हक्सली, सरज्युलियन सॉरेल : (२२ जून १८८७-१४ फेब्रुवारी १९७५). इंग्रज जीवशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ता, शिक्षणतज्ञ आणि लेखक. भ्रूणविज्ञान, वर्गीकरणविज्ञान आणि क्रमविकास व वर्तनाचे अध्ययन या विषयांच्या आधुनिक विकासावर त्यांच्या लेखनाचा खूपच प्रभाव पडला.

हक्सली यांचा जन्म लंडन येथे झाला. ते चरित्रकार लेनर्ड हक्सली यांचा मोठा मुलगा प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ ⇨ टॉमस हेन्री हक्सली यांचेनातू आणि कादंबरीकार ⇨ ऑल्डस लेनर्ड हक्सली यांचे भाऊ होते. ज्युलियन यांचे शिक्षण ऑक्सफर्ड येथील एटन अँड बॅलिओल कॉलेजमध्ये झाले. त्यांनी हॉर्मोने, विकसनशील प्रक्रिया, पक्षिविज्ञान आणि आचारशास्त्र या विषयांवर महत्त्वाचे शास्त्रीय संशोधन केले. त्यांनी ब्रिटिश आर्मी इंटेलिजन्स कोअरमध्ये सेवा केली (१९१६ – १९). नंतर त्यांनी ह्यूस्टन (टेक्सस) येथील राइस विद्यापीठातील जीवविज्ञान विभाग विकसितकेला आणि त्याचे प्रमुख झाले. त्यानंतर ते लंडन विद्यापीठाच्या किंग्ज कॉलेजमध्ये प्राणिविज्ञानाचे प्राध्यापक झाले. ते झूलॉजिकल सोसायटीऑफ लंडन या संस्थेचे सात वर्षे सचिव होते. रीजंट्स पार्क येथेप्राणिसंग्रहालय हलविल्यानंतर त्यांनी ते विकसित केले आणि द रॉयल सोसायटीचे फेलो झाले. त्यांनी १९४० च्या दशकामध्ये वर्गीकरण-विज्ञान, आनुवंशिकी आणि डार्विन सिद्धांत एकीकरणाच्या संदर्भाकरिता इव्होल्यूशनरी सिंथेसिस (क्रमविकासी संश्लेषण) ही संज्ञा तयार केली.

हक्सली संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (यूनेस्को) या संस्थेचे पहिले महासंचालक होते (१९४६-४८). १९५८ मध्ये त्यांना सर (नाइट) हा किताब मिळाला. १९६१ मध्ये त्यांनी द वर्ल्डवाइल्ड लाइफ फंड फॉर नेचर ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला.

हक्सली अनेक ग्रंथांचे लेखक आणि सहलेखक होते. त्यांपैकी काही ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : द इंडिव्हिज्युअल इन द ॲनिमल किंग्डम (१९१२), एसेज ऑफ अ बायोलॉजिस्ट (१९२३), रिलिजन विदाउट रेव्हलेशन (१९२७), बर्ड वॉचिंग अँड बर्ड बिहेव्हिअर (१९३०), द कॅप्टिव्ह श्रू (कविता, १९३२), द एलमेंट्स ऑफ एक्सपेरिमेंटल एंब्रिऑलॉजी (१९३४), द बिगिनिंग्ज ऑफ लाइफ (१९३८), इव्होल्यूशन : द मॉडर्न सिंथेसिस (१९४२), ऑन लिव्हिंग इन अ रिव्होल्यूशन (१९४४), इव्होल्यूशन इन ॲक्शन (१९५३), द ह्यूमन क्राइसिस (१९६३), एसेज ऑफ अ ह्यूमनिस्ट (१९६४), मेमरिज (दोन खंड, १९७०-७३) इत्यादी.

मानवाच्या सामाजिक जीवनाचा व धर्माचा विज्ञानाशी संबंध जोडण्यात हक्सली आघाडीवर होते.

हक्सली यांचे लंडन येथे निधन झाले.

जमदाडे, ज. वि.