हाली

हाली : (? १८३७– ? १९१४). उर्दूतील एक कवी, समाजसुधारक आणि आद्य टीकाकार. पूर्ण नाव अल्ताफ हुसेन हाली. त्याचा जन्म पानिपत येथे झाला. अरबी व फार्सीचे शिक्षण खाजगी रीत्या तो घरीचघेत होता; परंतु वयाच्या सतराव्या वर्षी त्याच्या इच्छेविरुद्ध त्याचे लग्न करून देण्यात आल्यामुळे तो शिक्षण अर्धवट सोडून दिल्लीस पळून गेला. तेथे मात्र, त्याने एका जुन्या वळणाच्या शाळेत १८५२–५५ पर्यंत शिक्षण घेतले. घरच्या पारंपरिक वळणाचा या वेळी त्याच्यावर जबरदस्त पगडा होता, तसेच इंग्रजीविषयी मनात तिटकाराही होता. त्यामुळे त्याने कॉलेजमध्ये नाव दाखल केले नाही. या सुमारासच त्याची व गालिबची भेट झाली. गालिबने त्याच्या काव्यनिर्मितीस प्रोत्साहन दिले. १८६३–६९ पर्यंत तो मुस्तफाखान नावाच्या काव्यप्रेमी नबाबाकडे होता. १८६९ मध्ये त्याने गालिबच्या मृत्यूवर एक मर्सिया (विलापिका) लिहिला. १८७१ मध्ये त्याने लाहोर बुक डेपोत नोकरी धरली. तेथे इंग्रजी पुस्तकांच्या उर्दू अनुवादांतील दुरुस्त्या करण्याचे काम त्याच्याकडे होते. या कामामुळे त्याचा इंग्रजीशी अधिक परिचय झाला. त्या वेळी इंग्रजीचा सर्वत्र बोलबालाही होता. परिणामी तो इंग्रजी शिकण्यास प्रवृत्त झाला.

हालीच्या विशेष कर्तृत्वाची खरी सुरुवात १८७५ पासून झाली. या वेळी दिल्लीच्या अँग्लो-अरेबिक कॉलेजमध्ये एका कायमस्वरूपाच्या जागेवर त्याची नेमणूक झाली, तसेच सर सय्यद अहमद खान यांच्या चळवळीत तो सामील झाला. सर सय्यद यांच्या सूचनेवरून त्याने मुसलमानांच्या सुधारणेसाठी मद्दो-जज्रे-इस्लाम (इस्लामचा उत्कर्ष आणि ऱ्हास) हा ग्रंथ १८७९ मध्ये लिहिला. मुसलमानांमध्ये ह्या ग्रंथाने अतिशय खळबळ उडवून दिली. घरोघरी, चौकाचौकांतून व जाहीर सभांतून हा ग्रंथ वाचला व चर्चिला जाऊ लागला. अल्पावधीतच त्याच्या सोळा आवृत्त्या निघाल्या. ह्या ग्रंथामुळे त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. मुसलमान स्त्रियांच्या तत्कालीन स्थितीवर त्याने दोन ‘मस्नवियाँ’ (उर्दू काव्य-विशेष) लिहिल्या असून त्यांची नावे मुनाजातेबेवा (१८८६) आणि चुप की दाद (१९०५) ही होत. त्याने काही गद्यलेखनही केले. त्यात मुकद्दमए-शेर ओ शायरी (१८९३) हा टीकाग्रंथ आणि यादगारे गालिब (१८९७) व हयाते जावेद (१९०१) ही अनुक्रमे गालिब व सर सय्यद अहमद खान यांची चरित्रे विशेष प्रसिद्ध आहेत.

पहा : उर्दू साहित्य.

 फैजी, सुलताना (उर्दू); सुर्वे, भा. ग. (म.)