शाह तुराब : (?–१७२७ –?). दक्षिण भारतातील प्रसिद्ध सुफी संतकवी. त्यांचे वडील अब्दुल लतीफ मूळचे इराणमधील सब्जावारचे रहिवासी व नुसैरी संप्रदायाचे अनुयायी होते. भारतात ते मद्रास जवळच्या तिरनामल येथे स्थायिक झाले. शाह तुराब यांचा जन्म तेथेच झाला. तुराब अली शाह, तुराब दखनी, मियॉं तुराब या नावांनीही ते ओळखले जातात.

कर्नाटकातील चिश्ती संत पीर पाशा हुसैनी यांचेकडून त्यांनी तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, रहस्यवाद, नक्षत्रविद्या इत्यादींचे ज्ञान मिळविले. ‘इल्मे-रमल’ अर्थात इस्लामी ज्योतिषविद्येतील त्यांच्या प्रावीण्यामुळे त्यांना ‘गंजुल असरार’ (रहस्यज्ञाता) ही उपाधी देण्यात आली. तुराबांचे अरबी व फार्सी भाषांवर प्रभुत्व होते. ते मराठी व संस्कृतचेही जाणकार होते. त्यांचे गुरू हुसैनी यांनी त्यांस खिलाफत (उत्तराधिकार) बहाल केली आणि कर्नाटक प्रांती धर्मप्रचाराचे कार्य त्यांच्यावर सोपविले. सुमारे एकवीस वर्षे त्यांनी धर्मप्रचाराचे कार्य केले. त्या काळात कर्नाटकाच्या अनेक नगरांवर फ्रेंच आक्रमणे झाली. तुराब यांच्या ग्रंथांमधून या आक्रमणांचा तपशील मिळत असल्याने राजकीय इतिहासाची सामग्री म्हणूनही त्या ग्रंथांना महत्त्व आहे.

तंजावरच्या प्रतापसिंह राजांच्या राजवटीत (कार. १७३९– ६३) शाह तुराब तेथे आले असताना त्यांनी समर्थ रामदासांच्या शिष्यांकडून मनाचे श्लोक ऐकले. या श्लोकांनी ते भारावून गेले. प्रत्युत्तर म्हणून त्यांनी मनसमझावन या काव्यकृतीची निर्मिती केली. अठराव्या शतकातील या वाङ्‌मयीन कृतीकडे हिंदू-मुस्लीम- ऐक्य स्थापनेच्या प्रयत्नातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून पाहिले जाते. बऱ्याच ठिकाणी विषय -निरूपण रामदासांच्या मनाच्या श्लोकांशी मिळते जुळते असल्याने मनसमझावन ही कव्यकृती मनाच्या श्लोकांचा छायानुवाद वाटते. मनसमझावनचा छंदही या श्लोकांच्या भुजंगप्रयात वा छंदाशी मिळताजुळता आहे. भाषेमध्ये फार्सी व हिंदीचे मिश्रण असले, तरी तुराब यांनी ग्रंथारंभीच ‘हिंदी भाका’ असा तिचा उल्लेख केला आहे. पुढील उदाहरणावरून मनसमझावनच्या भाषेचे स्वरूप आणि सोपेपणा सहज लक्षात येतो –

नको राम को ढूंढ चमने चमन में

न समदूर में ना तो सातों गगन में

जगा जोत इसका च है सब रुखन में

भरा आतमाराम हर-एक के तन में

शाह तुराब हे सच्चे सूफी संत होते. इतर धर्मांविषयी त्यांना घृणा नव्हती. रामायणादी हिंदू धर्मग्रंथांचाही त्यांनी अभ्यास केला होता. हिंदूंची तत्त्वज्ञानपर पारिभाषिक शब्दावली वापरून त्यांनी सुफी मताचे प्रतिपादन केले. सर्व जण एकाच ब्रह्माचे उपासक आहेत – (एक ही सनम के परसार है) हे सांगण्यावर त्यांचा भर असे. ही अभेद – भावना प्रत्यक्षात आणणारा कोणत्याही धर्माचा संत त्यांना जवळचा वाटे. तंजावर येथील हिंदू संत सतोबा महाराज यांची त्यांनी याच कारणशस्तव मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. तुराब यांच्या या व्यापक व उदार दृष्टीमुळेच त्यांना मध्ययुगीन दक्षिण भारतातील ‘हिंदलमानी’ (हिंदु-मुलसमान ऐक्य) जाणिवांना शब्दबद्ध करणारा महात्मा म्हणून ओळखले जाते.

शाह तुराब यांचे इतर काही ग्रंथ असे : जहुरे कुल्ली, गुलजारे वहदत, गंजुल असरार, मस्नवी-ए-तुराब बजवाने दखनी, नज्म ज्ञान- स्वरूप, आईन ए – कसरत, हुज्जतुल इस्लाम और मजमुए कलामे शाह तुराब.

संदर्भ : शाह तुराब, संपा., विद्यासागर, प्र. जाफर, सैयदा, मनसमझावन, हैदराबाद, 1968. 

चव्हाण, गजानन