चुगताई, इस्मतचुगताई, इस्मत : (२१ ऑगस्ट १९१५ —   ). प्रसिद्ध उर्दू लेखिका. शिक्षण अलीगढ व लखनौ येथे. बी. ए., बी. टी. झाल्यावर बरेली, जोधपूर येथे अध्यापन. त्यानंतर मुंबई येथे शाळा-निरीक्षका व शाळा-अधीक्षिका. १९४२ साली शाहीद लतीफ यांच्याशी विवाह.

त्यांच्या घरचे एकूण वातावरणच वाङ्‌मयीन होते. भाऊ अझीम बेग हा एक प्रसिद्ध विनोदी लेखक होता. इस्मत चुगताईंनी उर्दू तसेच इंग्रजी व रशियन साहित्याचे विपुल वाचन केले. बर्नार्ड शॉच्या लेखनाने प्रभावित होऊन त्यांनी फसादी हे आपले पहिले नाटक लिहिले. 

आपल्या सुरुवातीच्या कथा अश्लील वाटल्यामुळे त्यांनी स्वतःच फाडून टाकल्या परंतु नंतरच्या कथांपैकी काही त्यांतील धिटाई आणि वाङ्‌मयीन गुण यांमुळे लोकप्रिय झाल्या. त्यांच्या ‘लिहाफ’ नामक कथेवर लाहोरच्या न्यायालयात अश्लीलतेचा खटला भरण्यात आला होता.

‘लिहाफ’ या कथेतल्याप्रमाणे आपल्या लेखनात त्या लैंगिक प्रसंगांचे व अनैतिक संबंधांचे निर्भीडपणे चित्रण करतात. मध्यमवर्गीय मुस्लिम युवतींच्या मानसिक अवस्थेचे त्यांचे निरीक्षण सूक्ष्म आणि सखोल आहे. प्रेम आणि वासना यांच्याबद्दलच्या रूढ कल्पनांचा त्या उपहास करतात. ‘बहुबेटिया’ मध्ये आपल्या विवाहपद्धतीचा उपहास करून वैवाहिक संबंधातील विसंवादाची सूचक मीमांसा त्यांनी केलेली आहे.

सौंदर्य, स्त्री-पुरुषसंबंध, सामाजिक रूढी आणि संकेत यांसंबंधीच्याआजच्या विचारपद्धतीत इस्मत चुगताईंना क्रांतिकारक बदल करावयाचा आहे. पुरुषसत्ताक समाजातील स्त्रीजीवनाची शोकात्म बाजूच आपल्या कथाकादंबऱ्या लिहिण्यास त्यांना प्रेरक ठरली. भाषेवरील त्यांचे प्रभुत्व आणि व्याजोक्तिपूर्ण सूर यांमुळे त्यांच्या कथाकादंबऱ्यांना आगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.

टेढी लकीर (१९४४), जिद्दी (१९५०), मासूमा, दिल की दुनिया या कादंबऱ्या शैतान  हा एकांकिका-संग्रह आणि चोटें (१९४३), कलियाँ (१९४५) व दो हाथ  हे कथासंग्रह ही त्यांची काही प्रमुख ग्रंथनिर्मिती. तीन अनाडी  आणि नकली राजकुमार  हे त्यांचे प्रकाशित बालवाङ्‌मय.

जिद्दी  ही त्यांची पहिली कादंबरी विशेष प्रभावी नाही परंतु १९४४ मध्ये त्यांनी लिहिलेल्या टेढी लकीर  या कादंबरीने त्यांना विशेष प्रतिष्ठा मिळवून दिली. या कादंबरीतील ‘शम्मन’ या नायिकेच्या चित्रणात त्यांचे स्वतःचे जीवन प्रतिबिंबित झाले असून या संबंधीचे स्पष्टीकरण त्यांनी या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या (१९६७) प्रस्तावनेत केले आहे. मासूमामध्ये चित्रपटसृष्टीचे चित्रण करताना ‘मासूमा’ या निरागस मुलीचे देहविक्रय करणाऱ्या आणि फॅशनच्या जगात स्वैरपणे वावरणाऱ्या ‘नीलोफर’ मध्ये कसे अधःपतन होते, हे त्यांनी दाखविले आहे.

पडद्यामागील घटना हेरण्याची त्यांची सूक्ष्म दृष्टी अनेक कथा-कादंबऱ्यांतून दृग्गोचर होते. एका खानदानी पण नपुंसक पुरुषाची पत्नी परिस्थितीला कशी तोंड देते, याचे प्रभावी चित्रण त्यांच्या ‘लिहाफ’ या कथेत आढळते. ‘दो हाथ’ ही त्यांची एक उल्लेखनीय कथा आहे. किताब  या लखनौहून नोव्हेंबर १९७३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मासिकातील ‘मेरी दोस्त’ या कथात्मक निबंधात त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉ, विवाहप्रथा, स्त्री-पुरुषसंबंध आणि फूटपाथवर विकले जाणारे गलिच्छ, ओंगळ वाङ्‌मय यांबाबतचे आपले विचार निर्भीडपणे व्यक्त केले आहेत.

शैतान  संग्रहातील ‘धानी बाँकें’ (१९४७) ही एकांकिका जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिली आहे. त्यांच्या इतर लेखनामध्ये मजाझ, मिंटो व अब्बास यांची त्यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे प्रसिद्ध आहेत. शख्सियात और वाकेआत जिन्होने मुझे मुतअस्सर किया (मला प्रभावित करणाऱ्या व्यक्ती) या शीर्षकाने त्यांनी लिहिलेल्या निबंधांतून त्यांचे बालपण आणि व्यक्तिमत्त्व यांवर चांगला प्रकाश पडतो.

इस्मत चुगताई यांनी आतापर्यंत अनेक पटकथा लिहिल्या असून ‘फिल्म इंडिया कॉर्पोरेशन’ तर्फे पतीच्या सहकार्याने पाच चित्रपटही निर्माण केले आहेत. दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही त्यांनी नुकतेच पदार्पण केले असून सरदार जाफरी यांच्या काव्यावर एक अनुबोधपटही त्यांनी काढलेला आहे. गर्म हवा  हा त्यांचा पारितोषिक विजेता चित्रपट असून १९७६ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा सन्मान केला. 

नईमुद्दीन, सैय्यद