रशीद अहमद सिद्दिकी : (२४ डिसेंबर १८९२−१५ जानेवारी १९७७). आधुनिक उर्दू लेखक. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे जन्म. प्राथमिक शिक्षण जौनपूर येथे घेतल्यावर १९२१ मध्ये अलीगढ विद्यापीठातून पर्शियनमध्ये एम्.ए.ची पदवी प्राप्त केली. १९२२ मध्ये त्यांची उर्दूचे अधिव्याख्याता म्हणून व १९३४ मध्ये प्रपाठक म्हणून नियुक्ती झाली. उर्दूचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून १९५८ मध्ये सिद्दिकी सेवानिवृत्त झाले. १९६३ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब लाभला. १९७४ मध्ये साहित्य अकादेमीचा व उत्तर प्रदेश उर्दू अकादेमीचा पुरस्कार त्यांना मिळाला. अलीगढ येथे त्यांचे निधन झाले.

उरफी, गालिब आणि इक्बाल यांचे सिद्दिकी चाहते होते. अलीगढ मैगझीनमधून त्यांचे अनेक विनोदी लेख प्रसिद्ध झाल्याने सिद्दिकी विद्यार्थिदशेतच लेखक म्हणून मान्यता पावले होते. सिद्दिकींच्या विनोदात दूरान्वय, क्लिष्टता, शाब्दिक कोट्या, उत्स्फूर्ततेचा अभाव या उणिवा असल्या, तरी एकूण त्यांचे लेखन आनंद देणारे आहे. यांच्या लेखनातील विरोधाभास चमत्कृतिजनक आहे. व्यक्ती आणि वस्तू यांच्या संदर्भात ते इतक्या विभिन्न बाबी एकत्र आणतात, की त्यातून नकळत विनोद निर्माण होतो. सिद्दिकींचा विनोद विचार प्रवर्तक आहे. त्यातील उपहासाचा सूर क्वचितच कटुतेकडे झुकतो. उपरोधाचे उद्दिष्ठ एकाच वेळी वैयक्तिक आणि राष्ट्रीय असे आहे. उदा., ‘कॉन्फरन्स, कौन्सिल और कमिटियाँ’ या निबंधात असंबद्ध, निरर्थक गोष्टींत शक्ती खर्च करण्याचा आपला राष्ट्रव्यापी दुर्गुणच स्पष्ट केला आहे. ‘लीडर’, ‘एडीटर’, ‘वकील’ आणि ‘चारपायी’ (खाट) हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण असे विनोदी निबंध आहेत, चारपायी म्हणजे भारतीय जीवनाचे सर्वागीण प्रतीक आहे, असे त्यांना वाटते. भारतात जसे वेगवेगळे रोग आहेत, तसे इथल्या नेत्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, असे ते म्हणतात.

सिद्दिकी त्यांनी लिहिलेली व्यक्तिरेखाटने प्रसिद्ध आहेत. मौलाना मुहंमद अली, डॉ. झाकिर हुसेन आणि विशेषतः इक्बाल सोहेल यांची व्यक्तिचित्रे उल्लेखनीय आहेत. गालिब व आधुनिक गझल यांवरचे त्यांचे ममीक्षात्मक लेखन संस्कारवादी सर्जनशील समीक्षा म्हणून ओळखले जाते. नैतिक मूल्यांवरही ते तेवढाच भर देतात. यांच्या समीक्षेतील एक अणीव म्हणजे, जिगर व फानी यांच्यासारख्या यांच्या आवडत्या लेखकांवरची त्यांनी केलेली समीक्षा अतिशयोक्त आहे. त्यांचे प्रकाशित ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : तन्झियात व मुझहिकात, खन्दाँ(१९४०), मझामिचे रशीद (१९४१), गन्झहाये ग्रामाया (१९५१), जदीदगझल (१९५५), गालिबकी शक्सीयत और शायरी (१९७०), हमारे झकीरसाहेब (१९७३) इत्यादी.

नईमुद्दीन, सय्यद