बेदी, राजिंदरसिंग : (१ सप्टेंबर १९१५ -). उच्च दर्जाचे उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथालेखक. जन्म लाहोर येथे. लाहोर येथून १९३३ मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यानी तेथील महाविद्यालयात प्रवेश घेतला परंतु आर्थिक अडचणीमुळे ते आपले उच्च शिक्षण पूर्ण करु शकले नाहीत. १९३०-४० च्या दरम्यान लाहोर येथील डाक-तार कार्यालयात त्यांनी लिपिक म्हणून नोकरी केली. नऊ वर्षांनतर ही नोकरी सोडून त्यांनी पुढे काही काळ दिल्ली आकाशवाणी केंद्रावर नोकरी केली. दुसऱ्या महायुध्दाच्या अखेरीस ‘माहेश्वरी फिल्म’लाहोर येथे ते नोकरीला होते. ही नोकरीही त्यांनी नंतर सोडली आणि ‘संगम पब्लिशर्स’नावाची स्वतःची प्रकाशन संस्था काढली.

 देशाच्या विभाजनानंतर ते लाहोरवरून दिल्लीला आले आणि तेथे पुन्हा आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. नंतर त्यांची जम्मू काश्मीर आकाशवाणी केंद्राचे संचालक म्हणून नेमणूक झाली पण काही महिन्यानंतर ही नोकरीही त्यांनी सोडून दिली. ते १९४८ मध्ये चित्रपट व्यवसायात मुंबई येथे आले व तेथेच स्थायिक झाले.

सुरुवातीस त्यांनी पंजाबीत लेखन केले पण नंतर ते उर्दूतून लिहू लागले. त्यांच्या पंजाबीतील कथांचे हड्डीआँ ते फुल्ल (१९४२) व घर विच बजार विच (१९४४) हे दोन संग्रह होत. आपल्या कथालेखनाची सुरुवात त्यांनी प्रख्यात रशियन लेखक चेकॉव्ह याच्या लेखनाने प्रभावित होऊन केली होती. चेकॉव्हशिवाय त्यांनी टॉलस्टॉय, ब्रेट हार्ट, डी.एच्‌.लॉरेन्स आणि मोपासा यांच्या साहित्याचेही वाचन केले.  

‘भोला’ ही कथा १९३६ मध्ये लिहून त्यांनी आपल्या उर्दू कथालेखनाची सुरुवात केली आणि दाना-व-दाम हा आपला पहिला कथासंग्रह १९३९ मध्ये प्रकाशित केला. या संग्रहामुळे त्यांना खूपच प्रसिध्दी मिळाली. या कथासंग्रहात अपार सहानुभूती आणि प्रखर वास्तवता यांचा प्रत्यय प्रकर्षाने येतो. बेदी हे आपल्या कथांतून जीवनातील दुःखमय पैलूचे दर्शन घडवत असतानाही त्यातील सुखमय पैलूंचेही विस्मरण त्यांना होत नाही, हे त्यांच्या कथेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या दृष्टीने त्यांचे गर्म कोट हे आत्मवृत्त विशेष लक्षणीय म्हणावे लागेल.

त्यांच्या कथा मानसशास्त्रीय दृष्टीनेही परिपूर्ण आहेत.‘लाजवंती’हे याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. जातीय दंगलीच्या वेळी लाजवंतीचे अपहरण होते पंरतु तिचा पती तिला परत आणतो. इतकेच नव्हे, तर तिचा गतकाल विसरून तो तिला अधिकाधिक जपतोही. असे असूनही त्यांच्या संबंधांत एक विचित्र असा मानसिक ताण कायमच राहतो. हा ताण लेखकाने मोठ्या कौशल्याने व कलात्मक ताकदीने चित्रित केला आहे.

त्यांच्या कथालेखनाचे आणखी काही विशेष म्हणजे त्यांच्या कथातील सुरुवातीच्या काही वाक्यातच ते सबंध कथेच्या आशयाचे सार सूचकतेने गोठवतात (उदा., ‘चीचक के दाग’ सर कथेतील प्रास्ताविक वाक्ये). तसेच आपल्या कथांची परिणामकारकता साधण्यासाठी ते भारतीय पुराणकथांचाही मोठ्या कौशल्याने कलात्मक वापर करतात (उदा.,’गिऱ्हान’).  अभिव्यक्तितंत्र आणि आशय यांचे एकसंघ कलात्मक रसायन त्यांच्या कथालेखनात आढळून येते.

कथांशिवाय बेदींनी काही नाटके व एकाकिंकाही लिहिल्या आहेत आणि त्याचे अनुक्रमे बेजान चीजे (१९४३) व सात खेल (१९४६) हे संग्रह प्रकाशित झाले आहेत. एक चादर मैली सी (१९६२) ही त्यांची लघुकांदबरी असून तिला १९६४ चा साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला. पंजाबमधील एका गावाच्या पार्श्वभूमीवर ती लिहिली असून तीत ‘राणू’ च्या वैवाहिक जीवनाचे उत्कृष्ठ चित्रण आहे.  खूशवंतसिंग यांनी तिचा इंग्रजीत (आय टेक धिस वूमन – १९६७) अनुवादही केला आहे. ‘मिथुन’या कथेतही अशाच प्रकारचे सुंदर शैलीत वर्णन आहे. कथेच्या कलात्मक आवश्यकतेनुसार निरनिराळ्या व नावीन्यपूर्ण अशा अभिव्यक्तिपद्धतीचा अवलंब करण्याच्या त्यांच्या क्षमतेचा हा पुरावा आहे. कीर्ती नावाची एक अविवाहित कलाकार तरुणी एका निर्ढावलेल्या वासनाधीन लोभी व्यापाऱ्याला आपली शिल्पे विकते यावेळी तिला जो अपमान आणि दुःख सहन करावे लागते, त्याचे चित्रण यात आले आहे या प्रसंगाचा या संदर्भात आवर्जून निर्देश करावा लागेल.

समकालीन जीवन आणि कुटुंब यांतील बदलणाऱ्या पद्धतीचा मार्मिक वेध घेणाऱ्या बेंदीनी ‘सिर्फ एक सिगरेट’ ह्या आणखी एका रमणीय कथेमध्ये पिढयांच्या तफावतीबाबत सुंदर चित्रण केले आहे. ‘एक बाप बिकाऊ है’ (१९७८) या कथेमध्ये बदलत्या स्त्रीपुरुषसंबंधावर त्यांनी चांगला प्रकाश टाकला आहे. या कथेतील प्रमुख पात्र गंधर्वदास याच्या उद्गारांत खोल असा मानवतावाद उत्कटत्वे अभिव्यक्त झाला आहे. तो म्हणतो, ‘माणसाला ओळखण्याचा प्रयत्न करु नका, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा.’

 दाना-ष-दाम (१९३९) , गिऱ्हान (१९४२) , कोख जली (१९४९) अपने दुख मुझे दे दो (१९६५) , हाथ हमारे कलम हुए (१९७४) हे त्यांचे उल्लेखनीय उर्दू कथासंग्रह होत.

मिर्झा गालिब (१९५४), देवदास (१९५६), मधुमती (१९५८), अनुराधा (१९६०) सत्यकाम (१९६९), मेरे सनम इ. गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या असून एक आघाडीचे पटकथा लेखक म्हणून त्यांनी मोठाच लौकिक संपादन केला. एक चादर मैली सी (१९७१), फागुन (१९७२) आणि आँखो देखी (१९७७) हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत. दस्तक(१९७२) ह्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांची कथा, पटकथा, दिग्दर्शन व निर्मितीही त्यांचीच असून ह्या चित्रपटास तीन राष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. १९७५ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 नईमुद्दीन, सैय्यद