ॲडिसन, टॉमस : (? एप्रिल १७९३ – २९ जून १८६०). ब्रिटिश वैद्य. त्यांचा लाँग बेंटन येथे जन्म झाला. एडिंबरो विद्यापीठात वैद्यकाचे शिक्षण घेऊन १८१५ मध्ये पदवी मिळविल्यानंतर ते गायच्या रुग्णचिकित्सागृहात १८२० मध्ये गेले व १८३८ मध्ये त्यांनी एफ. आर. सी. पी. ही पदवी मिळविली.

निष्णात शिक्षक, रोगनिदान पंडित आणि उत्तम वैद्य म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. ⇨अधिवृक्क ग्रंथीच्या विकृतीमुळे होणारा रोग आणि मारक पांडुरोग (रक्तातील तांबड्या पेशींचे, हीमोग्‍लोबिनाचे किंवा दोहोंचे प्रमाण अथवा रक्ताचे एकूण घनफळ कमी झाल्यामुळे होणारा रोग) यांचे उत्तम वर्णन त्यांनी प्रथम केले. म्हणून त्या रोगांना अनुक्रमे ⇨ ॲडिसन रोग आणि ॲडिसन ⇨पांडुरोग अशी नावे दिलेली आहेत.

रिचर्ड ब्राइट यांच्या सहकार्याने त्यांनी एलेमेन्ट्स ऑफ द प्रॅक्टिस ऑफ मेडिसीन हा ग्रंथ लिहिला. ब्रायटन (ससेक्स) येथे ते मृत्यू पावले.

कानिटकर, बा. मो.