बृहल्लुब्धक व लघुलुब्धक :हे मृग नक्षत्रालगतचे व खगोलीय विषुववृत्ताजवळ असलेले दोन तारकासमूह आहेत. पैकी बृहल्लुब्धक हा ठळक तारकासमूह दक्षिण खगोलार्धात मृगाच्या आग्नेयीस दिसतो. व्याघ, २ प्रतीचे [⟶ प्रत] चार, ३ प्रतीचे २ आणि काही अंधुक तारे मिळून याची कुत्र्यासारखी आकृती बनते. ⇨व्याध (होरा ६ ता. ४० मि. क्रांती – २२) हा यातील सर्वांत मोठा व आकाशातील सर्वांत तेजस्वी दिसणारा (प्रत – १.४) तारा असून तो सूर्याच्या २७ पट प्रकाश बाहेर टाकतो. त्याचा व्यास सूर्याच्या दुप्पट व सूर्यापासूनचे त्याचे अंतर ८.७ प्रकाशवर्षे आहे. हा युग्मतारा असून याचा सहचर लघुतम तारा [⟶ तारा] असून तो सु. ४९ वर्षांत व्याधाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. व्याधाच्या पश्चिमेचा बीटा (मिरझाम प्रत २), एप्सायलॉन (अध्रा) आणि डेल्टा (बेझेन) हे बृहल्लुब्धकातील तेजस्वी तारे आहेत. शिवाय यात एक चलतारा असून त्याची प्रत १.४ दिवसांत ५.९ ते ६.७ अशी बदलते. यात दोन तारकागुच्छ असून त्यांपैकी एम ४१ (एन जी सी २२८७) हा तारकागुच्छ व्याधाच्या दक्षिणेस आहे. शिवाय बृहल्लुब्धकात काही युग्मतारेही आहेत. अगदी उत्तरेकडील प्रदेश सोडता हा समूह जगात बहुतेक सर्वत्र दिसू शकतो व जानेवारीत मध्यरात्री मध्यमंडलावर (खगोलाच्या ध्रुवबिंदूंतून व निरीक्षकाच्या माथ्यावरील बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळावर) असतो.

लघुलुब्धक हा अगदी लहान तारकासमूह असून तो मृगाच्या थेट उत्तरेस, बृहल्लुब्धकाच्या ईशान्येस व उत्तर खगोलार्धात खगोलीय विषुववृत्ताच्या लगतच दिसतो. ⇨ प्रश्वा हा यातील प्रमुख तारा असून तो आकाशातील आठव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा (प्रत ०.३४) आहे. तो सूर्यापासून ११ प्रकाशवर्षे दूर आहे. तो सूर्याच्या सहापट तेजस्वी असून त्याचा व्यास सूर्याच्या २.३ पट आहे. प्रश्वा हा युग्मतारा असून त्याचा सहचर अगदी अंधुक (प्रत १३) आहे व प्रश्व्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्याला सु. ४० वर्षे लागतात. प्रश्व्याचा समावेश ⇨ पुनर्वसू नक्षत्रात करतात. याशिवाय लघुलुब्धकात प्रश्व्यालगतचा बीटा (प्रत ३) व बरेच अंधुक तारे आहेत. हा तारकासमूहही जानेवारीमध्ये मध्यरात्री मध्यमंडलावर येतो.

वरील दोन्ही तारकासमूहांच्या मधून आकाशगंगा गेलेली आहे. हे दोन्ही तारकासमूह मृगानंतर उगवतात त्यामुळे त्यांना मृगाचे शिकारी कुत्रे असे पाश्चात्यांमध्ये (मुळात ईजिप्शियनांमध्ये) संबोधण्यात येते आणि लघुलुब्धकाला (कधीकधी प्रश्व्याला) लहान आणि बृहल्लुब्धकाला (कधीकधी व्याधाला) मोठा कुत्रा म्हटले जाते. व्याध प्रश्व्यानंतर उगवतो आणि व्याधाचा उदय नाईल नदीच्या पुराशी निगडित असल्याचा समज असल्याने ईजिप्तमध्ये प्रश्व्याचा उदय ही पुराची पूर्व सूचना मानली जाई.

ठाकूर, अ.ना.