सुरुर, अल्-इ-अहमद : (७ ऑक्टोबर १९१२–९ फेबुवारी २००२). उर्दू विद्वान व समीक्षक. त्यांचा जन्म बदाऊन (उत्तर प्रदेश) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. बदाऊन येथील पोषक वाङ्‌मयीन वातावरणामुळे त्यांची काव्यात्म संवेदनशीलता विकसित झाली व शालेय वयातच ते कविता करु लागले. त्यांनी विज्ञान विषयात महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आग्रा येथील सेंट जॉन्स कॉलेजातून पदवी घेतली. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून इंग्रजी व उर्दू विषयांत एम.ए. (१९३४) झाले व पुढे त्यांनी काश्मीर विद्यापीठाची डी.लिट्. पदवी मिळविली. ते लखनौ विद्यापीठात उर्दूचे प्रपाठक होते (१९४६– ५५). नंतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठात उर्दूचे प्राध्यापक व विभाग प्रमुख (१९५८– ७३), काश्मीर विद्यापीठातील इक्बाल इन्स्टिट्यूटचे संचालक (१९६४– ६६), अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात गुणश्री प्राध्यापक अशा विविध पदांवर त्यांनी दीर्घकाळ अध्यापन कार्य केले.

सुरुर यांची ३९ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांत सल सबील (१९३५), जौक-ए-जुनून (१९५५) व ख्वाब और खलिश (१९९३) या काव्यसंग्रहांचा समावेश होतो मात्र त्यांची ख्याती मुख्यत्वे समीक्षक म्हणूनच आहे. त्यांचे समीक्षालेख व वाङ्‌मयीन निबंध समाविष्ट असलेली पुढील पुस्तके महत्त्वाची आहेत : नये और पुराने चिराग (१९४६), तनकीद क्या है (१९४७), अदब और नजरीया (१९५४), नजर और नजरीये (१९७३), मसर्रत से बसीरत तक (१९७४), पहचान और परख (१९९३), दानिश्‌वर इक्बाल (१९९४), फिक्र-ए-रोशन (१९९५). त्यांच्या या समीक्षाग्रंथांनी उर्दू साहित्यात मोलाची भर घातली आहे. ख्वाब बाकी है (१९९१) हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले. ते उर्दू अदब या त्रैमासिकाचे (कार्यकाळ : १९५०– ७४) व हमारी जबान या साप्ताहिकाचे (कार्यकाळ : १९५६– ७४) संपादक होते. याशिवाय त्यांनी अनेक संहिता व प्रबंध ह्यांचे संपादन केले. त्यांनी दिलेली मूजीब मेमोरियल स्मृती व्याख्यान (१९९०) व साहित्य अकादेमी सांवत्सरिक व्याख्यान (१९९२) ही व्याख्याने संस्मरणीय ठरली.

सुरुर यांनी उर्दूमध्ये साहित्यसमीक्षा या प्रकाराला वाङ्‌मयीन प्रतिष्ठा व स्वतंत्र दर्जा प्राप्त करुन दिला. उर्दू समीक्षेला नवी दिशा व नवी दृष्टी दिली. त्यांच्या विद्यार्थिदशेच्या काळात (१९३० च्या दशकात) उर्दू समीक्षा ही परंपराप्रियता व भावुकता यांच्या चाकोरीत अडकून पडली होती. एकीकडे सनातनी अभिजाततावादी लेखक परंपरेला घट्ट पकडून होते तर दुसरीकडे पाश्चात्त्य प्रभावाखालील स्वच्छंदतावादी आधुनिक लेखक परंपरेचा वारसा नाकारु पहात होते. सुरुर यांनी सनातनी अभिजातता व पाश्चात्त्य प्रभावातून आलेली स्वच्छंद वृत्तीची आधुनिकता यांच्यांत समतोल व समन्वय साधला व स्वतःची वस्तुनिष्ठ, भावनिर्लेप व एकात्म दृष्टिकोणाने युक्त अशी समीक्षाप्रणाली विकसित केली. उर्दू साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी बजावलेली ही कामगिरी युगप्रवर्तक व नवदिशादर्शक ठरली.

सुरुर यांना अनेक पारितोषिके व मानसन्मान लाभले. त्यांच्या नजर और नजरीये या समीक्षाग्रंथाला १९७४ मध्ये साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला. उत्तर प्रदेश उर्दू अकादेमी, प. बंगाल उर्दू अकादेमी व महाराष्ट्र उर्दू अकादेमी या संस्थांकडून त्यांना पारितोषिके मिळाली. त्यांना पद्मभूषण (१९९१) हा किताबही लाभला. साहित्य अकादेमी, नवी दिल्लीच्या उर्दू विभागाच्या सल्लागार मंडळाचे निमंत्रक (१९५४– ७२), भारतीय ज्ञानपीठाच्या उर्दू समितीचे सदस्य, ‘अंजुमन तरक्की’ उर्दू-हिंदी संस्थेचे उपाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली. रशिया, रुमानिया, हंगेरी इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या.

इनामदार, श्री. दे.