बोज्यू – ई : (७७२ – ८४६). चिनी कवी. सध्याच्या शान्‌सी-प्रांतातील श्यांग् चंग येथे जन्मला. बालपण दारिद्र्यात गेले. खडतर परिस्थिती, वडिलांचे निधन (७९४) आदी कारणांमुळे राजसेवेतील अधिकारपदांसाठी आवश्यक असलेल्या परीक्षा तो २८ वर्षे पूर्ण होईपर्यंत देऊ शकला नाही. ८०७ मध्ये तो राजसेवेत शिरला आणि त्याला अनेक अधिकारपदे मिळाली. ह्या राजसेवेत काही चढउतारही त्याच्या अनुभवास आले. राजसेवेच्या अखेरच्या टप्प्यात लोयांग येथे हुनानचा प्रमुख न्यायाधीश म्हणून त्याची नेमणूक झाली (८३१). तथापी ८३३ मध्ये प्रकृतीच्या अस्वास्थामुळे तो सेवानिवृत्त झाला. त्यानंतरचे आयुष्य त्याने लोयांग येथेच घालविले तेथेच त्याचे निधन झाले.

चिनी साहित्यात उपेक्षित राहिलेल्या ‘युए फु’ ह्या काव्यप्रकाराला विकसित करून पूर्णत्वाप्रत नेण्याचे श्रेय बो ज्यू-ईला दिले जाते. ‘साँग ऑफ इटर्नल रिग्रेट’ (८०६, इं. शी.) आणि ‘साँग ऑफ गिटार’ (८१६, इं. शी.) ही त्याने रचलेली दोन काव्ये त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. उद्‌बोधन हे साहित्याचे कार्य असून साहित्यकृतीस निश्चित असा सामाजिक हेतू असला पाहिजे, अशी त्याची भूमिका होती. समकालीन सामाजिक-राजकीय अपप्रवृत्तीवर बोट ठेवणाऱ्या त्याच्या अनेक कवितांतूनही ती प्रत्ययास येते. लोकगीतांचा प्रभाव असलेली साधी, सरळ अभिव्यक्ती हे त्याच्या कवितेचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. त्याच्या कवितेत येणाऱ्या साध्यासुध्या शब्दांनाच त्याने एक वेगळे, वाङ्‌मयीन चैतन्य प्राप्त करून दिले. साहजिकच त्याच्या कवितेस फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली आणि ती देशोदेशी पसरली. यू युआन् ज्यव् शू हा त्याचा काव्यटीकाग्रंथ प्रसिद्ध आहे.

यान जुंग (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)