मीर : (१७२२/१७२३–२० सप्टेंबर १८१०). एक श्रेष्ठ उर्दू कवी. मुहंमद तकी मीर ऊर्फ मीर यांचा जन्म आग्रा येथे झाला. आग्र्याचे एक प्रतिष्ठित नागरिक मुहंमद अली मुत्तकी यांचे मीर हे चिरंजीव. मीर यांचे वडील आणि वडलांचे मित्र सैय्यद अमानउल्‍लह यांच्या सहवासाने मीरवर लहानपणीच चांगले बौद्धिक संस्कार झाले. या दोघांच्या मृत्यूनंतर मात्र ते निराधार झाले. १७३४–३५ मध्ये मीर दिल्लीला होते. नादिरशाहने आपल्या आक्रमणाने दिल्ली उद्‌ध्वस्त केल्यावर मीर पुन्हा १७ एप्रिल १७३९ रोजी दिल्लीस आले. त्यावेळी ते सतरा वर्षांचे होते. दिल्लीच्या वास्तव्यात एक वर्षभर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते.

मीर त्यांचे सावत्र मामा सिराजोद्दीन खाने आरजू यांच्याकडे १७३९ ते १७४८ पर्यंत राहिले. त्यांच्या सहवासात मीर यांची काव्यकला चांगली बहरली पण नंतर काही कारणाने मामांचा व त्यांचा बेबनाव झाला आणि त्यांनी मामांचे घर सोडले.

मीर यांना समसामुद्दीला आणि राजा नागरमल यांच्यासारख्या अमीरांचा आश्रय लाभला. ते १७३४–३५ ते १७३९ पर्यंत समसामुद्दौलाकडे, १७५७ ते १७७० पर्यंत राजा नागरमलकडे आणि काही काळाने राजा जुगुलकिशोर यांच्याकडे राहिले.

मीरची कीर्ती ऐकून लखनौचे नबाब आसिफउद्दौला यांनी १७८२ मध्ये त्यांना लखनौस आमंत्रित केले. तेथेच ते शेवटपर्यंत होते.

मीर यांनी उर्दू शायरीचे गझल, मस्‌नवी, कसीदा, वासोख्‌त वगैरे प्रकार हाताळले. नबाब आसिफउद्दौलांच्या शिकारीचा विषय घेऊन ‘शिकारनामे’ नावाने ओळखली जाणारी दोन काव्येही त्यांनी लिहिली. अजगरनामा नावाची एक मस्‌नवी प्रतीककाव्याच्या रूपात त्यांनी लिहिली. या काव्यात इतर कवींनी क्षुद्र जीवजंतू कल्पून अजगराच्या एका फूत्कारानेच ते सर्व नष्ट होतात अशी मध्यवर्ती कल्पना आहे. या मस्‌नवीत त्यांचे वर्णनकौशल्य प्रतीत होते परंतु त्यांचे खरे क्षेत्र मात्र गझल हेच आहे. आजही त्यांचे नाव गझल या वाङ्‌मयप्रकाराशीच संलग्न आहे. त्यांच्या गझलांचे सहा दीवान (संग्रह) असून त्यात दोन हजारांवर गझल व सु. पंधरा हजार ‘शेर’ आहेत.

मीर यांनी त्या काळात उर्दू गझलाला आपल्या अनुपम कलात्मक शैलीने फार्सी गझलाचा दर्जा मिळवून दिला. प्रेमभावनेची अशी एकही छटा नाही, की जी त्यांच्या काव्यात रेखाटली गेली नाही. त्यांच्या काव्यातील प्रेमभावनेचा सूर उत्कट विरहभावनेचा आणि शोकार्त नैराश्याचाच आहे. त्यामुळेच त्यांचे काव्य अधिक भावोत्कट नि हृद्य झाले आहे.

त्यांच्या शायरीत त्या काळाची अराजकता आणि उद्‌ध्वस्तता यांचेही प्रभावी चित्र उमटले आहे. एका समीक्षकाच्या शब्दांत सांगायचे झाल्यास ‘मीरची गझल दिल्ली आणि दिल (हृदय) दोघांचेही शोकगीत आहे,’ असे सांगता येईल.

मीर यांची भाषा सरळ, सुबोध आणि भावनेने ओथंबलेली आहे. अरबी व फार्सी म्हणींची उर्दू रूपे तयार करून त्यांनी आपल्या भाषेत बेमालूमपणे मिसळून दिली. हिंदी-विशेषतः ब्रज भाषेतील-शब्दांच्या वापराने त्यांनी उर्दूचे माधुर्यही वाढवले. त्यांची रचनापद्धती आणि त्यांनी वापरलेली वृत्ते आज केवळ उर्दूतच नव्हे, तर हिंदी, गुजराती आणि मराठी काव्यातही रूढ होऊन लोकप्रिय झाली आहेत. मीर यांचे काव्य जितके साधे तितकेच औपरोधिक आणि धारदारही आहे. त्यात फुलांची मृदुता आहे तसेच वज्राचे काठिण्यही आहे त्यामुळे ते एकदम हृदयाला जाऊन भिडते.

मीर यांच्या दृष्टीने प्रेमभावना सर्वव्यापी आहे. 

‘‘मुहब्बत ही इस कार खाने मे है |

मुहब्बतसे सब कुछ जमाने मे है |’’

त्यांची दृष्टी व्यापक होती. एका ‘शेरा’त ते म्हणतात

‘‘उसके फरोगे हुस्न से झमके है सबमे नूर |

शम्मे हरम होया दिया सोमनात का |’’

(ईश्वराचा प्रकाश सर्वत्र आहे. काबेची मेणबत्ती असो किंवा सोमनाथाचा दिवा असो, त्या प्रत्येकात ईश्वराचा प्रकाश सारखाच झळकतो आहे).

मीर यांनी फार्सी भाषेत देखील काही ग्रंथ लिहिले. उदा., जीकरे-मिर नावाचे आत्मचरित्र. यात त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या तीस वर्षांची हकीगत आली आहे. निकातूश-शोअरा हा तजकीरा म्हणजे कवी व त्यांचे काव्य यांचा परिचयात्मक असा ग्रंथ आहे. फैजे-मीर या त्यांच्या फार्सी गद्यरचना होत. त्यांच्या फार्सी कवितांचाही एक दीवान आहे.

संदर्भ : १. अब्दुल बारी आसी, संपा. कुलियात-ए-मीर, लखनौ, १९४१.

           २. ख्वाजा अहमद फारुखी, मीर तकी मीर, अलीगढ, १९५४.

           ३. जमील जालबी, तारीखे-अदबे-उर्दू, खंड २ रा, भाग १, लाहोर, १९८२.

           ४. जील्वे अब्बासी, संपा. कुलियात-ए-मीर, दिल्ली, १९८०.

           ५. सरदार जाफरी, संपा. दीवान-ए-मीर, २ भाग, मुंबई, १९६०.

नईमुद्दीन, सैय्यद