मालवी (माळवी) बोली : राजस्थानी भाषेची ही एक बोली. माळवा भागात ती बोलली जाते म्हणून मालवी वा माळवी असे तिचे नाव पडले. माळवा, भोपवार, इंदूर, भोपाळ, कोटा आणि नर्मदेच्या पलीकडे हुशंगाबाद या भागांत मालवीभाषक आहेत. हुशंगाबादची मालवी ही परिवर्तित रूपातील मालवी आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार मालवीभाषकांची संख्या सु. साडे अकरा लाख एवढी होती. मालवी ज्या भागात बोलली जाते त्याच्या उत्तरेस जयपुरी, राजस्थानी पूर्वेस बुंदेली ही हिंदीची बोली नैर्ऋत्येस गुजराती तर वायव्येस मारवाडी राजस्थानी बोली या भाषा बोलल्या जातात. शिक्षणक्षेत्रात हिंदीचा वापर वाढल्याने मालवी बोलीचे बरेच भाषक हिंदीभाषक बनत आहेत. ग्रीअर्सनच्या १९०८ च्या सर्वेक्षणात या बोलीचे भाषक ४३ लाख होते. यावरून या बोलीवर इतर भाषांचे आक्रमण किती मोठ्या प्रमाणावर आहे ते दिसते.

मालवी बोलीचे दोन उपभेद आहेत : पहिला रांगडी किंवा राजवाडी हा. माळव्यातले राजपूत ही भाषा बोलतात. मराठीतील रांगडा या शब्दाचा यातून खुलासा व्हावा. दुसरा अहिरी हा. माळव्यातले इतर लोक ही भाषा वापरतात. मालवी बोलीत फारशी साहित्यनिर्मिती झालेली नाही. मालवीच्या लेखनात ⇨ नागरी लिपीचा वापर होतो. मालवी बोलीवर गुजरातीचा आणि हिंदीचा परिणाम झाला आहे.

मालवीतील अनेक स्वरांचे नासिक्यरंजन होते. इ, ऊ या स्वरांऐवजी अनेकदा अ येतो. उदा., दिन चा उच्चार दन, तर ठाकूर चा उच्चार ठाकर असा होतो. हिंदीप्रमाणे मालवीमध्ये हूं आणि है ही क्रियापदे आहेत. मात्र त्यांचे भूतकाळ अनुक्रमे थो आणि था, थी तर भविष्यकाळ अनुक्रमे गो आणि गा, गी असे होतात. मालवीत नपुसकलिंगी नामे नाहीत. मराठीतल्या कुठे, जेथे, इथे या क्रियाविशेषणांसाठी मालवीत अनुक्रमे कठो, जठो, अठे असे शब्द आहेत.

पहा : राजस्थानी भाषा.

संदर्भ : 1. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. lX, Part ll, Delhi, (Reprint) 1968.

             2. Sebeok, T. A. Ed. Currens Trends in Linguistics, Vol 15, Paris, 1969.

             ३. उपाध्याय, चिं. मालवी – एक भाषाशास्त्रीय अध्ययन, जयपूर, १९७४.

             ४.माहेश्वरी, हीरालाल, राजस्थानी भाषा और साहित्य, कलकत्ता, १९६०.

धोंगडे, रमेश वा.