मंटो-सादत्त हसन मंटो : (११ मे १९१२-१८ जानेवारी १९५५). प्रसिद्ध उर्दू लघुकथाकार. जन्म पूर्व पंजाबमधील समराल येथे. त्यांचे मॅट्रिकनंतरचे शिक्षण अमृतसर येथे झाले. मंटोंचा बराचसा उमेदीचा काळ अमृतसर आणि लाहोर येथे गेला. १९४० ते १९४३ या कालावधीत त्यांनी दिल्ली आकाशवाणी केंद्रात नभोनाट्य लिहिण्याचे काम केले. १९४३ मध्ये ते दिल्लीहून मुंबईला गेले आणि तेथे त्यांनी फिल्मिस्तान व बॉम्बे टॉकीजकरता संवाद व पटकथा लिहिल्या. भारताच्या विभाजनानंतर ते लाहोरला गेले. तेथे १९५३ मध्ये अतिमद्यपानामुळे त्यांना गंभीर आजार झाला व त्यातच त्यांचे निधन झाले.

आपल्या विद्यार्थिदशेत त्यांनी गॉर्की, चेकॉव्ह, पुश्किन, ऑस्कर वाइल्ड व मोपासां यांचे ग्रंथ आवडीने वाचले. बारी अलीग नावाच्या कम्युनिस्ट इतिहासकाराने त्यांच्यात व्हिक्टर ह्यूगोबद्दलही गोडी निर्माण केली. त्यांच्याच प्रेरणेने मंटोंना सर गुझस्ते असीर या शीर्षकाने ह्यूगोच्या एका ग्रंथाचा उर्दू अनुवाद केला (१९३३). त्यांनी ऑस्कर वाइल्डच्या वीरानामक ग्रंथाचादेखील उर्दूत अनुवाद केला आहे (१९३४). गॉर्कीच्या काही कथाही मंटोंनी अनुवादिल्या. या भाषांतरित वाङ्मयाखेरीज नर्गिस व बाबूराव पटेल यांच्यासारख्या कलाकरांच्या प्रभावी चरित्ररेखाही त्यांनी लिहिल्या. त्या गंजे फ्रिश्ते (१९५२) या नावाने प्रकाशित झाल्या आहेत. एकांकिकांचे लेखनही मंटोंनी केले परंतु प्रामुख्याने ते लघुकथाकारच होते. समाजाच्या जवळजवळ सर्व स्तरांचे, विशेषतः वेश्यांच्या जीवनाचे, त्यांच्या मनोविश्वाचे सूक्ष्म निरीक्षण करून वेश्यांची जिवंत शब्दचित्रे त्यांनी रेखाटली. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘हतक’ (अपमान) ही त्यांची कथा होय. यात सुगंधी नावाच्या मुंबईच्या एका साध्याभोळ्या वेश्येचे जीवनचित्र रेखाटले आहे. सुगंधीच्या स्त्रीमनाचे हळुवार दर्शन तीत त्यांनी घडवले आहे. माधव नावाचा एक हवालदार पुण्याहून तिच्याकडे येत असे. तिच्या वेश्याजीवनाबद्दल नापसंती व्यक्त करून तिने चांगले जीवन जगावे, असे तो तिला नेहमी म्हणत होता पण प्रत्यक्षात तो काहीही करीत नव्हता. भाबड्या सुगंधीला मात्र माधवची खोटी आश्वासनेदेखील क्षणभर खरी वाटत असत. या कथेत अखेरीस एक नाट्यात्मक प्रसंग लेखकाने उभा केला आहे. एका मध्यरात्री एक शेठ आल्याचे तिच्या दलालाने तिला सांगितले. सुगंधीने झोपेतून उठून सारा साजशृंगार केला आणि ती त्याला सामोरी गेली. त्या शेठने तिच्या तोंडावर विजेरीचा प्रकाशझोत फेकला आणि नापसंतीचा ’हू’ असा उदगार काढून तो निघून गेला. सुगंधी विलक्षण अपमानित झाली, कमालीची दुखावली गेली. आपल्या समग्र जीवनाबद्दलच तिला उबग आला. खरूज झालेल्या कुत्र्याला जवळ घेऊन तिने आपल्या अंथरूणावर अंग टाकले.

‘हतक’ प्रमाणेच ‘ब्लाऊझ’, ‘धुवाँ’, ‘थंडा गोश्त’, ‘पहचान’ इ. कथांमध्येही वेश्यांच्या मानसिक क्रिया-प्रतिक्रियांचे आणि त्यांच्या लैंगिक मनोविज्ञानाचे सूक्ष्म ज्ञान प्रतीत होते. लैंगिक गोष्टींमधील त्यांची रूची कधीकधी अत्यंत बीभत्स रूप धारण करते. त्यामुळेच त्यांच्या ‘धुवाँ’ सारख्या कथांबद्दल त्यांना कोर्टात खेचले गेले (१९४२). पण असे असूनदेखील त्यांच्या कथांच्या अस्सल कलात्मकतेबद्दल समीक्षकांचे दुमत नाही. जातीय दंग्यांच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या त्यांच्या कथांमध्येही एक निखळ कलाकार म्हणून त्यांचे दर्शन घडते. ‘खोल दो’ ही कथा या संदर्भात उल्लेखनीय होय. ‘बाबू गोपीनाथ’, ‘नया कानून’ आणि ‘हतक’ या त्यांच्या कथा उर्दू वाङ्मयात अमर ठरल्या आहेत. या कथांत व अन्यत्र मंटोंनी ‘सारखा’, ‘फुकट’ इ. मराठी शब्दांचा वापरही केला आहे. मंटोंच्या कथांतून नवनवीन वाक्प्रचार व अभिनव उपमांचा उपयोग केलेला आढळतो.

मंटोके मझामीन आणि मंटोके खुतूत हे अनुक्रमे त्यांच्या निबंधांचे व पत्रांचे संग्रह आहेत. त्यांची नभोनाट्ये कर्वट (१९४४) आणि मंटोके ड्रामे या शीर्षकांनी संग्रहीत करण्यात आली आहेत. मंटोके अफसाने या नावाने त्यांचे लघुकथांचे लिखाण सर्वप्रथम म्हणजे १९३८ मध्ये प्रसिद्ध झाले. यानंतर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कथासंग्रहांत खाली बोतले, खाली डिब्बे (१९५०), थंडा गोश्त (१९५०), यझीद (१९५१), धुवाँ, फुंदने, लझ्झते संग, बुर्के, सडक के किनारे आणि चुगद यांचा समावेश होतो.

सैय्यद, नईमुद्दीन