सौदा : (सु.१७१३–१७८०). श्रेष्ठ उर्दू कवी. नाव मिर्झा मुहंमद रफी. ‘सौदा’ हे त्याने काव्यलेखनासाठी घेतलेले टोपणनाव. ‘सौदा’ ह्या शब्दाचो छंदी हा अर्थ त्याच्या स्वभावाशी जुळणारा होता. सौदाच्या जन्मसालाबद्दल निश्‍चित स्वरूपाची माहिती मिळत नाही. १६९५, १७०६, १७१३ असे वेगवेगळे सन सांगितले जातात. त्याचे वडील मिर्झा मुहंमद शफी हे मुळात शिपाई पेशाचे. पण पुढे ते हिंदुस्थानात व्यापारासाठी येऊन स्थायिक झाले. फार्सी साहित्यविश्वात प्रभावी उपरोधकार म्हणून ख्याती पावलेले, कवी नेमतखान अली यांची मुलगी सौदाची आई होय. आजोबांचे गुण सौदामध्येही उतरलेले दिसतात. सौदाचे घराणे सुखवस्तू होते. लहानपणी तो ऐषारामी जीवन जगला. फार्सी भाषा तो उत्तम प्रकारे शिकला होता. तसेच कविश्रेष्ठ शाह हातिम ह्याच्याकडून त्याने उर्दूचे ज्ञान संपादन केले होते. सौदा हा रसिक, रंगेल आणि आनंदी वृत्तीचा होता. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर, त्याच्याकडे आलेली त्यांची संपत्ती त्याने उधळून टाकली. तथापि त्यावेळी कवी म्हणून त्याचे नाव झालेले असल्यामुळे त्याला आश्रयदाते मिळत गेले. प्रथम दिल्लीचा वजीर इमादुल्मुल्क ह्याचा आश्रय त्याला मिळाला. त्याला तेथे राजकवीही करण्यात आले (सु.१७५४). दिल्लीत सौदाचे दिवस चांगले चालले असले, तरी दिल्लीत अराजकाची स्थिती निर्माण झाली होती. नादिरशाह, अहमदशाह अब्दाली, रोहिले, मराठे ह्यांच्या स्वाज्यांनी मोगल साम्राज्य खिळखिळे झाले. जुन्या अमीर-उमरावांचे वैभव उतरणीला लागले. अशा परिस्थितीत दिल्ली सोडण्याचा निर्णय सौदाने घेतला. त्याला तशी संधीही मिळाली. इमादुल्मुल्क ह्याच्याबरोबर तो फरुखाबादला आला असताना तेथील नबाब अहमदखान बंगश आणि त्याचा दिवाण मेहरबान खान ह्यांनी त्याला फरुखाबादलाच ठेवून घेतले. १७७२ च्या सुमारास सौदा फरुखबाद सोडून फैजाबाद येथे शुजाउद्दौलाच्या आश्रयाला त्याच्या निमंत्रणावरून गेला. फैजाबादेस अनेक कवी व कलावंतांच्या सहवासात सौदा रमला. शुजाउद्दौला ह्यानेही सौदाचा आश्रय कायम ठेवला. त्याने आपली राजधानी फैजाबाद येथून हलवून लखनौला नेली. सौदाही लखनौला गेला. तेथे त्याचे दिवस आनंदात गेले. त्याला मोठा शिष्यगण, मानसन्मान, धनदौलत, लोकप्रियता प्राप्त झाली. लखनौ येथेच तो मरण पावला. सौदाने जवळपास पन्नास वर्षे सातत्याने लेखन केले. सुरुवातीला तो फार्सीत कवित लिहीत होता. परंतु सिराजुद्दीन अलीखान ‘आर्जू’ (१६८९–१७५६) या कवीच्या प्रभावामुळे तो उर्दूत रचना करू लागला. त्याने अनेक काव्यप्रकार हाताळले. त्याच्या गझलांची संख्या काही हजार भरेल. वीस मस्नवी (दीर्घकाव्ये), वासोख्त (प्रेमकलहाच्या कविता), मर्सिए (हसन, हुसेन ह्यांच्यावर लिहिलेली शोकगीते), कसीदा (स्तुतिगीते), सलाम (वंदनपर गीते), मन्कबते (पैगंबर आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांच्यावरील स्तुतिपर गीते), नात (धार्मिक भजने) आणि हजो (विडंबनगीते) त्याने लिहिली. उर्दू कवितेवर त्याचा खोल ठसा उमटलेला आहे. तरल कल्पनाशक्ती आणि तिला तोलून धरणारी संपन्न शब्दकळा त्याच्यापाशी होती. कसीदारचनेवर त्याचे विलक्षण प्रभुत्व होते. फार्सी काव्यपरंपरेतील जोम आणि चैतन्य आत्मसात करून त्याने आपल्या प्रतिभावकीवर उर्दूतील कसीदारचना समृध्द तर केलीच पण तीवर आपल्या स्वतंत्र व्यक्तित्वाची मोहोरही उठविली. त्याच्या गझला म्हणजे त्याच्या आयुष्यातील विविध अनुभवांचे भावगेय आविष्कार होत. सौदाचा थोर समकालीन कवी ⇨ मीर (सु. १७२२-१८१०) ह्याच्या काव्याप्रमाणे सौदाचे काव्य नैराश्याने झाकोळून गेलेले नाही. जीवनातील दुःखे जीवनाचाच एक आवश्यक भाग समजून त्याचा स्वीकार तो करतो. त्याचा सतेज मानवतावाद, उत्तम अभिरुची, विचारांची परिपक्वता आणि भावनांची उत्कटता ह्यांचा त्याच्या गझलांमधून प्रत्यय येतो. उर्दू गझल घडविणाऱ्या कवींमध्ये त्याचा अंतर्भाव होतो.

सौदाने अनेक काव्यप्रकारांत समर्थपणे काव्यरचना केलीच पण उर्दू विडंबनकाव्याचा वा उपहासिकेचा तर त्याला जनकच म्हणावे लागेल. त्याचा स्वभावच आनंदी, रसिक होता. दिल्लीतले अराजक आणि दुःस्थिती त्याने पाहिली होती. त्या शहराच्या ह्या अवस्थेकडे त्याने उपहास-विडंबनाच्या दृष्टीने पाहिले. ज्हासाला लागलेल्या एका समाजाचे चित्र त्याने उपरोधप्रचुर लेखणीने रंगवले. मोगल शिपायांच्या घोड्यांची दैन्यावस्था वर्णन करताना तो म्हणतो की एका शिपायाच्या भुकेल्या घोड्याचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. तारका म्हणजे त्याला खायचे दाणे वाटतात. त्याला कधी बाजारात नेले, तर कसाई आणि चांभार स्वाराला विचारतात, हा घोडा आम्हाला कधी मिळणार?’ मराठ्यांशी लढण्याकरता निघालेला शिपाई लढाई सुरू झाल्यावर हातात जोडे आणि बगलेत घोडा मारून कसा घरी पळून येतो, ह्याचेही वर्णन त्याने एका कवितेत केले आहे. जिला सोडून त्याला जावे लागले त्या दिल्लीची मात्र त्याला सारखी आठवण येई. घ्उपवनापासून दूर फेकल्या गेलेल्या बुलबुलाला मी तळमळताना पाहिले आहे ! परमेश्वरा, कुणालाही आपल्या देशापासून दूर राहण्याचा प्रसंग आणू नकोसङ असे उद्गार त्याने काढले आहेत.

संदर्भ : १. पगडी, सेतुमाधवराव, उर्दू काव्याचा परिचय, मुंबई, १३६१.

           २. हुसैन, एहतेशाम, उर्दू साहित्य का आलोचनात्मक इतिहास, अलाहाबाद, १९६९.

कुलकर्णी, अ. र.