शिब्ली नोमानी

शिब्ली नोमानी : (१८५७ – १९१४). उर्दू साहित्यिक, टीकाकार व इतिहासकार. नाव मुहंमद. त्याचा जन्म उत्तर प्रदेशातील बगोल (आझमगढ) येथे झाला. त्याचे वडील एक नामांकित वकील होते. त्याचे सुरुवातीचे शिक्षण आझमगढ येथेच मुहंमद फारूक चिडियाकोटी यांच्याजवळ पारंपरिक मुसलमानी पद्धतीने झाले. नंतर त्याने रामपूर येथे जाऊन इस्लामी धर्मशास्त्राचा आणि लाहोर येथे अरबी व फार्सी वांङ्मयाचा अभ्यास केला. १८८० मध्ये तो वकिलीची परीक्षा पास झाला आणि आझमगढ येथे वकिली करू लागला. काही काळ वकिली केल्यावर त्याने व्यापारही करून पहिला पण शेवटी सर्व सोडून तो अलीगढ येथे आला. तेथे त्याची व सर सय्यद अहमद खान यांची भेट झाली. त्यांनी अलीगढ महाविद्यालयात अरबी व फार्सीचा प्राध्यापक म्हणून १८८२ मध्ये त्याला नियुक्त केले. या वेळेपर्यंत शिब्ली जुन्या वळणाचा कर्मठ मुसलमान होता. अलीगढला आल्यावर मात्र सर सय्यद आणि डॉ. आर्नल्ड यांच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर पडला आणि त्याचा कर्मठपणा नाहीसा होऊन तो उदारमतवादी, सुधारणावादी आणि पुरोगामी विचारांचा झाला. तेथे त्याने आपले लक्ष इतिहास आणि टीकाशास्त्राकडे केंद्रित केले. त्याच्या वांङ्मयीन जीवनाची सुरुवात काव्याने आणि विविध प्रकारच्या गद्यलेखनाने झाली असली, तरी शेवटी तो इतिहास आणि समीक्षेकडेच वळला. १८९२ मध्ये त्याने तुर्कस्तान, ईजिप्त आणि लेबानन (बेरूत) या देशांचा प्रवास केला. परत आल्यानंतर त्याने सफर नामए-मिस-ओ-रूम हा प्रवासवर्णनात्मक ग्रंथ लिहिला. १८९९ मध्ये त्याने अल फारूक हा ग्रंथ लिहिला. प्रस्तुत ग्रंथ त्याचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ समजला जातो.

त्याने १८९८ मध्ये अलीगढ सोडले. १९०० मध्ये तो कला व विज्ञानाचा संचालक म्हणून हैदराबाद येथे गेला. १९०४ मध्ये लखनौ येथील ‘नदवतुल उल्मा’ ह्या शाळेचा चिटणीस म्हणून त्याची नियुक्ती झाली. इस्लामी परंपरेच्या आणि धर्माच्या शिक्षणासोबत पाश्चात्त्य धर्तीचे शिक्षण आणि विज्ञानही शिकविले जावे म्हणून तेथे त्याने आटोकाट प्रयत्न केले परंतु त्यात त्याला यश आले नाही. दहा वर्षानंतर तो आझमगढला परतला आणि तेथेच कालवश झाला. अनुयायांनी व मित्रांनी त्याच्या स्मरणार्थ आझमगढ येथे ‘दारुल-मुसनफ्फी’ ह्या संशोधनसंस्थेची स्थापना केली आणि तेथे लेखन-संशोधनाचे काम सुरू केले. आजही हे कार्य व्यवस्थितपणे चालू आहे.

शिब्लीने अनेक ग्रंथ लिहिले. त्यांतील काही धार्मिक विषयांवर आहेत तर काही इस्लाम धर्मातील थोर व्यक्तींची चरित्रे आहेत. त्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि बृहद् स्वरूपाचा ग्रंथ म्हणजे शेअरुल-अज़म हा होय. यात त्याने फार्सी काव्याचा इतिहास पाच खंडांत दिला आहे. त्याने लिहावयास घेतलेला दुसरा असाच मोठा आणि महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे सीरतुन्नबी (सहा खंड) हा होय परंतु हा पूर्ण होण्यापूर्वीच तो कालवश झाला. त्याचे इतर ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : मुवाझन-ए-अनिस-ओ-डबीर (१९०७), हयत-इ-मौलाना-रुम (१९१८), अल्-मामुन (१८९२), अल्-गझाली (१९०२) इल्म-उल्-कलाम (१९०३) औरंगज़ेब अलमगीरपर एक नजर (१९११). दास्ता-इ-गुल (१९०८पर्शियन) व सुभी-उम्मीद (उर्दू) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत.

फैजी, सुलताना (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)