कीटा-क्यूशू : जपानच्या दक्षिणेकडील क्यूशू बेटाच्या उत्तर किनाऱ्यावरील फुकुओका विभागातील मोठे औद्योगिक केंद्र. लोकसंख्या १०,४२,३२१ (१९७०). याहाता, वाकामात्सू,  तोबाटा, कोकुरा आणि मोजी ही शहरे तसेच शिमोनोसेकी व त्सुशिमा या सामुद्रधुनीवरील किनारपट्ट्याचा यांचा ४५२ चौ.किमी. क्षेत्रफळाचा प्रदेश एकत्र करून, १९६३ मध्ये कीटा-क्यूशू शहराची स्थापना करण्यात आली. जपानमधील सहाव्या क्रमांकाचे हे शहर अवजड उद्योगधंद्यांसाठी प्रसिद्ध आहे. याहाता लोखंड, पोलाद, रसायन, सिमेंट, काच यांसाठी वाकामात्सू धातूकाम, यंत्रे, बोटी, रसायने यांसाठी तोबाटा कापड, मच्छीमारी यांसाठी कोकुरा लोखंड, पोलाद, दारूगोळा यांसाठी व मोजी आंतरराष्ट्रीय दळणवळणाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. जागा आणि उद्योगधंद्यांस लागणारे पाणी यांचा प्रश्न या नवीन शहरापुढे आहे. शिमोनोसेकी सामुद्रधुनीखालून लोहमार्गासाठी एक व मोटारींसाठी एक असे बोगदे काढले असून, ते कीटा-क्यूशू व उत्तरेच्या होन्शू बेटावरील शिमोनोसेकी या शहरांना जोडतात.

 

शाह, र. रू.

 

 

 

 

 

   “