सरदार जाफरी : (२९ नोव्हेबर १९१३-१ ऑगस्ट २०००). विख्यात उर्दू कवी. जन्म बलरामपूर (जि. गोंदा, उ. प्र.) येथे. बलरामपूर व अलीगढ येथे प्रारंभीचे शिक्षण घेऊन दिल्ली विदयापीठातून त्यांनी बी. ए. ची पदवी घेतली (१९३८) व लखनौ विदयापीठात एम्. ए. चा अभ्यास सुरू केला पण स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभाग व त्यामुळे भोगावा लागलेला तुरूंगवास यांमुळे शिक्षण अपूर्ण राहिले. नया दौर ह्या उर्दूमधील प्रागतिक विचारसरणीच्या आदय नियतकालिकाचे ते सहसंपादक होते. (एप्रिल १९३९). त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीची सुरूवात काही लघुकथा लिहून केली. मंझील हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९३८ मध्ये प्रकाशित झाला. तथापि त्यांना खरी लोकप्रियता मिळाली, ती त्यांच्या कांतिकारी व देशभक्तिपर काव्यरचनांमुळे. प्रथमत: डिसेंबर १९४० मध्ये व नंतर जून १९४१ मध्ये त्यांनी राजकीय चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली व तुरूंगवासही भोगावा लागला. त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व घेतले, तसेच कामगार संघटनेच्या कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी काव्याच्या माध्यमातून श्रमजीवी वर्गाच्या जीवनाचे प्रभावी चित्रण केले व बहुजन समाजामध्ये राजकीय जागृती निर्माण करण्याचे कार्य केले.

त्यांची एकूण २३ पुस्तके प्रकाशित झाली असून परवाज हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९४४ मध्ये प्रकाशित झाला. नवनवे विषय तसेच मूलगामी, कांतदर्शी नव्या कल्पना यांच्या अभिव्यक्तीसाठी त्यांनी काव्यात नवे रचनाबंध, प्रतिमा व शैलीविशेष उपयोजिले. त्यांचा दुसरा काव्यसंग्रह नयी दुनिया को सलाम (१९४८) हे दीर्घ नाटयकाव्य असून ते बव्हंशी रूपकात्मक व मुक्तछंदात आहे. त्यांचे स्वातंत्र्योत्तर काळात प्रकाशित झालेले अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह असे : आशिया जाग उठा (१९५१) हे मुक्तछंदात्मक दीर्घकाव्य, खून की लकीर (१९४९), अम्न का सितारा (१९५०), पत्थर की दीवार (१९५३), एक ख्वाब और (१९६५), पैरहन-ए-शरार (१९६६), लहू पुकारता है (१९८०) इत्यादी. जाफरींनी आपल्या काव्यातून सर्वंकष शोषण, साम्राज्यवाद तसेच अन्याय, अत्याचार यांच्या विरोधात मानवी स्वातंत्र्य व प्रतिष्ठा यांचे प्रखरपणे समर्थन केले. ह्या विश्वात हरघडी साजरा होणारा सृजनोत्सव हा त्यांच्या काव्यात वारंवार प्रकटणारा एक विषय आहे.मार्क्सवादी विचारवंत व समीक्षक म्हणूनही त्यांचे कार्य मोलाचे आहे. तरक्की पसंद अदब (१९५१), पैगंबर-ए-सुखन (१९७०), इक्बाल शनासाई (१९७७) हे त्यांचे समीक्षाग्रंथ त्यांतील मध्ययुगीन व आधुनिक साहित्यमीमांसेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. साहित्य व समाज यांच्यातील अन्योन्य संबंधांच्या अनेकविध पैलूंवर त्यांनी आपल्या समीक्षेतून मार्मिक प्रकाश टाकला आहे. याशिवाय ते किसका खून है (१९४३) हे नाटक, लखनौकी पाँच रातें (१९६४) हा निबंधसंग्रह, गालिब का सोम्नत-ए खयाल (१९९७ गालिबच्या फार्सी मस्नवींचे भाषांतर) ही त्यांची उल्लेखनीय साहित्यसंपदा होय. तसेच त्यांनी दिवाने-गालिब, दिवाने-मीर व कबीर बानी ह्या पुस्तकांचे संपदन केले. ‘तरक्की पसंद’ ह्या पुरोगामी उर्दू साहित्य चळवळीतील एक आघाडीचे कवी व विचारवंत म्हणूनही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. तरक्की पसंद चळवळीतील साहित्यिकांचा उद्देश त्यांनी पुढील वाक्यात मार्मिकपणे विशद केला आहे :‘किसी खुबसूरत मंजिल तक पहुंचनेके लिए किसी हसीन रास्तेकी तलाश मेथे ।’.

अलि सरदार जाफरींनी लेखन, ससंपादनाव्यतिरिक्त दूरदर्शनसाठी अनुबोधपट-मालिकांची निर्मिती केली. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांत मानाची पदे भूषवून मौलिक कार्यही केले. उदा. आकाशवाणी व दूरदर्शन, मुंबई येथे गुणश्री निर्माती (१९८०-८५) आखिल भारतीय प्रगतिक लंखकसंघाचे अध्यक्ष (उर्दू विभाग, १९७७-९०) जम्मू विदयापिठात अभ्यागत प्राध्यापक (१९८३) महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे संचालक व उपाध्यक्ष (१९९४ पर्यंत) चित्रपठ लेखक संघटनेचे अध्यक्ष (१९९२-९३) नया अदब (१९३९-४९) व गुफ्तगु(१९६७-८०) या दोन उर्दू वाङ्मयीन नियतकालिकांचे संस्थापक-संपादक इत्यादी.

जाफरींना साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अनेक मानसन्मान लाभले : सोव्हिएट लँड नेहरू पारितोषिक (१९६५), पद्मश्री (१९६७), पाकिस्तान सरकारतर्फे ‘इक्बाल पदक’ (१९७८), कुमारन आशान पारितोषिक (१९८३) आंतरराष्ट्रीय उर्दू अकादमीतर्फे संत ज्ञानेश्वर पुरस्कार (१९९७), तसेच उत्तर प्रदेश, आंध्र व मध्य प्रदेश येथील उर्दू अकादमींतर्फे पुरस्कार बिहार शासनातर्फे मौलाना मझरूल हक पुरस्कार (१९९७), जवाहरलाल नेहरू अधिछात्रवृत्ती (१९६८-६९), अलीगढ मुस्लिम विदयापिठाची डी. लिट्., तसेच ज्ञानपिठ पुरस्कार (१९९७).

इनामदार, श्री. दे.