सरशार, पंडित रतननाथ : (? १८४६ – २१ जानेवारी १९०३). लोकप्रिय आदय उर्दू कादंबरीकार. काश्मीरी बाह्मण कुटुंबात लखनौ येथे जन्म. उर्दू ही मातृभाषा तसेच अरबी, फार्सी, इंग्रजी या भाषांचेही त्यांनी शिक्षण घेतले. उच्च शिक्षण घेण्यासाठी कॅनिंग कॉलेज, लखनौ येथे त्यांनी पवेश घेतला परंतु पदवी न घेताच शिक्षण अर्धवट सोडले. प्रारंभी काही काळ त्यांनी एका शाळेत अध्यापन केले. नंतर १८७३ मध्ये अवध अखबार ह्या तत्कालीन लोकप्रिय साप्ताहिकात संपादक म्हणून ते रूजू झाले. उर्दू कादंबरीलेखनाचा सरशार यांनी पाया घातला. फिसानए-आजाद ही त्यांची पहिलीच कादंबरी विनोदी व्यक्तिरेखांच्या रूपात अवध अखबार मधून डिसेंबर १८७८ ते डिसेंबर १८७९ या कालावधीत कमशः प्रसिद्ध होत होती ती पुढे पुस्तकरूपात प्रकाशित झाली (१८८०). तिचे चार भाग असून सु. २,००० पृष्ठे आहेत. ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध, लोकप्रिय व विशेष महत्त्वाची मानली जाते. लखनौमधील तत्कालीन समाजजीवनाचे प्रत्ययकारी वास्तव चित्रण त्यात आढळते. लखनौमधील गतार्थ नबाबी परंपरा, त्यांतील भपकेबाज पोकळ डामडौल व ऱ्हसशील संस्कृती यांचे प्रभावी चित्रण त्यांनी विनोदी, व्यंगात्मक व्यक्तिरेखांच्या व्दारे केले. तत्कालीन चालीरीती, मेळे, मोहरम, तसेच सर्वसामान्य माणसाचे जीवन मोठया कौशल्याने लखनवी बोलीभाषा, वाक्प्रचार इ. वापरून त्यांनी केले आहे. कादंबरीचा नायक आजाद हा रंगेल, साहसी वृत्तीचा तरूण असून, त्याचा निष्ठावान मित्र खोजी हे विनोदी पात्र म्हणून रंगवले आहे. खोजी हा लखनौच्या तत्कालीन ऱ्हसशील संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. सरव्हँटीझच्या डॉन क्विक्झोट या कादंबरीची दाट छाप या लेखनावर आढळते. मात्र या लिखाणाला जाणीवपूर्वक कादंबरीचा रचनात्मक सुबक घाट दिल्याचे जाणवत नाही. ती रचनादृष्टया खूप सैल व अस्ताव्यस्त पसरल्यासारखी वाटते. सरशार यांच्या अन्य काही उल्लेखनीय साहित्यकृतींमध्ये जामे-सरशार (१८८७), सैरे कोहसार (१८९०), कामिनी (१८९४), बिछडी दुल्हन (१८९४), पी कहाँ (१८९४), कुडमधुम हुश्शू (१८९४), तूफान बेतमीजी (१९९४) इ. पुस्तकांचा अंतर्भाव होतो. त्यांनी काही कविताही लिहिल्या, तसेच उल्लेखनीय अनुवादही केले. त्यांच्या अनुवादित पुस्तकांत शम्स उझुहा (१८७८) हा वातावरणविज्ञानावरील इंग्रजी गंथाचा अनुवाद, अल्फ लैला (१९०१) हे अरेबियन नाइट्स चे भाषांतर व खुदाई फौजदार हे डॉन क्विक्झोट चे भाषांतर यांचा समावेश होतो.

सरशार यांची कीर्ती मुख्यत्वे उर्दूमधील गदय शैलीकार लेखक व आदय कादंबरीकार अशी आहे. उर्दू साहित्यात रजब अली सरूर हा गद्य लेखक कीर्तीच्या ऐन शिखरावर असतानाच सरशार यांची वाङ्मयीन कारकीर्द लखनौ येथे सुरू झाली. अल्पावधीतच सरूरची गदय शैलीची परंपरा मोडीत काढून सरशार यांनी स्वत:ची एक सर्वस्वी नवी गदयलेखनाची परंपरा लखनौमधील अवध पंच या नियतकालिकाशी संबंधित असलेल्या अन्य काही समकालीन लेखकांसमवेत सुरू केली. हे त्यांचे उर्दू साहित्यातील अपूर्व योगदान म्हणता येईल.

सरशार यांनी १८९५ मध्ये लखनौहून हैदराबादला (सिंध) प्रयाण केले. त्या ठिकाणी महाराजा किशन प्रसाद यांनी त्यांची एका उच्च पदावर नियुक्ती केली. सरशार यांनी त्या ठिकाणी दबदबा-ए-असिफी ह्या नियतकालिकाचे संपादनही केले. पण काही काळानंतर महाराजांचा आश्रय सोडून ते लखनौला परतले व लखनौ येथे अतिरिक्त मदयपानामुळे त्यांचे निधन झाले.

इनामदार, श्री. दे.