीन काळातील लिखित रोमन वा लॅटिन लिपींतील अक्षरे साधारणतः चौकोनी आकार घडणीची ‘कॅपिटल्स’ होती. त्यांत हळूहळू परिवर्तने होत जाऊन इ. स. सहाव्या ते आठव्या शतकांत ‘हाफ-युन्सिअल’ लिपीचा उदय झाला. प्रत्येक अक्षराची उंची व आकार यात नेमकेपणा व प्रमाणबद्घता साधण्याकडे या लिपीचा कल होता. लेखनपद्घतीतील या सुधारणेमुळे सुलेखनकलेला चालना मिळाली. ‘हाफ-युन्सिअल’ ही पश्चिमी जगातील पूर्ण विकसित अशी ‘मिनुस्कूल’ किंवा लहान (स्मॉल) अक्षरांची लेखनलिपी होती. ही लेखनपद्घती सुलेखनाच्या विकासास मुख्यत्वे तीन कारणांनी पूरक व उपयुक्त ठरली : ह्यातील अक्षरांची आकारघडण वा रचनाबंध मूलतःच सौंदर्यानुकूल असून त्यातून सुलेखनाच्या एका प्रमुख संप्रदायाला चालना मिळाली व त्याचा उत्तरकालीन लेखनकलेवर स्थायी प्रभाव पडला. साधारणतः अक्षरांच्या चौकोनी आकारघडणीपेक्षा गोलाकार घडणीची अक्षरे ही या लेखनप्रक्रियेमध्ये जास्त सहज-सुलभ ठरतात. या तत्त्वानुसार प्रवाही (कर्सिव्ह) लेखनशैली ही शीघ्रलेखनासाठी व सुलेखनासाठी जास्त उपयुक्त ठरली. दस्तऐवज-लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कर्सिव्ह’ लेखनातून लहान अक्षरलेखनाचे घाट व वळणे उत्क्रांत होत गेली व त्यातूनच पुढे ‘हाफ-युन्सिअल’ ही परिपूर्ण विकसित शैली निर्माण होऊन ती सुलेखनकलेला उपकारक ठरली. याशिवाय लेखन-साधनांमध्ये होत गेलेले बदलही सुलेखनकलेला चालना देणारे ठरले. पूर्वीच्या काळी पपायरसांवर केले जाणारे लेखन आता मृदु चर्मपत्रांवर केले जाऊ लागले. तसेच पक्ष्यांच्या पिसांच्या (उदा., राजहंस, हंस, टर्की, मोर इ.) लेखण्या, टोकदार वा टोकाला पटाशीसारखे तिरपे तासलेले बोरु ह्यांचा वापर लेखनासाठी होऊ लागला. अक्षरांमधील कमीअधिक जाडीचे वा बारीक पातळ रेषांकन त्यामुळे शक्य झाले.


 अक्षरांची उंची, जाडी, पसरटपणा तसेच गोल, वाटोळे, चौकोनी इ. आकार, घाट, वळण इ. घटकांमध्ये वैविध्य आणून सुलेखनात सौंदर्य निर्माण करता येते, ही जाणीव सुलेखनकाराच्या ठायी त्या काळी निर्माण झाली व आजही अक्षरांकनाच्या वेगवेगळ्या शैलींमध्ये हे घटक कल्पकतेने व नावीन्यपूर्ण रीतीने उपयोजून सौंदर्य-निर्मिती साधली जाते. ह्या सौंदर्यदृष्टीचा पाया त्या काळात (सातवे-आठवे शतक) घातला गेला. विसाव्या शतकातील इंग्लिश सुलेखनकार एडवर्ड जॉन्स्टन याने ही सुलेखनलिपी परिपूर्ण असल्याचा अभिप्राय नोंदवला आहे. तो बुक ऑफ केल्स  (ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन ) व लिंडिसफार्न गॉस्पेल्स (ब्रिटिश म्यूझियम) ह्या हस्तलिखितांच्या संदर्भांत जास्त अन्वर्थक आहे. शार्लमेनच्या कारकीर्दीत इ. स. आठव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते नवव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत ‘कॅरोलिंजिअन मिनुस्कूल’ ही महत्त्वाची सुलेखनलिपी विकसित झाली. तूर्स येथील ‘सेंट मार्टिन्स’चा मठाधिपती ॲबट ॲल्‌क्विन (सु. ७३२–८०४) याच्या आधिपत्याखाली कॅरोलिंजिअन लिपी विकसित झाली. सुस्पष्ट, आकलनसुलभ अशा सुलेखनशैलीत लिहिलेल्या गोल्डन गॉस्पेल्स नामक शोभिवंत उत्कृष्ट हस्तलिखितांचे श्रेय ॲल्क्विनला दिले जाते. [→ रोमन लिपि].

मध्ययुगीन कालखंडात ‘गॉथिक’ (सु. ११५०–१४००) ही महत्त्वाची अलंकरणप्रधान सुलेखनशैली उदयास आली. ती ‘ब्लॅक लेटर’ सुलेखनपद्घती म्हणूनही ओळखली जाते. ब्लॅक लेटर सुलेखनपद्घतीचे वैशिष्ट्य म्हणजे मृदू , रुंद व तिरप्या छेदाच्या निबेचा वापर करुन अक्षरणात रेखाटलेले जाड, रुंद रेषांचे तसेच केसासारख्या सूक्ष्म बारीक रेषांचे फटकारे (स्ट्रोक्स). ह्या अक्षरणात दबल्यासारखी दिसणारी अक्षरे (कंप्रेस्ड लेटर्स) काढून त्यांत वक्राकारांच्या ऐवजी आखूड, छोट्या, तिरप्या फटकाऱ्यांचा वापर केला जाई. या लेखन-पद्घतीवरुनच पुढे ‘ब्लॅक लेटर’ ह्याच नावाची इंग्रजी मुद्रण ठश्यांची मुद्राक्षरपद्घती अस्तित्वात आली. ब्लॅक लेटर वा गॉथिक ही त्या काळात सुलेखनकाराची सर्वोत्कृष्ट कलासिद्घी मानली गेली. पीत्रार्क (१३०४– ७४) ह्या तत्कालीन विख्यात इटालियन कवी – विद्वानाने ‘गॉथिक’ सुलेखनशैलीची मुक्त कंठाने प्रशंसा केली. या ‘गॉथिक’ सुलेखनशैलीची तुलना तत्कालीन वास्तुकलेशी केली गेली. युन्सिअल व हाफ-युन्सिअल अक्षरांचे साधर्म्य रोमनेस्क चर्चवास्तूंच्या आकारांशी, तर ब्लॅक लेटर्स चे साधर्म्य गॉथिक शैलीच्या कॅथीड्रल वास्तूंशी दर्शविले गेले.

प्रबोधनकाळ : चौदाव्या ते सोळाव्या शतकांत भरभराटीस आलेल्या मानवतावादी वाङ्‌मयीन चळवळीतून दोन प्रमुख लिपी उदयास आल्या व त्यांचा प्रभाव उत्तरकालीन सर्व हस्ताक्षरलेखनशैलींवर आणि मुद्रणाच्या शोधानंतर (सु. १४५०) मुद्राक्षरांच्या वळणांवर पडला. ‘रोमन’ व ‘इटॅलिक’ ह्या त्या दोन लिपिशैली होत. यूरोपमधील पुढील काळातील सर्वच प्रकारचे हस्ताक्षरलेखन, अक्षरण व सुलेखन तसेच मुद्रणही या दोन लेखनप्रकारांनी प्रभावित केले. मुद्रणाचा शोध व प्रसारानंतर सुलेखन हे जास्तीत जास्त ठळक, ठाशीव, ठसठशीत व अलंकरणप्रचुर होत गेले. ह्याचे मुख्य कारण मुद्रित मजकुरापेक्षा सुलेखनाचे वेगळेपण व स्वतंत्र अस्तित्व ठळकपणे व प्रकर्षाने अधोरेखित करणे हेच होते. मुद्रणाच्या शोधानंतरची जवळजवळ २०० ते ३०० वर्षे यूरोपीय सुलेखन हे जाड ठळक अक्षरांकन व विपुल, समृद्घ अलंकरण या वैशिष्ट्यांनी युक्त होते.

प्रबोधनकाळात नव्यानेच हाती लागलेल्या प्राचीन अभिजात संहितांचे प्रतिलेखन करणे, हे तत्कालीन विद्वज्जनांचे प्रमुख उद्दिष्ट होते. अशा विद्वत्तापूर्ण लेखनकार्यासाठी त्यांना अलंकरणप्रधान गॉथिक लेखनशैली निरुपयोगी वाटल्याने त्यांनी नवी ‘मानवतावादी अक्षरलिपी ’ (ह्यूमॅनिस्टिक स्क्रिप्ट) निर्माण केली व त्याला त्यांनी नाव दिले : ‘लेटेरा अँटिका’ (द ओल्ड लेटर). ह्या लिपिलेखनपद्घतीवर सुरुवातीला ‘कॅरोलिंजिअन मिनुस्कूल’ पद्घतीचा प्रभाव होता. स्वच्छ, स्पष्ट, नीटनेटके व शीघ्रगतीने लेखन करणे हे मानवतावादी लिपिलेखनपद्घतीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. सौंदर्यवादी दृष्टिकोण हा त्या मानाने दुय्यम मानला गेला तथापि पुढे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीमध्ये आर्थिक सुबत्ता व सत्ता यांच्या वैभवकाळात अभिजात ग्रंथांच्या शाही (डिलक्स) आवृत्त्यांची मागणी जसजशी वाढत गेली, तसतशी सुलेखनकलेची भरभराट होत गेली. अभिजात ग्रंथांच्या शाही हस्तलिखित आवृत्त्यांमध्ये सुलेखनाचे नानाविध शोभिवंत, अलंकरणयुक्त प्रकार दिसू लागले. पंधराव्या शतकाच्या मध्यापासून पुढील साधारण १५० वर्षे हा इटालियन सुलेखनकलेचा सुवर्णकाळ होता. १४५०–१५०० या काळात इटलीमध्ये हस्तलिखितांच्या उत्तमोत्तम नकला करणारे अनेक श्रेष्ठ दर्जाचे सुलेखनकार (अमॅन्युएन्सिस) होऊन गेले. या काळात प्रबोधनकालीन लेखक-कलावंतांचे अभिजात रोमन कोरीव लेखांमधले स्वारस्य वाढीस लागले आणि ह्या कोरीव लेखांतील अक्षरांकनाचा प्रभाव सुलेखनकलेवर पडला. व्हेरोना येथील फेलिस फेलिस्यानो ह्या पुरातत्त्वविद लेखकाने १४६३ च्या सुमारास सुलेखनकलेवर एक संशोधनपूर्ण हस्तलिखित प्रबंध सिद्घ केला. त्यात रोमन वर्णमालेतील अक्षरांच्या भौमितिक आकृत्या रेखाटल्या होत्या. मुद्रणाच्या शोधानंतर सुलेखनकलेवर जशा काही स्वाभाविक मर्यादा आल्या, तसेच त्याचे विशेषीकरणाचे क्षेत्रही विस्तारत गेले. ‘लेटेरा अँटिका’ ही नियमबद्घ मानवतावादी लेखनपद्घती मागे पडली तथापि तिच्याशी सादृश्य असलेली अनौपचारिक अशी मानवतावादी प्रवाही लेखनलिपी (कर्सिव्ह स्क्रिप्ट) मात्र पुनरुज्जीवित होऊन तिला नवचैतन्य लाभले. ही लवचीक व शीघ्रलेखनसाठी उपयुक्त अशी प्रवाही लेखनलिपी आजही तिचे महत्त्व टिकवून आहे. सुमारे १४७०–८० या दशकात या लिपीला ग्रंथाक्षरलेखनासाठी (बुक हँड) मान्यता मिळून सुलेखनकलेला दर्जा व प्रतिष्ठाही प्राप्त झाली. लूडोव्हिको आर्रीघी या इटालियन सुलेखनकार-मुद्रकाने सुलेखन-अक्षरे गिरविण्यासाठी पहिली कित्तावही (कॉपीबुक) सु. १५२२ मध्ये तयार करुन प्रसिद्घ केली. तसेच तिरप्या (इटॅलिक) वर्णाक्षरांचे आकृतिबंध व मुद्रणठसे तयार केले. सोळाव्या शतकातील उल्लेखनीय जर्मन सुलेखनकारांत यूर्बानूस व्हीस हा सर्वांत प्रभावी होता.


 प्रबोधनोत्तर सतराव्या शतकात सुलेखनकलेला उतरती कळा लागली. केवळ सुशोभनासाठी, अलंकरणासाठी केले जाणारे हस्ताक्षरलेखन जवळजवळ लोप पावले. सुलेखनकाराचा व्यवसायही हळूहळू नामशेष होत चालला. अशा प्रतिकूल अवस्थेत केवळ फ्रान्समध्ये सुलेखनकला व ग्रंथसजावट काही प्रमाणात तग धरुन होती. शिक्षणक्षेत्रातील कित्तावह्यांची प्रथा यूरोप-अमेरिकेत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भरभराटीस होती पण एकूण सुलेखनाचा दर्जा मात्र सामान्य प्रतीचाच राहिला.

आधुनिक काळ : विसाव्या शतकात इंग्लंड, जर्मनी व अमेरिका येथे सुलेखनकलेचे घडून आलेले पुनरुज्जीवन ही कलाजगतातील एक अभूतपूर्व घटना ठरली. ह्या चळवळीचे पूर्वसूरी म्हणून एकोणिसाव्या शतकातील इंग्रज वास्तुशिल्पज्ञ ओवेन जोन्स (१८०९–७४) आणि इंग्रज कारागीर-कवी ⇨ विल्यम मॉरिस (१८३४–९६) यांचा प्रामुख्याने निर्देश करावा लागेल. हे दोघेही मध्ययुगीन हस्तलिखितांचे जाणकार संग्राहक होते. ओवेन जोन्सने मध्ययुगीन गॉथिक वा ब्लॅक लेटर पद्घतीच्या आधारे सुलेखनाचे प्रयोग केले. त्याने बारीक टोकाच्या पोलादी लेखणीने अक्षरांचे बाह्य रेषांकन आधी करुन मग आकारघडणीच्या आतल्या पोकळ जागा कुंचल्याने भरल्या. विल्यम मॉरिसला १८७० पासून शोभित हस्तलिखितांत व सुलेखनकलेत स्वारस्य निर्माण झाले आणि तेव्हापासून त्याने स्वहस्ताक्षरात पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने पिसांच्या लेखणीचा वापर केला, तसेच इटालियन प्रबोधनकालीन सुलेखनशैलीच्या आदर्शांना अनुसरुन त्याने सुलेखन केले. ह्या कलेच्या जोपासनेची परिणती त्याने पुढे स्वतःचे मुद्रणालय (केल्मस्कॉट प्रेस) काढण्यात झाली. त्याने मुद्रणयोजनावरही आपल्या सुलेखनशैलीचा ठसा उमटविला. ⇨ नव्य कला  (आर्ट नूव्हो ) संप्रदायाच्या ए. फिइल या सुलेखनकाराने नावीन्यपूर्ण अक्षरणशैली घडवून विसाव्या शतकात आधुनिक सुलेखनाला चालना दिली.

विसाव्या शतकात एडवर्ड जॉन्स्टन (१८७२–१९४४) या इंग्लिश सुलेखनकाराने खऱ्या अर्थाने सुलेखनकलाक्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्याने मध्ययुगीन सुलेखन-तंत्रे, लेखन-साधने, कागद, लेखण्या इ. घटकांचा कसोशीने सूक्ष्म अभ्यास करुन स्वतःची सुलेखनशैली घडविली. जॉन्स्टनच्या सुलेखनात अक्षरांकनातील जाड व बारीक रेषांचे तसेच अक्षरावयवांच्या विविध आकारिक घटकांचे समुचित कलात्मक संतुलन साधलेले दिसून येते. जॉन्स्टनच्या सर्जनशील व कल्पक सुलेखनातून अक्षराकृतिबंधांतील सौंदर्याचा व नवचैतन्याचा प्रत्यय येतो. जॉन्स्टनने आपला आधीचा वैद्यकीय पेशा १८९७ मध्ये प्रकृतिअस्वास्थ्याच्या कारणास्तव सोडून दिला व पुढील दोन वर्षे त्याने ‘ब्रिटिश म्यूझिअम’-मधील प्राचीन व मध्ययुगीन हस्तलिखितांचा कसून पद्घतशीर अभ्यास केला. त्यानंतर १८९९ ते १९१२ या काळात त्याने लंडन येथे ‘सेंट्रल स्कूल ऑफ क्राफ्ट्स’ या संस्थेत तसेच ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’ येथे सुलेखनकला या विषयाचे अध्यापन केले. ह्या दीर्घ अनुभवातून त्याने रायटिंग अँड इल्युमिनेटिंग अँड लेटरिंग  (१९०६) हे सुलेखनावरचे आद्य क्रमिक पाठ्यपुस्तक लिहिले. आजही या विषयावरचा हा अद्ययावत अभिजात संदर्भग्रंथ मानला जातो. जर्मनीतील कलाविद्यालयांतूनही त्याने सुलेखनकलेवर व्याख्याने दिली. त्याची शिष्या जर्मन सुलेखनकार ॲना सिमॉन्स हिने जॉन्स्टनच्या अध्यापन पद्घतीचा प्रसार जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड व नेदर्लंड्स येथे केला. जॉन्स्टनचा शिष्य, सहकारी व उत्तराधिकारी विल्यम ग्रेली हेविट हाही दर्जेदार सुलेखनकार व उत्तम शिक्षक होता. त्याने जॉन्स्टनच्या पश्चात ‘लंडन सेंट्रल स्कूल ऑफ आर्ट्स अँड क्राफ्ट्‌स’ येथे अध्यापन केले. त्याने सुरुवातीच्या काळात जॉन्स्टनच्या सुलेखनशैलीचे अनुकरण केले पण पुढे स्वतःची अशी वेगळी स्वतंत्र सुलेखनशैली विकसित केली. त्याने इटालियन प्रबोधनकालीन मानवतावादी सुलेखनशैलीचे पुनरुज्जीवन जाणीवपूर्वक करुन त्यातून स्वतःची शैली सिद्घ केली. सुलेखनातील अक्षरसजावट, विशेषत: अक्षरांना सोनेरी मुलामा वा सोनेरी छटा देण्याची अवघड तांत्रिक किमया त्याने प्रयत्नपूर्वक आत्मसात केली व त्या तंत्रावर विलक्षण प्रभुत्व मिळविले. त्याने काही ग्रीक व लॅटिन संहितांचे पूर्णपणे सुवर्णाक्षरांत प्रतिलेखन केले. ही त्याची सर्वोत्कृष्ट कलासिद्घी मानली जाते.

यूरोपमध्ये अलिकडच्या काळात सुलेखनाला एक ललित कलाप्रकार म्हणून विशेषत्वाने मान्यता व प्रतिष्ठा लाभली आहे. बहुसंख्य हौशी व व्यावसायिक कलावंत सुलेखनकलेकडे आकृष्ट होत आहेत व या कलेची निष्ठेने व्यासंगपूर्वक जोपासना करीत आहेत. लंडनमधील ‘सोसायटी ऑफ स्क्राइब्ज अँड इल्युमिनेटर्स’ ही सुलेखनकलेच्या क्षेत्रात कार्य करणारी अग्रेसर मान्यवर संस्था आहे, तसेच ‘व्हिक्टोरिया अँड ॲल्बर्ट म्यूझिअम’ मध्ये सुलेखनाची नित्यनेमाने प्रदर्शने भरत असतात. न्यूयॉर्क सिटी व शिकागो येथे सुलेखनाची नामवंत कलाविद्यालये आहेत.

पौर्वात्य सुलेखन : चीन, जपान व काही प्रमाणात कोरिया येथेही सुलेखनकलेला प्राचीन काळापासूनच एक उच्च दर्जाचा कलाप्रकार म्हणून मान्यता व प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. पौर्वात्य सुलेखनाच्या अगदी प्रारंभकाळापासूनच (इ. स. पू. सु. १७००) ते आजतागायत सुलेखन हा कलात्मक अभिव्यक्तीचा एक समृद्घ व वैविध्यपूर्ण प्रकार म्हणून विकसित होत गेल्याचे दिसून येते.

चिनी सुलेखन : चीनमध्ये लेखनकला ही इ. स. पू. सु. १५०० च्या आसपास चित्रलिपीच्या स्वरुपात निर्माण झाली. लवकरच लिपीतील चित्रांचा अंश कमी होत जाऊन अक्षरांचे घाट वेगळे होत गेले. चिनी अक्षरलेखन हे विविध माध्यमांत, विविध उपकरणांच्या साहाय्याने केले जात असे. ह्या विविध माध्यम-साधनांच्या स्वरुपभिन्नतेनुसार अक्षरांचे घाट व वळणेही बदलत असत. उदा., लाकडावर किंवा बांबूवर कोरलेली अक्षरे जास्त काटकोनी असत, तर रेशमी वस्त्रावर कुंचल्याने लिहिलेली अक्षरे जास्त गोलाकार असत. सुलेखनाचे विविध प्रकार यांतूनच पुढे विकसित होत जाऊन त्यांना कलात्मक दर्जा प्राप्त झाला. इ. स. पू. तिसऱ्या शतकापर्यंत ‘गू-वन’ ही प्राचीन लिपी प्रचलित होती. त्यातून पुढे ‘ली’ ही लेखनिकांना सुलभ अशी लिपी प्रगत झाली. तिच्यातच काहीसे फेरफार होऊन ही लिपी सरकारी कामकाजामध्ये वापरली जाऊ लागली. नंतरच्या हान काळात (इ. स. पू. सु. २०२ ते इ. स. ९) सरकारी कामकाज फारच वाढल्यामुळे शीघ्रलेखनासाठी मराठीतील मोडी लिपीसारखी ‘त्साव शू’ (गवतासारखी अक्षरे) ही नवी जलदगती लेखनलिपी तयार करण्यात आली.


 चिनी सुलेखनकलेत इ. स. तिसऱ्या शतकापासून ते सहाव्या शतकापर्यंत दोन प्रमुख संप्रदाय निर्माण झाले : सू जिंग याने उत्तरेकडील एका संप्रदायाची स्थापना केली. या पंथाचे अनुयायी जाड व बुटकी अक्षरे लिहीत. वांग स्यी -जृ व त्याचा मुलगा स्यन-जृ यांनी नाजूक हस्ताक्षरांचा दुसरा संप्रदाय स्थापन केला. थांग काळात (इ. स. ६१८ ते ९०७) इतर कलांबरोबरच सुलेखनकलेचाही विकास घडून आला मात्र त्यात सू जिंगच्या पंथाचा जास्त प्रभाव होता. येन जन-च्यींग, ल्यव गुंग-च्युआन आणि छू स्वै-ल्यांग हे या पंथातील प्रसिद्घ सुलेखनकार होत. सुंग काळात (९६० ते १२७९) सर्व कलाविष्कारांतच एक प्रकारचा नाजूकपणा दिसू लागला. त्यामुळे वांग पितापुत्रांच्या नाजूक हस्ताक्षराच्या सुलेखन-संप्रदायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ⇨ सू दुंग-फो, मी फू, ह्‌वांग थांग-ज्यन व सम्राट ह्‌वै जुंग (१०८२–११३५) हे या संप्रदायातील प्रमुख सुलेखनकार होत. ह्याच काळात सुलेखनविद्येच्या तांत्रिक अंगोपांगांवर शास्त्रीय स्वरुपाचे ग्रंथ लिहिले गेले. वांग पितापुत्रांच्या सुलेखनशैलीचा प्रभाव नंतरच्या काळातही टिकून राहिला. मंगोल काळात (१२६०–१३६८) जाव मंग-फू हा चित्रकार व सुलेखनकार आणि स्यन यू-शू हे या पंथाचे अनुयायी विशेष प्रसिद्घी पावले. मात्र त्यानंतरच्या मिंग राजवटीतील (१३६८–१६४२) स्यींग थूंग, वन जंग-मिंग आणि दुंग च्यी-छांग या सुलेखनकारांनी उत्तरेकडच्या जोमदार हस्ताक्षरपंथाला पुन्हा पुढे आणले. त्यांचा प्रभाव चीनमधल्या शेवटच्या च्यिंग ऊर्फ मांचू राजवटीतही (१६४४–१९१२) टिकून राहिला. वू वै-ये आणि ल्यव युंग हे या काळातील प्रसिद्घ सुलेखनकार होत. चिनी सुलेखन हे चिनी चित्रकलेला खूपच जवळचे आहे, असे दिसून येते. चिनी कलावंतांनी सुलेखनाचे इतके उत्तमोत्तम आविष्कार घडविले, की चिनी सुलेखनकला ही एके काळी चित्रकलेपेक्षाही उच्च दर्जाची मानली जात असे. आधुनिक काळात चिनी सुलेखनावर कोणत्याही एकाच संप्रदायाचा प्रभाव आहे, असे दिसत नाही. आजही सर्व पारंपरिक लिपिप्रकारांचा सुलेखनकलेत कौशल्याने वापर करुन घेतला जातो आणि सुलेखनकलेचे महत्त्व अद्यापही पूर्वीप्रमाणेच टिकून आहे. एखाद्या व्यक्तीच्या पांडित्याची पारख अजूनही तिच्या हस्ताक्षरावरुन केली जाते. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या रन्-मिन-बाव (इं. शी. ‘पिपल्स डेली’) या दैनिकाचा मथळा माओ त्से-तुंग यांच्या हस्ताक्षरात छापला आहे.

जपानी सुलेखन : इ. स. ६०० च्या सुमारास जपानी कारागिरांनी चिनी सुलेखनकारांकडून सुलेखनविद्या शिकून घेतली व त्यात उच्च दर्जाचे प्रावीण्य मिळविले. जपानी सुलेखनात ‘कांजी’ (चिनी अक्षरे वा वर्णमाला ) आणि स्थानिक जपानी ‘हिरागाना’ लिपी यांचे मिश्रण दिसून येते. त्यांतील अक्षरवळणांच्या व घाटांच्या वैविध्यपूर्ण संयोगातून व समृद्घ अलंकरणातून जपानी सुलेखनकारांनी व्यक्तिनिष्ठ व सर्जनशील अक्षरलेखनाचे अनेकविध कलात्मक आविष्कार घडविले. अद्यापही जपानमध्ये सुलेखनाच्या स्पर्धा प्रतिवर्षी घेतल्या जातात आणि त्यांत सर्व वयोगटांतले तसेच भिन्न भिन्न व्यवसायांतले स्पर्धक भाग घेतात व आपले सुलेखनकलेचे आविष्कार स्पर्धेनिमित्त भरविल्या जाणाऱ्या जाहीर प्रदर्शनांतून मांडतात.

इस्लामी सुलेखन : इस्लाम धर्मीयांत कुराणा च्या नकला करणे हे पवित्र मानले जात असे. कुराणाच्या अरबी भाषेतील श्रद्घापूर्वक लेखनातून इस्लामी सुलेखनकलेचा विकास घडून आला. मशिदी तसेच अन्य धार्मिक वास्तू, विविध वस्तू यांवर कुराणा तले संदेश कोरले जात. हे लेखन विविध शैलींनी व सुंदर सजावटीने आकर्षक करण्यात येई. शेकडो वर्षे इस्लामी कलावंतांनी सुंदर अलंकरणात्मक हस्ताक्षरांचा कलात्मक सजावटीसाठी उपयोग करुन घेतला. सुलेखनात पुष्कळदा वेलबुट्ट्या वा भौमितिक आकृत्या चितारल्या जात. इस्लामच्या उदयानंतर मानवाकृतींच्या व प्राणिमात्रांच्या चित्रणावर धार्मिक प्रतिबंध आल्याने इस्लामी कला अलंकरण, ‘अरेबस्क (कल्पनारम्य अलंकरणप्रधान कलाशैली) नक्षीप्रकार’ या अंगांनी विकसित होत गेली. पानाफुलांच्या नक्षी, भौमितिक आकृत्या यांना कलाविष्कारात प्राधान्य आले. सुलेखन, हस्तलिखितांची सजावट यांसारखे अलंकरणात्मक कलाप्रकार प्रमुख ठरले व प्रगत होत गेले. धार्मिक उद्दिष्टांनी केल्या जाणाऱ्या लेखनातून कालांतराने सौंदर्यमूल्येही वृद्घिंगत होत गेली व त्यातून सुलेखनाला उच्च कलात्मक दर्जा व प्रतिष्ठा प्राप्त झाली. एकांतरित उभ्या-आडव्या फटकाऱ्यांनी लयबद्घ बनलेली अरबी लिपी जात्याच अलंकरणानुकूल होती. अलंकरणाच्या इतर प्रकारांतही इस्लामी कलावंतांनी तिचा कौशल्यपूर्वक वापर केला. अरबी सुलेखनाच्या ‘कूफिक’ व ‘नक्शी’ या दोन शैली प्रसिद्घ होत. कूफिक ही साधारणतः चौकोनी व अणकुचीदार वळणाची अक्षरशैली असून, कूफिक हे नाव कूफा (इराक) या गावाच्या नावावरुन आले. त्या गावात उत्तमोत्तम सुलेखनकार रहात. इस्लामी सुलेखनकारांनी कूफिक शैलीचा वापर कोरीव शिलालेखांसाठी व दहाव्या शतकापर्यंत कुराणा च्या लेखनासाठी केला. नक्शी ही गोलाकार वक्र रेखाटनाची व अधिक प्रवाही अशी अक्षरलेखनाची शैली असून कालांतराने तिचाही कुराण लेखनासाठी वापर होऊ लागला. कूफिक शैली प्रामुख्याने कुराणा तील ‘सूरां’च्या (अध्यायांच्या) शीर्षकांसाठी वापरीत. इराणी सुलेखनकारांनी अरबी लिपीचे कूफिक व नक्शी हे अलंकरणप्रकार विशेषत्वाने वापरले. त्यातही कूफिक ही सुलेखनशैली प्रकर्षाने व प्राचुर्याने वापरलेली दिसून येते. अनेक यूरोपीय कलावंतांनीदेखील कूफिक ही शैली सौष्ठवपूर्ण, डौलदार व अलंकरणयुक्त असल्याने तिच्या आकर्षक सौंदर्याच्या प्रभावाने आपल्या सुलेखनात ती जाणीवपूर्वक अनुसरली. फारच थोडे यूरोपीय कलावंत जरी ती वाचू शकत होते, तरी ती आत्मसात करण्याचे प्रयत्न मात्र मोठ्या प्रमाणावर झाले. सुलेखनाच्या अनेकविध वेगवेगळ्या शैली इस्लामी संस्कृतीत उदयास आल्या व त्यांचा वापर भिन्न भिन्न प्रयोजनांनुसार इस्लामी संस्कृती असलेल्या वेगवेगळ्या देशांत होत राहिला. इस्लामी संस्कृतीतले हे एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य असून, जगभरातल्या अन्य संस्कृतींमध्ये ते क्वचितच आढळते.

भारतीय सुलेखन : भारतात मुद्रणपूर्व काळात हस्तलिखित पोथ्या, पुराणादी धार्मिक ग्रंथांच्या सजावटीतून सुलेखनकला प्रामुख्याने जोपासली गेली. सुवाच्य व सौंदर्यपूर्ण सुलेखनाच्या विविध शैलींचे नमुने ह्या धार्मिक हस्तलिखितांतून पाहावयास मिळतात. इस्लामी संस्कृतीत कुराणा च्या लेखन-सजावटीला कलाविष्कारांत विशेष प्राधान्य होते. साधारणपणे मुद्रणपूर्व, हस्तलिखित-शोभनाच्या काळात भारतात सुलेखनकलेचा उदय व उत्कर्ष झाल्याचे दिसून येते. सम्राट हर्षवर्धनाची (सातवे शतक) स्वाक्षरी, धार शिलालेख अशा काही उदाहरणांतून सुलेखन शैलींचे नमुने आढळतात. अकराव्या शतकात जैन सुलेखनकला अतिशय समृद्घ अवस्थेत होती. देवनागरी अक्षरवळणांशी साधर्म्य असलेली जैन लिपीतील अक्षरे सुलेखन शैलींचे विविध नमुने दर्शवितात. ताडपत्रावरील लिपिरेखन बौद्घ प्रज्ञापारमिता  हस्तलिखितात (दहावे-अकरावे शतक) आढळते. साधारण बाराव्या ते सोळाव्या शतकांत निर्माण झालेल्या जैन सचित्र हस्तलिखितांतून सुलेखनाचे विविध नमुने आढळतात. विशेषतः कल्पसूत्र, कालकाचार्य कथा  (१४५२) या सचित्र हस्तलिखित ग्रंथात सुलेखनाचे उत्तम नमुने आढळतात.


 अहमदाबाद येथील लालबाई दलपतभाई संग्रहालयात निवडक जैन हस्तलिखितांचे नमुने पाहावयास मिळतात. जैन मंदिरे व ‘देरासरे’ (जैन घरांच्या मंदिरांतील गाभारे) भारतात सर्वत्र आढळतात. या मंदिरांच्या व देरासरांच्या ग्रंथभांडारांत उत्कृष्ट सुलेखनाने युक्त हस्तलिखित ग्रंथ अद्यापही जतन केलेले दिसून येतात. जैन हस्तलिखितांमुळे जगाला भारतीय सुलेखनशैलीची, अल्प प्रमाणात का होईना, पण ओळख झाली. बौद्घांच्या ललितविस्तार या संस्कृत ग्रंथात प्राचीन भारतीय साठ लिप्यांचा निर्देश आहे. शिवाय सुलेखनक्रियेची शास्त्रोक्त व मुद्देसूद मांडणी या ग्रंथात आढळते. सुलेखनाची लेखणी (बोरु), तिची लांबी-रुंदी, बोरु तासण्याची, शाई बनविण्याची, कागद बनविण्याची पद्घती इ. तसेच ग्रंथाचे पान कसे असावे, अक्षराच्या उंचीची ओळ कशी आखावी, अशा स्वरुपाची विविध माहिती ललितविस्तार   या ग्रंथात आढळते. देवनागरी व जैन सुलेखनशैलींचे असंख्य नमुने हस्तलिखितांतून पाहावयास मिळतात. ह्या काळात दाक्षिणात्य राज्यांमध्ये जी हस्तलिखिते तयार झाली, ती ‘शलाका’ नामक सुईसारख्या अणकुचीदार लोखंडी लेखणीने ताडपत्रावर कोरलेली असत. तमिळ व ओडिया भाषांतील अनेक हस्तलिखित पोथ्यांतून वर्तुळाकार सुलेखनशैलींचे नमुने आढळतात. तिबेटी मठांत व देवळांत पारंपरिक पद्घतीचे सुलेखन अद्यापही अत्यंत श्रद्घेने केले जाते. ‘उचेन’ व ‘उमेन्’ ह्या तिबेटी सुलेखनशैली त्यात पाहावयास मिळतात. तिबेटी अक्षरांशी आकारसाधर्म्य असलेले बंगाली सुलेखनाचे नमुनेही दिसून येतात. बंगाली अक्षराकार त्रिकोणात्मक ओडिया, तमिळ, तेलुगू, मलयाळम्, कन्नड अक्षराकार वर्तुळात्मक, तर देवनागरी, गुजराती व गुरुमुखी (पंजाबी) अक्षराकार चौकोनात्मक अशी आकारविल्हे स्थूल वर्गवारी भारतीय भाषांच्या लिप्यांची करता येईल. त्या त्या भाषा-लिप्यांच्या सुलेखनशैलींतून ही अक्षराकार वळणे दिसून येतात.

भारतात मोगल राजवटीत (सोळावे-अठरावे शतक) इस्लामी सुलेखनकलेचा विकास घडून आला. कुराणा च्या शोभित हस्तलिखितांच्या सजावटीतून सुलेखनाचे विविध उत्कृष्ट नमुने आढळतात. अकबराने ग्रंथसजावटीला विशेष प्रोत्साहन दिले. त्याने आपल्या कारकीर्दीत चोवीस हजारांहून अधिक हस्तलिखित ग्रंथ चित्रबद्घ करवून घेतले. ग्रंथसजावटीत चित्रासंबंधीचे सुलेखन चित्रावरच केले जाई व चित्राचाच एक भाग म्हणून पाहिले जाई. ह्या लयदार व एकसंध सुलेखनामुळे चित्राला उठाव येत असे. हे सुलेखन स्वतंत्र सुलेखनकाराकडून करुन घेतले जाई. ऐतिहासिक वृत्तांत, काव्यग्रंथ, कथनपर ग्रंथ अशा विविध प्रकारच्या हस्तलिखित ग्रंथांच्या सजावटींतून सुलेखनाच्या नानाविध शैलींचे उत्कृष्ट नमुने पाहावयास मिळतात. ‘शिरीन कलम’ (सुंदर लेखणी) हा त्या काळातला श्रेष्ठ सुलेखनकार होता. दारा शुकोह हा देखील सिद्घहस्त सुलेखनकार होता. मोगलकालीन अरबी-फार्सी लिप्यांतले उर्दू सुलेखनाचे उत्कृष्ट नमुने, चित्रे व हस्तलिखिते यांतून पाहावयास मिळतात. कूफिक, नक्शी, नस्तालिक, तुलुथ, रेहानी, मघरिबी इ. सुलेखनशैली या काळात प्रचलित होत्या. ग्रंथसजावटीप्रमाणेच अन्य कलाप्रकारांतही सुलेखनाचा वापर केला जाई. मशिदी व अन्य धार्मिक इमारती, विविध वस्तू यांवर कुराणा तील संदेश सुलेखनाने व आलंकारिक सजावटीने कोरले जात. सुलेखनात बऱ्याचदा वेलबुट्ट्या वा भौमितिक आकृत्या चितारल्या जात. अल्तमशच्या कबरीवर (१२३६) कूफिक शैलीत कोरलेले सुलेखन आढळते. कुतुबमिनार (सु. ११९९–१३६८), ताजमहाल (१६३२–१६५२) यांसारख्या वास्तूंमध्ये दगडावर कोरलेली तसेच शिसे भरुन केलेली इस्लामी सुलेखनशैली पाहावयास मिळते. लपेटदार व लयबध्द उर्दू लिपीतील ही अक्षरे बव्हंशी नस्तालिक शैलीत कोरली आहेत, असे दिसून येते. ताजमहालाच्या भव्य प्रवेशद्वाराच्या कमानीभोवती कुराणा चे आयते कोरले आहेत. ‘तुलुथ’ सुलेखनशैलीत ते कोरले आहेत. सतराव्या शतकातील वास्तूंवर पुरालेख कोरण्यासाठी तुलुथ ही प्रवाही सुलेखनशैली विशेषतः प्रचलित होती. मुमताज व शाहजहान यांच्या कबरीवरील स्मृतिलेख फार्सी लिपीत असून ते अनुक्रमे नक्शी व नस्तालिक सुलेखनशैलींत आहेत. शीराझ येथील अब्द-उल्-हक (‘अमानत खान’ उपाधीने प्रसिद्घ) याचा सुलेखनकार म्हणून निर्देश आढळतो.

भारतातील मुद्रणपूर्व काळातील लिप्यांच्या सुलेखनाबाबत अद्यापही पुरेशा प्रमाणात अभ्यास व संशोधन झालेले नाही. अक्षरांच्या आकारसौंदर्याच्या अंगाने भारतीय लिप्यांच्या सुलेखनाचा शास्त्रीय, पद्घतशीर अभ्यास व संशोधन होणे गरजेचे आहे.

मराठी सुलेखन : विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात चित्रकलेच्या क्षेत्रात वाणिज्य कला (कमर्शिअल आर्ट) हा नवा विभाग अस्तित्वात आला आणि त्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेल्या व्यावसायिक चित्रकारांनी मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांना जास्त आकर्षक व कलात्मक रुप देण्यात बहुमोल कामगिरी बजावली. मुखपृष्ठांवर आकर्षक रंगीबेरंगी चित्रांबरोबरच कलात्मक अक्षरलेखनही ग्रंथ व ग्रंथकार यांच्या शीर्षकांसाठी वापरले जाऊ लागले. मराठी सुलेखनकलेचा हा प्रारंभकाळ म्हणता येईल. १९१०–१९३६ या काळात मुखपृष्ठसजावटीत व अक्षरालंकरणात विकासात्मक बदल होत गेले. ग्रंथांप्रमाणेच वृत्तपत्रे, नियतकालिके यांची शीर्षके, लेखशीर्षके, मथळे, उपशीर्षके अशा सर्वच घटकांत, जिथे-जिथे शक्य व सोईस्कर असेल अशा ठिकाणी कलात्मक, अलंकरणात्मक अक्षरलेखन दिसू लागले. मराठी सुलेखनकलेचा विकास अनेक अंगोपांगांनी, विविध क्षेत्रांत होत गेला. चित्र, छायाचित्र आणि सुलेखन यांच्या कलात्मक संतुलित संयोजनातून साधलेले जाहिरातींचे आकृतिबंध नाटक, चित्रपटांच्या जाहिरातींतून प्रदर्शित होऊ लागले. चित्रपट, नाटके यांच्या जाहिरातींसाठी अक्षराकृतिबंध तयार करुन ते जाहिरातफलक (पोस्टर्स), वृत्तपत्रीय जाहिराती अशा अनेक माध्यमांत विपुलतेने व वैविध्यपूर्ण रीतीने उपयोजिले जाऊ लागले. सुरुवातीच्या काळातील ग्रंथ, नियतकालिके आदींच्या चित्राक्षर- सजावटीसाठी नावाजलेल्या चित्रकारांत दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर प्रभृतींची नावे आवर्जून घ्यावी लागतील.


ग्रंथसजावट, नाटक-चित्रपटांच्या जाहिराती यांप्रमाणेच विविध व्यावसायिक, सामाजिक-सांस्कृतिक आदी संस्थांच्या जाहिरातींत आधुनिक काळात सुलेखनाचा वापर वैपुल्याने व आकर्षक, कलात्मकरीत्या होऊ लागला. त्यायोगे सुलेखनकलेचे उपयोजित मूल्य उत्तरोत्तर वाढत गेले. त्याचा अप्रत्यक्ष फायदा उत्पादित वस्तूंच्या, ग्राहकसेवांच्या विक्री- वृद्घींत होऊ लागल्याचे दिसून येते.

रघुनाथ कृष्णकांत ऊर्फ र. कृ. जोशी (१९३६–२००७) हे आधुनिक मराठी सुलेखनकलेचे आद्य प्रवर्तक मानले जातात. मराठी अक्षरांचा आकार-अंगाने शास्त्रशुद्घ व सौंदर्यलक्ष्यी विचार सातत्याने करुन व सुलेखनाचे नानाविध प्रयोग करुन त्यांनी आधुनिक मराठी सुलेखनक्षेत्रात पायाभूत कार्य केले. १९५६ मध्ये उपयोजित कलेतील जी. डी. आर्ट ही पदविका मिळवून त्यांनी नंतरच्या काळात एका नामवंत देशव्यापी जाहिरात संस्थेत काम केले. त्यांनी स्वतःच्या शैलीत जी सुलेखने केली, त्यांतून त्यांनी भारतीय अक्षराकार संस्कृतीचा अविरत घेतलेला ध्यास जाणवतो. त्यांनी सर्व भारतीय भाषालिपींना सामावून घेणारी देशभारती ही सामायिक भारतीय लिपी तयार केली व सुलेखनामध्ये आणि मुद्राक्षरांमध्ये अनेकविध प्रयोग केले. संगणक तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर त्यांनी सुलेखनात करुन घेतला. त्यांनी काव्यपंक्ती व सुलेखनयुक्त अक्षराकार यांचा अपूर्व मेळ साधून ‘मूर्त कविता’ हा आगळावेगळा प्रयोगशील दृक्‌काव्यबंधाचा प्रकार निर्माण केला. त्यांच्या या मूर्त कविता सत्यकथा मासिकातून साधारण १९६५ पासून वेळोवेळी प्रसिद्घ होत गेल्या. १९७० साली त्यांनी ‘ हॅपनिंग्ज’ हा सुलेखनाचा नावीन्यपूर्ण प्रयोग सादर केला. सर्वसामान्यांमध्ये सुलेखनकलेविषयी जाण निर्माण व्हावी व ती वाढीस लागावी, या दृष्टीने त्यांनी शोधनिबंध, व्याख्याने, प्रात्यक्षिके, माहितीप्रधान प्रदर्शने इ. स्वरुपाचे कार्य केले. सुलेखनविषयक शिक्षण व संशोधन क्षेत्रातही त्यांनी मौलिक कामगिरी बजावली. उपयोजित कलेच्या शिक्षणात भारतीय सुलेखनकला व मुद्राक्षरलेखनकला यांना प्राधान्य व महत्त्व प्राप्त होण्याच्या दृष्टीने त्यांनी अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल सुचविले.

र. कृ. जोशी यांनी जुन्या पोथ्यांमधील अक्षरांची वळणे अभ्यासण्यासाठी एशियाटिक लायब्ररी, मुंबई येथे दोन वर्षे सातत्याने संशोधनकार्य केले. एशियाटिक ग्रंथसंग्रहालयातील जुन्या दुर्मिळ हस्तलिखितांतील देवनागरी सुलेखनशैलींचे त्यांनी प्रथमतः वर्गीकरण केले. त्यांतील वैशिष्ट्यपूर्ण शैलींचे अक्षराकार ते स्वतः मुळाबरहुकूम नकलून काढत. त्यामुळे त्या त्या सुलेखनशैलीतील आंतररचनातत्त्व त्यांना पूर्णतः उमगले होते. सदर हस्तलिखितांच्या शास्त्रशुद्घ संशोधनाचे सार त्यांनी काल्टिस ८३  या अक्षर-आकार संशोधनास वाहिलेल्या संशोधनपत्रिकेत शोध-निबंध लिहून मांडले आहे. (‘इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर’, आय्आय्‌टी., पवई येथे १९८३ मध्ये झालेल्या चर्चासत्रात वाचलेला शोधनिबंध). र. कृ. जोशी यांनी अक्षरयोग नावाची आंतरराष्ट्रीय सुलेखन कार्यशाळा व परिसंवाद पुणे येथे १९८६ मध्ये आयोजित केला होता. त्यातून अनेक सुलेखनकारांना प्रेरणा मिळाली व भारतीय सुलेखनाची ओळख जागतिक पातळीवर होऊन त्याविषयीचे कुतूहल वाढीस लागले. र. कृ. जोशी यांनी उल्का जाहिरात संस्थेच्या नावे सुलेखनातील संशोधनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुलेखनकारांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. ओडिया भाषालिपीच्या सुलेखनासाठी एस्. के. मोहंती आणि मराठी सुलेखनासाठी अच्युत पालव हे या शिष्यवृत्तीचे पहिले मानकरी होत. एस्. के. मोहंती यांनी ओडियाप्रमाणेच अनेक मुद्राक्षरांच्या निर्मितीमध्ये लक्षणीय व विपुल प्रमाणात काम केले.

अच्युत पालव (१९६०–     ) यांनी उल्का शिष्यवृत्तीसाठी मोडी लिपीचा पंधराव्या ते सतराव्या शतकांतील इतिहास, तसेच मोडी लिपीची विविध वळणे व अक्षररुपे यांवर कलात्मक दृष्ट्या संशोधन करुन प्रबंध लिहिला (१९८३). मोडी व आजची देवनागरी यांच्या दृश्य समन्वयातून ‘धृतनागरी’ तयार केली. तिला ‘मुक्त लिपी’ असे नाव दिले. या लिपीचा त्यांनी सुलेखनातून कलात्मक आविष्कार घडवून ह्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करुन दिली. शैक्षणिक व संशोधन दृष्ट्या त्यांचे हे काम मोलाचे आहे. त्यांच्या सुलेखनात मोडी लिपीतून आलेला देवनागरी गोडवा हे त्यांच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. महाराष्ट्र शासनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेल्या आपला महाराष्ट्र  व मार्ग प्रकाशनाच्या महाराष्ट्र  या पुस्तकांत मुक्त लिपीच्या सुलेखनाचे नमुने आढळतात. ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम ह्या संतांच्या काव्यरचनांना सुलेखनाच्या माध्यमातून त्यांनी देखणे रुप दिले. तसेच ओम-अल्ला सारख्या सुलेखन-प्रदशर्नांतून सामाजिक बांधीलकी प्रकट केली. जर्मनीतील ‘क्लिंगस्पोर’ या प्रख्यात सुलेखन संग्रहालयात आपली अक्षरचित्रे मांडणारे ते एकमेव भारतीय सुलेखनकार होत.

त्यानंतरची उल्का शिष्यवृत्ती संतोष क्षीरसागर यांना देण्यात आली. या शिष्यवृत्तीच्या काळात, शिष्यवृत्तीचा त्यांचा संशोधनाचा विषय ‘सुलेखन साहित्य-सामुग्री व पृष्ठभाग याचा जागतिक अभ्यास’ हा होता. आजपर्यंत जगातील अनेक परंपरागत सुलेखनशैलींची कारणे ही लेखनसामुग्री साहित्य असून, सुलेखनाचा तो अविभाज्य घटक आहे व म्हणून त्यातूनच उद्याच्या अक्षर सुलेखनाचे प्रयोग करणे शक्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले. संतोष क्षीरसागर यांनी नंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. र. कृ. जोशींच्या प्रेरणेतून व शिकवणुकीतून त्यांनी सुलेखनाचे सर्जनशील विविधांगी प्रयोग केले व त्यांच्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी त्या दिशेने प्रयोगशीलतेकडे प्रवृत्त केले. भारतीय सुलेखनाचा प्रचार, प्रसार व प्रबोधन करण्यासाठी त्यांनी त्यांचे शिक्षक व सहाध्यायी विनय सायनेकर यांच्या साहाय्याने ‘अक्षराय’ नावाची चळवळ सुरु केली. महाराष्ट्रातील अन्य नावाजलेल्या सुलेखनकारांमध्ये दत्तात्रय पाडेकर, चंद्रमोहन कुलकर्णी, कमल शेडगे यांचे उल्लेख करावे लागतील. त्यांचे व्यावसायिक योगदान व प्रसिद्घीमाध्यमांसाठी त्यांनी केलेली सुलेखने यांतून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. कमल शेडगे हे एक लोकप्रिय व्यावसायिक सुलेखनकार असून त्यांचे अक्षरणावरील प्रभुत्व नजरेत भरणारे आहे. नाटके, चित्रपट, विविध सांस्कृतिक संस्था, पर्यटन संस्था आदींच्या जाहिरातींतील सुलेखनकामामुळे ते प्रसिद्घीच्या झोतात आले. त्यांच्या कमलाक्षरं  (२००९) या पुस्तकात त्यांच्या सुलेखनाचे विविध नमुने पाहावयास मिळतात. (चित्रपत्रे).

पहा : अक्षरण कोरीव लेख चित्रलिपि नागरी लिपि रोमन लिपि लेखनविद्या शोभित हस्तलिखिते.

संदर्भ : 1. Begley, W. E. Monumental Islamic Calligraphy from India, 1985.

    2. Jessen, Peter, Masterpieces of Calligraphy 261 Examples, 1500 –1800, 1981.

    3. Lancaster, John, Calligraphy Techniuques, 1987.

    4. Long, Jean, The Art of Chinese Calligraphy. 1987.

    5. Nakata, Yujiro, The Art of Japanese Calligraphy, 1973.

    ६. नाईक, बापूराव, देवनागरी मुद्राक्षर लेखनकला : खंड पहिला  मुंबई, १९८२.

    ७. पालव, अच्युत, अक्षरानुभव, मुंबई, १९९९.

    ८. शेडगे, कमल, कमलाक्षरं, मुंबई, २००९.

 

इनामदार, श्री. दे.

 


आई : सुलेखनाचे नमुने-कमल शेडगे 'काळआ आवाज आकारात लपलेला' : प्रायोगिक सुलेखन- संतोष क्षीरसागर.

मोडी लिपी : सुलेखन-अच्चुत पालवक चे विविध प्रकार : प्रायोगिक सुलेखन : संतोष क्षीरसागर.धार शिलालेख : आद्य मराठी सुलेखन नमुना.ॐ 'कार' सुलेखन-र.कृ. जोशी.


'कल्पसूत्र कालकाचार्य कथा' (१४५२) : जैन सुलेखनाचा नमुना.'श्री' : सुलेखन-र. कृ. जोशी.समर्थ रामदासांचे श्लोक : सुलेखन र. कृ. जोशी.मोडी-देवनागरी : मुक्त लिपीतील सुलेखन-अच्चुत पालव.'सत्यं शिवं सुंदरम्' : सुलेखन- र. कृ. जोशी.'कर्म हमारो निर्णय का आधार है' : सुलेखन- र. कृ. जोशी.'अवकाश' : प्रायोगिक सुलेखन - संतोष क्षीरसागर.ओडिया लिपी : सुलेखन : एस्. के. मोहंतीउर्दू लिपी : सुलेखन : आतिक अन्सारी.जर्मन 'न्यू फंडामेंटल बुक' मधील अलंकारणात्मक सुलेखन (१९६२), झुरिक-यु. व्हीस.'चार अक्षरे' : सम्राट दायगोकालीन (८९३-९३०) जपानी सुलेखन.मोगलकालीन 'खबरनामा' मधील इस्लामी सुलेखनाचा नमुना (१७१६), काश्मीर.'अन्शल' लिपीतील सुलेखन, आठवे शतक, व्हॅटिकन ग्रंथालय, रोम.नव्य कला अक्षरणशैलीतील आधुनिक सुलेखन - ए. फिश्लचिनी सुलेखन : थांग काळ (६१८-९०७), सुलेखनकार- ली यांग पिंग.