उर्दूसाहित्य : उर्दू भाषा आरंभकाळापासून ‘हिंदी’ म्हणूनच ओळखली जाते. अमीर खुसरौ (१२५३–१३२५) याने या भाषेला ‘हिंदी’ असे नाव अनेकदा वापरलेले आहे. ‘उर्दू’ हा शब्द तुर्की आहे. या भाषेला ‘उर्दू’ वा ‘खडी बोली’ ही नावे फारच उशीरा (सु. १८००) लावली गेली. सर्वच नव्या आर्य-भारतीय भाषांना साहित्यिक रूप इ. स. अकराशेनंतर येऊ लागले होते. यानंतर थोड्याच काळात दिल्ली प्रदेशावर इराणातून आलेल्या फार्सी भाषिक मुसलमानांची सत्ता दृढ झाली. परकीय मुसलमानांची मातृभाषा जरी इराणी (फार्सी) होती, तरी बहुसंख्य मुसलमान दिल्लीच्या परिसरातील हिंदीच बोलत. दरबारात मात्र फार्सी भाषाच वापरली जात होती. तत्कालीन काही कवींनी हिंदीत रचना केलेली होती, पण ही रचना आता उपलब्ध नाही. अमीर खुसरौनेही एक हिंदी काव्यसंग्रह लिहिलेला होता तोही आज उपलब्ध नाही. खुसरौ याचा गुरुबंधु रोशन चिराग दिहलवी (मृ. १३५६) याने या भाषेला ‘हिंदूई’ असे नाव वापरले आहे.

दक्षिणेतील उर्दू साहित्य : इस्लामी सत्ता हिंदीच्या मातृभूमीत स्थिर झाली व फार्सी भाषेलाच तेथे राजभाषा म्हणून स्थान मिळाले. हिंदूंची दीनावस्था राज्यकर्त्याची अनास्था यांमुळे पुढील पाचशे वर्षात उत्तर भारतात साहित्य निर्माण होऊ शकले नाही. १३४७ मध्ये देवगिरी येथे बहामनी राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. येथील मुसलमानी सत्तेला फार्सी भाषेच्या नवीन रक्ताचा पुरवठा होऊ शकला नाही. येथील मुसलमान सत्ताधीश, सेनानी, मुत्सद्दी, सैनिक व दरबारातील विद्वान लोक हिंदी भाषेचा वापर करीत. या मुसलमान सत्ताधीशांना या भाषेचाच अवलंब करावा लागला. उत्तरेतून हिंदी भाषिक मुसलमानांची ये जा होत राहिली. देवगिरीस भारताची राजधानी करण्याच्या महंमद तुघलकाच्या कल्पनेतून पुष्कळशा सूफींना व फकिरांना दौलताबादेस रहावे लागले. हिंदी बोलभाषेचा आरंभ अशा रीतीने दक्षिणेत (महाराष्ट्रात) झाला. महंमद तुघलक याच्या आदेशाने देवगिरीस आलेल्या सूफींत ख्वाजा बंदेनवाज याचा बाप राजू हाही आला होता (१३२५). त्याच्याबरोबर चार वर्षाचा बंदेनवाजही होता. तो अकरा वर्षानंतर दिल्लीस परतला. तो १४०२ मध्ये पुन्हा देवगिरीस परत आला. त्याचा मृत्यू गुलबर्गा येथे झाला (१४२२). त्याचे मूळ नाव मुहंमद हुसेनी. ‘बदेनवाज’ (भक्तवत्सल) व ‘गेसूदराज’ (लंबकेश) ह्या नावांनाही लोक त्याला ओळखत. हाच हिंदी वा उर्दूचा दक्षिणेतील आद्य लेखक होय. त्याचा दर्गा गुलबर्गा येथे आहे. तो धर्मप्रसारक सूफी साधू होता. त्याच्या नावावर चार ‘रिसाले’ (छोटे छोटे गद्यग्रंथ) मोडतात. मीराजूल आशिकैन (भक्तांची साधना) या ग्रंथात त्याने कुराणाच्या आधारे ईश्वरप्राप्तीचा मार्ग चर्चिला आहे. त्याच्या भाषेत ‘ने’ या तृतीया प्रत्ययाचा वापर आहे. शिकारनामा या वेदान्तपर गद्य पुस्तिकेत त्याने ज्ञानेश्वरांच्या नावावर मोडणाऱ्या ‘काट्यांच्या अणीवर तीन गाव वस्ती’ या कूटाचा वापर केलेला आहे. दुसऱ्या दोन रिसाल्यांतूनही त्याने भक्तिमार्गाची चर्चा केलेली आहे.

दक्षिणेतील आद्य कवी म्हणून निजामी याच्या नावाचा उल्लेख अवश्य करावा लागेल. त्याने कदमराव अउर पद्य  (कदमराव आणि पद्मिनी) ही ऐहिक प्रेमजीवनावर आधारलेली ‘मस्‍नवी’ (खंड-काव्य) १४६० ते १४६२ या काळात लिहिली. तत्कालीन राज्यात मराठ्यांचे काय स्थान होते, हे कदम या नावावरून कळते. या काव्यात ८६५ ‘बैत’ म्हणजे श्लोकार्ध आहेत. काव्यात तत्सम व तद्‍भव शब्दांचेही बाहुल्य दिसते.

बीदरनिवासी कवी कुरैशी याचा १४८२ ते १५२० या काळात भोगबल  नावाचा कामशास्त्रावरील एक ग्रंथ उपलब्ध आहे. त्याची प्रत हैदराबादच्या ‘सालारजंग’ ग्रंथालयात आहे. जालना (जि. औरंगाबाद) येथे राहणाऱ्या शाह अश्रफ बियाबानी (सु. १४५८–१५२९) याची नौ -सरहार नावाची एक मस्‍नवी हैदराबाद येथे हस्तलिखित स्वरूपात आहे. तो जालना येथे वारला. तो अहमदनगरच्या निजामशाही राज्यात राहत होता. अश्रफने या काव्यात करबला येथील युद्धकांडाचे वर्णन करून तेथे शहीद झालेल्या हुसेनप्रीत्यर्थ दु:खाश्रू ढाळले आहेत. या काव्यात नऊ प्रकरणे आहेत, म्हणून त्याला त्याने वरील नाव दिलेले आहे. अश्रफने आपल्या भाषेस ‘हिंदूई’ च म्हटले आहे. प्रस्तुत काव्यग्रंथात ग्रंथलेखनाचा कालही दिलेला आहे. (१५०४). अश्रफची ही मस्‍नवी बरीच मोठी असून प्राचीनही आहे. हिंदी-उर्दूच्या भाषाशास्त्रीय अभ्यासाची तीत खूप सामग्री सामावलेली आहे. हिंदीच्या प्रथमावस्थेतील प्रत्ययांचा वापर तीत केलेला आढळतो. ही मस्‍नवी अद्यापही अप्रकाशित आहे.

कुत्बुद्दीन फीरोज बीदरी नामक कवीची एक लहानशी मस्‍नवी पिरतनामा या नावाने प्रकाशित झाली आहे. तीत १२१ बैत असून ते भाषाभ्यासास उपयुक्त आहेत. फीरोज १५६५ मध्ये हयात होता.

दक्खिनी हिंदी अथवा उर्दूची साहित्यिक धारा बंदेनवाजपासून सुरू झाली. ती अखंडपणे चारशे वर्षे चालू होती. फोर्ट विल्यम कॉलेजच्या स्थापनेने नागरी हिंदी व उर्दू असे वेगळे प्रवाह १८०३ च्या सुमारास सुरू झाले. या चारशे वर्षातील उर्दू साहित्याच्या इतिहासाचे भाषादृष्ट्या तीन कालखंड पाडता येतात. पहिला कालखंड १५९२ पर्यंतचा. या काळातील साहित्य मुख्यत्वे धार्मिक स्वरूपाचे होते. या कालखंडात मराठी भाषेचा विशेष प्रभाव दिसून येत नाही. दुसरा कालखंड सतराव्या शतकाचा. उर्दू भाषेच्या व साहित्याच्या विकासाचा हा सुवर्णकाल आहे. या शंभर वर्षांत अनेक प्रकारची साहित्यसंपदा निर्माण झाली. धार्मिक रंग जाऊन तिच्यात ऐहिक जीवनाचे खरेखुरे प्रतिबिंब दिसून येते. शिवाय या विशाल साहित्यिक प्रपंचासाठी मराठी भाषेच्या संपत्तीचाही तिला वापर करावा लागला.मस्‍नवी, गझल, कसीदा, मर्सिया, रूबाई इ. प्रकारांतील साहित्यही याच काळात निर्माण झाले. तिसरा कालखंड औरंगजेबाच्या मृत्यूपासून (१७०७) पुढील शंभर वर्षांचा असून यात उर्दू भाषेची व साहित्याची प्रगती कुंठित झाली. दक्षिणेतील मुसलमानी सत्ता नामशेष झाली. राजाश्रय न राहिल्यामुळे चांगले साहित्यिक पुढे आले नाहीत.

सोळाव्या-सतराव्या शतकांतील आद्यकवी म्हणून विजापूरनिवासी शाह मीरांजी शम्सुल उश्शाक याचा उल्लेख करता येईल. याचा देहान्त १५६३ च्या नंतर झाला असे दिसून येते. तो एकनाथांचा समकालीन होता. त्याने विजापूर येथून सूफी पंथाचा प्रसार केला. त्याचे काव्यलेखनही याच हेतूने प्रेरित झाले आहे. दक्खिनी हिंदीच्या कवींत प्रथमत: मीरांजीच्या काव्यातच मराठीचा पुरेपूर प्रभाव दिसून येतो. तो मराठी ग्रामजीवनाशी एकरूप झाला होता असे दिसते.शहादतुत्तहकीक  (सत्यदर्शन), खुशनामा (खुश नावाच्या भक्तस्त्रीचा ग्रंथ) आणि खुशनाज  हे त्याचे काव्यग्रंथ होत. मराठी व हिंदी भाषेचा त्याच्या काव्यातील प्रभाव लक्षणीय आहे. मीरांजीचा मुलगा बुर्हानुद्दीन जानम व नातू अमीनुद्दीन आला हे दोघेही सूफी कवी होते. त्यांच्या कृती उपलब्ध आहेत. आलाचा मृत्यू १६७५ मध्ये झाला.

इब्राहिम आदिलशाह दुसरा (१५८०–१६२६) हा स्वत: कवी, संगीतज्ञ, रसिक व सहिष्णू होता. त्याने ‘जगद्‍गुरू’ ही उपाधी धारण केली होती.त्याचा नौ – रस हा १७ दोहे व ५९ संगीत पदे समाविष्ट असलेला काव्यग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यात केवळ हिंदी भाषा आहे, म्हणून नौ रस हा उर्दू ग्रंथ नव्हे असे काहींचे मत आहे. त्याने ही पदे १५९९ पूर्वी संगृहीत केली होती. इब्राहीमनामा  नावाने या इब्राहिमचे चरित्र लिहिणारा कवी अब्दुल हा दिल्लीचा राहणारा हिंदीभाषी होता. तो आपल्या भाषेला ‘हिंदूई’ म्हणतो. त्याचे हे चरित्र पद्यात आहे. त्यात तो ‘मी दिल्लीचा राहणारा’ माझी भाषा हिंदूई आहे. मला अरबी व फार्सी येत नाही ’ असे म्हणतो. त्याने आपल्या रचनेचा काळ १६०३ सांगितला आहे.


सतरावे शतक म्हणजे उर्दू वा दक्खिनी हिंदीचा परमोत्कर्षकाल होय. या शतकातील वजही, हसन शौकी, गवासी आणि नुस्रती हे चार कविश्रेष्ठ होत. नुस्रती सर्वाचा कविकुलगुरू असून खरोखरच श्रेष्ठ प्रतीचा महाकवी होय. सर्व उर्दू साहित्यातही तो श्रेष्ठ मस्‍नवीकार आहे. असे डॉ. अब्दुल हक यांनी म्हटले आहे. या चौघांत वजही हा वयाने पूर्वकालीन आहे. त्याची कुतुबमुश्तरी (१६०९) ही मस्‍नवी पहिलीच कृती होय. त्याचा दुसरा ग्रंथ सबरस (१६३५) हा गद्य असून उर्दू साहित्यात अपूर्व गणला जातो. त्याची भाषा अनुप्रासयुक्त व लालित्यपूर्ण आहे. तोही आपल्या भाषेला ‘हिंदी’ म्हणतो. वजहीची साहित्यनिर्मिर्ती पंचवीस-तीस वर्षे चालली असली, तरी त्याचे इतर साहित्य मात्र आज उपलब्ध नाही.

हसन शौकी हा उर्दूतील ऐतिहासिक काव्याचा जनक होय. त्याने १६२६ च्या सुमारास आपला जफरनामए – निजामशाह (निजामशाह याचा विजयग्रंथ) हा काव्यग्रंथ लिहिला. दक्षिणेतील चार मुसलमानी राजांनी विजयानगरचे साम्राज्य ज्या लढाईत धुळीस मिळविले, त्या तालीकोटच्या लढाईचे वर्णन त्यात आहे. त्याचा दुसरा ग्रंथ मेजबानी-नामा  (१६३३) हा मुस्तफा खानाची मुलगी व मुहम्मद आदिलशाह यांच्या लग्‍नसोहळ्याविषयी आहे. त्याच्या काही गझलाही उपलब्ध आहेत.

गोवळकोंडा येथील कवी गवासी हा अब्दुल्ला कुतुबशाह याचा ‘मलिकुश्शुअरा’ (राजकवी) होता. त्याची पहिली मस्‍नवी मैना सतवंती ही चंदा व लोरक या उत्तर भारतीय लोककथेवर आधारलेली आहे. सैफुल्मुल्क (१६२६) ही दुसरी मस्‍नवीही एका लोककथेवर आधारित आहे. शुकसप्तति  या मूळ संस्कृत ग्रंथाच्या नख्शबी याने केलेल्या तूतीनामा  या फार्सी अनुवादावरून गवासीने हिंदी तूतीनामा  लिहिला (१६३९). त्याच्या गझल व अन्यप्रकारच्या काव्यांचा संग्रहही प्रकाशित झाला आहे.

महाकवी  नुस्रती (मृ. १६७४) याचे गुल्शने इश्क  (१६५८), अलीनामा (१६६५) आणि तारीखे -इस्कंदरी  (१६७२ ) हे तीन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. यांशिवाय त्याच्या काही गझला, बारा कसीदे व एक मर्सिया उपलब्ध आहे. अलीनामा  हा ऐतिहासिक काव्यग्रंथ असून डॉ. हक यांच्या मते तो सर्व उर्दू साहित्यात अपूर्व व श्रेष्ठ आहे. युद्धकाव्यलेखनात त्याला उत्तरकालीन कवींतदेखील तोड नाही. हा बृहद्‍ग्रंथ आहे. तारीखेइस्कंदरी  हा ५५४ बैतांचा छोटा, पण ऐतिहासिक महत्त्वाचा ग्रंथ आहे. वजही, शौकी, गवासी व नुस्त्रती या कविश्रेष्ठांच्या साहित्यात मऱाठीचा भरपूर प्रभाव दिसतो. आतापर्यत अरबी-फार्सी शब्द अपभ्रष्ट स्वरूपात उर्दूत वापरले जात. नुस्रतीने ते कटाक्षाने शुद्ध स्वरूपात वापरण्याचा पायंडा पाडला. सनअती या विजापूरच्या कवीने तर आपण संस्कृत शब्द कमी वापरलेले आहेत, असे आवर्जून सांगितले. नुस्रतीच्या इतिहासग्रंथातून शिवाजीचे चरित्र व स्वभावविशेष, मुत्सद्देगिरी मराठी शिलेदाराचे बहारदार पण मार्मिक वर्णन पन्हाळा, पुरंदर, सिंहगड आदी गडांची अपूर्व वर्णने तसेच कोकणच्या वनश्रीचे सुंदर वर्णन आलेले आहे.

विजापूरनिवासी कवी हाशमी (मृ. १६९७  हा विशेष महत्त्वाचा आहे. तत्कालीन सामान्य मुसलमान शिलेदारांच्या भार्यांचे वा प्रेयसींचे चित्रण आपल्या गझलांतून त्याने केलेले आहे. आशय, घाट, भाव व भाषा या दृष्टीने हाशमीवर मराठी लावणीचा प्रभाव दिसतो. तसेच ख्वाजा बंदेनवाज, मीरांजी, बुर्हानुद्दीन जानम व त्याच संप्रदायातील सूफी कवी महमूद बहरी यांच्या साहित्यावर महाराष्ट्रातील भक्तिमार्गाचा प्रभाव दिसतो.

दक्खिनी हिंदीच्या परंपरेतील सर्वात अखेरचा कवी म्हणजे मुहंमद वलीउल्ला (मृ. १७०७) हा होय. त्याचे कविनाम ‘वली’ असून तो ⇨ वली दखनी म्हणून ओळखला जातो. तो औरंगाबाद येथे रहात असे. त्याने गझल व छोट्याछोट्या मस्‍नवी लिहिल्या. त्याचे काव्य म्हणजे हलक्याफुलक्या प्रतीची प्रेमकविता. त्याच्या कवितेला विशेष तात्त्विक बैठक नाही व खोलीही नाही. त्याच्या काव्यातील प्रेम उथळ स्वरूपाचे असून त्याची भाषाही विशेष प्रगल्भ नाही. तो दोन वेळा दिल्लीला गेला होता. दिल्लीत या दक्खिनी हिंदी भाषेचा विकास झाला नसल्याने तेथे त्याचे काव्य फार लोकप्रिय झाले. त्याच्या प्रभावाने तेथील कवींनी उर्दूत रचना करण्यास आरंभ केला. फार्सी काव्य निर्मिती मंदावली. स्वत: वलीवरही दिल्लीच्या वातावरणाचा प्रभाव पडला. त्याने उत्तर काळात तत्सम व तद्‍भव शब्दांचा उपयोग कमी केला व आपल्या काव्यातील फार्सी शब्दांचे प्रमाण वाढविले.

चौहान, देवीसिंग

उत्तरेकडील उर्दू साहित्य : मोगल साम्राज्याच्या अखेरीचा हा काळ होता. दिल्लीवर नादिरशहाने स्वारी केली. कत्तल, लूटमार, आणि विध्वंस यांचेच साम्राज्य सर्वत्र पसरले होते. इतरही अनेक स्वाऱ्या दिल्लीवर झाल्या परंतु ह्या झंझावाताही उर्दू काव्याचा नंदादीप शांतपणे तेवतच होता. सिराजुद्दीन अलीखान ‘आर्जू’ (१६८९–१७५६) याने खऱ्याखुऱ्या अर्थी उर्दू काव्याला हातभार लावून उत्तेजन दिले इतकेच नव्हे, तर त्याला उच्च दर्जाही प्राप्त करून दिला. तो स्वत: फार्सीत रचना करणारा कवी होता, तरीही त्याने कवींना उर्दूत रचना करण्यासाठी उत्तेजन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविला. अगदी सुरुवातीस ज्या काही मोजक्या कवींनी वलीचे अनुकरण करून शेर लिहिले, त्यांतील फारच थोडे आज उपलब्ध आहेत. ह्या प्रारंभिक काळातील नामवंत कवी सौदा, दर्द आणि मीर हे मानले जातात. यावेळेपर्यंत उर्दू भाषा हिंदूई (हिंदी) म्हणून ओळखली जात असे, तसेच कधीकधी तिला ‘रीख्ता’ (रेख्ता) किंवा ‘जबाने दिहलवी’ असेही संबोधण्यात येई. आरंभी फार्सी भाषेला लाभलेल्या राजाश्रयामुळे उर्दूचे लिपिस्वरूप मात्र फार्सी राहिले आणि तेच पुढे रूढही झाले. पण यानंतर उर्दूचा प्रसार फार झपाट्याने झाला आणि तिचा वाड्:मयीन दर्जाही सिद्ध झाला. सौदा, दर्द आणि ह्या कवीनी आपल्या प्रासादिक आणि आलंकारिक रचनेमुळे उर्दूला एक नवीन प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तिला वाड्:मयीन भाषेचा दर्जाही प्राप्त करून दिला. मीर आणि त्याचे समकालीन कवी एकीकडे सर्वसामान्य माणसाच्या उर्दू भाषेत काव्यरचना करून तिला साहित्यिक भाषा बनवीत होते, तर दुसरीकडे ते फार्सीच्या वाड्:मयीन परंपरांचे आणि म्हणींचे अनुकरण व अनुवाद करून त्यांचे तीत मिश्रण करीत होते. फार्सीतील म्हणी, वाक्प्रचार आणि शैली यांसोबतच ते वृत्तेदेखील फार्सीच वापरीत होते. ही फार्सी वृत्ते केवळ उर्दूतच नव्हे, तर क्वचित मराठी, गुजराती आणि हिंदी काव्यांतही रूढ झाली आहेत. ह्या कवींच्या काव्याची मोहिनी अमीरउमरावांवरही पडली आणि ते तिकडे आकृष्ट झाले. रेख्ता लिहिणाऱ्या ह्या कवींना दरबारातही सन्मानपूर्वक जागा दिली जाऊ लागली. सार्वजनिक ठिकाणे आणि गल्लीबोळात निर्माण झालेली रेख्ता किंवा उर्दू भाषा आता राजदरबारी विराजमान झाली. राजदरबारात जरी ती प्रतिष्ठा पावली असली, तरीही तिच्या प्रमाणितपणाचा निकष मात्र सर्वसामान्य जनता हाच राहिला. कारण कुठलाही शब्दकोश किंवा व्याकरणग्रंथ द्याप तीत निर्माण झाला नव्हता. म्हणून दैनंदिन बोलभाषेला किंवा जुम्मा मशिदीच्या पायऱ्यांवर बसून लोक ज्या गप्पा मारीत होते, त्यांतील भाषेलाच प्रमाणभाषा समजले जाई. अर्थातच वरील कवींच्या अविश्रांत परिश्रमामुळे उर्दू ही दरबारी भाषा बनली. राजदरबारात तसेच अमीरउमरावांमध्ये आणि प्रतिष्ठित लोकांमध्ये तिचा वापर होऊ लागला. पुढे तर ती सुधारणा आणि संस्कृतीचीही भाषा बनली.


मिर्झा मुहंमद रफी ‘सौदा’ (१७१३–१७८०) हा सुरुवातीस फार्सीत कविता लिहित होता. परंतु ‘आर्जू’ याच्या प्रभावामुळे तो उर्दूत रचना करू लागला. गझल, कसीदा आणि उपहासिका त्याने लिहिल्या. त्याचाच समकालीन ख्वाजा मीर ‘दर्द’ (१७१९–१७८५) याच्या गझलांत सूफी विचारांचा प्रभाव विशेषत्वे दिसून येतो.

मीर तकी  मीर (१७२२–१८१०) यानेही प्रथम फार्सीत काही गद्यलेखन केले तसेच काही मस्‍नवी लिहिल्या परंतु जेव्हा तो उर्दूकडे वळला, तेव्हा त्याने आपल्या प्रतिभेने उर्दूला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. उर्दू काव्यात काव्यगुणदृष्ट्या मीरचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागते. मोठमोठे कवीही स्वत:ला त्याचे अनुयायी म्हणवून घेण्यात भूषण मानू लागले. मीरच्या काव्यात निराशेची व दु:खाची गडद छाया सर्वत्र भरलेली दिसते. त्याने व्रज भाषेतील मधुर शब्द घेऊन आपले शेर सजविले. त्याचे काव्य साधे, सुबोध आणि एकदम अंत:करणाला जाऊन भिडणारे आहे. त्यात प्रसंगी दाहकता, मृदुता आणि कडवटपणाही आढळतो. विशाल सागराप्रमाणे असलेल्या त्याच्या काव्यात अखिल जगातील मानवाचे दु:ख भरलेले आहे. दिल्लीत त्याच्या काव्याने मोठी खळबळ उडवून दिली. दिल्ली सोडून तो लखनौस आसिफउद्दौला ह्या नबाबाकडे गेला परंतु तेथील परिस्थिती त्याला विशेष मानवलेली दिसत नाही. स्वत:ची आत्यंतिक अहंता तसेच अतिशय हळवा आणि शीघ्रकोपी स्वभाव, यांमुळे त्याचे तेथे पटू शकले नाही. दरबार सोडल्यावरही स्वाभिमानामुळे कोणाही पुढे त्याने मदतीसाठी हात पसरला नाही. दारिद्र्यात तो घरी बसून राहू लागला आणि अशा अवस्थेतच त्याचा अंत झाला.

यानंतरच्या काळातील उर्दू साहित्य नव्या दमाच्या कवींनी आणि त्यांनी केलेल्या नवनवीन प्रयोगांनी बहरून आलेले दिसते. हे कवी आपल्या काव्यात प्रभावी कल्पकतेचा वापर करताना, स्वत:च्या काव्यसमर्थनार्थ परस्परांशी अटीतटीने भांडताना, उपहासिका–विडंबिका लिहिताना आणि फार्सी व्याकरणाचा वाढत्या प्रमाणात वापर करताना दिसतात. ह्या काळातील नामवंत कवींत ‘मुसहफी’, ‘इन्‍शा’, ‘जुर्अत’ आणि ‘रंगीन’ ह्यांचा अंतर्भाव होतो. इकडे दिल्लीचा विध्वंस झाल्यामुळे (१७५६) तेथील कवी आश्रयाच्या शोधार्थ लखनौ आणि फैजाबादचा मार्ग धरताना दिसतात. कारण तेथील नबाबांची स्थिती चांगली होती आणि ते कलाप्रेमी व विद्याप्रेमीही होते. सुजाउद्दौला आणि आसिफउद्दौला ह्या दोन नबांबानी निमंत्रणे पाठवून ख्यातनाम कवींना लखनौस बोलावून घेतले. त्यामुळे मीर १७८३ मध्ये आणि मुसहफी १७९० मध्ये लखनौस गेले. तेथे शांतता होती, तसेच समृद्धीही होती. त्यामुळे अनेक तरूण कवीही तेथे जाऊन आपल्या नशिबाची परीक्षा पाहू लागले. त्यातच  इन्‍शा (सु. १७५६–१८१७) आणि रंगीन हे कवीही होते. यांनी सुरू केलेला उर्दू काव्यातील प्रवाह ‘लखनौ – संप्रदाय’ म्हणून ओळखला जातो.

दिल्ली-वर्तुळातील कवी आपल्या काव्यात माधुर्य आणण्यासाठी व्रज भाषेतील शब्दांच्या वैपुल्याने वापर करीत होते. परंतु लखनौ-वर्तुळातील कवी आपल्या काव्यातून व्रज शब्द काढून टाकण्यात आणि त्यांऐवजी ओढूनताणून आणलेले अरबी व फार्सी शब्द त्यात कोंबण्यात व्यग्र होते. कृत्रिम शब्दालंकार, गल्लीबोळात प्रचलित असलेले शब्द, अतिशयोक्त उपमा व रूपके इत्यादींचा ते आपल्या काव्यात सर्रास वापर करू लागले. त्यावेळचे लखनौतील समाजजीवन सुखलोलुप आणि विलासी होते. तेथील संस्कृती रंगेल लोकांचे माहेरघर बनली होती. याचे पडसाद तत्कालीन कवींच्या काव्यातूनही उमटू लागले होते.त्या काळातील कवींच्या काव्यातून सुंदर स्त्रिया, त्यांचा साजशृंगार, त्यांचे दागदागिने, त्यांची वेशभूषा आणि त्यांतील बारकावे यांच्या इत्थंभूत वर्णनावर शेर पडू लागले. कठीण वृत्ते व यमक, अतिशयोक्तिपूर्ण उपमा व रूपके इ. कृत्रिम गुणांनी ओतप्रोत असलेली कारागिरीच ते श्रेष्ठ कविता मानू लागले. मीरसारख्या प्रतिभासंपन्न कवीला हे मानवणे शक्यच नव्हते म्हणून तो घरीच बसून राहू लागला. रंगीन ह्या कवीने तर ‘रेख्ता’ ला ‘रेखती’ करून सोडले. म्हणजे स्त्रियांच्या तोंडी असलेली भाषा व बोली, म्हणी व वाक्प्रचार, त्यांच्या लकबी इत्यादींत तो शेर रचू लागला. इन्‍शा हा वृत्तीने खिलाडू, विनोदी, मिस्कील आणि नीतिध्येयहीन असल्याकारणाने त्याचे काव्य बिघडले. वास्तविक तो एक बुद्धिमान आणि थोर कवी होता परंतु तेथील समाजाने व वातावरणाने त्याच्यावर फार वाईट परिणाम घडवून आणला आणि त्याला साफ धुळीस मिळविले. नासिख आणि आतिश हे कवीही ह्याच वातावरणात राहिले परंतु त्यामुळे त्यांचे काव्य मात्र बिघडले नाही. त्यांच्या काव्यात अधिक खोली आणि अर्थसघनता आहे. त्यांच्या रचनेमुळे लखनौ-काव्यात कोमलता, भाषेची शुद्धता व माधुर्य आले तसेच त्याचे गांभीर्यही टिकून राहिले.

या काळात लखनौत दोन गोष्टींना अनन्‍यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते: एक म्हणजे विलास आणि दुसरी म्हणजे धर्म. तेथील नबाबांचा आणि अमीरउमरावांचा धर्मपंथ शिया होता. दरवर्षी मोहरमचा सण ते मोठ्या धुमधडाक्याने साजरा करीत. इराणातील धार्मिक परंपरेप्रमाणेच लखनौतही मिरवणुका, ताबूत आणि ध्वजापताका उभारल्या जात होत्या. अल्लाचा दूत इमाम हुसेन याने केलेल्या धार्मिक बलिदानाच्या म्हणजे ‘जिहाद’ च्या घटनेवर अतिशय दु:खपूर्ण अशी शोकगीते (मर्सिए) म्हणण्यात येत असत. फार्सीतील मर्सियांच्या शैलीचे आणि रचनापद्धतीचे अनुकरण करून उर्दूतही मर्सिए लिहिले जाऊ लागले. उर्दू मर्सियांच्या क्षेत्रात दोन कवींची नावे विशेष प्रसिद्ध आहेत. एक मीर बबर अली ‘अनीस’ (१८०२–१८७५) आणि दुसरा सलामत अली ‘दबीर’ (१८०३–१८७४) हे ते कवी होत. या दोघांनीही अतिशय शुद्ध भाषेत अप्रतिम मर्सिए लिहिले आहेत. कमालीचे दु:खद आणि उदास वातावरण त्यांचे शब्द एकदम साकार करतात. आपल्या मर्सियांच्या साहाय्याने या दोघांनीही उर्दू काव्याला सौंदर्यवती व प्रेम, विरह व मीलन यांतच गुरफटून पडलेल्या गझलांच्या संकुचित क्षेत्रातून दुसऱ्या व्यापक क्षेत्राकडे नेले. त्यांनी नवीन विचार, नवीन घटना आणि नवीन शब्द उर्दू भाषेत आणून तिला समृद्ध केले तिला शब्द व अर्थलावण्य प्राप्त करून दिले काव्यात नवीन शैली निर्माण केली, तसेच विविध अलंकारही आणले. उर्दू काव्यातील पारंपरिकतेच्या शृंखला तोडून त्यात एक नवीन शैली आणण्याचे श्रेय दबीर आणि अनीस या दोन श्रेष्ठ कवींना देण्यात येते.

मीर ‘हसन’ (?–१७८६) हा मीर ‘दर्द’चा शिष्य होता. त्याने मस्‍नवी सिहरूल बयान (१७८५) नावाने एक काव्य लिहिले. तत्कालीन चालीरीती, वेशभूषा आणि संस्कृतीचे स्वच्छ प्रतिबिंब त्यात पडलेले दिसून येते. मानवी भावभावना, प्रेम आणि निसर्गंसौदर्य यांचे चित्रण अतिशय कौशल्याने व वास्तवपूर्णतेने त्यात केलेले आढळते. उर्दूतील एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय प्रेमकाव्य म्हणून त्याचा उल्लेख केला जातो.

‘नजीर’ अकबराबादी (?–१८३०) हाही कवी याच काळात होऊन गेला. त्याने त्या काळातील गुलगुलित स्वरूपाची आणि अमीर उमरावांच्या स्तुतिपर काव्याची पारंपरिक चाकोरी सोडून आपली कविता लिहिली. निसर्गसौंदर्याचे त्याने आपल्या काव्यात अप्रतिम चित्रण केले. स्वत:चे शेर तो स्वत:च गात असे. हे शेर त्याने पशुपक्ष्यांवर लिहिले आहेत. उदा., गरीब हंस, अस्वलाचे पिलू, खारीचे पिलू यांसारख्या पशुपक्ष्यांच्या माध्यमाने त्याने तत्कालीन सामाजिक स्थितीवर आणि रीतिरिवाजांवर विदारक टीका केली आहे. त्याचे काव्य लोककाव्य म्हणून संबोधावयासही हरकत नाही. कारण ते लोकांच्या भाषेत आणि लोकांसाठी लिहिलेले काव्य आहे उच्चूभ्रू लोकांचा आणि विषयांचा त्यात लवलेशही नाही.


या काळातील उत्कृष्ट गद्याचा नमुना मिर्झा रजब अली बेग ‘सुरूर’ (१७८७–१८६७) याच्या फिसाना -ए अजायब (१८२४) ह्या दीर्घकथेत दिसून येतो. सुरूर हा लखनौ येथील आद्य गद्यलेखक म्हणून ओळखला जातो. यातील त्याची शैली अत्यंत आकर्षक व मनोरंजक आहे.

इकडे लखनौचे उर्दू भाषासाहित्य समृद्ध होत होते, तर तिकडे दिल्लीस मोगल राजवटीच्या अखेरीचा बादशाह बहादूरशाह जफर हा सर्व वैभव नष्ट झाल्यामुळे केवळ नावाचाच बादशाह उरला होता. असे असले, तरी तो स्वत: चांगल्या प्रतीचा कवी होता. त्याच्या गझला आजही मोठ्या आवडीने गायिल्या जातात. जफरचा गुरू शेख इब्राहिम ‘जौक’ (?–१८५५) हा होता. जौक हा त्याच्या दरबारातील शेवटचा कवी. त्याने बादशाह आणि राजपुत्रांवर कसीदे (स्तुतिकाव्ये) लिहिले. त्यांत त्याने फार्सी शैलीचे तसेच इतरही प्रकारचे नवनवीन यमक वैपुल्याने वापरले. उर्दू साहित्यात त्याच्या कसीद्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्याच्या गझला मात्र कसीद्यांइतक्या सरस उतरल्या नाहीत.

येथून पुढे काही काळ उर्दू काव्याचा प्रवाह क्षीण झालेला दिसतो. नवे कवी केवळ जुन्या कवींचे अनुकरण करून शेर लिहू लागले. अशा वेळी  गालिब (१७८७–१८६९) ह्या प्रतिभासंपन्न कवीचा उर्दू साहित्याच्या क्षितिजावर उदय झाला. सुरुवातीस तो आपली कविता फार्सीत लिहित होता, परंतु नंतर तो उर्दूकडे वळला. त्याच्या काव्यात फार्सी शब्दांचा भरणा अधिक असण्याचे कारण होय.१८५७ च्या उठावाच्या वेळी तो दिल्लीतच होता. त्याने मोगल बादशाहीतील शेवटच्या बादशाहाचा अंतही पाहिला. या दारुण घटनांचा परिणाम त्याच्या काव्यावर प्रकर्षानें झालेला दिसून येतो.

गालिबच्या काव्यामुळे उर्दू काव्यात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली, असे मानले जाते. त्याचा फक्त एकच उर्दू दीवान (काव्यसंग्रह) असून त्यात १,३०० शेर समाविष्ट आहेत. अन्य कवींच्या संग्रहाच्या मानाने प्रस्तुत संग्रह लहान असला, तरी काव्यगुणदृष्ट्या तो सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्याचे शेर अतिशय लोकप्रिय असून ते वारंवार म्हटले जातात. उर्दू भाषिकांत तर ते सर्वतोमुखी झाले आहेत. त्याच्या काव्यात आशयाची खोली, नावीन्य आणि दु:ख आहे. त्याची शैली मौलिक, हृदयाला जाऊन भिडणारी आणि सौंदर्यपूर्ण आहे. त्याचे काही शेर फार्सीप्रचुर असल्याने कळायला कठीण असले, तरी काही शेर अतिशय साधे, वाक्प्रचारयुक्त आणि चित्तवेधक आहेत. याव्यतिरिक्त गालिबने आपल्या अनुयायांना व मित्रांना वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांचा एक संग्रह उर्दू-ए -मुअल्ला  ह्या नावाने प्रसिद्ध झाला आहे. त्यातील शैलीचे नावीन्य, आशयाची मौलिकता, साधेपणा, मार्दव या गुणांमुळे उर्दूतील नव्या गद्याचा पायंडा गालिबच्या ह्या पत्रसंग्रहाने पाडला, असे मानले जाते.

लखनौ-वर्तुळातील काव्यावरदेखील या वेळी एक प्रकारची अवकळा येऊ लागलेली दिसते. काव्यात नवीन काही आणण्याचे किंवा जिवंत कविता लिहिण्याचे सामर्थ्य कोणाही कवीत उरले नव्हते. केवळ नावालाच काव्य म्हणावे अशी निर्मिती होत होती. निव्वळ शब्दबंबाळपणा आणि परिणामशून्यता तत्कालीन लखनौ-वर्तुळाच्या काव्यात अधिक होती. आतिश आणि नासिख हे त्यातल्या त्यात या काळातील चांगल्या शैलीचे कवी मानले जात असले, तरी त्यांचे बहुतेक अनुयायी मात्र केवळ शब्दांची कसरत करण्यात आणि मामुली दर्जाचे शेर रचण्यात मश्गूल होते. आतिशचा अनुयायी दयाशंकर ‘नसीम’ (१८११–१८४३) ह्या काश्मीरी पंडिताचा उल्लेख मात्र अवश्य केला पाहिजे. तो त्याच्या गुल्जारे नसीम (१८३३) नावाच्या मस्‍नवीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. ताजुल्-मुल्क आणि गुलबकावली यांची प्रेमकाहाणी तीत त्याने रंगविली आहे. प्रस्तुत मस्‍नवी यमक उपमादी अलंकारांनी त्याने नटविली असून तिच्यातील शेर कथापरिपोषास अतिशय अनुकूल उतरले आहेत.

यानंतर येणाऱ्या दाग (१८३१–१९०५) ह्या कवीच्या काव्यानंतर तर उर्दूतील अभिजात काव्याचा शेवट झाल्याचे स्वच्छ दिसून येते. दागची शैली जिवंत आणि प्रसन्न आहे. त्याने आपल्या शेरांत अनेक उर्दू म्हणी आणि वाक्प्रचार गोविले आहेत आणि त्यांमुळेच आजही त्याचे शेर लोकांच्या तोंडी आहेत. त्याच्या गझलांतील गेयताही लक्षणीय असल्यामुळे त्या गाऊन म्हणण्यासही फार चांगल्या आहेत. असे असले, तरी एकंदरीत त्याच्या काव्यात नवीन असे काहीच मिळत नाही उलट तोचतोपणा सारखा जाणवतो.

इंग्रजकालीन उर्दू साहित्य : आतापर्यत आपण प्रामुख्याने उर्दू काव्याचाच आढावा घेतला. गद्याबाबत लिहिले नाही. दक्खिनी उर्दू काळात पुष्कळ गद्य लिहिले गेले, तरी ते धार्मिक स्वरूपाचे होते. कविचरित्रे आणि कोशरचना मात्र उर्दूत सुरुवातीपासूनच होत होती. भारतीय भाषांमध्ये उर्दू भाषेचे हे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. उर्दूत कविचरित्रे लिहिण्याची प्रथा सर्वप्रथम सुरू झाली, ती इराणी (फार्सी) संपर्कातून. फार्सी भाषेत अब्दुला जुमही याचा कविचरित्रपर ग्रंथ तबकातुश्शुअरा  हा ८४५ च्या सुमारास निर्माण झाला होता. अशी कविचरित्रे फार्सीत प्रत्येक शतकात आढळतात. १०६० मध्ये तूसनिवासी असदी याने शाहात्तर कवी व त्यांच्या काव्यातील आर्ष शब्दांची चर्चा केलेली आहे. फार्सीतील असा अलीकडील ग्रंथ मजमऊल -फुसहा  रजा कुली खान याने १८७८ मध्ये लिहिला. ही परंपरा उर्दू पंडितांनीही स्वीकारली. असा सर्वप्रथम प्रयत्‍न औरंगाबाद येथील खान मुहंमद याने १७५६ मध्ये गुल्शने -गुफ्तार  ग्रंथ लिहून केला. त्यांत फक्त तीस समकालीन कवींची चर्चा आहे. यानंतर मीर तकी मीर याने १०३ कवींची ओळख नुकातुश्शुअराए -हिंदी  या ग्रंथात करून दिली. १७९४ मध्ये मुसहफी कवीने आपला तज्किरए-हिंदी हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. पुढील वीस वर्षापर्यत उर्दूत अशा प्रकारची आठ कविचरित्रे लिहिली गेली. अलीकडील काळातील अशा ग्रंथांची संख्या बरीच मोठी आहे. त्यांत शिब्‍ली याचा शिअरूल-अजम म्हणजे फार्सीतील काव्य हा ग्रंथ उल्लेखनीय आहे. उर्दू साहित्यात कोशरचनेची परंपराही फार जुनी आहे. या क्षेत्रात अमीर खुसरौ याचा उल्लेख सर्वप्रथम करावा लागेल. त्याने नवागत इराणी मुस्लिमांना हिंदी सुलभ व्हावी म्हणून एक छोटासा कोश तयार केला. तो खालिक-बारी  म्हणून प्रसिद्ध हे. त्यात हिंदी शब्द देऊन त्याला फार्सी प्रतिशब्द दिलेले आहेत. या कोशात फार्सी शब्दसंख्या ४८२, हिंदी ४७५, अरबी २३७ आणि तुर्की २ अशी आहे. याच धर्तीवर कोणाएकाचा वाहिद-बारी म्हणून आणखी एक कोश आहे. तो डॉ. जोर यांनी अश्रफ बियाबानीचा असावा असे अनुमान केले आहे. आणखी एक पद्यमय कोश उपलब्ध असून त्याची भाषा दक्खिनी आहे. तो सतराव्या शतकातील असावा. वाहिद-बारी  हा कोश पद्यात असून तो विक्रम संवत् १६७९ मध्ये (इ. स. सु. १६२२) रचलेला आहे. या कोशात १०३ बैत आहेत.


उर्दूतील नव्या गद्याची सुरुवात कलकत्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये झाली. लॉर्ड वेलस्लीने १८०० मध्ये प्रस्तुत कॉलेजची स्थापना केली. हिंदुस्थानात येणारे इंग्रज अधिकारी व सैनिक यांना हिंदुस्थानी भाषा शिकता यावी आणि त्याद्वारे सांस्कृतिक संपर्क साधला जावा, ह्या हेतूने कॉलेजची स्थापना केली गेली. उर्दू हिंदी व फार्सी यांचे अध्यापन तेथे केले जात होते. डॉ. गिलक्रिस्ट (१७५९–१८४१) हा कॉलेजचा प्रमुख होता. त्याला उर्दू, संस्कृत व फार्सी भाषांची आवड होती. त्याने अनेक ग्रंथही उर्दूत लिहिले आहेत. त्यांतील महत्त्वाचे दोन ग्रंथ म्हणजे, अंग्रेजी हिंदुस्तानी लुगत (१७९८) हा दोन भागांतील शब्दकोश आणि हिंदुस्तानी ग्रामर (१७९६) हे होत. गिलक्रिस्टने मोठे परिश्रम घेऊन आपल्या कॉलेजात उर्दूतील ख्यातनाम लेखक आणि कवी जमविले आणि त्यांच्याशी सन्‍मानपूर्वक वागून त्यांच्याकडून अनेक चांगल्याचांगल्या फार्सी ग्रंथांचे उर्दू अनुवाद करवून घेतले. गिलक्रिस्टच्या उत्तेजनामुळे त्यांनी उर्दूत स्वतंत्र ग्रंथनिर्मितीही केली. मीर अम्मन याच्या बागोबहार (१८०२) ह्या फार्सीवरून अनुवादित केलेल्या मस्‍नवीचा आणि शेर अली अफसोस ह्याच्या आराइशे महफिल (१८०५) ह्या इतिहासपर स्वतंत्र ग्रंथाचा उल्लेख अवश्य करावयास हवा. हे दोन्हीही ग्रंथ त्यांतील वाड्:मयीन शैलीसाठी आणि ओजस्वी अभिव्यक्तीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. बागोबहारमधील माधुर्य आणि हृदयाचा ठाव घेण्याचे तिचे सामर्थ्य, यांमुळे वाचक अंतर्मुख होतो. कॉलेजच्या स्थापनेमुळे हिंदी व फार्सीतील अनेक चांगल्या ग्रंथांचे अनुवाद साध्या व सुबोध उर्दूत केले गेले. ही अनुवादाची उर्दू भाषा अत्यंत साधी व सुबोध होती. महात्मा गांधी तिचा उल्लेख ‘हिंदुस्थानी’ म्हणून करीत. ह्या सुबोध अनुवादांचा परिणाम असा झाला, की उर्दूतील अनेक लेखकांनी भारदस्त, फार्सीप्रचुर व अनुप्रासयुक्त उर्दू गद्य लिहावयाचे सोडून दिले व ते साधे व सरळ उर्दू लिहू लागले. यामुळे उर्दू गद्यातील क्लिष्टता नाहीशी होऊन ते विकसित झाले. भाषेवर पाश्चात्त्य प्रभाव अधिक पडू लागला. इंग्रजी राजवटीसोबतच उर्दूत नवनवे विचार येऊ लागले, जुन्या परंपरा व संकेत बदलू लागले आणि पाश्चात्त्य विज्ञान, तत्त्वज्ञान आणि इतर अनेक नवीन गोष्टी शिकण्याची लोकांत आवड निर्माण झाली. उर्दूतील जुन्या वळणाचे क्लिष्ट काव्य कमी होऊ लागले. जुन्या वळणाची रचना करणारे कवी व फकीर बेकार होऊन वणवण फिरू लागले. ह्या काळातच ⇨ सर सय्यद अहमद (१८१७–१८९१) यांनी आपली चळवळ सुरू केली. त्यांच्या आसारुस्स-नादीद (१८४७) ह्या ग्रंथामुळे त्यांची विशेष कीर्ती झाली होती. प्रस्तुत ग्रंथात त्यांनी दिल्लीतील सर्व प्राचीन व ऐतिहासिक महत्त्वाच्या वास्तूंचा इतिहास वास्तूंच्या योजना, नकाशे, आकृत्यादींसह अत्यंत परिश्रमपूर्वक तयार करून दिला आहे आणि त्यामुळे हा ग्रंथ अत्यंत आकर्षक झाला आहे. १८६४ मध्ये ह्या ग्रंथाचा फ्रेंचमध्ये अनुवाद झाल्यावर त्यांना ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’चे फेलोपद मिळाले. वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्यांनी मुसलमान समाजाची स्थिती पाहून एक नवीन चळवळ सुरू केली. तहजीबुल् अखलाक  नावाचे एक वृत्तपत्र सुरू केले, तसेच अलीगढ कॉलेजची स्थापना (१८७७) केली. वृत्तपत्रासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले आणि त्याद्वारे उर्दूतील नवीन काव्य जिवंत, साध्या व सुबोध उर्दूत लिहिण्यास उत्तेजन दिले. त्यांच्या प्रस्तुत पत्राने उर्दू भाषिकांत फार मोठी खळबळ उडवून दिली. त्या काळी मुसलमानांमध्ये जे एक प्रकारचे नैराश्य आले होते, ते घालवून त्यांना परत जागे करण्याचे व कार्यास लावण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी टाकाऊ झालेल्या सामाजिक चालीरीतींच्या जाचक बंधनांतून त्यांना मुक्त करून विज्ञान व तत्त्वज्ञानाकडे त्यांना मार्गक्रमणा करावयास लावणे, त्यांना आवश्यक वाटू लागले. त्यांच्या सर सय्यद यांच्या प्रभावाने प्रेरित होऊन साध्या व सरळ उर्दूत काही ग्रंथनिर्मिती केली व समाजाला जागृत करण्याचे यत्‍न केले.

अकबर हुसेन अकबर (१८४६–१९२१) हा त्या काळी प्रसिद्ध असलेला कवी सर सय्यद यांच्या चळवळीविरूद्ध होता. तो आपल्या काव्यातून जुन्या पौर्वात्य संस्कृतीच्या रक्षणासाठी पाश्चात्त्य संस्कृतीच्या समर्थकांची टर उडवीत होता. तो पुराणमतवादी विचारांचा व संस्कृतीचा पुरस्कर्ता होता तसेच तिचे पुनरुज्‍जीवन व्हावे असे त्यास वाटे. त्याची लेखणी उपरोधपूर्ण, विनोदी व बोचरी होती. त्याची ही विशिष्ट विचारसरणी सोडली, तर तो एक चांगला कवी होता. आपल्या लेखणीच्या केवळ एका उलटसुलट फटकाऱ्यातून हवा तो मजेदार अर्थ अभिव्यक्त करण्याचे सामर्थ्य त्याच्यात होते. त्याची शैली वर्णनानुकूल आणि अर्थसघन होती. त्या काळी तो अत्यंत लोकप्रिय कवी होता.

सर सय्यद यांच्या वर्तुळातील प्रसिद्ध उर्दू लेखक पुढीलप्रमाणे होत : मुहंमद हुसेन आझाद (१८३०–१९१०) याने अनेक ग्रंथ लिहिले परंतु त्यांतील आबे-हयात  (१८९१) हा त्याचा ग्रंथ अभिजात मानला जातो. त्यात उर्दू कवींची चरित्रे आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना त्याने वर्णिल्या आहेत. त्याची शैली आलंकारिक, जिवंत आणि नावीन्याने रसरसलेली आहे. भाषा साधी व मृदू आहे, तसेच त्याचे विचारही नवीन आणि आकर्षक आहेत. इतिहासकार व टीकाकार म्हणून त्याचे उर्दू साहित्यातील स्थान वरचे आहे. अल्ताफ हुसेन  हाली (१८३७–१९१४) याचे कवी व गद्यलेखक म्हणून स्थान वरचे आहे. तो सुरुवातीस सामान्य प्रतीची कविता लिहीत होता. नंतर सर सय्यद यांच्या चळवळीत तो सामील झाला. मुसलमानांच्या खालावलेल्या स्थितीवर सर सय्यद यांच्या प्रेरणेने त्याने एक ‘मुसद्दस’ (उपदेशपर वा वर्णनपर उर्दू काव्यप्रकार) लिहिला. मुसलमानांमध्ये नवी हिंमत व जिद्द निर्माण व्हावी व त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने कार्यप्रवृत्त व्हावे, हा तो लिहिण्यामागील हेतू होता. प्रस्तुत मुसद्दसचे नाव मद्दो -जज्रे-इस्लाम (इस्लामचा उत्कर्ष व र्‍हास) असे असून त्यात इस्लामच्या इतिहासाचे आणि सद्य:स्थितीचे अत्यंत ओजस्वी वर्णन त्याने केले आहे. त्यातील शेर ओजस्वी, भावनेने ओथंबलेले व परिणामकारी आहेत. खऱ्या अर्थाने तो समाजसुधारक व वास्तववादी कवी होता. याशिवाय त्याने तत्कालीन स्त्रियांच्या दु:खपूर्ण स्थितीवर दोन काव्यग्रंथ लिहिलेले आहेत. उर्दू साहित्य सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे श्रेय हालीला द्यावे लागते. अत्यंत सोप्या व साध्या भाषेत त्याने गद्यपद्य रचना केली. उर्दूतील आद्य टीकाकार म्हणूनही त्याचाच उल्लेख केला जातो.त्याने काही चरित्रेही लिहिली आहेत. मुकद्दमए -शेर ओ शायरी  व हयाते जावेद  हे त्याचे दोन ग्रंथ उर्दू गद्यातील महत्त्वाचा टप्पा मानले जातात. यांव्यतिरिक्त त्याने हयाते सादी, यादगारे गालिब इ. ग्रंथ व अनेक निबंध लिहिले आहेत.  नजीर अहमद (१८३६–१९१२) हाही सर सय्यद यांच्या वर्तुळातील एक मोठा लेखक व वक्ता होता. भाषेवर त्याचे असामान्य प्रभुत्व होते. त्याच्या लेखनात अरबी शब्दांचे प्राचुर्य असले, तरी त्याचे लेखन वाचकाच्या मनावर खोल ठसा उमटविल्यावाचून रहात नाही. त्याने विशेषत: कथा, कादंबरी, चुटके इ. प्रकारांत लेखन केले. त्याचे सर्व लेखन बोधप्रधान आहे. त्याने रंगविलेल्या काही व्यक्तिरेखा अतिशय लोकप्रिय असून संभाषणात लोक त्यांचा वारंवार उल्लेख करतात. त्याच्या काही महत्त्वाच्या ग्रंथांची नावे पूढीलप्रमाणे : इब्‍नुलवक्त, मीरातुल उरूस आणि  तौबतुन्नुसूह. याशिवाय त्याने केलेला कुराणाचा अनुवाद फार सरस उतरला असून तो अतिशय लोकप्रियही आहे.

शिब्‍ली नोमानी (१८५७–१९१४) हा अलीगढ येथे अरबी-फार्सीचा प्राध्यापक होता. त्याने सर सय्यद यांच्या प्रेरणेने अनेक ग्रंथ लिहिले. त्यांत इस्लामचा इतिहास, तत्त्वज्ञान आणि इस्लाम धर्मातील थोर व्यक्तींची चरित्रे यांचा समावेश होतो. तसेच त्याने अनेक विषयांवर निबंध लिहिले. इंग्रजी गद्याच्या धर्तीवर उर्दू गद्याचा त्याने विशेष विकास केला. त्याचे विशेष प्रसिद्ध ग्रंथ पुढील होत: सीरतुन्नबी (मुहंमद पैगंबरांचे चरित्र) हा ग्रंथ त्याने सहा खंडांत लिहिला असून तो त्याचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ समजला जातो. अल्फारूक (मुसलमानांच्या दुसऱ्या खलीफाचे चरित्र ) आणि शेअरूल् -अजम (फार्सी काव्याचा इतिहास) हे त्याचे ग्रंथही दर्जेदार आहेत. यांशिवाय त्याने काही राजकीय स्वरूपाच्या कविताही लिहिल्या आहेत.


पंडित रतननाथ  सरशार (१८४६–१९०३) याने उर्दू कादंबरीलेखनाचा पाया घातला. फिसानए-आजाद ही त्याची कादंबरी विशेष प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. प्रस्तुत कादंबरीत अनेक घटनांची गर्दी झालेली असली, तरी लखनौच्या तत्कालीन समाजजीवनाचे हुबेहुब प्रतिबिंब तीत पडलेले दिसते.तत्कालीन चालीरीती, मेळे, मोहरम तसेच सर्वसामान्य माणसाचे जीवन यांचे चित्रण त्याने मोठ्या कौशल्याने केले आहे. लखनौची बोलभाषा व वाक्प्रचार त्याने वापरून प्रस्तुत कादंबरीत स्थानिक रंग भरला. या कादंबरीतील एकदोन व्यक्तिरेखा उर्दू भाषिकांत अतिशय गाजल्या व लोकप्रिय झाल्या. याव्यतिरिक्त त्याने अनेक कादंबऱ्या लिहिल्या, पण त्यांना फिसानए -आजादची सर नाही.

अब्दुल हलीम ‘शरर’ (१८६०–१९२६) याचा जन्म लखनौ येथे झाला. आपले शिक्षण पूर्ण होताच तो वृत्तपत्रव्यवसायाकडे वळला. त्याच्या वृत्तपत्राचे नाव दिलगुदाज  (१८८७) होते. नंतर तो कादंबरीलेखनाकडे वळला. त्याच्या बहुतांश कादंबऱ्या ऐतिहासिक व सामाजिक स्वरूपाच्या आहेत. त्या लखनौच्या स्थानिक भाषेत लिहिल्या असून अतिशय हृदयस्पर्शी आहेत. त्यांतील काही प्रसिद्ध कादंबर्‍यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : फिर्दोसे -बरी, ऐय्यामेअरब, हुस्‍न का डाकू, मन्सूर मोहना इत्यादी. यांव्यतिरिक्त अनेक कादंबऱ्या त्याने समाजसुधारणेसाठीही लिहिल्या. पडदापद्धती बंद व्हावी म्हणूनही त्याने एक कादंबरी लिहिली. त्याच्या कल्पकतेची व ज्ञानाची झेप प्रचंड होती. त्याने इस्लाम धर्मातील अनेक व्यक्ती व घटना ह्यांवर कादंबऱ्या लिहिल्या. त्याच्या कादंबऱ्यांनंतर काही काळापर्यंत उर्दू साहित्यात एकही दर्जेदार कादंबरी लिहिली गेली नाही. १९१७ मध्ये ⇨ प्रेमचंद  यांची बाजारे हुस्‍न ही कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यांचे आयुष्य अत्यंत हलाखीत गेले. त्यांनी उर्दूत अनेक दर्जेदार कादंबऱ्या व कथा लिहिल्या. त्यांच्या इतर गाजलेल्या व दर्जेदार कादंबऱ्या पुढील होत : गोदान, चौगाने हस्ती इत्यादी. त्यांच्या कथांचेही बारा – तेरा संग्रह आहेत. प्रेम पच्‍चिसी आणि प्रेम बत्तिसी हे संग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. प्रेमचंद सुरुवातीस साध्या व सुबोध उर्दूत लिहीत होते नंतर ते हिंदीत लिहू लागले. हिंदी साहित्यात त्यांचे स्थान फार वरचे आहे. त्यांची उर्दू शैली साधी, सरळ आणि अंत:करणाचा ठाव घेणारी आहे. नव्या विचारांचे पुरोगामी साहित्यिक त्यांना युगप्रवर्तक लेखक म्हणून मान देतात. कारण कादंबरी व कथा या क्षेत्रांत ग्रामीण जीवनाचे वास्तवपूर्ण चित्रण करण्याचा पायंडा त्यांनीच पाडला.

मिर्झा मुहंमद ‘रुसवा’ (१८५८–१९३१) हा त्याचा उमरावजान अदा (१८९९) ह्या कादंबरीसाठी प्रसिद्ध आहे. तीत अवध प्रदेशातील (उत्तर प्रदेश) एका स्त्रीचे दु:खपूर्ण चरित्र सांगितले आहे. त्याची भाषा व अभिव्यक्ती अतिशय संपन्न व कौशल्यपूर्ण आहे. खास लखनवी ढंगाची भाषा व बोधपरता हे त्याचे विशेष होत. काही टीकाकार प्रस्तुत कादंबरी उर्दूतील उत्कृष्ट कादंबरी मानतात.

सर मुहंमद  इकबाल (१८७३–१९३८) हे बालवयातच कविता करू लागले. त्यांची आरंभीची कविता राष्ट्रीय स्वरूपाची आहे. या काळातच त्यांनी ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे एक ओजस्वी असे राष्ट्रीय स्वरूपाचे गीत रचिले. नंतर ते इंग्‍लंड व जर्मनीत गेले. तेथून परत आल्यावर त्यांचा राष्ट्रीय दृष्टिकोन बदलला आणि ते सर्व इस्लामवादाचे पुरस्कर्ते झाले. यावेळीही त्यांची काव्यप्रतिमा बहरलेलीच होती परंतु त्यांच्या कवितेत आता तत्त्वज्ञान आल्यामुळे ती कळावयास कठीण झाली. नीत्शे व बेर्गसाँ या तत्त्वज्ञांचा त्यांच्या विचारांवर गाढ प्रभाव पडलेला होता. त्यांच्या काव्यातूनही त्यांनी एका नवीन तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. यूरोपात इस्लामी राज्यांवर जे अन्याय झाले होते, ते पाहून इकबाल सर्व – इस्लामवादाकडे वळले. यूरोपातून परत येताच त्यांनी उर्दूऐवजी फार्सीत लेखन करण्यास सुरूवात केली. असरारे खुदी आणि रूमूजे बेखुदी ह्या त्यांच्या दोन फार्सी मस्‍नवी विशष प्रसिद्ध आहेत. १९३५ मध्ये ते पुन्हा उर्दूत लिहू लागले. बाले -जिब्रैल (१९३५) व जर्बे कलीम (१९३५) ह्या उर्दू काव्यग्रंथांत त्यांनी मानवाच्या अस्मितेवर अधिक जोर दिला. तसेच मानवाने सतत प्रयत्‍न आणि उच्च ध्येये त्याची अस्मिता विकसित करू शकतात, असे त्यांचे मत होते. मनुष्याचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी होत. ह्या गोष्टींमुळेच तो खऱ्या अर्थी माणूस बनतो, अशी त्यांची धारणा होती.

मौलाना अबुल कलाम आझाद (१८८८–१९५८) हे उत्कृष्ट वक्ते व पत्रकार होते. अल्-हिलाल  (१९१२) हे त्यांचे साप्ताहिक कलकत्त्याहून निघत होते. ह्या साप्ताहिकामुळे त्यांना कीर्ती लाभली. त्यांचे दोन ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे तर्जुमानुल कुर्आन (कुराणाचा सटीक अनुवाद) व गुबारे खातिर  ही होत. बुद्धिजीवी वर्गात हे ग्रंथ अतिशय आवडीने वाचले जातात.

पंडित ब्रिजनारायण ‘चकबस्त’ (१८८२–१९२६) हे अल्पायुषी असले, तरी त्यांनी थोड्या काळात दर्जेदार कविता लिहिली. ते विशेषकरून राष्ट्रीय कवितेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा सुबहे वतन (१९३१) हा मुसद्दस त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला. त्याच्यातील वर्णनशैली अत्यंत साधी, सुबोध व चित्तवेधक आहे.

पहिल्या महायुद्धानंतर १९२० च्या सुमारास उर्दू साहित्यात फार मोठे परिवर्तन घडून आले. ह्या परिवर्तनाची सुरूवात प्रेमचंदांच्या कथांपासून झाली. कारण प्रेमचंदांनी मजूर, शेतकरी आणि गोरगरिबांची सुखदु:खे, अडीअडचणी यांना उर्दू साहित्यातून वाचा फोडली. उर्दू साहित्यातील वास्तववादाचे जनक म्हणून त्यांनाच मान दिला जातो. ह्या घटनेचा प्रभाव उर्दू काव्यावरही पडू लागला. ‘जोश’ मलीहाबादी (१८९८–  ) याच काळात ओजस्वी कविता लिहित होते. ते शब्दसम्राट होते. त्यांच्या लेखणीत मोठे सामर्थ्य होते. त्यांच्या सोबतच ‘हस्रत’ मोहानींचाही (१८७५–१९५१) उल्लेख करावा लागेल. त्यांनी गझलांमध्ये नावीन्य आणले आणि लखनवी परंपरेच्या र्‍हासातून गझलांना वाचविले. आपल्या दर्जेदार गझलांनी त्यांनी उर्दू साहित्यातील गझलांचा दर्जा उंचावला. त्यांचेच समकालीन ‘जिगर’ मुरादाबादी हे तर केवळ गझलाच लिहित होते. त्यांच्या गझलांत शृंगार तर आहेच, पण त्यासोबतच सूफी ढंगही आहे. जिगरचेच समकालीन  फिराक गोरखपुरी (१८९६–  ) हे कवी व टीकाकार होत. त्यांनी कटाक्षाने हिंदी व उर्दूमिश्रित कविता लिहिण्याचा प्रयत्‍न केला. भारतीय ज्ञानपीठाने त्यांना १९६९ चे साहित्याचे एक लाख रूपयांचे पारितोषिक देऊन (गुल-ए-नग्मा ह्या काव्यग्रंथास) त्यांचा गौरव केला, आजही ते दर्जेदार साहित्यनिर्मिती करीत आहेत. अख्त शीरांनी (१९०५–१९४२) हे ह्या काळातील फार महत्त्वाचे कवी होत. १९३६ मध्ये ते विशेष प्रसिद्धीस आले. त्यांनी आपली शृंगारिक कविता एका असामान्य अशा नवीन शैलीत लिहिली. सिंदर अली ‘वज्द’ (लहू तरंग, आखताबे -ताजा व औराके – मुसव्वर) व नून मीम ‘राशिद’ (मावरा व ईरान मे अजनबी) हे आधुनिक काळातील विशेष महत्त्वाचे कवी होत. राशिद हे मुक्तच्छंदाचे एक प्रवर्तक मानले जातात. १९३५ च्या सुमाराचे उर्दू काव्य सखोल, विशाल व दर्जेदार आहे. ह्या ६०–७० वर्षांत उर्दू साहित्याचा जो विकास झाला, तो त्यापूर्वीच्या २०० वर्षांतही होऊ शकला नाही. उर्दू साहित्यात पूर्वी फक्त गझल, मस्‍नवी, कसीदा आणि थोडीफार चरित्रपर काव्ये लिहिली जात. आता त्यात नज्मे (विषयनिष्ठ उर्दू काव्यप्रकार), कथा, कादंबऱ्या, चरित्रे, इतिहास, टीका इ. नवे वाङ्‍मयप्रकार आले आणि ते विशेष समृद्ध बनले. तसेच त्यात विशालता व खोलीही आली. हे साहित्यभांडार समृद्ध करण्यात हाली, शिब्‍ली, इकबाल, प्रेमचंद प्रभृतींचा वाटा फार मोठा आहे.

‘तरक्की पसंद’ (पुरोगामी) नावाची एक साहित्यिक चळवळ १९३५ मध्ये सुरू झाली. पॅरिस येथे भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय संमेलनातून तिचा जन्म झाला आणि थोड्याच अवधीत ती सर्व हिंदुस्थानभर फैलावली. या चळवळीचा परिणाम प्रामुख्याने तरूण वर्गावर आणि उदयोन्मुख साहित्यिकांवर झाला. ह्या चळवळीचा उद्देश समाजातील सर्व जुन्या रूढी व चालीरीती मोडण्याचा होता. सरदार जाफरींच्याच शब्दांत ह्या चळवळीवाल्यांचा उद्देश सांगावयाचा झाला, तर ते ‘किसी खुबसूरत मंझिल तक पहुंचनेके लिए किसी हसीन रास्ते की तलाश मे थे’, असा सांगता येईल. तरक्की पसंदचे घोषवाक्य होते ‘अदब बराए जिंदगी’, म्हणजे जीवनासाठी साहित्य किंवा जीवनासाठी कला. साहजिकच त्यांचे साहित्य व काव्य हे वास्तव जीवनाचे भाष्य म्हणून निर्माण झाले. त्यांनी आपल्या कथा, कादंबऱ्या व काव्य यांद्वारा शेतकरी, मजूर आणि गोरगरिबांच्या दारुण स्थितीचे वास्तव चित्रण केले तसेच स्त्रियांवर होणाऱ्या सामाजिक अन्यायासही त्यांनी आपल्या साहित्यातून वाचा फोडली. याव्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या चळवळीस पोषक असलेल्या रशियन, इंग्रजी व फ्रेंच ग्रंथांचे उर्दू अनुवादही केले.


तरक्की पसंद ह्या चळवळीतील उल्लेखनीय लेखक व कवी म्हणजे किशनचंदर (कृष्णचंद्र), असरारूल् हक ‘मजाज’, जान निसार ‘अख्तर’, फैज अहमद ‘फैज’,  उपेंद्रनाथ अश्क, ‘जजबी’, सादत हसन मंटो, सज्‍जाद ‘जहीर’, अली ‘सरदार’ जाफरी, अख्तर हुसेन रायपुरी, इस्मत चुगताई, ख्वाजा अहमद अब्बास (कथाकार), अहमद नदीम कासिमी (कथाकार), राजेंदरसिंग बेदी इ. होत. यांच्या कथा आणि मुक्त कविता नियतकालिकांतून आणि ग्रंथरूपाने प्रसिद्ध होऊ लागल्या. तीनचार वर्षाच्या कालावधीतच त्यांचे अनेक नवीन संग्रह प्रसिद्ध झाले. त्यांतील उल्लेखनीय संग्रह म्हणजे फैजच्या कवितांचा नक्शेफर्यादी  हा संग्रह आणि राजेंदरसिंग बेदींच्या कथांचा दाना-ओदाम हा संग्रह हे होत. तसेच सज्‍जाद जहीर, रशीद जहॉं, अहमद अली आणि महमूदुज-जफर यांनी आपल्या नव्या कथांचा अंगारे (१९३३ ) हा संग्रह लखनौ येथून प्रसिद्ध केला. त्यामुळे उर्दू साहित्यात फार मोठी खळबळ उडाली. अंगारेवर बंदीही घातली गेली. १९४१-४२ मध्ये अनेक लेखक तरक्की पसंद चळवळीच्या ध्येयाने प्रेरित होऊन साहित्यनिर्मिती करू लागले आणि त्यामुळे अल्पावधीतच ह्या चळवळीचे लोण सर्वत्र पसरले. यूरोपातील साहित्याचे अनुकरण करून ह्या चळवळीतील काही लेखकांनी काम व कामिनी ह्या विषयांवरच प्रामुख्याने लिहिण्याचा सपाटा लावला. त्यांतील काहींनी तर अतिशय अश्लील, घाणेरड्या आणि सनसनाटी कथा लिहिल्या. तसेच काव्यक्षेत्रातही मुक्तच्छंदात्मक आणि निर्यमक कविता निर्माण होऊ लागली. परंतु थोड्याच अवधीत लोक अशा स्वरूपाच्या निर्मितीस कंटाळले.

हिंदुस्थान १९४७ मध्ये स्वतंत्र झाला आणि याच सुमारास देशात सर्वत्र जातीय दंगलींचा डोंब उसळला. ह्या घटनेचे पडसाद साहित्यातूनही उमटल्यावाचून राहिले नाहीत. ‘पेशावर एक्सप्रेस’ ही किशनचंदर ह्यांची ह्या घटनेवरील कथा सर्वोत्कृष्ट मानावी लागेल. देशाची फाळणी झाल्यामुळे साहजिकच साहित्यिकही पाकिस्तान व भारत यांत विभागले गेले. तसेच उर्दू भाषा-साहित्याचीही दोन राष्ट्रांत विभागणी झाली. फैजी,

सुलताना (उर्दू) सुर्वे, भा. ग. (म. )

स्वातंत्र्योत्तर काळातील उर्दू साहित्य : ह्या काळातील उर्दू साहित्य झपाट्याने विकसित झालेले दिसते. त्यात नवीन विचारप्रणाली, नवनवे प्रयोग तंत्रांचा वापर प्रकर्षाने केला गेला. अत्यंत विपुल प्रमाणावर ही साहित्यनिर्मिती होत आहे आणि साहित्यिकांची संख्याही मोठी आहे. दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्षाप्रत्यक्ष झळ जगातील सर्वच देशांना पोहोचली. युद्धाचे भयानक परिणाम आणि त्यांतून आलेले वैफल्य विश्वव्यापी ठरले. हिंदुस्थानच्या फाळणीमुळे अनेकांची जीवने व संसार उद्ध्वस्त होऊन त्यांना निर्वासित बनावे लागले. मार्क्सवादी विचारसरणी व फ्रॉइडची मनोविश्लेषणवादी विचारसरणी या काळातील साहित्यातून प्रभावी होत असलेल्या दिसतात. ह्या पार्श्वभूमीवरच ह्या काळातील उर्दू साहित्याकडे पाहणे उचित ठरेल.

काव्य : ह्या काळातील उर्दू काव्यात रचनेबाबतचे नवेनवे प्रयोग, मुक्तच्छंदाचा व प्रतिमांचा वापर, प्रतीकवाद, मृषावाद (अँब्सर्डिजम ) इत्यादींचा प्रभाव पडलेला आहे. कवी आपली पृथगात्मकता सिद्ध करण्याचा प्रयत्‍न करताना दिसतात. पाश्चात्त्य साहित्यातील नव्या प्रेरणांचा व संप्रदायांचा इतर भारतीय भाषांतील काव्याप्रमाणेच उर्दू काव्यावरही विशेष प्रभाव आहे. काव्याचा आशय आणि तो अभिव्यक्त करण्याची पद्धती या दोहोंतही नवता आल्याचे दिसते. नवकाव्याचे उर्दू साहित्यात काय स्थान राहील, हे आजच सांगणे कठीण आहे. उर्दू नवकवींची संख्या फार मोठी आहे तथापि त्यांतील काहींनाच मान्यता व प्रतिष्ठा लाभली आहे.

भारतातील उर्दू नवकवीत पुढील कवी व त्यांचे काव्यसंग्रह उल्लेखनीय होत : खलीलुर्रहमान आजमी यांचा नया अहदनामा  हा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून त्यातील रचना मात्र पारंपारिक स्वरूपाचीच आहे. बाकर मेहदी हे कवी व समीक्षक असून ते कवीच्या पृथगात्मक व्यक्तिमत्त्वाचे पुरस्कर्ते आहेत. शहरे आरजू  आणि काले कागज की नज्मे हे त्यांचे काव्यसंग्रह उल्लेखनीय होत. वहीद अख्तर हे अलीगढ विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून मोजक्या शब्दांत आपल्या अनुभूती व्यक्त करण्यात ते निष्णात आहेत. पत्थरों का मुगन्नी (१९६७) हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. बलराज कोमल हे १९५० पूर्वीच प्रसिद्धीस आलेले कवी होत. गेल्या दशकात ते नवकाव्य लिहू लागले. मेरी नज्मे आणि दिल का रिश्ता  हे त्यांचे संग्रह दर्जेदार असून नारियल के पेड हा त्यांचा तिसरा संग्रह नागरी लिपीत छापला आहे. त्यांनी नवीन धर्तीच्या काही कथाही लिहिल्या आहेत. ‘राही’ मासूम रजा ह्यांनी काव्यलेखनास सुरुवात केल्यावर अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी लाभली. रक्से -मय, अठरासो सप्तावन आणि अजनबी शहर अजनबी रास्ते हे त्यांचे तीन संग्रह असून त्यांतील अठरासो सत्तावन हे एक दीर्घकाव्य आहे आणि ते त्यांनी महाकाव्याच्या धर्तीवर लिहिले आहे. अमीक हनफी हे पारंपारिक काव्यातून नवकाव्याकडे वळले. त्यांचे संगपैराहन आणि सिंदबाद हे दोन संग्रह प्रसिद्ध झाले. अलीगढ विद्यापीठातील फार्सीचे प्राध्यापक मुनीबुर्रहमान यांचा द्दष्टिकोन पुरोगामी असून त्यांनी मोजके काव्यलेखन केले असले, तरी ते दर्जेदार आहे. बाजदीर हा त्यांचा एकच संग्रह होय. हैदराबादचे (आंध्रप्रदेश) शाज तमकनत यांनी अल्पावधीतच उर्दू काव्यात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून घेतले. त्यांचा तराशीदा हा एकमेव संग्रह प्रसिद्ध आहे. मजहर इमाम हे बिहारमधील लोकप्रिय कवी असून जख्मेतमन्ना हा त्यांचा संग्रह आहे. शहाब जाफरी हे दिल्लीचे रहिवासी असून श्रेष्ठ उर्दू कवींत त्यांची गणना केली जाते. त्यांची कविता विचारप्रधान असून सूरज का शहर यात ती संगृहीत आहे. इस्मे -आजम हा शहरयार यांचा संग्रह असून त्यात आशयाचे नावीन्य आणि अभिव्यक्तीचे सौंदर्य आढळते. कुमार पाशी हे आपल्या शैलीच्या नावीन्यासाठी व प्रतिमांच्या वेगळेपणासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.


पाकिस्तानमध्येही नवकाव्याचा चांगला विकास झाल्याचे दिसते. तेथील ख्यातनाम कवी पुढीलप्रमाणे होत : वजीर आगा हे पाकिस्तानातील आद्य नवकवी असून त्यांनी नवकाव्याची वैचारिक बैठक आणि त्याचे वेगळेपण सिद्ध करण्याचेही कार्य केले आहे. त्यांच्या विचार सरणीवर मनोविश्लेषणवादी विचारांचा, विशेषत: युंगच्या विचारांचा, प्रभाव आहे. त्यांचा शाम और साये हा एकमेव काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला असला, तरी त्यांचे अनेक गद्यग्रंथ प्रसिद्ध आहेत. अहमद फराज यांचा दर्द आशोब मुस्तफा जैदी (‘तेग’ इलाहाबादी) यांचे रौशनी, गरेबाँ आणि कबाएसाज जहूर नजर यांचा रेजा – रेजा ‘अर्श’ सिद्दीकी यांचा दीदाए याकूब नासिर शहजाद यांचा चाँदनी की पत्तियाँ ‘साकी’ फारूकी यांचा प्यास का सहरा जफर इक्‌बाल यांचा आबे खाँ शहजाद अहमद यांचा सदफ फहमीदा रियाज यांचा पत्थर की जबान अंजुम आजमी यांचा लबो-रुखसार इब्‍ने-इन्शा यांचा चाँद नगर मुनीर नयाजी यांचा जंगलमें धनुक इ. काव्यसंग्रह विशेष उल्लेखनीय आहेत. या कवींव्यतिरिक्त भारतातील मंजरसलीम, महमूद अयाज, अजीज तमन्नाई, राजनारायण राज, मुहंमद अलवी हे कवी आणि पाकिस्तानातील अदा जाफरी, महबूब खिजाँ, फैज अहमद ‘फैज’, हाफीज जालंधरी, अख्तर शिरानी, जमील मलिक, बाकी सिद्दीकी, अब्दुल अजीजी ‘खालिक’, जमीलउद्दीन ‘आली’, मुशाफिक ख्वाजा, झेबुन्निसा हमीदुल्ला इ. कविकवयित्री उल्लेखनीय होत. भारतात तसेच पाकिस्तानमध्येही गझलरचना बहुतेक कवींनी स्वीकारल्याचे दिसून येते. नवा आशय पेलण्यास गझलरचना अत्यंत अनुकूल असावी.

कथा-कादंबरी : आधीच्या कालखंडातील काही कथा-कादंबरीकारांचे लेखन याही काळात चालूच आहे. तथापि नवतेच्या प्रभावाने प्रेरित होऊन नव्या शैलीच्या कथाकादंबऱ्या उर्दूत अलीकडे लिहिल्या जात आहेत. नव्या कथा – कादंबरीकारांत पुढील लेखकांचा अंतर्भाव होतो : कर्रतुलऐन-हैदर यांनी स्वातंत्र्योत्तर काळात मेरे मी सनमखाने  ही कादंबरी लिहिली. तीत त्यांचा आधीचा दृष्टिकोन सर्वस्वी बदललेला दिसतो. त्यांच्या नव्या साहित्यकृतींतून पाश्चात्त्य साहित्य आणि भारतीय कला व संस्कृती यांची सखोल जाण दिसते. रचनाकौशल्यावर व भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व आहे. त्यांना अतिशय लोकप्रियताही लाभली. त्यांनी आपल्या लेखनातून भारतीय जीवनमूल्यांचा शोध घेण्याचा, लक्षणीय प्रयत्‍न केला आहे. सितारो से आगे, शीशे के घर आणि पतझड की आवाज  हे त्यांचे कथासंग्रह आणि सफीनए-गमे -दिल, आग का दर्या, चाय का बाग, सीताहरण आणि आखरे -शब के हमसफर ह्या त्यांच्या इतर कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. रामलाल हे १९४७ च्या आधीपासून लेखन करू लागले होते परंतु १९५५ नंतरच्या त्यांच्या लेखनास विशेष प्रसिद्धी लाभली. रचनेच्या सफाईबाबत ते विशेष जागरूक असून त्यांनी जीवनातील विविध स्तरांवरच्या आपल्या अनुभूती प्रभावीपणे चित्रित केल्या आहेत. त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह गली -गली, आवाज पहचानो तो, चिरागों का सफर आणि कल की बाते हे होत. अनवर अजीम हे लोकप्रिय कथाकार असून साध्यासुध्या घटनांतून दर्जेदार साहित्यकृती निर्माण करतात. त्यांची धुआँ-धुआँ संवरा ही कादंबरी उल्लेखनीय आहे. कथाकार म्हणून जोगेंद्रपाल यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. धरती का काल हा कथासंग्रह आणि एक बूँद लहू की व कछुआ  ह्या त्यांच्या कादंबऱ्या परिणामकारक आहेत. जीलानी बानू ह्यांनी सुधारणावादी विचारांची प्रभावित होऊन कथाकादंबरीलेखन केले आणि ते लोकप्रिय झाले. त्यांचा रौशनी के मिनार हा कथासंग्रह आणि जुगनू और सितारें हा कादंबरिकांचा संग्रह प्रसिद्ध आहे. आमीना अबुलहसन ह्यांनी हैदराबादच्या जीवनावर कथा लिहिल्या असून त्या त्यांच्या कहानी नावाच्या संग्रहात प्रसिद्ध झाल्या आहेत. वाजिदा तबस्सुम ह्यादेखील हैदराबादच्याच कथालेखिका असून त्यांचा शहरे – ममनूअ  हा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. गयास गद्दी हे बिहारमधील कथाकार असून त्यांच्या कथांत समाजजीवनाचे उत्कृष्ट प्रतिबिंब आढळते. बाबा लोग  हा त्यांचा संग्रह. काजी अब्दुस्‌सत्तार यांच्या कथा – कादंबऱ्यात ग्रामीण जीवनाचे दर्शन घडते. शबगुजीदा, मज्‍जू भैय्या, दारा शिकोह  ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. इक्‌बाल मतीन यांचा उजली परछाइयाँ  हा कथासंग्रह उल्लेखनीय आहे.

पाकिस्तानात उर्दू ही राष्ट्रभाषा आहे. शिवाय उर्दू वृत्तपत्रे व नियतकालिकेही तेथे पुष्कळ आहेत. त्यामुळे उर्दू ललित साहित्याच्या निर्मितीस तेथे अधिक चालना मिळाली. हाजिरा मसरुर आणि खदीजा मस्तूर या दोघी बहिणींनी कादंबऱ्या, कथा व नाटके लिहिलेली असून त्यांचे हे साहित्य अत्यंत लोकप्रिय आहे. सध्या मात्र त्यांचे लेखन मंदावले असून त्यांची जागा रजिया फुसीह अहमद आणि जमीला हाशीमी ह्या लेखिका घेत आहेत. रजिया यांची अवलापा आणि जमीला यांच्या तलाशे -बहाराँआतशे-रफ्ता ह्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या असून त्यांची वाङ्‍मयीन गुणवत्ता मोठी आहे. ए-हमीद यांचे अनेक कथासंग्रह व कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हमीद कश्मीरी यांचा दिवारे  हा कथासंग्रह, कासिम महमूद  यांचा कासिम की मेंहदी, सादिक हुसेन यांचा फुलोंका महल, अब्दुल्लाह हुसेन यांचा उदास नस्ले हे कथासंग्रह उल्लेखनीय होत. शौकत सिद्दीकी यांची खुदा की बस्तीही उल्लेखनीय कादंबरी. यांशिवाय भारतातील व पाकिस्तानातील कथाकादंबऱ्यात सालेहा आबिद हुसेन यांच्या कतरे से गोहर होने तक, राहे अमल आणि यादों के चिराग, अख्तर ओरेन्वींची हसरते तामीर  ह्या कादंबऱ्यांचा तसेच हंसराज रहबर यांच्या वह लोग आणि कौसर चाँदपुरी यांच्या शोलाएसंग ह्या कथासंग्रहांचा उल्लेख आवर्जून करावयास हवा.

नाटक, एकांकिका व विनोद : नव्या उर्दू नाटककारांनी व एकांकिका लेखकांनी लेखनविषयक तसेच रंगभूमीबाबतही विविध प्रयोग केले व नवनवीन तंत्रेही हाताळली. ह्या लेखकांत मुहंमद हसन (पैसा और परछाई आणि मेरे स्टेज ड्रामें ), असगर बट, जावेद इक्‌बाल, अनवर इनायत उल्लाह, रेवतीसरन शर्मा यांचा आवर्जून उल्लेख करावयास हवा. उर्दूतील विनोदी साहित्याची परंपरा पूर्वीपासूनच समृद्ध असून ह्या काळातही गद्यात्मक तसेच पद्यात्मक विनोदी साहित्य विपुल प्रमाणावर निर्माण झाले असून ते दर्जेदारही आहे. विनोदी गद्यलेखकांत ए. एस्‌. बुखारी ‘पतरस’, सज्‍जाद हैदर, फुरकत काकोरवी, मुश्ताक युसुफी, अहमद जमाल पाशा, शौकात थानवी, कन्हैयालाल कपूर, युसूफ नाजिय, मुजतबा हुसेन, भारतचंद खन्ना, शफीकुर्रहमान इ. लेखक, तर विनोदी पद्यलेखकांत जमीर जाफरी, मुहंमद जाफरी, रजा नक्की वाही, दिलावर फिगार, साबमियाँ हे लेखक विशेष लोकप्रिय व महत्त्वाचे होत.

साहित्यसमीक्षा व वैचारिक लेखन : ह्या काळातील उर्दू साहित्यसमीक्षा इतर भारतीय भाषांतील साहित्यसमीक्षेप्रमाणेच पश्चिमी विचारांनी प्रभावित झालेली आहे. त्याचप्रमाणे स्वत:च्या अशा भारतीय परंपरांचाही तीत शोध घेण्याचा प्रयत्‍न दिसतो. सखोल संशोधनाकडेही अभ्यासकांचे लक्ष वेधल्याचे दिसते. उर्दू समीक्षा-साहित्यात डॉ. खलीलुर्रहमान आजमी आणि बाकर मेहदी यांचे लेखन महत्त्वपूर्ण आहे. खलीलुर्रहमान यांचे फिक्राे -फन, जाविए -निगाह, मुकद्दमए-कलामेआतश आणि नवाए- जफर हे ग्रंथ महत्त्वपूर्ण मानले जातात. बाकर मेहदी यांचा आगाही -बेबाकी  हा समीक्षापर निबंधसंग्रह महत्त्वाचा होय. उस्‌लूब अहमद अन्सारी यांचे समीक्षापर लेख तनकीदो -तखलीक  यात संग्रहीत केले आहेत. दिल्ली विद्यापीठातील डॉ. मुहंमद हसन हे उत्तम नाटककार व साहित्यसमीक्षक आहेत. अरबी तनकीद, उर्दू में रोमानी तहरीक, मुतालए -सौदा, शेरे -नौ, जलाल लखनवी आणि देहली में उर्दू शायरी का फिकरी और तहजीबी पसमंजर  हे त्यांचे समीक्षापर ग्रंथ महत्त्वाचे आहेत. डॉ. ग्यानचंद जैन हे जम्मूकाश्मीर विद्यापीठात उर्दूचे विभागप्रमुख असून एक चोखंदळ समीक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे. उर्दू की नसरी दास्ताने, तहरीरे आणि उर्दू -मस्‍नवी : शुमाली हिंद में हे त्यांचे समीक्षाग्रंथ प्रसिद्ध आहेत. डॉ. शकीलुर्रहमान यांच्या समीक्षेवर मनोविश्लेषणाचा प्रभाव असून त्यांचे जबान और कल्चर आणि अरबी कदरे और नफसियात  हे ग्रंथ महत्त्वपूर्ण होत. उर्दू तनकीद की तारीख, हर्फे -गजल, मरासी स्मीर  आणि उर्दू मर्सीए का इरतका हे डॉ. मसीहुज्‍जामाँ यांचे समीक्षाग्रंथ उत्कृष्ट आहेत. डॉ. मुहंमद अकील यांचे नयी फिकरे आणि उर्दू मस्‍नवी का इरतका (शुमाली हिंद में ) हे ग्रंथ उल्लेखनीय होत.दिल्ली विद्यापीठातील डॉ. करम रईस, डॉ. खलीक अंजुम आणि डॉ. गोपीचंद नारंग यांचे संशोधनपूर्ण ग्रंथ महत्त्वाचे मानले जातात. सय्यद शबीहुल हसन यांनी थोडेच लेखन केले असले, तरी ते त्यांतील विचारांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तनकीदे -तहलील यात त्यांचे लेख संगृहीत आहेत. देवेंद्र इस्सर हेही चांगले समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत.


पाकिस्तानातील समीक्षकांत डॉ. वजीर आगा यांचे स्थान महत्त्वपूर्ण असून त्यांचे मसर्रत की तलाश, खयाल पारे आणि चोरी से यारी तक हे समीक्षापर निबंधसंग्रह आणि उर्दू शाएरी में तंजोमिजाह, नज्‍मे जदीद की करवटें, उर्दू शायरी का मिजाज आणि तनकीदो एहतेसाब  हे समीक्षाग्रंथ महत्त्वपूर्ण होत. जमील जालबी, मुजफ्फर अली सय्यद, फतह मुहंमद, मलिक, रियाज अहमद, सलीम अहमद इ. समीक्षकही उल्लेखनीय आहेत. कराची येथील उर्दू विकास मंडळाने ऑक्सफर्ड इंग्‍लिश डिक्शनरीच्या धर्तीवर एक बृहत उर्दू शब्दकोश रचनेचे कार्य हाती घेतले आहे. तसेच लाहोर येथील केंद्रीय उर्दू मंडळाने आधुनिक विज्ञानावरील शालेय व महाविद्यालयीन पाठ्यपुस्तके उर्दूत तयार करण्याची योजनाही कार्यान्वित केली आहे. ‘अंजुमन-ई-तरक्की-ई-उर्दू’ ही संस्था उर्दूतील विस्तृत ग्रंथसूची तयार करण्याचे काम करीत असून आतापर्यंत तिने धर्म व इतिहासावरील दोन खंड प्रसिद्ध केले आहेत.

सुर्वे, भा. ग.

साहित्यसंस्था व नियतकालिके : उर्दू साहित्याच्या विकासास भारतातील काही संस्थांनी व नियतकालिकांनी विशेष हातभार लावला. ‘अंजुमन-ई-तरक्की-ई-उर्दू’ ही संस्था मौलवी अब्दूल हक यांच्या प्रयत्‍नाने १९२० मध्ये स्थापन झाली. ती आरंभी औरंगाबाद येथून कार्य करीत होती. नंतर ती हैदराबाद व दिल्ली येथे गेली. स्वातंत्र्यानंतर अलीगढ येथून तिचे कार्य सुरू आहे. या संस्थेने आतापर्यंत सु. तीनशे दुर्मिळ ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. या संस्थेतर्फेच उर्दू हे संशोधनपर त्रैमासिकही १९२० पासून १९४६ पर्यत प्रकाशित होत होते. स्वातंत्र्यानंतर ते उर्दू अदब नावाने निघते. मूळचे उर्दू नावाने त्रैमासिक पाकिस्तानात कराचीहून निघते. हैदराबादेस ‘इदार-ई अदीबयात-ई-उर्दू’ ही संस्था १९३१ मध्ये स्थापन झाली. तिने आतापर्यंत तीनशेवर चांगली पुस्तके प्रकाशित केली. या संस्थेने सबरस नावाचे मासिक १९३७ पासून चालविले आहे. ‘दारूल-मुसनफ्फीन’ ही संस्था दिल्ली येथून इस्लामी संस्कृतीच्या संशोधनाचे कार्य करतात. पहिल्या संस्थेतर्फे मआरिफ  व दुसऱ्या संस्थेतर्फे बुर्हान ही उर्दू मासिके अनुक्रमे १९४१ व १९४५ पासून निघत आहेत. भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे आजकल  हे मासिक दिल्लीहुन १९४२ पासून निघत आहे. मुंबईच्या अंजुमन-ई-इस्लाम उर्दू रिसर्च संस्थेच्या वतीने १९५० पासून नवाअदब  हे संशोधनपर उर्दू त्रैमासिक चालू आहे. मुंबईतूनच शाइर हे मासिक गेल्या त्रेचाळीस वर्षापासून चालू आहे. राष्ट्रीय वृत्तीच्या मुस्लिमांनी ‘जामिअ-ई मिल्लिया इस्लामिया’ या नावाने १९२० मध्ये स्थापन केलेल्या संस्थेचे जामिआ  हे मासिक गेली तीस-पस्तीस वर्षे निघत आहे.

पाकिस्तानात कराचीहून ‘अंजुमन-ई-तरक्की-ई-उर्दू’ ही संस्था १९४८ पासून काम करीत आहे. या संस्थेने भारतातील पूर्वीच्या उर्दू ह्या त्रैमासिकाच्या नावाने व क्रमांकाने १९५० पासून ते त्रैमासिक चालविलेले आहे. ‘मजलिस-ई-तरक्की-ई-अदब’ ही संस्था लाहोर येथे १९५० मध्ये स्थापन झाली. तिचे सहीफा  हे मुखपत्र १९५५ पासून निघत आहे. ‘तरक्की-ई-उर्दू बोर्ड’ ही पाकिस्तानची शासकीय संस्था १९५८ मध्ये स्थापन झाली. तेव्हापासून कराचीहून उर्दूनामा  हे तिचे त्रैमासिक चालू आहे.

उर्दू साहित्याचा केवळ स्थूल आढावा घेणाऱ्या ह्या लेखात केवळ ललित साहित्याचा व समीक्षापर साहित्याचा आढावा घेतला असला, तरी तात्त्विक, राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक इ. प्रकारचे ललितेतर उर्दू लेखनही निर्माण होत आले आहे. हे सर्व लेखन उर्दू साहित्याच्या विकासास उपकारक ठरले. अन्य यूरोपीय व भारतीय भाषांतील चांगल्या ग्रंथांचे अनुवादही उर्दूत आढळतात.

चौहान, देवीसिंग

संदर्भ : 1. Abdul Latif, S. The Influence of English Literature on Urdu Literature, London, 1924.

             2. Asiri, FazL Mahmud, Studies in Urdu Literature, Santiniketan, 1952.

            3. Asraf, S. M. Urdu Prose Under the Influence of Sir Syed Ahmad, Lahore, 1940.

            4. Hussain, Yusuf, Urdu Ghazal, Delhi, 1952.

            5. Qudir, Sir Abdul, Famous Urdu Poets and Writers, Lahore, 1947.

            6. Sadiq, Muhammad, A History of Urdu Literature. London, 1964.

           7. Saksena, Baburam, A History of Urdu Literature, Allahabad, 1927.

           ८. पगडी, सेतुमाधवराव, उर्दू काव्याचा परिचय, पुणे, १९६१.

          ९. व्रजरत्‍नदास, उर्दू साहित्य का इतिहास, बनारस, १९३४.

          १०. हुसैन, एहतेशाम, उर्दू साहित्य का आलोचनात्मक इतिहास, अलहाबाद, १९६९.