सुलेमान खतीब : (१० फेबुवारी १९१९– ? १९७८). लोकप्रिय उर्दू कवी. चिडगुप्पा (कर्नाटक) या खेड्यात जन्म. त्यांचे मूळ नाव मुहम्मद सुलेमान व वडिलांचे नाव मुहम्मद सादिक होते. ‘खतीब’ (धर्मोपदेशक) हे त्यांचे वंशनाम. ते ‘सुलेमान खतीब’ या टोपणनावाने कवी म्हणून प्रसिद्घीस आले. खतीब हे जलव्यवस्थाविभागात नोकरीला होते तथापि त्यांनी आपले आयुष्य सर्वस्वी साहित्यसेवेला वाहून घेतल्याने त्यांचा अधिकांश वेळ साहित्याचा व्यासंग व निर्मिती यांतच व्यतीत होत असे. ते दक्षिणी उर्दूचे अर्वाचीन काळातील अत्यंत लोकप्रिय व नामवंत कवी होते व त्यांचे काव्यगायन विलक्षण प्रभावी होत असे. त्यामुळे ज्या कविसंमेलनात खतीब भाग घेत असत, तेथील रसिक श्रोते त्यांचेच काव्यगायन वारंवार ऐकण्यास उत्सुक असत. सैयद मुबारजुद्दीन ‘रफत’ यांनी धनक या शीर्षकाने खतीब यांचा काव्यसंग्रह १९६९ मध्ये संपादित व प्रकाशित केला. त्यानंतर त्यांचा दुसरा काव्यसंग्रह केवडे का बन उर्दू व हिंदी या दोन्ही भाषांत प्रकाशित झाला (१९७६).

खतीब हे कवी म्हणून जितके लोकप्रिय होते, तितकेच गद्य लेखक म्हणूनही यशस्वी ठरले. त्यांनी साहित्याच्या अनेक प्रांतांत उल्लेखनीय कार्य केले. त्यांनीच दक्षिणी उर्दूमधील मौलिक व दुर्मिळ लोकगीते (ग्रामगीते) सर्वप्रथम संशोधित व संकलित करुन लिहून काढली. मेडक व बीदर येथील खेडेगावांत ही लोकगीते अद्यापही मोठ्या आवडीने गायिली जातात. त्यांतील ‘मिट्टा मिट्टा मोटका पानी ’ आणि ‘न्योकाला आया’ ही त्यांनी संगृहित केलेली दोन सुमधुर लोकगीते अत्यंत लोकप्रिय आहेत. खतीब यांनी काव्यनिर्मिती व गद्यलेखन ह्यांबरोबरच दक्षिणी उर्दू व्याकरण व भाषिक विकास यांसंबंधीही सखोल चिंतन व अध्ययन केले.

खतीब यांच्या साहित्यात वर्तमान परिस्थितीचे यथार्थ आकलन व मूल्यमापन करुन ते सोप्या व समर्पक शब्दांत मांडण्याचे असाधारण कौशल्य व क्षमता दिसून येते. व्यंग्य दर्शन हा त्यांच्या काव्याचा आत्मा होय. त्यांच्या अनेक कवितांमध्ये व्यंग्य आशयाची समर्थ अभिव्यक्ती आढळते. ‘हिमाला की चांदी’, ‘पगडंडी’ ह्या त्यांच्या निसर्गपर कविता प्रसिद्घ आहेत. तसेच त्यांच्या ‘शायर की इज्जत’, ‘हमारे बच्चे’,‘एक कब्रस्तान – तीन मंजर’, ‘हिप्पी कट’ इ. सामाजिक आशयाच्या व्यंग्य कविता लोकप्रिय आहेत. ‘पंडित जवाहरलाल नेहरु की वसीयत’, ‘सफीरे अमन : लालबहादूर शास्त्री’, ‘प्यारा वतन हमारा’ यांसारख्या प्रभावी राष्ट्रीय कविताही त्यांनी लिहिल्या.

आजम, मुहंमद