गुलराजाणी, जेठमल परसराम : (१८८५–१९४८). प्रसिद्ध सिंधी लेखक, देशभक्त आणि समाजसुधारक. जन्म हैदराबाद (सिंध) येथे त्यांचे कार्यक्षेत्रही हैदराबाद हेच होते. सुरुवातीची काही वर्षे त्यांनी शिक्षकाचा व्यवसाय केला (१९०२–११) परंतु शाळेत विद्यार्थ्यांना देवीची प्रतिबंधक लस टोचून घेण्याची इंग्रज सरकारकडून जी सक्ती केली गेली, तिला विरोध म्हणून त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. पुढे काही वर्षे हैदराबादच्या नॅशनल कॉलेजमध्ये ते सिंधीचे प्राध्यापक होते (१९३३–४०) तथापि त्यांनी आपले जीवन प्रामुख्याने सामाजिक कार्यासाठीच वेचले.

जेठमल परसराम गुलराजाणी

तत्कालीन धार्मिक, सामाजिक, राजकीय इ. क्षेत्रांत सुरू असलेल्या विचारमंथनाचा व चळवळींचा प्रभाव गुलराजाणींच्या संवेदनशील व संस्कारक्षम मनावर पडून त्यांनी वेळोवेळी उत्स्फूर्तपणे ह्या विविध क्षेत्रांतील चळवळींचा अभ्यास केला आणि त्यांत सक्रिय भागही घेतला. सूफी व इस्लामी तत्त्वज्ञान, वेदान्त, ब्राह्मो समाज, ॲनी बेझंट यांची थिऑसॉफी–चळवळ, समाजवाद, भारतीय राष्ट्रवाद, जमीनसुधारणा चळवळ इत्यादींत त्यांनी मनापासून भरीव कार्य केले. सूफी तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारी ‘रूह-रिहान’ (१९४७) ही संस्था तसेच ‘बेझंट लॉज’ नावाची थिऑसॉफीचा अभ्यास करणारी संस्था त्यांनी हैदराबाद येथे स्थापन केली. कट्टर राष्ट्रभक्त, कुशल संघटक व उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांचा लौकिक होता.

जेठमल परसराम हे सिंधमधील पहिले समाजसुधारक होत. सिंधमध्ये सामान्य शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. त्यासाठी जमीनसुधारणेची चळवळही (हारी हलचल) त्यांनी सुरू केली. ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक ‘रौलट ॲक्ट’ विरुद्ध त्यांनी लिहिलेल्या लेखामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. होमरूल चळवळ (१९१७) सुरू झाल्यावर त्यांनी हिंदुवासी  नावाचे दैनिक काढून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जोरदार प्रचार सुरू केला.

ते एक सिद्धहस्त लेखक होते. त्यांची ग्रंथरचना पन्नासाच्यावर असून साहित्य, राजकारण, तत्त्वज्ञान, समाजवाद इ. विविध विषयांवर त्यांनी लेखन केले. त्यांची काही उल्लेखनीय वैचारिक स्वरूपाची ग्रंथरचना : मौतु आहे कोन, परलोक मां पैगम, फेलसुफी छा आहे, पैगंबर इस्लाम  इत्यादी. अब्दुल लतीफ शाह व साचाल सरमस्त या संतकवींवर त्यांनी शाह मिटाई-जी-हयाती (१९१५), साचाल सरमस्त (१९२२) व शाह जे आखाणियूं जी समुझाणी (१९२३) इ. पुस्तके लिहिली असून साचालवरच्या त्यांच्या पुस्तकास सिंधी साहित्यसमीक्षेत उच्च दर्जाचे स्थान आहे. सिंधमधील गूढवादी व सुफी संतांवर सर्वप्रथम इंग्रजीतून ग्रंथरचना करणारेही तेच होत. शेक्सपिअरच्या हॅम्लेटचे व गटेच्या फाउस्टचे त्यांनी सिंधी भाषेत अनुवाद केले तथापि ते तितकेसे यशस्वी ठरले नाहीत. एडविन आर्नल्डच्या लाइट ऑफ एशियाचे त्यांनी केलेले भाषांतर (पूरब जोती, १९३३) मात्र सिंधी साहित्यातील उत्कृष्ट गद्यकाव्य म्हणून गौरविले जाते. जेठमल परसराम हे आद्य सिंधी लघुकथालेखकांपैकी एक होत. त्यांच्या कथांतून श्रीमंत व बलदंड अशा वर्गातील स्वार्थी मनोवृत्तीचे भेदक चित्रण आढळते. आपले लेखन त्यांनी ‘सुंझो’ (गुप्तहेर) व ‘चाम्र पोश’ (बुरखाधारी) या टोपणनावांनी केले. 

त्यांची लेखनशैली साधी, सरळ व सहजसुंदर आहे. त्यांनी सिंधीमध्ये अनेक दैनिके व नियतकालिके सुरू केली, तसेच अनेक ग्रंथालयेही स्थापन केली. ‘सिंधी साहित्य (साहित) सोसायटी’च्या संस्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला. या सोसायटीसाठी लिहिलेले त्यांचे समीक्षात्मक लेखन उच्च दर्जाचे असे. त्यांचे वृत्तपत्रीय लेखनही लोकप्रिय होते. वृत्तपत्रलेखनास त्यांनी साहित्यिक दर्जा प्राप्त करून दिला. सिंधी लिपीचे अरबी लिपीत रूपांतर करण्यास दौडपोटा यांना त्यांनी कडवा विरोध केला. शिकारपूर येथे १९३१ मध्ये भरलेल्या पहिल्या सिंधी साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष होते. 

जेठमल परसराम यांनी आपल्याभोवती असंख्य सहकारी व अनुयायी जमविले परंतु स्वतःची अशी कोणती संस्था वा पंथ त्यांनी स्थापन केला नाही. प्रसिद्ध सिंधी लेखक अमरलाल हिंगोराणी हे त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एक. देशभक्त, समाजसुधारक, संघटक व विचारवंत असे बहुरंगी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या जेठमल परसरामांना सिंधी साहित्यात अत्यंत मानाचे स्थान आहे. आधुनिक सिंधी गद्याचे ते एक प्रवर्तक मानले जातात. 

हिरानंदाणी, पोपटी रा. (इं.) पोरे, प्रतिभा (म.)