हक, अब्दुल : (बाबा-ए-उर्दू ). (१६ नोव्हेंबर १८७२-१६ ऑगस्ट १९६१). उर्दू भाषेचे नामवंत साहित्यिक व समीक्षक. त्यांचा जन्म गाझियाबाद (उत्तर प्रदेश) जिल्ह्यातील हपूर या गावी झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जन्मगावी घेऊन अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून ते बी.ए. झाले (१८९४). सुरुवातीस त्यांनी भारतातील ब्रिटिश सरकारच्या गृहखात्यामध्ये काही वर्षे भाषांतरकार म्हणून सेवा बजावली. पुढे त्यांना पदोन्नती मिळून त्यांची नेमणूक औरंगाबाद येथे शाळा निरीक्षक म्हणून करण्यात आली.

अलीगढमध्ये असतानाच सर सय्यद अहमद खान, शिब्ली नोमानी,टी. डब्ल्यू. आर्नल्ड, बाबू मुखर्जी, रॉस मसूद, मोहसीन उल्-मुल्क आदी तत्कालीन उर्दू साहित्यिक आणि राजनीतिज्ञ यांच्याशी त्यांचा परिचयव मैत्री झाली होती. अलीगढ येथे त्यांनी ‘अंजुमन-ई-तरक्की-ई-उर्दू’ ही संस्था स्थापन केली (१९०३). त्याचे पहिले अध्यक्ष आर्नल्ड आणि सचिव शिब्ली नोमानी होते. दक्षिणेत सतराव्या शतकात उर्दू-फार्सीला जो राजाश्रय लाभला, त्यामुळे उर्दू काव्य, मस्नवी, कसीदा यांसारखी खंडकाव्ये लिहिली गेली पण नंतर हे साहित्य दुर्लक्षित झाले. त्याला पुन्हा उजाळा देण्यासाठी अब्दुल हक दक्षिण भारतात गेले. हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठामध्ये ते उर्दू भाषा विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले.त्यांनी विद्यापीठात सर्व विषयांकरिता उर्दू माध्यमाचा आग्रह धरला व कृतीत आणला. तसेच आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे उस्मानिया महाविद्यालय सुरू केले. पुढे ते औरंगाबाद येथील उस्मानिया महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रूजू झाले व तेथून १९३० मध्ये निवृत्त झाले. अध्यापन करीत असताना त्यांनी उर्दू-इंग्रजीचा पहिला शब्दकोश तयार केला.

हक हे सुरुवातीला इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षामध्ये होते परंतु त्यांचे महात्मा गांधींशी मतभेद झाले व त्यांनी महंमद अली जिनांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगमध्ये प्रवेश केला. भारत-पाक फाळणी दरम्यान त्यांनी पाकिस्तानात स्थलांतर केले. तेथे त्यांनी उर्दू भाषेला उभारी देण्याचे काम सुरू केले. कराचीमध्ये ‘अंजुमन-ई-तरक्की-ई-उर्दू ‘ही संस्था नव्याने सुरू केली. उर्दू शाळा, ग्रंथालय यांची स्थापना केली आणि मोठ्या प्रमाणात उर्दू खंडकाव्यांचे प्रकाशन केले. त्यांच्या या प्रयत्नामुळे प्राचीन दुर्मिळ उर्दू ग्रंथांचे जतन झाले. त्यांत इंग्रजी व फार्सी भाषेतील काही अभिजात साहित्यकृतींचे अनुवाद होते. चंद हम असर, मुकद्दमात, तनकीदात ही त्यांची महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदा. उर्दू भाषेला पाकिस्तानने राष्ट्रभाषेचा दर्जा द्यावा म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले, तसेच तेथील शिक्षणाचे माध्यम उर्दू असावे म्हणूनही त्यांनी शेवटपर्यंत आग्रह धरला. उर्दूबद्दलचे त्यांचे प्रेम व कार्य पाहून जनतेने त्यांना ‘बाबा-ए–उर्दू’ ही पदवी दिली. त्यांच्या उर्दू साहित्य सेवेच्या गौरवार्थ अलाहाबाद विद्यापीठाने त्यांना डी.लिट्. ही सन्माननीय पदवी बहाल केली (१९३७).

कराची येथे त्यांचे निधन झाले.

शेख, आय्. जी.